आशा पाटील यांची लोकविलक्षण भ्रमंती!

4
52
6

सायकल शर्यतीमध्ये १९७३ सालापासून १९८७ पर्यंत सातत्याने सहभागी होणारी तळेगाव दाभाडे येथील पहिली स्त्री खेळाडू!

 जुन्या मुंबई –पुणे रस्त्यावरील बोरघाट एकोणतीस मिनिटांत सायकलवरून चढणारी भारतातील एकमेव स्त्री सायकलपटू!

 मुंबई-पुणे रस्ता न थांबता पाच तास पंचेचाळीस मिनिटांमध्ये पार करणारी एकमेव स्त्री खेळाडू!

 पाच फूट दोन इंच उंची, नीटनेटके बसावेत असे, कोणतीही फॅशनेबल स्टाईल न करता कापलेले करड्या रंगाचे केस, समोरच्याला दरारा वाटावा असे चेहर्‍यावरचे भाव, स्कर्ट व वर कॉलरचा शर्ट असा वेश आणि तिच्या अस्तित्वाचा अविभाज्य घटक असावा अशी ‘हिरो’ची जुन्या स्टाईलची लेडीज सायकल सतत तिच्या बरोबर!

 शिरपेचामध्ये अनेक उपाधी धारण केलेली, तळेगाव-दाभाडे येथील आशा पाटील!

 जून महिन्यात (२०१०) पुण्यामध्ये पी.वाय.सी. हिंदू जिमखान्याच्या वतीने पन्नास वर्षांपुढील स्त्रियांसाठी बायथलॉन स्पर्धा आयोजित केल्या होत्या. बायथलॉन म्हणजे स्पर्धकांनी पळण्याच्या आणि सायकलिंगच्या स्पर्धेमध्ये एकाच वेळी भाग घेणे. पुण्यातील स्पर्धक स्त्रिया आपला यच्चयावत पोषाख घालून, गिअरच्या सायकली घेऊन स्पर्धेला आल्या होत्या. त्यामध्ये तळेगावची आशा पाटील,  तिची १९६७-६८ मध्ये तिच्या आईने प्रेझेंट दिलेली, पहिलीच ‘हिरो’ची सायकल घेऊन हजर होती. रंग उडालेल्या, तीन ठिकाणी वेल्डिंग केलेल्या सायकलीकडे सर्वांचच लक्ष वेधलं जात होतं. स्पर्धक स्त्रिया तिच्या सायकलीकडे पाहून हसतही होत्या. आणि पन्नास वर्षांच्या पुढच्या स्त्रियांच्या स्पर्धेत जवळजवळ साठी गाठलेल्या आशानं पळण्याच्या स्पर्धेत दुसरा आणि सायकल स्पर्धेत पहिला नंबर पटकावला. स्पर्धेत भाग घेणं सोडल्यापासून तेवीस वर्षांनी ती अशा स्पर्धेत सहभागी झाली होती.

 तिच्याकडून हा सारा प्रसंग ऐकताना, माजिद माजिदी या इराणी दिग्दर्शकाच्या ‘चिल्ड्रेन ऑफ हेवन’ या चित्रपटाची आठवण झाली. गरिबीमुळे, त्यातल्या छोट्या अली नावाच्या मुलाला शाळेची वेळ गाठायला पळावं लागायचं. तीच त्याची रनिंग रेसची तयारी! तसं आशा पाटील १९६४ पासून सातवी ते दहावीपर्यंत देहूरोड इथं असलेल्या तिच्या केंद्रीय विद्यालयात सायकलवरून जायची. तळेगाव ते देहूरोड हे अंतर पंधरा किलोमीटरचं आहे. त्‍या शाळेमध्येच तिच्यातल्या खेळाडू वृत्तीला धुमारे फुटले. ती समोर येणार्‍या प्रत्येक खेळात हिरिरीने भाग घेत असे. पण तिला अ‍ॅथलेटिक्समध्ये अधिक रस वाटू लागला आणि तिनं पळण्याच्या शर्यतीतला पहिला क्रमांक शाळा संपेपर्यंत सोडलाच नाही. सायकल आणि पळणे ही तिच्या आयुष्याची पॅशन बनली. तिनं १९६४ ते १९६९ या काळात विविध स्पर्धांमध्ये मुलींच्या गटातील सर्व बक्षिसं मिळवली. त्या काळी सॉक्सचा जोड, जेवणाचा डबा, हातरुमाल, कधी पैसे तर कधी सायकलचा टायर बक्षीस म्हणून मिळे. ही बक्षिसं घेताना खूप अभिमान वाटे असं आशा सांगत होती.

