उद्योगसौदामिनी अरुणा भट (Aruna Bhat)

carasole

अरुणा अशोक भट यांना उद्योगसौदामिनीच म्हणता येईल. साधीसुधी गृहिणी ते बड्या दोन कंपन्यांची संचालक असा त्यांचा जीवन प्रवास आहे. त्या ‘भट ग्रूप’च्या संचालिका म्‍हणून कार्यरत आहेत.

अरुणा पूर्वाश्रमीच्या अरुणा हर्डीकर. त्यांचे कुटुंब नाशिक जवळच्या देवळालीचे. वडील सरकारी नोकरीत होते. त्यांच्या वारंवार बदल्या होत. पुढे ते कुटुंब पुण्यात आले आणि तेथेच स्थिरावले. अरुणा तेव्हा चौथीत शिकत होत्या. त्यांचे विद्यालयीन शिक्षण ‘अहिल्यादेवी शाळे’त तर पुढील शिक्षण ‘आबासाहेब गरवारे महाविद्यालया’त झाले, अरुणा यांना तीन बहिणी. त्यांचे लग्नापर्यंतचे आयुष्य साधेसोपे, बिना गुंतागुंतीचे होते.

अरूणा महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर अशोक भट यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. हर्डीकर आणि भट कुटुंब एकाच वाड्यात राहत असे. तेथेच अरुणा आणि अशोक भट यांचे प्रेमसंबंध जुळले. भट यांच्‍या ‘केप्र फुड्स’ या व्यवसायाची सुरुवात त्‍याच वास्तूत झाली.

भट यांचा ‘केप्र’ मसाल्यांचा व्यवसाय अशोक यांच्या आईने पासष्ट वर्षांपूर्वी सुरू केला. तत्‍पूर्वी भट कुटुंबाचा कोलकात्याला सुताच्या कापडाचा व्यवसाय होता. त्‍यांचे पती विनायकराव भट कापडाचा व्यवसाय बंद करून पुण्यात येईपर्यंत कुटुंबाचा चरितार्थ सांभाळण्यासाठी अशोक यांच्‍या आईने शिवणकाम, फराळविक्री, मसालेविक्री हे उद्योग सुरू केले. विनायकराव पुण्यात परत आल्यानंतर त्यांनी त्या व्यवसायाची क्षमता बघितली आणि तेही त्‍या व्‍यवसायात सक्रीय झाले. त्‍यांनी मुंबई मार्केटमध्ये जाऊन मसालेविक्री सुरू केली. त्‍या व्यवसायाचा जम बसत असतानाच त्यांचे निधन झाले. त्यावेळी अरुणा यांचे पती अशोक भट केवळ अकरा-बारा वर्षांचे होते. अरुणा सांगतात, “सासू-सासरे, तिन्ही नणंदा, माझे पती या सर्वांचे कष्ट त्या व्यवसायात झाले आहेत. नणंदा आणि माझे पती शिक्षण करता करता घरच्या व्यवसायात काम करत असत- कच्चा माल बाजारातून आणण्यापासून पॅकिंगपर्यंत सगळे घरातच होत असे. फक्त मसाले, पापड यांसाठी सात-आठ बायका कामाला असत.’” पुढे व्यवसायाचा व्याप वाढल्यावर कोंढव्याला जागा घेऊन ‘केप्र फूड्स’ची फॅक्टरी उभारण्यात आली.

अशोक यांनी निर्माण केलेली ‘ए.व्ही भट आणि कंपनी’ ही बांधकाम व्यवसायात नाणावलेली कंपनी. ‘गोपाळ हायस्कूल’ला १९६६ मध्ये चाळीस-पन्नास खोल्यांचा वाडा विकायचा होता. त्या वाड्याचे नुतनीकरण केले तर लोकांची राहण्याची सोय होऊ शकते, या कल्पनेने ए.व्ही. भट यांनी तो विकत घेतला आणि बांधकाम व्यवसायाची मुहूर्तमेढ झाली. पुण्यात प्रथमच ओनरशिप फ्लॅटच्या संकल्पनेचा पाया रोवला गेला. त्‍यानंतर १९७० साली मातृकृपा, त्यानंतर गंधर्वनगरी, सरितानगरी, रम्यनगरी अशा स्कीम्स बांधून पुण्याच्या कक्षा रुंदावल्या. त्या कंपनीने वाड्यात राहणा-यास पुणेरी माणसांना फ्लॅटमध्ये राहण्याची सवय लावली असे ते म्हणत.

अरुणा सांगत होत्या, “मी लग्नानंतर घरातील व्यावसायिक वातावरण प्रथमच बघत होते. व्यवसायात वेळेचे बंधन नसते, कंटाळा करून चालत नाही. मोठी ऑर्डर आली तर स्वतःच्या प्रकृतीच्या वगैरे सगळ्या अडचणी बाजूला ठेवाव्या लागतात. मी ते सर्व माझ्या सासुबार्इंना करताना बघितले आहे. सासुबाई थकल्यावर मी कंपनीत पार्टनर झाले. माझ्यासमोर त्यांचाच आदर्श आहे.”

