इवलेसे रोप लावियले दारी…

0
45

– विनता कुलकर्णी, इलिनॉय, अमेरिका

BMM Logoपु. ल. देशपांडे मराठी माणसाबद्दल एक गोष्ट सांगत. एक लहान बेट होतं आणि तिथे दोन मराठी माणसं राहायची आणि त्यांची तीन मराठी मंडळे होती. प्रत्येकाचे एक आणि दोघांचे मिळून एक. या मराठी मनोवृत्तीला छेद देत १९८१ साली शिकागो मध्ये कै. शरद गोडबोले, कै. विष्णु वैद्य आणि सौ. जया हुपरीकर यांच्या पुढाकाराने उत्तर अमेरिकेतील विविध शहरांमध्ये अस्तित्वात असणाऱ्या सर्व मराठी मंडळांना एकत्रित आणण्याच्या उद्देशाने बृहन्महाराष्ट्र मंडळाची स्थापना केली. आजमितीस विविध राज्यांमध्ये एकूण ४२ मराठी मंडळे सभासद आहेत.
 

(अमेरिकेतील आद्य महाराष्ट्र मंडळाच्या आणि बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या संस्थापकांच्या कार्याचा परिचय)

– विनता कुलकर्णी, इलिनॉय, अमेरिका

सामाजिक संस्थेचा इतिहास म्हणजे तीमधील कार्यकर्त्यांची प्रयत्नशीलता, तत्कालीन परिस्थिती, संस्कृती यांच्या जडणघडणीच्या पाऊलखुणा आणि पुढे जाणार्‍यांसाठी मशाल असते. शिकागो महाराष्ट्र मंडळ हे बेचाळीस वर्षांची परंपरा असलेले अमेरिकेतील आद्य मराठी मंडळ. उत्तर अमेरिकेतील सर्व मराठी मंडळांसाठी संघटित मंच असावा ह्या उद्देशाने निर्मिलेल्या बृहन्महाराष्ट्र (बृ.म.) मंडळाच्या संस्थापनेत शिकागोचे कार्यकर्ते कै. विष्णू वैद्य, कै. शरद गोडबोले आणि सौ. जया हुपरीकर ह्यांचा पुढाकार आहे. तसेच ह्या संस्थापक त्रयींच्या सामाजिक कार्यात इतर स्वयंसेवकांबरोबर त्यांना मोलाचे सहकार्य मिळाले स्वत:च्या घरातून – अर्थात्‌ प्रभा वैद्य, अनिता गोडबोले आणि शंकर हुपरीकर ह्यांच्या सहभागातून.

छायाचित्रात डावीकडून श्री व सौ.- हुपरीकर, गोडबोले आणि वैद्य दांपत्यशरद गोडबोले हे मूळचे गुजरातमधील बडोदा शहराचे रहिवासी. अनिता गोडबोले यांचे महाराष्ट्रातील धुळे हे गाव. अनिता यांचे बी.ए. पदवीपर्यंतचे शिक्षण मुंबईच्या विल्सन महाविद्यालया त झाले. शरद गोडबोले यांनी इलेक्ट्रिकल इंजिनीयरिंगचे – पदवीशिक्षण पूर्ण करून मुंबईस टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च येथे पाच वर्षें काम केले. गोडबोले १९६१ साली सप्टेंबरमधे शिकागोत आले. त्यांचे बंधू – रमेश गोडबोले त्यावेळी युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो मधे पीएच्‌.डी. पदवीसाठी अध्ययन करत होते. ते दोघे हाईड पार्क भागात राहात असत. युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोतील इंडिया असोसिएशनमधे शरद आणि रमेश गोडबोले (१९६१ ते १९६३) सहभागी झाले. त्यांचा युनिव्हर्सिटीत अनेक भारतीय विद्यार्थी आणि कलाकार यांच्याशी परिचय झाला. महाराष्ट्रातील नामांकित लेखक कै. बाळ गाडगीळ तेव्हा मॅडिसन विद्यापीठात शिकवत होते. त्यांच्याशी गोडबोलेबंधूंची मैत्री जुळली. बाळ गाडगीळ यांनी ‘शिकागो – चोराची आळंदी’ हा लेखही (१९६२) महाराष्ट्रातील एका मासिकात प्रकाशित केला होता. गोडबोलेबंधू आणि देवबंधू यांचा त्या लेखात उल्लेख होता. शरद गोडबोले १९६३ मधे ’द प्लेन् (Des Plaines) येथील ’न्युक्लिअर शिकागो कॉर्पोरेशन’ मधे इलेक्ट्रिकल इंजिनीयर पदावर रुजू झाले. त्यांनी शिकागोच्या उत्तरेस उपनगरात घर घेतले आणि त्यांच्या पत्नी अनिता मुलीसह  (पद्मजा) भारतातून शिकागोत आल्या.
 