पुढे, ती तळेगावातल्या इंद्रायणी कॉलेजमध्ये गेली. तिथंही ती थ्रो बॉल, नेट बॉल, रिंग टेनिस अशा खेळांत सहभागी होई. तेव्हाही तिला बक्षिसं मिळत, पण बक्षिस मिळण्याच्या आनंदापेक्षा, तिला बरोबरीचा प्रतिस्पर्धी नसल्याचं जास्त वाईट वाटे. नंतर तिनं पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून इंग्रजी साहित्य विषय घेऊन बी.ए. केलं. तिचा १९७३ पासून सायकल रेस हा ध्यास झाला. तिला दशरथ पवार यांनी सायकलचं शास्त्रीय शिक्षण दिलं.

तिने १९७३ ते १९८५ या काळात पाच किलोमीटर, दहा किलोमीटर, पंचवीस किलोमीटर अशा अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन पुणे जिल्ह्यातल्या सायकल रेसमधील प्रथम क्रमांकाचे स्थान दुसर्‍या कोणालाच मिळू दिले नाही. मुंबईमध्ये १९७७ साली झालेल्या पंचवीस किलोमीटरच्या स्पर्धेत तिचा दुसरा क्रमांक आला आणि तिची राष्ट्रीय स्पर्धेमध्ये निवड झाली. जय्यत तयारी चालू होती. पण महाराष्ट्राच्या संघाने या खेळाविरुद्ध बंद पुकारला, त्यामुळे तिची राष्ट्रीय पातळीवरची संधी हुकली, याची हळहळ आशाला वाटते.

 त्याच सुमारास, पुण्यामध्ये T.I. Cycles  या सायकलच्या कंपनीने सायकल स्पर्धा आयोजित केल्या होत्या. पेपरमधली जाहिरात वाचून आशा आपली ‘हिरो’ सायकल घेऊन तिकडे हजर झाली. या स्पर्धा पुण्यात शिवाजीनगरच्या जवळ असलेल्या पोलिस ग्राऊंडवर घेण्यात आल्या होत्या. सात किलोमीटरची फास्ट रेस आणि स्लो सायकलिंग या स्पर्धांमध्ये लीलया पहिला नंबर पटकावल्यानं तिसर्‍या स्पर्धेत तिला भाग घेऊ दिला गेला नाही. हे भाग घेऊ न देणं, आशाला पहिल्या नंबरपेक्षा अभिमानास्पद होतं, असं ती स्मित करत सांगते.

 तिची सगळ्यात मोठी सायकल शर्यत १९८२ मध्ये होती. ती स्पर्धा अमरावती ते नागपूर या एकशेसहासष्ट किलोमीटर अंतराची होती. आशा वयाच्या तिसाव्या वर्षी या स्पर्धेत सहभागी झाली. नेहमीची ‘हिरो’ सायकल न घेता, यावेळेस तिनं पुरुषांची सायकल घेतली होती. आईचा नकार होता, पण ती एका ऊर्मीपोटी एस.टी.च्या टपावर सायकल टाकून अमरावतीला पोचली. तिचा त्या स्पर्धेत तिसरा नंबर आला. पहिल्या दोन स्थानिक मुली होत्या. पावसातली ती शर्यत, जंगलातला रस्ता, एवढं मोठं अंतर, ट्रॅफिक पोलिसांनी प्यायला दिलेलं पाणी, वाटेत भेटलेल्या सरदारजीचे कौतुकाचे शब्द आणि नंतर मिळालेलं पंधराशे रूपयांचं तिसर्‍या क्रमांकाचं बक्षिस… ती हे सारं सांगताना जणू स्पर्धा पुन्हा अनुभवत होती. त्‍या रेसनं मला खूप शिकवलं असं ती म्हणते!

 ती १९७६-७७-७८ या काळात दररोज चाळीस ते पन्नास मैल सायकलिंग करत असे. मुंबईला जाताना लागायचा तो जुना बोरघाट ती चढत असे आणि तेसुद्धा सायकलवरून एकदाही न उतरता! तिला मुंबई-पुणे या रेसमध्ये सहभागी व्हायचं होतं, पण शर्यत फक्त पुरुषांकरता होती. तिची पुरुषांच्या स्पर्धेतही सहभागी होण्याची तयारी होती, पण आयोजकांनी नकार दिला. शेवटी, तिनं एकटीनं मुंबई-पुणे अंतर न थांबता पाच तास पंचेचाळीस मिनिटांत पार पाडलं आणि आंतरिक समाधान मिळवलं. एकोणतीस मिनिटांत घाट चढणारी आशा ही एकमेव स्त्री सायकलपटू.

