आत्मनाश आणि धर्म

1
25
carasole

दयामरण म्हणजे जी व्यक्ती; तिला असलेल्या असाध्य रोगामुळे जगणे अशक्य झाले आहे, तिला जिवंत ठेवणे म्हणजे तिचे स्वत:चेच हाल होत राहणे आहे. अशा व्यक्तीस, तिच्या नातेवाईकांच्या अनुमतीने डॉक्टरांनी मरण देणे – औषधांनी तिच्या जीवनाचा अंत करणे.

काही व्यक्ती त्यांना इतर काही कारणामुळे त्यापुढे जगायचे नाही, असा निश्चय करतात. त्या स्वत:च स्वत:चे जीवन संपवण्याचा निर्णय घेऊन तो अंमलात आणतात, त्यास आत्महत्या किंवा आत्मत्याग म्हटले जाते.

अशा प्रकारच्या मरणाबाबतची चर्चा सर्व अंगांनी उत्तम प्रकारे विजापूर येथील संगन बसवेश्वर कॉलेजचे प्राध्यापक श्री. र. भिडे यांनी ‘रामायण-महाभारतातील आत्महत्या’ या पुस्तकात केली आहे. भिडे यांनी म्हटले आहे, की जगातील बहुतेक सर्व धर्मांनीआत्मनाशाचा निषेध केलेला आहे. आत्मनाश हा निसर्गविरोधी आहे. ‘जातस्य हि ध्रुवो मृत्यु:’ जन्मलेल्या प्रत्येकाला मृत्यू हा येणारच असतो. त्यासाठी मुद्दाम प्रयत्न करण्याची आवश्यकता नसते. तरीही विविध धर्मांचे आत्मनाशाविषयीचे विचार, दृष्टिकोन आणि पद्धती जाणून घ्यायला हव्यात.

हिंदू धर्माने आत्मनाश हा दोषार्ह मानला आहे. ऋग्वेदात आत्मनाशाचे उल्लेख आढळत नाहीत. ‘उत्तरकालीन संहिता’ आणि ‘ब्राह्मण ग्रंथ’ सती प्रथेला अनुकूल नाहीत, मात्र ब्राह्मण ग्रंथांतील दोन उल्लेख आत्मनाशास पोषक आहेत. कालांतराने, सती जाण्याच्या प्रथेला धार्मिक अधिष्ठान लाभले असावे. आत्मयज्ञ हा सर्व प्रकारच्या यज्ञांहून श्रेष्ठ मानला गेला असून मृत्यू लवकरच प्राप्त व्हावा यासाठी सर्वसंगपरित्याग आणि वनवास हे उपाय सुचवले गेले आहेत. जाबाल आणि कठश्रुती या उपनिषदकारांनी संन्याशांना प्रायोपवेशन, जलप्रवेश, अग्निप्रवेश आदी मार्गांनी मृत्यूला जवळ करण्यास मुभा दिली आहे. माणसाने दैहिक गरजा क्रमाक्रमाने कमी करत मृत्यूला कवटाळणे शतपथ ब्राह्मणात प्रशस्त मानले गेले आहे. महाभारतात धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती यांनी त्या मार्गाचे अनुकरण केले आहे.

मनूने राजे आणि रोगग्रस्त यांच्यासाठी आत्मनाशाचे दोन मार्ग सुचवले आहेत. वृद्ध राजांनी पुत्राला राज्यपदी आरूढ करून, दंडाद्वारे प्राप्त झालेले धन ब्राह्मणांना दान करावे आणि अंतकाळ जवळ आला आहे हे लक्षात घेऊन रणांगणावर किंवा तसा युद्धप्रसंग नसेल तर उपवासाने देहत्याग करावा असे सांगितले आहे. रोग्याने ईशान्येकडे प्रस्थान ठेवून केवळ वायू व पाणी यांचे सेवन करत देहपात होईपर्यंत चालत राहवे. कौटिल्याने आत्मनाश हा खूनच मानला आहे. अग्निप्रवेशाने ब्राह्मण्याची प्राप्ती होते असे धर्मसूत्रात सांगितले आहे. मेधातिथीने जलसमाधी, अग्निप्रवेश, उपवास या उपायांना अनुकूलता दर्शवली आहे. प्रायोपवेशन, पवित्र नद्यांचे संगम, तीर्थक्षेत्रे इत्यादी पवित्र स्थळी मृत्यू येण्यासाठी प्रयत्न करणे, स्वत:चे शरीर जगन्नाथाच्या रथाखाली चिरडून घेणे, भवानीपुढे गळा कापून घेणे, व्यक्तीने स्वत:चा कडेलोट पवित्र शैलशिखरावरून करून घेणे आणि महारोग्याने स्वत:ला जमिनीत पुरून घेणे हे आत्मनाश गैर मानलेले नाहीत; उलट, गौरवास्पद मानले आहेत. सती जाणे हे बऱ्याच काळापर्यंत धार्मिक कृत्य मानले जाई. परंतु, कालौघात सामाजिक मूल्ये बदलतात. सतीच्या प्रथेत अनेक समाजघातक विकृती उत्पन्न झाल्याने कायद्याने त्या प्रथेला बंदी घालण्यात आली.

समर्थ रामदासांनी आत्मनाशाचा धिक्कार केला असून आत्मनाश करणाऱ्यास (त्यांचा शब्द आत्महत्यारा) मूर्ख ठरवले आहे. समर्थांनी तमोगुण व्यक्तींच्या लक्षणांचे निरूपण करत असताना त्यात आत्महत्यारांचा अंतर्भाव केला आहे.

