आॅलिंपिक खेळाडू हे सैनिकच!

0
25
carasole

ऑलिंपिक क्रीडास्पर्धा दर चार वर्षांनी होतात. स्पर्धा संपली, की भारतात post olympic hysteria सुरू होतो. रिवोद जानीरो येथे २९१६ च्या स्पर्धा संपल्यानंतर तोच अनुभव आला. पदक मिळालेल्यांना कोटीच्या कोटी रकमांची बक्षिसे, घरे, गाड्या, राजकीय सत्कार आणि काय काय! मुळात पदक मिळालेल्यांची संख्या एवढी नगण्य असते, की हे सगळे करणाऱ्यांना ते परवडते. विचार करा, इंग्लंडमध्ये किंवा अमेरिकेत प्रत्येक पदक विजेत्याला असे बक्षिस द्यावे लागले तर… ते असो!

पदक मिळालेल्यांचे कौतुक होत आहे म्हणून माझ्या पोटात दुखत नाही. त्यांचे कौतुक मलाही वाटतेच. परिस्थिती सर्वतोपरी प्रतिकूल असताना त्यांनी हे यश मिळवले आहे. राग येतो तो दांभिक भारतीय समाजाचा आणि त्याचाच भाग असणाऱ्या राजकारण्यांचा. प्रत्येकाला त्याचे मूल डॉक्टर, इंजिनीयर बनून देशाच्या बाहेर, बहुतांशी अमेरिकेत, जायला हवे आहे. शाळांमधील कलाशिक्षण, क्रीडाशिक्षण हळूहळू संपवण्याचा घाट घातला जात आहे. शाळेला चुकून मैदान असेलच तर त्यावर अजून एक इमारत बांधून त्यात इंग्रजी शाळा (उदाहरणार्थ, ठाण्यातील सरस्वती शाळा) सुरू होण्याच्या काळात या देशातून खेळाडू निपजतील ही अपेक्षा करणेच चुकीचे आहे. एरवी भारतीयांना देशप्रेमाचे भरते येत असते, पण एक देश म्हणून जगात त्यांची किती नाचक्की होते याची जाणीव नसते. महाराष्ट्रात काय किंवा इतर राज्यांत काय, पदोपदी भूतकाळातील पराक्रमी वीरांचे स्मरण करून बेडकुळ्या फुगवणारे भारतीय हे विसरून जातात, की आधुनिक जगात समरांगणावरील युद्धे अशी होणार नाहीत. आण्विक युद्धाच्या शक्यतेमुळे अशी man to man युद्धे होण्याचे प्रसंग विरळाच. आधुनिक जगात युद्धे होतात ती जागतिक प्रदर्शनांत, आर्थिक आघाडीवर, शालेय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विविध विषयांच्या Olympiad मध्ये आणि खेळांच्या स्पर्धांमध्ये. मी जर्मनीला ‘मेडिका’ या प्रसिद्ध आरोग्यविषयक प्रदर्शनाला गेलो होतो. आमच्या ओळखीचे मुलुंड येथील उद्योजक स्वत:च्या कंपनीचा स्टॉल गेली दहा वर्षें त्या प्रदर्शनात लावतात. भारतीयांनी मांडलेले त्यांच्यासारखे स्टॉल हाताच्या बोटावर मोजण्याच्या संख्येने होते. पण प्रदर्शनात फिरताना जाणवले, की पाकिस्तानचे स्टॉल्स भारतापेक्षा खूप जास्त संख्येने होते. आख्खे पॅव्हेलियन होते त्यांचे. चीनचे तर दोन-तीन पॅव्हेलियन्स होते. आमच्या ठाण्यातील कोरम मॉल सारखे वीस मॉल्स मावतील एवढे मोठे ते प्रदर्शन होते. भारत देशाचे स्टॉल्स किती लोकांच्या नजरेत भरले असतील? प्रदर्शनासाठी आलेल्या बहुतांश प्रेक्षकांना भारत हा आरोग्यविषयक सेवासुविधा पुरवण्याच्या बाबतीत अगदीच अप्रगत असल्याचा समज झाला असेल तर त्याला कारण कोण? भारत सरकारने पुढाकार घेऊन (कारण इतर देशांमधील Exhibitors ना त्यांच्या देशांची सरकारे पैसा पुरवतात) जर का नोंद घेण्याएवढ्या संख्येने सहभाग केला तर त्याची दखल घेतली जाईल. कारण दिखता है वोही बिकता है!