भारतातून अमेरिकेत स्थलांतरित झाल्यावर, अमेरिकेतील इतर मराठी/भारतीय व्यक्तींशी कसा परिचय होत गेला ह्याबद्दल अनिता गोडबोले सांगतात-

“आम्ही अमेरिकेत नव्याने येणार्‍या, स्थायिक होणार्‍या मराठी व्यक्तीची मानसिकता अनुभवली होती. अमेरिकेत मराठी भाषकांची संख्या मोजकी होती. आम्ही युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोच्या आंतरराष्ट्रीय हाउसमधे भारतीय विद्यार्थ्यांना भेटण्यास जात असू. आमच्या घरी शरदने १९६४मध्ये दिवाळीला काही मराठी विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या इतर दोस्तांना आमंत्रित केले. आम्ही त्यानंतरही पुढे काही वर्षे, दर दिवाळीला भारतीय विद्यार्थ्यांना दिवाळीला घरी बोलावत असू. आम्ही १९६५मधे दिवाळीनिमित्त युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोच्या आंतरराष्ट्रीय हाउसमधे मराठी लोकांचा एकत्रित कार्यक्रम आयोजित केला. त्या कार्यक्रमास तीन मराठी कुटुंबे आणि बाकी बत्तीस लोक उपस्थित होते. त्यांतले काही आय.आय.टी.(मुंबई)चे पूर्वीचे विद्यार्थी होते. शिकागोच्या विवेकानंद वेदांत सोसायटी चे स्वामी भाष्यानंद हे मराठी भाषक होते. आमंत्रितांमध्ये तेदेखील सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.
 

पंधराव्या द्विवार्षिक मेळाव्यातील आनंदक्षण.“शं.ना.नवरे यांच्या कथाकथनाचा कार्यक्रम १९६६मधे शिकागोला दिवाळीनिमित्त झाला.
 

“त्याचवर्षी Peace Corps च्या वतीने सत्तर अमेरिकन मुंबईला भेट देणार होते. आम्ही सात जणींनी त्यांना मराठी शिकवण्यास शिक्षिका म्हणून काम केले. आमची एक विद्यार्थिनी होती लिलियन कार्टर. ती त्यानंतर निवडून आलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांची आई.
 

“त्याच सुमारास, म्हणजे १९६६च्या सप्टेंबरमधे हुपरीकर दांपत्य मुंबईहून शिकागोला आले. भारतात असताना शंकर हुपरीकर ह्यांनी बायोकेमिस्ट्रीमधे पीएच.डी. पदवी मिळवली तर जया हुपरीकर ह्यांनी मायक्रोबायोलॉजीमध्ये एम.एस्‌सी. केले होते. शंकर हुपरीकर हे ईव्हन्स्टन हॉस्पिटलमध्ये ’रिसर्च फेलो’ पदावर आणि जया हुपरीकर क्लिनिकल लॅबमध्ये कामावर रुजू झाले.

