आपटे गुरुजी – येवल्यातील राष्ट्रीय शाळेचे संस्थापक

1
43
carasole

नाशिक जिल्ह्यातील येवले हे तालुक्याचे शहर तात्या टोपे यांची जन्मभूमी म्‍हणून ओळखले जाते. तेथे कै. आपटे गुरुजी यांनी 23 मे 1921 रोजी राष्ट्रीय शाळा स्थापन केली. ती शाळा महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील पहिली राष्ट्रीय होती असे म्‍हटले जाते. येवलेकरांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात तन-मन-धन अर्पून जे योगदान दिले, त्यामागे आपटे गुरुजी यांची स्फूर्ती होती. स्वत:ची हयात निरपेक्षपणे देशसेवेत व लोकसेवेत घालवणाऱ्या आपटेगुरुजींचा येवलेकरांना सार्थ अभिमान वाटतो.

आपटे गुरुजी विद्यार्थीदशेत हुशार विद्यार्थी म्हणून चमकले. त्यांनी मिळवलेल्या शिक्षणाचा उपयोग स्वार्थासाठी करून घ्यायचे ठरवले असते तर त्यांना ब्रिटिश सरकारची मोठ्या हुद्द्याच्या पगाराची नोकरी सहज मिळाली असती, पण त्यांनी त्याऐवजी भारतमातेला पारतंत्र्याच्या शृंखलांमधून मुक्त करण्याचे ध्येय मनी बाळगले. आपटे गुरुजी त्या ध्येयाने प्रेरित झाले होते. त्यांनी टिळक विद्यालयाच्या राष्ट्रीय शाळेचे मुख्याध्यापक पद स्वीकारावे यासाठी राष्ट्रीय चळवळीतील लोकांनी आपटे गुरूजी यांना आग्रह केला. त्यांना होकार देत आपटे गुरूजी रत्नागिरी जिल्ह्यातून येवले येथे १९१८ साली आले. त्यांनी तेथे भारतातील पहिल्या समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शाळेची स्थापना केली. येवले शहरातील रंगीलदास देवचंद पटनी या पेढीचे मालक भागचंदशेठ पटनी यांनी त्याच वर्षी शाळेला वीस हजार रुपयांची मदत केली. त्‍यांनी ती रक्‍कम तत्कालिन पेढीमध्येे कायमस्वरूपी ठेव स्‍वरुपात ठेऊन त्याच्या व्याजाचे पैसे राष्ट्रीय शाळेला मदत म्हणून देण्याची व्यवस्था केली होती. पण ती आर्थिक मदतही अपुरी पडे. मग गुरुजी निधीसंकलनासाठी खांद्यावर भिक्षेची झोळी अडकवून दारोदारी जात. ते दारापुढे उभे राहून एक श्लोक म्हणत. तो श्लोक पूर्ण होईपर्यंत झोळीत आर्थिक मदत टाकण्याची वाट पाहत, अन्यथा ते पुढच्या दारी जात. गुरुजी नेहमी, ‘मी शिक्षणासाठी आहे’ असे म्हणत.

आपटे गुरुजी गुणग्राही होते. त्यांनी त्यांच्या राष्ट्रीय शाळेत त्यांच्यासारखेच ज्ञानी व त्यागी शिक्षकमंडळी जमवली होती. त्यांमध्ये काशिनाथ रघुनाथ वैशंपायन, दत्तात्रय धोंडो पुराणिक, ता.ब. कुलकर्णी, दिगंबर धोंडो पुराणिक, रामचंद्र नारायण खरे, लक्ष्मण बळवंत कुलकर्णी, उद्धव वामन भाटवडेकर, मुरलीधर जयदेव गोसावी, वामनराव मुंडले, राक्षे, गोविंद केशव जोशी, दत्तोटपंत जोशी, परदेशी आणि भाजेकर यांचा समावेश होतो. त्या सर्व शिक्षकांनी शिक्षणदानाचे कार्य चोखपणे बजावले. त्या सर्वांनी त्या संस्थेकडे उपजीवीकेचे साधन म्हणून पाहिले नाही. त्या कार्यासाठी त्यांची प्रसंगी पदरमोड करण्याचीही तयारी असे. आपटे गुरूजींनी त्या सर्व सहका-यांच्या सोबतीने त्या संस्थेचे संगोपन केले.