आईनं तिच्या लहानपणी घासाघीस करून घेतलेल्या (२१० रुपयांची १९० रूपयांना) ‘हिरो’ सायकलनं तिला अनेक सायकल स्पर्धांमधून आठ नव्या कोर्‍या सायकली बक्षिस म्हणून मिळवून दिल्या! त्या तिनं तळेगाव, पुणे येथील कोणाकोणाला देऊन टाकल्या. ‘‘माझ्या सायकलीनं मला कुठे कुठे नेलं.. टीव्हीवर नेलं, पेपरच्या पहिल्या पानावर झळकावलं! तिनं आपल्या त्रेचाळीस वर्षांच्या जुन्या सायकलीला सखीसारखं साभाळलंय. ‘मी कधी दुसरं कुठलंही वाहन चालवलं नाही, ना माझी तशी इच्छा आहे. मला वाटतं, सायकल चालवण्यातला खरा आनंद फक्त मला कळलाय’’ असं आशा सद्‍गदित होऊन सांगत होती.

आशा ही विदर्भनिवासी अस्सल मराठी कुटुंबातील कुस्तीगीर उदयभानू पंढरीनाथ पाटील आणि रशियानिवासी नताशा स्कारिनिना अशा आईवडिलांची मुलगी. अशिक्षित कुटुंबामध्ये जन्मलेले उदयभानू यांनी विदर्भातून पुणे, तेथून मुंबई आणि नंतर थेट अमेरिका… असा शैक्षणिक आणि भौगोलिक प्रवास करता करता, शुगर केमिस्ट्री या विषयात पीएच.डी मिळवली. अमेरिकेत बरीच वर्षे स्थायिक झाल्यावर त्यांना कम्युनिझमबद्दल उत्सुकता वाटली आणि ते रशियाला गेले. तिथं त्यांना नताशा स्कारिनिना भेटल्या आणि त्यांनी हुशारीची चमक असलेल्या उदयभानूंबरोबर लग्न करायचं ठरवलं. ते दांपत्य १९२०च्या सुमारास मुंबईत आलं, पण उदयभानूंना मनासारखी नोकरी मिळत नव्हती. मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टर भाऊसाहेब सरदेसाई यांनी त्‍या दोघांना त्यांच्या कामशेतच्या पोल्ट्री फार्मचं प्रमुख केलं. दहा वर्षं नीट गेली, पण १९३० मध्ये पोल्ट्रीला अनेक संकटांनी ग्रासलं. मग त्यांनी तळेगावातील दाभाडे सरदारांचा बंगला व जमीन भाडेतत्त्वावर घेतली आणि तिथं स्वत:ची पोल्ट्री सुरू केली. त्यावेळी सात हजार पक्षी असलेली पुणे-चाकण रस्त्यावरची ती एकमेव पोल्ट्री होती. पंचवीस एकरांचा पसारा, त्यात कोंबड्या, घोडे, गाई, म्हशी, बैल आणि दहा-पंधरा गावठी कुत्री यांच्या सहवासात आशाचं लहानपण गेलं. निर्जन ठिकाणी असलेल्या एकांड्या घराच्या आसपास इतर कोणी राहत नव्हतं. त्यामुळे आशाला हेच प्राणी-पक्षी सवंगडी झाले. अशातच तिचं श्‍वानप्रेम सुरू झालं. आशा श्वानप्रेमी म्हणूनही ‘सायकलपटू’इतकीच प्रसिद्ध आहे.