मराठी मंडळांची संकेतस्‍थळे

डल्‍लास फोर्टवर्थ मंडळ महाराष्‍ट्र मंडळ विशाखापट्टणम् ह्यूस्‍टन महाराष्‍ट्र मंडळ महाराष्‍ट्र मंडळ लंडन महाराष्‍ट्र मंडळ न्‍यूयॉर्क महाराष्‍ट्र मंडळ ऑफ डेट्रॉइट
महाराष्‍ट्र मंडळ बे एरिया कोलंबस महाराष्‍ट्र मंडळ महाराष्‍ट्र मंडळ पिटस्बर्घ महाराष्‍ट्र मंडळ एटलांटा महाराष्ट्र मंडळ लॉस एंजल्स महाराष्ट्र मंडळ सिऍटल

“शरद गोडबोले यांच्या पुढाकाराने सुमारे साठ मराठी लोकांनी शिकागोत एकत्र येऊन दिवाळी १९६७ साली साजरी केली. महाराष्ट्रातील प्रसिध्द कवी विंदा करंदीकर तेव्हा युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमधे शिकवत होते. त्यांनाही दिवाळीस आमंत्रित केले होते. विंदा करंदीकरांचा काव्यवाचनाचा कार्यक्रम रंगला. हुपरीकर, प्रचंड, कुलकर्णी, भोराडे आणि अन्य काही उपस्थित कुटुंबीयांनी त्या कार्यक्रमाच्या संयोजनात मदत केली.
 

शिकागो मंडळाच्या निर्मितीची कल्पना कशी आकारास आली ह्याबद्दल जया हुपरीकर सांगतात:

“वेदांत समाजाच्या जागेत आम्ही एकत्र जमत असू. त्यातून आमचे आनंदददायी सामाजिक मंडळ आकारास येत गेले. आम्ही १९६८च्या आसपास ‘भारत इन्वेस्टमेंट क्लब’ची स्थापना केली. उद्देश होता अमेरिकन शेअर बाजाराची माहिती आणि आर्थिक गुंतवणूक. वास्तविक आमचा क्लब हे सोशल नेटवर्क होते. दर महिन्याला होणार्‍या बैठकीच्या निमित्ताने आम्ही दहा मराठी कुटुंबे जेवणासाठी एकत्र जमत असू. कालांतराने, आमच्या क्लबने मराठी मंडळ स्थापण्याचा निर्णय घेतला. शिकागो मराठी मंडळाची स्थापना अतिशय उत्साहाने १९७०मध्ये झाली.
 

“मणेरीकर मंडळाचे पहिले अध्यक्ष आणि अनिता गोडबोले उपाध्यक्ष. मणेरीकरांच्या अध्यक्षपदाखाली आणि सर्व दहा मराठी कुटुंबीयांच्या मदतीने पहिल्या वर्षी मंडळाचे पाच मुख्य कार्यक्रम झाले- मकर संक्रांत, गुढी पाडवा, उन्हाळी सहल, गणेशोत्सव, आणि दिवाळी. शिकागो मंडळात दरवर्षी पाच कार्यक्रमांची प्रथा चालू आहे. आणखी काही विशेष कार्यक्रमही होत असतात. सुधीर फडके यांच्या गायनाचा कार्यक्रम १९७१मध्ये मंडळाच्या दिवाळीनिमित्त चांगलाच रंगला.”
 

नुकत्‍याच पार पडलेल्‍या अधिवेशनात डेलावेर मराठी मंडळाचे अध्यक्ष श्री. आशिष चौघुले यांची बृहन्‍महाराष्‍ट्र मंडळाचे अध्‍यक्ष म्‍हणून निवड करण्‍यात आलीशिकागो मंडळाची ना नफा तत्त्वावर अधिकृत संस्थास्वरूपी नोंदणी झाल्यानंतर १९७०मधे जया हुपरीकर यांच्या पुढाकाराने आणि संपादनाखाली गोपाल प्रचंड, पुष्पा प्रचंड, धनंजय जोशी आणि प्रभाकर भोसले यांच्या मदतीने शिकागो मंडळाच्या ’रचना’ ह्या मुखपत्राचा पहिला दिवाळी अंक हस्तलिखित स्वरूपात प्रकाशित झाला. गेली बेचाळीस वषें शिकागो मंडळ ’रचना’-नियतकालिक प्रकाशित करते. साधारण त्याच सुमारास, १९७०मध्ये विष्णू वैद्य पुण्याहून अमेरिकेत आले.