तीच गोष्ट जागतिक खेळ स्पर्धेची. तेथे पदक मिळवणाऱ्या खेळाडूच्या राष्ट्राचा झेंडा आणि राष्ट्रगीत वाजवले जाते. ज्या देशाचे खेळाडू जास्तीत जास्त पदके मिळवतात त्यांचे राष्ट्रगीत ऐकून ऐकून जगाला वाटत असेल, काय ग्रेट आहे हा देश आणि तेथील माणसे! ते पेक्षकांची मने जिंकत असतात. नुसते भाग घेणारे नव्हे, त्यामुळे देशातील सर्वांनी त्यांचे खेळाडू हे त्यांच्या देशाचे सैनिकच आहेत या भावनेने त्यांना promote करण्यास हवे, तसा खर्च त्यांच्यावर करण्यास हवा. तेच भारत देशाची छाप आंतरराष्ट्रीय पातळीवर पाडू शकतात.

हा लेख लिहिताना आठवण झाली, रवींद्रनाथ टागोर त्यांच्या तरूणपणी कविता सादरीकरण करत. तशाच एका कार्यक्रमासाठी त्यांना इंग्लंडला जायचे होते. पण पैशांची तजवीज होत नव्हती. इकडे महाराष्ट्रात जेव्हा लोकमान्य टिळक यांना ती गोष्ट समजली तेव्हा त्यांनी काहीही न बोलता वीस हजार रुपये रवींद्रनाथांना पाठवले. रवींद्रनाथांना आश्चर्य वाटले. त्यांनी टिळकांना कळवले, की मी इंग्लंडला काव्यवाचनासाठी जात आहे. त्याचा स्वातंत्र्याच्या चळवळीशी दुरान्वयाने संबंध नाही. तुमचा काही गैरसमज होऊन तर तुम्ही मला हे पैसे पाठवले नाहीत ना? त्यावर टिळकांचे त्यांना उत्तर मिळाले, की इंग्लंडमध्ये भारताची प्रतिमा मागासलेला देश म्हणून आहे. त्यांचा तो गैरसमज तुमच्या काव्यवाचनाने दूर होण्यास मदत होईल. तीसुद्धा देशसेवाच आहे. टिळकांना तेव्हा तशा प्रकारच्या Representation चे महत्त्व कळले होते. पण दुर्दैवाने, मोठ्या नेत्यांची कोठलीही शिकवण आचरणात न आणण्याची सध्याच्या समाजाने शपथ घेतली असल्यामुळे भारतीय नागरिक  नको त्या ‘देखाव्याच्या’मागे लागून असा जगापुढील चांगला दिखावा करण्याची संधी घालवत आहोत.

– किरण भिडे

About Post Author

Previous articleजे.एन. यु. : संघर्षाचे स्पष्टीकरण
Next articleराधिका वेलणकर स्वतःच्या शोधात
किरण भिडे ठाण्‍यात राहतात. मराठी मराठी साहित्‍य आणि संस्‍कृती हे त्‍यांच्‍या जिव्‍हाळ्याचे विषय. त्‍यांनी ठाण्‍यात फक्‍त मराठी खाद्यपदार्थ मिळणारे 'मेतकूट' हे रेस्‍टॉरंट सुरू केले आहे. तत्‍पूर्वी त्‍यांनी 'जपान लाईफ' या मल्‍टी लेव्‍ही मार्केटींग कंपनीमध्‍ये सेल्‍स एक्‍झीक्‍युटीव्‍ह पदावर काम केले. त्‍यानंतर त्‍यांनी 'माधवबाग' या ह्रदयोपचार करणा-या संस्‍थेत संचालक पदवर काम केले. लेखकाचा दूरध्वनी 9821014716