आपलं स्वत्व … आपलं वेगळेपण…

0
62

     जगून झालेल्या आयुष्यातले अनेक चेहरे आपण आपल्या चेह-यासभोवती वागवत असतो. काही आपले, काही इतरांचे. आपल्या स्वतःला ते जाणवतातच, पण आजुबाजूच्यांनाही ते अधुनमधून निरखता येतात. मानसशास्त्र बहुतेक वेळा त्यांचाच मागोवा घेताना आढळतं. पिवळंजर्द सूर्यफूल –शास्त्रीय परिभाषेमधे ज्याला संपुष्प म्हणतात, ते वरकरणी सुसंगत, एकच दिसतं, पण खरंतर ती असते अनेकानेक वेगवेगळ्या घटक फुलांची परस्पर फायद्यासाठी झालेली मांडणी. आपल्‍या सभोवतीचा चेहरेसमूह म्हटला तो अशाच काहीशा अर्थाने. कशामुळेही असेल, पण आपण आरशात पाहत आहोत आणि कॉलरमधून लयदार देठाच्या टोकाशी झळकत आहे घवघवीत सूर्यफूल ही कल्पनाच कशी पिवळसर, छान वाटते की नाही

     सजीव म्हणून आपण जर आपल्या मूलभूत एककाकडे, म्हणजे कोशिकांकडे पाहिलं तर हा (एकात अनेक) प्रकार त्याही स्तरावर ठळकपणे आढळतो. प्रचलित समजानुसार कोशिकेमधले कलकणू (mitochondria), प्रकलकणू (plastids) वगैरे कोशिकांगके कोणे एके काळी स्वतंत्र जगणारे सूक्ष्मजीव होते. त्यांची स्वतंत्र जनुकं (genetic material), त्यांचं अनुहरण (heritability), त्यांची वितंचकं (enzymes) असा सर्व सवतासुभा उत्क्रांतीच्या ओघामधे कधीतरी संपून जाऊन हे विविध सूक्ष्मजीव एका कोशिकेची कोशिकांगके बनली. अजूनही ही मंडळी पुनरुत्पादनासारखी काही अपरिहार्य कामे स्वतःची स्वतः करतात. संरक्षणासारखी इतर काही कामे अंतर्गत सहकार्याने सगळ्या कोशिकेची मिळून होतात. ऊर्जाविपुल कामांची पुनरावृत्ती टाळून अंतःसहकाराने (endosymbiosis) सगळ्या कोशिकांगकांना आणि पर्यायानं कोशिकेला जनुकांच्या अनुहरणाची जास्त चांगली संधी मिळते. थोडक्यात असं, की आपल्या कोशिकांमधे दडलेलं आपलं व्यक्तिगत जननिक सांकेतिक वर्णसंचितसुद्धा एकसंध, एका उगमाचं नसतं. मग बाह्यात्कारी बहुविधतेचं एवढं काय पिंडी ते ब्रह्मांडी

            काही सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ तर कोशिकेतल्या अंतःसहकाराच्या संकल्पनेची ही कक्षा पूर्ण देहापर्यंत रुंदावतात. त्यांच्या नजरेत प्रत्येक माणूस हा त्याच्या शरीराच्या आत आणि बाहेर नांदणा-या सूक्ष्मजीवांच्या ताटव्यांचा बनलेला आहे. व्यक्तिगत जननिक सांकेतिक वर्णसंचिताप्रमाणे सूक्ष्मजीवांच्या प्रजाती, त्यांचं वैपुल्य व्यक्तिगणिक वेगळं असतं आणि ते तुमच्या वर्णसंचिताइतकं तुमच्या जिवंत असण्याला आधारभूत असतं. तुमची एकूण प्रकृती, तुम्हाला होणारे आजार, तुम्हाला आवडणारं पचणारं अन्न, तुम्हाला लागू पडणारी औषधं अशा सगळ्याच गोष्टी तुमचे व्यक्तिगत ताटवे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे ठरवतात. अर्थात त्यांच्या सोईने. त्या विविध प्रजातींच्या आपापल्या स्वार्थसाधनेत, परस्पर सहकार्यानं, चढाओढीनं जगण्याच्या रणकंदनात जो शक्य असतो, तोच तुमचा जीवनानुभव.

       आपलं स्वत्व, आत्मभान, पृथगात्मता वगैरेसारख्या संकल्पना प्राणिसृष्टीतही काही ठिकाणी दिसतात. Theory of mind ह्या सदराखाली येणा-या प्रयोगांत प्राण्यांच्या विवक्षित क्षमतेचं निरीक्षण केलं जातं. त्‍यामुळे प्रत्‍येक प्राण्याला सद्यस्थितीत दुस-या प्राण्याच्या जागी स्वतःला कल्पून त्याच्या वर्तनामुळे आपल्याला होऊ शकेल अशा उपद्रवावर आधीच प्रतिबंधक उपाय करणं जमतं. चिंपांझी, बोनोबो असे काही वानरविशेष, कावळ्याच्या जातीतले काही पक्षी अशा मोजक्या जिवांत ही क्षमता आढळते. म्हणजे मी आणि माझं हित हे दुस-यापेक्षा समूहापेक्षा भवतालापेक्षा वेगळं आहे ही जाणीव, मग दुसरा कोणी त्याच्या हितसंवर्धनासाठी काय करू शकेल ह्याचा आडाखा, त्यातून मला होऊ शकणा-या फायद्या-तोट्याचं मूल्यमापन आणि शेवटी माझ्या हितसंवर्धनासाठी कृती एवढा सगळा प्रवास मेंदूमधे कळतनकळत घडतो. तेव्हा कुठे प्राण्याच्या कृतीतून स्वत्वाच्या भावनेचं अनुमान लावता येतं. आरशामधे पाहून स्वतःलाच टोच मारू पाहणारी चिमणी क्वचितच दिसते, पण ती मोडते ती ह्या गटात. पाण्याची पातळी खडे टाकून, उंचावून मग ते पिणारा गोष्टीतला कावळाही असाच आत्मभानवाला.

       स्वत्व, पृथगात्मता वगैरै गोष्टी आपल्या नित्यव्यवहारात कधीकधी उपेटाला येतात जीवघेण्याही ठरतात. तेव्हा त्यांची जीवशास्त्रीय पार्श्वभूमी जाणून घेणं आवश्यक आहे.

ऋचा गोडबोले – भ्रमणध्वनी : 9819321852,
इमेल : rcagodbole@gmail.com

संबंधित लेख –

मुंबईकरांच्या ‘टॉप टेन’ समस्या
भाषा, लिपी आणि वास्तवाची जाणीव
आपल्या समजुतींचं कपाट
भिक्षा

{jcomments on}

About Post Author