प्रभा वैद्य सांगतात:

’’विष्णू वैद्य यांनी भारतामध्ये मेकॅनिकल इंजिनीयरिंगची पदवी मिळवली. ते अमेरिकेच्या आर्थिक सुबत्तेबद्दल कुतूहल आणि अमेरिकी औद्योगिक क्षेत्राची ओढ ह्या दोन मुख्य कारणांनी भारतातून, अमेरिकेत आले. पण त्यावेळी अमेरिकेच्या आर्थिक विश्वात मंदी होती. वैद्यांनी नोकरीच्या शोधात कॅलिफोर्निया, न्यू यॉर्क, फिलाडेल्फिया असा प्रवास केला. शेवटी एक वर्षानंतर, त्यांना शिकागोमध्ये नोकरी मिळाली. मी डॉक्टर आणि विष्णू इंजिनीयर असल्यामुळे आमच्या नोकरीव्यवसायास भरपूर संधी असलेल्या शिकागो शहरात स्थायिक होण्याचे आम्ही ठरवले. मी आमच्या मुलांसह (स्वाती -वय वर्षे तीन आणि अजित- वय वर्षें दीड) शिकागोत आले.’’
 

विष्णू वैद्यांनी दोन-तीन वर्षांतच सामाजिक कार्यात लक्ष द्यावयास सुरुवात केली. त्यांना भारतीय संगीताची आवड; तसेच, मराठी समाजासाठी आपण काहीतरी करायला हवे, मराठी उद्योजकतेस प्रोत्साहन द्यायला हवे असे त्यांना वाटे. त्यांनी मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी १९७६साली स्वीकारली तर प्रभा वैद्य यांनी १९८४साली. वैद्य कुटुंबाच्या घरी प्रभा अत्रे, उत्तरा केळकर आणि इतर काही कलाकारांच्या गायनाचे कार्यक्रम झाले. हृदयनाथ मंगेशकर, बाबासाहेब पुरंदरे , मोहन आगाशे, पद्मजा फेणाणी इत्यादींच्या कार्यक्रमाच्या व्यवस्थापनातही विष्णू वैद्यांचा सहभाग होता. शिकागोतील काही अन्य संस्था उदाहरणार्थ: हिंदू टेंपल ऑफ ग्रेटर शिकागो , लिटल इंडिया फाउंडेशन, फेडरेशन ऑफ इंडिया असोसिएशन यांच्या कार्यकारिणीचेही ते सदस्य होते.

 

बोस्टन अधिवेशनाचे प्रमुख संयोजक - बाळ महाले भगवा झेंडा फडकवीताना त्यांच्या सहकाऱ्यांसोबत
जया हुपरीकर सांगतात:“शिकागो मंडळ म्हणजे आम्हा सर्वांना एकत्र कुटुंबासारखे झाले होते. सगळ्यांची भावना प्रत्येक कार्यक्रम घरचा असल्याची असे. १९८०पर्यंत शिकागोमधे भारतीय किराणाची दुकाने, रेस्टॉरंट्स नव्हती. त्यामुळे कार्यक्रमाची तयारी, व्यवस्थापन आणि उपस्थितांच्या जेवणाची – बनवण्यापासून वाढण्यापर्यंत- सर्व व्यवस्था आम्हा स्वयंसेवकांना स्वत: करावी लागे. आम्ही सर्वही सहकुटुंब मंडळाच्या कामात सहभागी होत असू. गणपतीच्या कार्यक्रमाला सुमारे साडेतीनशे लोकांच्या जेवणाचा अंदाज कधी कमीही पडत असे. पण एकंदर सर्व कार्यक्रम आनंदात आणि उत्साहात पार पडत. मंडळाचे कार्यक्रम हीच आमची मुख्य ‘अॅक्टिविटी’ बनून गेली होती. शिकागोत मराठी लोकांची संख्या १९८०- नंतर जरा वाढली. नवीन लोक मंडळाच्या कार्यकारिणीत सहभागी होऊ लागले. आणि मग आमच्या पिढीतल्या बहुतेकांनी मंडळाच्या प्रत्यक्ष कामकाजातून निवृत्ती घेतली. स्थलांतरित महाराष्ट्रीयन आणि मंडळ सदस्य, तसेच कार्यक्रमांस उपस्थित राहणा-यांच्या संख्येत १९९०च्या सुमारास लक्षणीय वाढ झाली. त्या अनुषंगाने, मंडळाच्या कार्यक्रमांचे घरगुती कौटुंबिक स्वरूप बदलत जाऊन RSVP, कार्यक्रमांना तिकिट्स, भोजनासाठी केटरर्स असे स्वरूप आले.’’
 

