आपल्या समजुतींचं कपाट

0
58
brain
      आपल्या समजुती मधूनमधून बाहेर काढून, कपड्यांचं कपाट लावतो तशा  नीट लावण्याची गरज असते. कपड्यांच्या घड्या उलगडून, त्यांना उन्हं दाखवून आपण जशा त्या घड्या परत व्यवस्थित घालतो, तसंच. आपल्याला काही बाबतींत नेमकं असंच का वाटतं ह्याचा मागोवा घेतला म्हणजे स्वतःबद्दलच्या काही मजेदार गोष्टी समजतात आणि त्यातून काही भ्रम दूर व्हायला मदत होते. अट एकच- डोक्यातले न्यायनिवाडा, मूल्यमापन, घेतलेल्या पवित्र्याचा पुरस्कार वगैरे सगळे विचार जरा वेळ दूर ठेवायचे आणि मेंदूत नीटनेटकेपणा आणायचा आहे हा एकमेव हेतू मनी धरायचा.  

     चमच्याने काही खात असताना तो चमचा जमिनीवर पडणे हा प्रकार आपल्या सर्वांच्या बाबतीत, विशेषतः लहानपणी घडतोच घडतो. अशा प्रसंगी बहुतेक वेळा, आपल्या आया चमचा तत्परतेनं उचलून घेऊन त्यावर फू फू फुंकर घालतात, चमचा बारकाईनं न्याहाळतात आणि घासून-पुसून परत आपल्या तोंडात खुपसतात. त्या प्रसंगी आपल्याला मिळालेली दटावणी सोडून, त्यातून आपण शिकतो की तो चमचा जितके कमी सेकंद जमिनीवर (घाणीत) काढेल, त्याचा जितका काही पृष्ठभाग फुंकरला जाईल, नजरेनं तो जितक्या बारकाईनं तपासला जाईल तितका तो स्वच्छ होतो! परदेशातही वेगळा प्रकार नाही. आपल्याकडे तुलनेनं अप्रचलित अशी लहान मुलांची चुपणी तोंडातून जमिनीवर पडली तर तीसुद्धा अशीच  ‘स्वच्छ’ करून वापरताना अनेकानेक परदेशी पालक मी बघितले आहेत. म्हणजे ही निर्जंतुकीकरण (स्टरलायझेशन) प्रणाली जगन्मान्य असावी. काहीही असो, हातरुमाल जरी खाली पडला तरी तो झटकून, त्यावर फुंकर मारून घेतो की नाही आपण? साथी पसरवणारे विषाणू नुसत्या फुंकरीनं किंवा नजरेनं नष्ट होत नाहीत, हे पक्कं माहीत असून!  

      जर्मन भाषिक मुलखात तुम्हाला सर्दी-पडसं, छातीत कफ जाणवत असेल तर आजीबाईचा बटवा सर्रास सांगतो, की दूध आणि दुग्धजन्य पदार्थ टाळावेत. आपल्याकडेही काही लोक हा सल्ला आयुर्वेदाच्या हवाल्यानं देतात. पण जर्मनांचं कारण तपासून बघावं तर ते दिसतं भाषेमधे! जर्मन ही सरळसोट, रोखठोक भाषा आहे. तिथं दुटप्पीपणा नाही. सर्वांनी रोज वापरायची भाषा वेगळी आणि वैज्ञानिक भाषा, जी मोजक्यांनी वापरायची ती तेवढी लॅटिनाळलेली असा इंग्रजीसारखा प्रकार जर्मन भाषेत नाही. पुन्हा जर्मन लोक पिढीजात चिकित्सक, त्यामुळे शरीरातल्या अवयवांची, घटकांची नावं काय, पृथःकरण काय हे त्यांच्याकडे फार जुनं आहे. ह्या सगळ्याचा सर्दीशी संबंध असा, की आपल्या शेंबडामधे असतं galactose नावाचं साखरेचं एक प्रतिरूप, आणि त्याच्याशी संबंधित पदार्थं. Galactoseचं जर्मन नाव आहे चक्क बुळबुळीत किंवा ‘शेंबूडसाखर’! दुधामधली दुग्धशर्करा (lactose) बनते ती ह्या ‘शेंबूडसाखरे’चा मेळ द्राक्षातल्या साखरेशी (glucose)शी बसल्यावर. (वाचकांना इकडे ईईईईईईईईईई म्हणायची पूर्ण मुभा आहे). तर मग दुधातून अशी ‘शेंबूडसाखर’युक्त दुग्धशर्करा पोटात गेल्यानं शरीरातली शेंबूडसाखर वाढल्याशिवाय कशी राहील? काही समजुती पसरतात अशा विचित्र योगायोगांमुळे.  

      काही समजुती रूढ असतात कोणाच्या तरी-कधी तरी झालेल्या फसवणुकीमुळे, कोणाच्या तरी-कधी तरीच्या चाणाक्षपणामुळे. बँकेचे व्यवहार जोखमीचे, मग बँकेत अगदी स्वतःच्या खात्यावर स्वतःच्या नावाचाच चेक भरायचा तरी लोक पे-इन स्लिपवर सही करताना अडोसा का शोधतात?

      काही समजुती असतात पारंपरिक भौगोलिक मर्यादांमुळे. आपल्याकडे पावसाशी निगडित साधारण भावना असते आनंदाची. आपला उत्फुल्ल पाऊस आपल्याला भेटतो मेघ आणि मल्हार रागांतून, कालिदासापासून बालकवींपर्यंतच्या कवितांतून. परदेशातलं सर्द, क्षयी मळभ, खिन्न, उदास रिपरिप सरळ जोडली जाते मनोविकारांच्या आकडेवारीशी. वार्‍याची झुळुक किंवा झोत प्रकृतीला किती तर्‍हांनी धोकादायक असू शकतात हे आपल्याला थंडीच्या देशांतच समजतात. आपल्याकडचं मंद झुळकांचं सौख्य तिकडच्या लोकांना आठवण करून देतं सूज, संधिवात, डोकेदुखी यांची -अगदी आपल्याकडे आल्यावरही.  

      मेंदू नीटनेटका ठेवायच्या ह्या सवयीचा खरा उपयोग होतो तो आपल्या स्वतःबद्दलच्या समजुती जपताना. आपल्या प्रत्येकाच्या आपल्या आवडीनिवडी, आपली मतं, आपला प्राधान्यक्रम, बाहेरचं जग आणि आपलं त्यातलं स्थान ह्या सर्वांबद्दल काही समजुती असतात, त्या आपल्या दृष्टीनं आवश्यक आणि अपरिहार्य असतात. म्हणूनच त्या नवीन अनुभव, नवी माहिती किंवा नवं चिंतन यांनूसार मधूनमधून उलगडून सारख्या करायला हव्यात. बाहेरच्या जगाशी आपला ताळमेळ राखणं आपल्याच हिताचं असतं, आणि ते ह्या सवयीमुळे सहजसाध्य ठरतं.  

ऋचा गोडबोले – भ्रमणध्वनी : 9819321852, इमेल rcagodbole@gmail.com

संबंधित लेख  

मुक्तता!

ध्यानधारणा किंवा मेडिटेशन : वास्तव काय आहे?

{jcomments on}

About Post Author