अशोक यांच्या व्यवसायाचा मोठा विस्तार त्या काळात झाला. भट आणि त्यांचे फॅमिली फ्रेंड बँकॉकला फिरायला गेले असता तेथील हॉटेल इंडस्ट्रीचे उत्तम भवितव्य बघून त्‍यांनी त्या क्षेत्रातही उतरण्याचे ठरवले. पाचशे रुम्सच्या फाइव्ह स्टार हॉटेलचे सर्व प्लॅनिंग केले गेले. जमिनीचा व्यवहार पूर्ण केला, प्लॅन तयार झाले. कर्जाची उभारणी चालू झाली होती. त्याचबरोबर केप्र, ए.व्ही. भट याही व्यवसायांचा विस्तार मोठा वाढला होता. परंतु अशोक भट व्यवसायाच्या यशाच्या शिखरावर असताना, दुर्दैवाने १९९० साली त्यांचे अपघाती निधन झाले. काही घरबांधणी योजना अर्धवट स्थितीत होत्या. बँक लोन्स एकदम डोंगराएवढी झाली. मित्रमंडळी दुरावली. काही पार्टनर्सनी या परिस्थितीचा गैरफायदा घेतला.

अरुणा सांगत होत्या, “माझ्यावर दुर्दैवाचा मोठा आघात झाला होता. अचानक माझ्या शिरावर व्यवसायाची सगळी जबाबदारी आली. मला वैयक्तिक दुःख दूर सारून त्या परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा हाच विचार करावा लागला.”

अरूणा यांनी त्‍या खडतर परिस्थितीला खंबीरपणे तोंड दिले. अशोक भट यांनी जे कष्ट केले, ध्येय ठेऊन काम केले, कर्तृत्व गाजवले, लोकांचा विश्वास मिळवला, तो सर्व जपण्यासाठी अरुणा भट खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यांनी प्रामाणिक राहून कामाला सुरुवात केली. अरुणा यांनी सर्व आर्थिक व्यवहार पुढील दहा-बारा वर्षांत पूर्ण केले. स्वत:कडे ‘केप्र फूड्स’ आणि ‘ए.व्ही भट बिल्डर्स’ हा बांधकाम व्यवसाय ठेवला. काही जमिनी विकून फायनान्सर्स, पार्टनर्स यांचे हिशोब चुकते केले. बँकांची कर्जे फेडली. बांधकाम व्यवसायातील पैसे कर्ज फेडण्यासाठी वापरल्यामुळे चालू कामे बंद पडली. त्यात ‘केप्र’च्या काही मार्केटिंगच्या लोकांनी फसवले. परंतु त्यांनी धीराने आणि नेटाने मार्ग काढला. त्या सगळ्यातून बाहेर पडण्यास पंधरा वर्षे लागली. त्यांनी कल्पकतेची आणि कौशल्याची जोड देऊन व्यवसाय पुन्हा भरभराटीला आणला.

अरुणा यांचा मुलगा केदार भट त्या व्यवसायाची धुरा सांभाळत आहे. तो आईवडिलांचा वारसा सांभाळत आहे. काळाची गरज ओळखून ‘झटपट स्मार्ट स्पाइसेस’सारखी उत्पादने बनवत आहे. अरुणा म्हणतात, “मी त्याच्याबरोबर असते, गरज भासेल तेव्हा त्याला ‘गाईड’ करते. व्यवसायाचा बराच भाग केदारने हाती घेतला, याचे मला समाधान आहे.”

‘ए.व्ही. भट’ म्हटले, की त्यांच्या योजना मुख्यत्वेकरून मध्यमवर्गीयांसाठी असतात हे समीकरण बाजूला सारत केदार भट याने ग्राहकांची गरज आणि आवड ओळखून क्लब हाऊस, स्विमिंग पूल, केल्व्हर अॅमॅनिटीजने सज्ज अशा योजना सुरू केल्या आहेत. त्या सगळ्यामध्ये आवर्जून उल्लेख करावा अशी गोष्ट म्हणजे ‘टॉप टेरेस डेव्हलपमेंट’. मध्यमवर्गीयांना ही सुविधा उपलब्ध करून देणाऱ्यांमध्ये केदार हा पहिलाच असेल असे अरुणा भट म्हणतात. केदारने सर्व स्तरांतील ग्राहकांसाठी घरांच्या योजना आणल्या आणि त्या यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत. “नवीन पिढीला व्यवसायाची धुरा अशा पद्धतीने सांभाळताना बघून, अतिशय आनंद होतो आणि अभिमानही वाटतो.” असे अरूणा भट आवर्जून सांगतात.

अरुणा घरात कुटुंबात रमतात. त्या म्हणतात, “आजच्या मुली स्मार्ट, हुशार आहेत, त्या मन लावून काम करतात. खरंतर त्यांना जास्त व्यग्रता आहे. पण तरीही त्यांना सांगावेसे वाटते, की कुटुंब ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे! नाती सांभाळा, तुम्ही बाहेरचा त्रास सहन करता तशाच घरातील माणसांनाही सांभाळा. स्त्रियांनी व्यवसायात जरूर यावे. आयुष्याप्रमाणे व्यवसायातही लहानमोठे चढउतार असतात. ते स्वीकारून, न डगमगता त्यातून मार्ग काढण्याची तयारी ठेवली पाहिजे. माणूस विचार करू शकतो त्यापेक्षा खूप वेगळे प्रश्न, वेगळ्या समस्या मार्गात उभ्या राहू शकतात. त्यावर मात करत जिद्दीने आणि आणि प्रामाणिकपणे यशाची शिखरे सर केली पाहिजेत.”

– अंजली कुलकर्णी

About Post Author

1 COMMENT

Comments are closed.