सांस्कृतिक, संगीत कार्यक्रमांबरोबर अमेरिकेतील नाट्यमंचावर मराठी नाटकांचे प्रयोगही होऊ लागले. शंकर हुपरीकर यांच्या पुढाकाराने, स्थानिक कलाकारांसमवेत शिकागोत नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या नाट्यगृहात मंडळाचे आणि अमेरिकेतील पहिले तीन अंकी- मराठी नाटक- ‘प्रेमा तुझा रंग कसा’ १९७१ मध्ये सादर केले गेले. हुपरीकर यांनी १९७० ते २००३ सालापर्यंत – तेहत्तीस वर्षे शिकागो मंडळात नाट्य दिग्दर्शन आणि नाटकात प्रमुख भूमिका असे दोन्ही ‘रोल्स’ समर्थपणे सांभाळले. अपवाद फक्त एक वर्षाचा – हृदयावर शस्त्रक्रिया आणि गुडघेदुखीमुळे त्या वर्षी हुपरीकरांनी नाटकात भूमिका केली नाही; मात्र त्या नाटकाचे दिग्दर्शन केले. एकांकिका असो वा दोन-तीन अंकी, दरवर्षी नाटक हे शिकागो मंडळाचे अविभाज्य आकर्षण ठरले.
 

सौ. जया हुपरीकर - संस्थापक सदस्य,  बृहनमहाराष्ट् मंडळाच्या सर्वसाधारण सभेला आवर्जून उपस्थित होत्या.हुपरीकरांच्या नेतृत्वाखाली १९७६मध्ये ‘कथा कुणाची व्यथा कुणा’ ह्या नाटकाचे मिल्वॉकी आणि डेट्रॉईट येथेही प्रयोग झाले. अमेरिकेत दुसर्‍या गावी जाऊन केलेले बहुधा ते पहिले मराठी नाटक. त्यानंतर पुढे काही वर्षें शिकागोतील मराठी नाटकांचे प्रयोग अमेरिकेत इतर राज्यांमध्ये आणि टोरांटो (कॅनडा)च्या मराठी भाषक मंडळामधेही झाले. शिकागो मराठी मंडळाच्या नाट्यपरंपरेच्या रौप्य वर्षानिमित्त पहिल्या वर्षी केलेल्या ‘प्रेमा तुझा रंग कसा’चा नाट्यप्रयोग पुन्हा सादर केला गेला. ‘नटसम्राट’ नाटकाचे एकंदर सहा प्रयोग केले. एका वर्षी शिकागोत हुपरीकर आणि कलाकारांनी सुंदर कवितांच्या चाली लावून ’कट्यार काळजात घुसली’ नाटकातील केवळ रागमालिकेवर दीड तासांचा प्रवेश सादर केला. त्याला रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.
 

हुपरीकर सांगतात:

“ मी माझ्या नाट्यदिग्दर्शनाखालील सर्व नाट्यप्रयोग महाराष्ट्र मंडळ (शिकागो) ह्या संस्थेच्या बॅनरखाली आणि त्यातील हौशी आणि कसलेल्या कलाकारांना बरोबर घेऊन केले. सगळ्यांच्या संघटित परिश्रमाने ताकदीचे नाटक उभे राहू शकते हे पटवून दिल्यामुळे कोणालाही न दुखावता सांघिक आणि खेळीमेळीच्या वातावरणात आमचे सर्व नाट्यप्रयोग होतं.’’
 

बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या स्थापनेची कल्पना कशी आकारास आली याबाबत विचारल्यावर प्रभा वैद्य म्हणाल्या:

“शिकागो मराठी मंडळाचा चांगला जम १९८०च्या सुमारास बसला होता. कालांतराने, अमेरिकेतील इतर काही राज्यांत मराठी मंडळे स्थापन करताना शिकागो मंडळाच्या संस्थापकांच्या अनुभवांची काहीजणांना मदतही झाली. तेव्हा मग उत्तर अमेरिकेतील सर्व मराठी मंडळांना एकत्रित आणण्याच्या दृष्टीने विष्णू वैद्य यांनी शरद गोडबोले आणि जया हुपरीकर ह्यांच्यापुढे बृहन्महाराष्ट्र (बृ. म.) मंडळाची कल्पना मांडली. तिघांनी त्यावर बराच विचारविनिमय करून कार्याचा आराखडा तयार केला. उद्देश होता उत्तर अमेरिकेतील सर्व मराठी भाषकांचे संघटन, अमेरिकेतील आणि महाराष्ट्रातीलही कलाकारांना प्रोत्साहन, कलागुणांची देवाणघेवाण, महाराष्ट्रातून अमेरिकेत नवीन स्थलांतरित आणि विद्यार्थी यांना आवश्यक ते मार्गदर्शन/मदत करणे, इत्यादी.’’

आणखी काही मराठी मंडळे

महाराष्ट्र मंडळ वॉशिंग्टन डी.सी.

न्यू इंग्लंड मराठी मंडळ

महाराष्ट्र मंडळ मिल्वौकी

महाराष्ट्र मंडळ सिंगापुर

मराठी मंडळ सिडनी

ओरेगॉन मराठी मंडळ

मराठी मंडळ टांपा बे

मराठी भाषिक मंडळ टोरोंटो

टोकियो मराठी मंडळ

महाराष्ट्र मंडळ मेलबर्न – व्हिक्टोरिया

महाराष्ट्र मंडळ जॅक्सनविल फ्लोरिडा

महाराष्ट्र मंडळ बंगलोर

ब्लुमिंगटन-नॉर्मल मराठी मंडळ, आयएल, संयुक्त संस्थाने

विविध मराठी मंडळांचे प्रतिनिधी सभेला आवर्जून उपस्थित होते.विष्णू वैद्य, शरद गोडबोले आणि जया हुपरीकर ह्या तिघांनी १९८० मधे बृहन्महाराष्ट्र मंडळाची स्थापना केली. ‘बृहन्महाराष्ट्र वृत्त’ (बृ. म. वृत्त) हे बारा पानांचे मंडळाचे मुखपत्र हस्तलिखित स्वरूपात त्याच वर्षी सुरू झाले. त्यात मुख्यत्वे महाराष्ट्रातील घटनांबद्दल आणि उत्तर अमेरिकेतील मराठी समाजासंबंधित काही वार्ता यांचा समावेश असे. ‘बृ. म. वृत्ता’ची रूपरेषा, मांडणी, लेखन, संपादन ह्या सर्व जबाबदार्‍या जया हुपरीकर सांभाळत असत. त्या काळात ‘बृ. म. वृत्त’ हे उत्तर अमेरिकेतील सर्व मराठी मंडळांच्या संपर्काचे साधन होते.  हुपरीकर, वैद्य, गोडबोले ह्यांचे सर्व कुटुंबीय दर महिन्याला ‘बृ. म. वृ्त्ता’च्या अंकाच्या पोस्टल मेलिंगसाठी -पोस्टाची तिकिट्स, पत्त्याची लेबल्स लावणे, झिप कोड प्रमाणे त्यांची विभागणी करणे इत्यादी कामे करत असत. ‘बृहन्महाराष्ट्र वृत्ता’ला चांगला प्रतिसाद मिळाला आणि मग मंडळाच्या संस्थापकांनी अमेरिकेत अधिवेशन भरवण्याची कल्पना सर्वांपुढे मांडली. त्यांचे स्वप्न १९८४च्या जुलै महिन्यात प्रत्यक्षात येऊन बृहन्महाराष्ट्र मंडळाचे पहिले अधिवेशन शिकागोत भरले. त्यास रावसाहेब गोगटे हे प्रमुख पाहुणे आणि द. मा. मिरासदार हे प्रमुख वक्ते होते. कार्यक्रमातील प्रमुख आकर्षण होते आनंद गंधर्व यांचे नाट्यसंगीत आणि लक्ष्मण देशपांडे यांचा एकपात्री नाट्यप्रयोग ‘वर्‍हाड निघालंय लंडनला.’ अमेरिका, कॅनडा येथून सुमारे अडीचशे लोक अधिवेशनास उपस्थित होते. त्यांची शिकागोतील मराठी कुटुंबांमधे, घरीच राहण्याची सोय केली होती.
 