 तिच्या घरात अनेक कोंबड्या, बदके, गावठी आणि पेडिग्री कुत्री, लव्हबर्डस, तळ्यातले मासे गुण्यागोविंदाने राहतात. वीस वर्षांची असताना आशा घोड्यावर बसून काम करायला जाई. काम म्हणजे किरकोळ भाजी आणणं, औषध आणणं वगैरे. तिनं कुत्र्यांसाठी पाळणाघर गेल्या काही वर्षांपासून चालू केलं आहे. पुण्याच्या आणि आसपासच्या उच्चभ्रू लोकांनी ‘स्टेटस’ म्हणून घेतलेली भारीभारी कुत्री आशाच्या संगोपनानं लहानाची मोठी होत आहेत. संध्याकाळी आजुबाजूला पाच-सहा कुत्री हातात पट्ट्यांनी पकडून आशा त्यांना फिरवताना दिसते, त्यांच्या खाण्यापिण्याचे लाड करते. भाद्रपदानंतर दोन-अडीच महिन्यांनी कॉलनीत आणि आसपास कुठल्या कुत्रीनं किती पिलांना जन्म दिला याची माहिती तिच्याकडे असते. त्‍या पिलांना चांगली स्थळं मिळावी यासाठी आशा भटकंती करते, योग्य ठिकाणी शब्द टाकते.

 मध्यंतरी, तिच्या घराशेजारच्या कचराकुंडीजवळ व्यालेल्या कुत्रीची दोन पिल्लं, तिनं शिफारस करून आम्हाला घ्यायला सांगितली. ‘सुंदर’ आणि ‘चंदा’ अशी ही जोडी आमच्या शेतघराचं चैतन्य बनली आहेत! प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा आमच्याकडे आल्या असताना, ती कुत्री खूप आवडल्यानं ‘अशी कुत्री मला हवीत’ असं त्यांनी म्हणायचा अवकाश, आशानं निवडीसाठी तीन-चार कुत्री हजर केली! त्यांतली दोन ‘स्विटी’ आणि ‘राणी’ बनून तनुजाच्या बंगल्यावर राहतात.

 आशाबरोबर तिची शशी नावाची दत्तक बहीण राहते. शशीसुद्धा चव्वेचाळीस वर्षांची आहे. आशा एकोणसाठ. शशी पण थोडीफार अ‍ॅथेलिट आहे. तिचे वडील १९६६ साली वारले आणि आई १९९१ मध्ये गेली. आई एकटी पडेल, या भावनेपोटी आशानं अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला. याबद्दल तिला दु:ख नाही, असं ती म्हणते. तिचं सारं आयुष्य उलगडणार्‍या गप्पा मारून मी परत येत असताना रॉबर्ट ब्राऊनिंगच्या ‘द रोड नॉट टेकन’ या कवितेतली शेवटची ओळ “I chose the other and that made all the difference” याचं उदाहरण पाहिल्याचा आनंद मी अनुभवत होते.

आशा पाटील, ९६१९१९५३३९

– प्रा. अपर्णा महाजन
हार्मोनी, ४९,
वनश्री नगर, तळेगाव – दाभाडे,
ता. मावळ, जिल्हा पुणे,
पिन – ४१०५०७
भ्रमणध्वनी : ९८२२०५९६७८
इमेल – aparnavm@gmail.com

About Post Author

Previous articleगर्दीची अक्क्ल
Next articleडॉ. लहाने यांची जीवनदृष्टी
अपर्णा महाजन या चाकण येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयातून इंग्रजी विषयाच्या विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाल्या. त्यांनी नामवंत वृत्तपत्रे, जर्नल आणि मासिके यांमधून लेखन केले आहे. त्यांत कथा आणि वैचारिक लेख यांचा समावेश आहे - त्यांचा ‘आस’ हा कथासंग्रह आणि 'मथित' नावाचा लेखसंग्रह प्रसिद्ध झाला आहे. अपर्णा यांना कार्पोरेट क्षेत्रामध्ये सॉफ्ट स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स आणि इंग्रजी भाषा शिकवण्यास बोलावले जाते. त्यांचे नाट्यशास्त्र, इंग्रजी-मराठी अनुवाद आणि भाषाविषयक कौशल्ये; तसेच, सेंद्रिय पद्धतीने झाडे, बगीचा वाढवणे हे आवडीचे विषय आहेत. त्या तळेगाव दाभाडे येथे राहतात.

4 COMMENTS

  1. अफलातून… सध्याच्या व
    अफलातून… सध्याच्या व पुढच्या पिढीच्या मुले व मुली दोघांनाही सायकलिंगबाबत कायमस्वरुपी आदर्श (mile stone?) वाटावी अशीच कारकीर्द.

  2. खरोखर अफलातुन.
    खरोखर अफलातुन.

  3. उत्कंठावर्धक लेख. अतिशय…
    उत्कंठावर्धक लेख. अतिशय प्रेरणादायी

Comments are closed.