आपली उपकरणं!

0
37
aapali_upkarne

     माणूस जन्माला आला, की तो कालांतराने आणि काही मुदतीसाठी पृथ्वीच्या मर्यादित पृष्ठभागापैकी काही भाग व्यापून राहणार हे अगदी सहज, सर्वमान्य आहे. एकतर माणूस चालू-फिरू शकत असल्याने तो परिसर त्याच्या शारीरिक मोजमापाहून बराच जास्त असतो; पुन्हा एका माणसाचा असा बृहद्परिसरही दुस-या कशाहीसाठी किंवा दुस-या कुणाहीसाठी प्रतिबंधित क्षेत्र होतो. ही सवय प्रयोगशाळेत बशीतल्या पोषक थरावर वाढवलेल्या, जागेला खिळून जगणा-या सूक्ष्म जीवाणूंच्या पुंजक्यांतही आढळते. नवा येऊ बघणारा पुंजका प्रस्थापित पुंजक्यांच्या परिघाबाहेर काही अंतर राखूनच तगू शकतो.

     दुस-या टोकाचा विचार करावा तर उत्क्रांतीच्या आख्ख्या पटलावर पाहता कोणत्याच जीवाला संपूर्णपणे एकटं, इतरांपासून फटकून जगणं जवळपास अशक्य असतं. अशी ही हाडीमाशी नव्हे तर जनुकसंचितात दडलेली माणसाची विरोधाभासी प्रवृत्तीच जगातल्या बहुतेक अडचणींना कारणीभूत ठरते. प्रत्येकाला हवी ती माणसं, हवा तेवढा वेळ, हव्या तितक्याच अंतरावर कशी काय वावरणार?

     माणसं आणि त्यांनी व्यापलेली जागा हा विषय मुंबईसारख्या ठिकाणी झोपडपट्टयांच्या रूपानं सतत नजरेसमोर असतो. तसा तो ब-याचशा देशांतल्या ब-याचशा शहरांतही असतो. सुधीर कक्कड ह्या मनोविश्लेषणतज्ञाच्या मते, झोपडपट्टयांतील भारतातल्या रहिवाशांमधे आणि परदेशातल्या रहिवाशांमधे असणारा मुख्य फरक म्हणजे भारतीय झोपड्यांत असणारी परंपरा आणि कुटुंबपद्धत यांची जाणीव. म्हणजे कशाही कुठेही उभारलेल्या ह्या चार भिंती आणि छपरांच्या मांडणीत अनेक माणसांची कुटुंबं राहतात, एकटीदुकटी माणसं क्वचितच. आपण वाहनातून जाताना दिसणारी ही घरं, दिवसा त्‍यांना दारंच दिसत नाहीत. त्यांत ती सर्व राहतात, वावरतात. दारं-खिडक्या नसल्या तरी लोकांची ती घरंच असतात. तेव्हा आपण काही फार वेळ आत डोकावत नाही. त्यामुळे दिवसा, आपण चल असतानाची क्षणचित्रं ग्राह्य धरली तर मुख्यत्वानं लक्षात येतं, की ती घरं किती रिकामी असतात! इतकी माणसं एवढ्याशा जागेत मावतात तरी कशी अशा दृष्टीनं पाहू जावं, तर कोणी दिसतच नाही. घरांच्या बाहेर भरपूर वर्दळ, पण आत काही नाही. खूपशा माणसांच्या दैनंदिन गरजांचे थरावर थर अशा लहानशा पोकळीत? काही ठिकाणी चक्रावणा-या गोष्टी आढळतात, जशा की वॉशिंगमशीन किंवा एकच लठ्ठ सोफा.

     अशावेळी ब-याचदा जर्मनीत बघितलेल्या खास कँपिंगसामानाच्या दुकानांची आठवण होते. वीज, पाणी, पायाखाली एकसारखी जमीन, अशी सगळी सामान्य गृहितकं सोडून देऊनही ब-याच लोकांनी कमीत कमी जागेत त्यांतल्या त्यात आरामात राहण्यासाठीची एकाहून एक साधनं तिकडे मिळतात. आपल्याकडच्या हवामानाचा एक मोठा फायदा असा, की बहुतेक ठिकाणी अतिथंडीला तोंड द्यायची वेळच येत नाही. पाश्चात्य कँपिंगमधे खूपसा वेळ आणि पैसा उघड्यावरच्या मरणथंडीचा सामना करण्यात जातो. तर मग आजच्या niche marketing च्या जमान्यात अशा खास उपकरणांपैकी आपल्या झोपड्यांना साजेशा काही गोष्टी आपल्याकडे का मिळत नाहीत? जमिनीवरची ओल, उपद्रवी प्राणी दूर ठेवेलसा हलका गालिचा, घडी घालून ठेवता येईलसं, कप्पे असणारं स्वयंपाकाचं टेबल, मच्छरदाणीसकटच्या झोपायच्या झोळ्या असे किती प्रकार उपयोगी ठरू शकतील. आपल्याकडे ह्याचं उत्पादन का होत नाही? मागणी इतकी आहे की वेगवेगळ्या किमतीच्या मालाला बाजारपेठ मिळेल.

     घरात स्वयंपाकासाठी लागणारी चूल, भांडी वगैरे व्यवस्था हा जसा जीव जगवणारा पण तसाच जिवावर उठू शकेल असा प्रकार असतो; तुटपुंज्या जागेत तो जिवावर उठण्याचा संभवच अधिक! कमीतकमी आपल्याकडची इंधनं, आपली जेवण्याकडून मिळणा-या समाधानाची कल्पना ह्यांचा ताळमेळ घालून झोपड्यांतल्या स्वयंपाकासाठी काही खास उपकरणं बाजारात यायलाच हवीत. ऐसपैस बसण्यासाठी क्षेत्रफळाची अपेक्षा ज्यांना ठेवता येत नाही, त्यांची निदान उभ्या उभ्यातरी सुरक्षितपणे चार घास खायची सोय व्हायला हवी.
ऋचा गोडबोले – भ्रमणध्वनी : 9819321852, इमेल : rcagodbole@gmail.com

संबंधित लेख –

गर्दीतली वृक्षराजी 

आकडेवारीचे फुलोरे 

भाषेचे उत्पादक होऊ! 

ऊस, राजगिरा, साबुदाणा, बटाटा, मिरची
{jcomments on}

About Post Author