विष्णू वैद्य, शरद गोडबोले, जया हुपरीकर यांनी सहा वर्षांनी पुढच्या कार्यकारिणीकडे मंडळाच्या कामाची सूत्रे सोपवली. विष्णू वैद्य बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या सर्व अधिवेशनांना आत्मीयतेने उपस्थित असत. त्यांनी अमेरिकेत, भारतात मोठा मित्रपरिवार जोडला. वृत्तपत्रांतून, मासिकांतून लेखन केले. विष्णू वैद्य यांचे २६ ऑगस्ट २००१मधे निधन झाले. शरद गोडबोले १९ एप्रिल २००४ रोजी परलोकवासी झाले. मात्र अमेरिकेतील महाराष्ट्र मंडळाच्या कार्याच्या निमित्ताने एकत्र आलेल्या- वैद्य, गोडबोले आणि हुपरीकर या तीन कुटुंबांची परस्परांशी मैत्री अतूट राहिली.
 

शिकागो महाराष्ट्र मंडळाच्या रूपाने अमेरिकेत पेरलेल्या मराठी भाषक संघटनेच्या बीजाचा समृध्द वृक्ष झाला आहे.
 

शिकागो येथाल पहिल्या अधिवेशनानंतर जुलै (२१-२४) २०११मधे पंधरावे अधिवेशन पुनश्च शिकागोत भरले. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या उगमापासून उगमापर्यंतचे हे एक आवर्तन झाले!
 

विनता कुलकर्णी

संबंधित लेख –

उत्‍तर अमेरिकेतील मराठी अधिवेशने

बीएमएम अधिवेशनात दिग्गजांची रेलचेल

{jcomments on}

About Post Author

Previous articleकुटुंब रंगलंय नेत्रदानात!
Next articleतुळशीचे लग्न
विनता कुलकर्णी या प्राध्यापक. त्या मास्टर्स आणि डॉक्टरल पदवी अभ्यासक्रमासाठी सांख्यिकी आणि संगणक विज्ञान शिकवतात. त्या भारत व उत्तर अमेरिकेतील काही प्रकाशनांमधून लिहितात. त्या बृहन्महाराष्ट्र मंडळाकडून प्रकाशित होणाऱ्या ‘बीएमएम वृत्त’ (उत्तर अमेरिका) मासिकाच्या संपादक आहेत. त्यांना मराठी आणि इंग्रजी साहित्याची आवड आहे. त्यांची मराठीमध्ये ‘क्षितिज पश्चिमेचे’, पुस्तकचोर (अनुवादित) आणि ‘ठसे आठवांचे’ ही तीन पुस्तके ‘ग्रंथाली’तर्फे प्रकाशित झाली आहेत. तर इतर त्यांनी लिहिलेली चार पुस्तके - तीन शैक्षणिक आणि एक युनिव्हर्सिटी डिग्री लेव्हल फॉर क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स अशी आहेत. विनता कुलकर्णी यांना समाजसेवेची आवड आहे.