आपटे गुरुजींनी विद्यादानासोबत विद्यार्थ्‍यांना घडवण्‍याचे काम केले. त्‍यांनी विद्यार्थ्यांना धीटही बनवले. त्यांना ब्रिटिश सत्तेविरूद्ध दंड थोपटून उभे राहण्यास शिकवले. त्यांनी विद्यार्थ्यांकडून खाडिलकर, गडकरी यांची नाटके; तसेच, शेक्सपीयरच्या नाटकातील अँटनी आणि ब्रूट्स यांसारख्या कठीण भूमिका करवून घेतल्या. त्यांचे विद्यार्थ्यांच्या इंग्रजीच्या उच्चारांकडे विशेष लक्ष असे. त्यांनी विद्यार्थ्यांना नीती व सद्वर्तन यांचे धडे दिले. चांगल्या कार्यास तन-मन-धन अर्पून मदत करण्याचे बाळकडू पाजले. गुरूजींनी विद्यार्थ्यांवर त्‍यांना स्वदेश, स्वभाषा, स्वधर्म व भारतीय संस्कृती यांचा अभिमान वाटावा असे संस्कार केले. त्यांनी येवल्यात प्रथमच राष्ट्रीय गणेशोत्सवाची सुरुवात केली. ती देखील या राष्ट्रीय शाळेतूनच! त्यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेक देशभक्तांना व्याख्यानासाठी आमंत्रित करून राष्ट्रजागृतीचे कार्य केले. त्यांच्या विद्यार्थ्यांमधील शिस्त वाखाणण्यासारखी होती. गुरुजी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आयुष्यभर झटले. शिक्षण पुरे करून त्या शाळेतून बाहेर पडणारा विद्यार्थी ‘आदर्श विद्यार्थी’ म्हणून बाहेर पडत असे. ब्रिटिश सरकारचे १९३२ साली त्या शाळेकडे लक्ष गेले. त्यांनी ती राष्ट्रीय शाळा बेकायदेशीर ठरवून आपटे गुरुजींना दीर्घकाळाची शिक्षा ठोठावली. आपटे गुरूजींना त्‍या शिक्षेच्या काळात नाशिक येथील तुरूंगात ठेवण्यात आले होते.

देशभक्ताला-समाजसेवकाला खासगी, कौटुंबिक जीवन नसते. ते गुरुजींच्या बाबतीत खरे होते. घरात मुलगी आजारी असल्याने त्यांनी १९४२ च्या सत्याग्रहात भाग घेऊ नये असे त्यांच्या आप्तांनी त्यांना सुचवले. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून सत्याग्रहात भाग घेतला. त्यात त्यांना पुन्हा तुरुंगवासाची शिक्षा झाली. गुरुजींचे चिरंजीव शंभू आपटे (पुणे विद्यापीठाचे माजी उपकुलगुरू) हे त्यावेळी वैद्यकीय अभ्यास करत होते. पण समाज आणि राष्ट्र उभारणीच्या कार्यात गुंतलेल्या गुरुजींचे त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले होते. गुरुजी तुरुंगात गेल्यामुळे त्यांच्या धर्मपत्नी राधाबाई प्रपंचाला हातभार लागावा यासाठी नर्स म्हणून काम करू लागल्या.

गुरूजींचा येवल्यातील राजकीय जीवनाचा इतिहास म्हणजे येवल्याच्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास आहे. त्यांनी 1947 साली तुरूंगातून सुटका झाल्यानंतर येवले शहर सोडले.

येवल्यातील नागरिकांना गुरुजींबद्दल नितांत प्रेम व आदर होता. गुरुजींची गावातील प्रत्येक सांस्कृतिक व राष्ट्रीय कार्यक्रमामागे प्रेरणा असे. त्यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल जिव्हाळा निर्माण झाला होता. नागरिक आणि गुरुजी यांच्यात दृढ नाते होते. येवल्याचे प्रभावी सामाजिक नेतृत्व करणा-या आपटे गुरुजींना तेथील जनतेने त्यावेळच्या म्युनिसिपालटीतून (येवला नगर परिषदमधून) भरघोस मतांनी निवडून दिले होते. त्यावेळी त्यांना खांद्यावर घेऊन त्यांची प्रचंड मिरवणूक काढून ‘आपटे गुरुजी बोले आणि येवले हाले’ अशा घोषणा दिल्या गेल्या होत्या.

आपटे गुरूजींनी ९ डिसेंबर १९५६ रोजी जीवनयात्रा संपवली. त्यांच्या अखेरच्या इच्छेप्रमाणे त्यांचे शव पुणे येथील मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना शरीरशास्त्राच्या अभ्यासासाठी दिले गेले. त्यांच्या धर्मपत्नीने ‘आपले सर्वस्वच गेले’ म्हणून स्वत:चे मंगळसूत्रदेखील त्या मेडिकल कॉलेजच्या मदतीसाठी देऊन टाकले.

– प्रभाकर झळके

(आम्‍ही हा लेख अपडेट करण्‍याचा प्रयत्‍न करत आहोत. वाचकांकडे यासंदर्भातील माहिती असल्‍यास त्‍यांनी जरूर कळवावी. – टिम ‘थिंक महाराष्‍ट्र’)

About Post Author

1 COMMENT

  1. hya gurujinpramanech ekda
    hya gurujinpramanech ekda pujari sir baddal mahiti dyavi. Tyancha Jabbar Patel and Achyut Godbole hya diggajanvar prabhav hota

Comments are closed.