आत्मनाशाला बौद्ध धर्मात स्थान नाही. मनुष्याला जे आणि जसे जीवन लाभते ते त्याने तसेच स्वीकारायचे असते. आत्मनाशाने अर्हतपद किंवा निर्वाण यांची प्राप्ती होत नाही. त्याचप्रमाणे गतजन्मीची पातकेही त्यामुळे नष्ट होत नाहीत. बौद्ध धर्माने आत्मनाश हा खून मानून त्याचा निषेध केला आहे. बौद्धांच्या मते, तृष्णा दोन प्रकारची असते. भवतृष्णा म्हणजे जगण्याची उत्कट इच्छा आणि विभवतृष्णा म्हणजे न जगण्याची – मरणाची इच्छा. त्या दोन्ही त्याज्य मानल्या आहेत. आत्मनाशाने आध्यात्मिक उन्नती होत नाही. पुनर्जन्मी बौद्ध धर्मच प्राप्त व्हावा या उद्देशाने केलेला आत्मनाश मात्र धर्ममान्य मानला आहे ! त्या धर्मातील महायान पंथीयांची विचारसरणी वेगळी आहे. त्यांच्या मते, आत्मनाश हा श्रेष्ठ आत्मयज्ञ होय. देह जाळून घेणे देवळीत दिवे लावण्यापेक्षा अधिक पुण्यप्रद आणि दान भिक्षा म्हणून देण्यापेक्षा देहदान करणे त्यांनी अधिक उत्तम मानले आहे.

भारतीय साधुसंतांनी परमेश्वरप्राप्तीच्या उद्देशाने केलेला आत्मनाशसुद्धा दोषार्ह मानला. जैनांनीही त्याचा निषेधच केला आहे. मात्र जैन धर्माने उपवासाने मृत्यूजवळ जाणे हे उचित मानले आहे. जैन उपवासाने आत्मशुद्धी होते असे मानतात. जैन धर्माचा विश्वास मौनाने शाब्दिक पाप, श्वसनाच्या संयमाने मानसिक पाप, उपवासाने शारीरिक पाप आणि इंद्रियदमनाने आसक्तीमुळे होणारे पाप नष्ट होते असा आहे. त्या धर्मास कडेलोटादी अन्य उपायांनी आत्मनाश करणे मान्य नाही. जैनांनी ‘आचारांगसूत्र’ या ग्रंथात आत्मार्पणास अनुकूलता दर्शवली आहे. मात्र जैन धर्माने मृत्यूला जवळ ओढणे, तो लवकर प्राप्त व्हावा यासाठी प्रयत्न करणे निषिद्ध मानले आहे. तेथे उपवासाने मृत्यूजवळ जाणे यावर भर आहे. जैन धर्मात संलेखना हा वैशिष्ट्यपूर्ण उपवास आहे. संलेखनेत तसे प्रयत्न असतात, म्हणून तिला धर्माची मान्यता आहे. पूर्णत्व प्राप्त झालेल्या संयमीने विशिष्ट रीतीने अन्नपाण्याचे प्रमाण कमी कमी करत मृत्यूजवळ जाणे यास धर्माची मान्यता आहे. पार्श्वनाथ आणि अरिष्टनेमी यांनी तशा प्रकारे जीवनयात्रा संपवली.

मुसलमानांनी आत्मनाश म्हणजे देवाशी द्रोह मानला आहे. बुखारीच्या मते, आत्मनाश करणारा कुराण आणि प्रेषित (सुन्नाह) यांचे उल्लंघन करत असतो. कुराणात आत्मनाशाला प्रतिबंध करणारे उल्लेख नसले तरी अल्लाच्या अनुमतीशिवाय, जाणुनबुजून आत्मनाश करणे अयोग्य मानले आहे. महंमदाने आत्मनाश करणाऱ्याचे दफन करण्यास मनाई केली असल्याची कथा प्रसिद्ध आहे.

इजिप्शीयन लोक दुसऱ्याकडून मृत्यू येण्यापेक्षा स्वत:चा मृत्यू स्वत: घडवून आणणे श्रेयस्कर मानत. होमरच्या मते, जगण्यास आवश्यक गोष्टींचा अभाव असेल तर आत्मनाश करणे हा सहज व सुलभ उपाय होय. त्याने दारिद्र्यामुळे केलेला आत्मनाश समर्थनीय ठरवला आहे. ग्रीक काव्यातील आत्मनाश हे उदात्त हेतूने प्रेरित असल्याने वीरोचित असे आहेत. त्यांच्या मते, आत्मनाश दोषास्पद नाही. अथेनियन स्त्रिया आत्मनाशासाठी हेमलॉक नावाच्या विषारी वनस्पतींचा उपयोग करत असत. सॉक्रेटिसने आत्मनाशासाठी त्या वनस्पतीचा उपयोग केला होता. तशाच प्रकारे, कण्हेरीच्या झाडाच्या मुळ्यांनी आत्मनाश करता येतो असा उल्लेख अन्यत्र आढळतो. रोमच्या इतिहासात वीरोचित आत्मनाश बरेच आढळतात. ख्रिश्चनांनी मात्र आत्मनाश धिक्कारला आहे. आत्मनाश केलेल्याच्या पार्थिवावर प्रार्थनादी अंत्यसंस्कार केले जात नसत.

आत्मनाशासंबंधी ही चर्चा न संपणारी आहे. तत्संबंधी भिडे यांचे सदर पुस्तक वाचणे आवश्यक आहे.

(‘जनपरिवार’ २२ जून २०१५ वरून पुनर्मुद्रित)
रामायण-महाभारतातील आत्महत्या

श्री.र. भिडे
राजहंस प्रकाशन

– जॉन कोलासो

About Post Author

1 COMMENT

Comments are closed.