सोलापूर पाठोपाठ जळगावला हे घडणे अपेक्षितच होते. तेथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठास बहिणाबार्इंचे नाव द्यावे अशी आग्रही मागणी सुरू झाली आहे. सोलापूरचे वादंग ही अक्षरश: तीन महिन्यांपूर्वीची, ऑक्टोबर-नोव्हेंबर 2017 मधील घटना.
सरकारने सोलापूर विद्यापीठास अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचे जाहीर करून त्या वादावर पडदा टाकला. सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरावरून वादळ उठले हे वाचूनच वाईट वाटले होते. मुख्यमंत्र्यांनी तो वाद असा समाप्त करावा व धनगर समाजाला खूष करावे हेही योग्य वाटले नाही. मुळात सुशिक्षित मराठी समाजदेखील विचारभावनांनी अजून किती मागास आहे हेच या अशा वादांवरून जाणवते.
लोकांच्या मनी विद्यापीठे रुजतात, ती त्या शहरांच्या नावाने आणि त्याहून अधिक विद्यापीठातील शिक्षणाच्या दर्ज्याने. तो दर्जा दिवसेंदिवस खालावत चालला आहे. नामांतरावरून प्रथम ‘मराठवाडा विद्यापीठा’त वाद झाला. नंतर ‘मराठवाडा विद्यापीठा’चे व ‘पुणे विद्यापीठा’चे अशी नावे बदलण्यात आली. लोक संभाषणात किंवा काही वेळा व्याख्यानांसारख्या सार्वजनिक कार्यक्रमातदेखील विद्यापीठांच्या मूळ शहरांवरून नावांचा उल्लेख करताना दिसतात; पत्रव्यवहारासारख्या लेखी व औपचारिक गोष्टींमध्ये विद्यापीठाचे नवीन पूर्ण नाव येते. त्यामुळे नवनवीन नावांच्या प्रवर्तकांना जो काही आनंद लाभत असेल तो त्यांचा त्यांनाच लखलाभ समजला पाहिजे. मराठवाड्यात पहिले विद्यापीठ औरंगाबादला झाले. त्यामुळे त्यास प्रथम प्रादेशिक अस्मिता लाभली व ते मराठवाडा नावाने ओळखले गेले. नांदेडला वेगळे विद्यापीठ झाल्यावर मूळ मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या नावाने उल्लेखले जाते. मुंबईच्या ‘व्हिक्टोरिया टर्मिनस’ या मध्यवर्ती स्टेशनचे नाव बदलले. त्यास ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ हे नाव दिले गेले. त्या नावाचा उल्लेख सर्वत्र ‘छशिमट’ असा केला जातो. त्यात एक शक्यता गृहीत धरली पाहिजे, की ‘व्हिक्टोरिया टर्मिनस’चे जसे ‘व्हीटी’ झाले व ते पिढ्यान् पिढ्या पुढे रूळत गेले, तसे ‘छशिमट’ (csmt) चे होईल. अर्थातच सोलापूर विद्यापीठाचे व आता कदाचित जळगाव विद्यापीठाचे नामांतरदेखील त्याच पद्धतीने रूळून जाईल.
आक्षेप वाटतो, तो सुशिक्षित, सुसंस्कृत समाजाने विद्यापीठासारख्या उच्च शिक्षण संस्थेबाबत नामांतराच्या क्षुल्लक व भावनिक गोष्टीला इतके महत्त्व का द्यावे, हा? धनगर समाजाचे म्हणणे सोलापूर विद्यापीठास अहिल्यादेवींचे नाव द्यावे असे आहे. त्या विरूद्ध आग्रह आहे तो विद्यापीठास सिद्धेश्वराचे नाव द्यावे, असा. अहिल्यादेवींचे इतिहासातील स्थान महाराष्ट्रात/भारतात अढळ आहे आणि सिद्धेश्वर तर महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र राज्यांतील लक्षावधी लोकांकडून पूजला जातो. त्याच्या नावे यात्रा भरतात. नवनवीन कथा-दंतकथा प्रसृत होत असतात. सिद्धेश्वर मंदिराचा परिसर रमणीय असल्यामुळे तो पर्यटकांचेदेखील आकर्षण ठरतो. त्यामुळे विद्यापीठाला सिद्धेश्वराचे नाव दिल्याकारणाने त्याच्या महतीत काहीच भर पडणार नाही. अहिल्यादेवींच्या बाबतही तेच म्हणता येईल.
जळगावला बहिणाबार्इंचेदेखील तेच… प्रथम सोपानदेव चौधरी व आचार्य अत्रे यांनी बहिणाबार्इंचे लोकजीवनातील स्थान व त्याची अभिजातता टिपली. टीव्ही माध्यम आल्यावर गायिका उत्तरा केळकर यांनी बहिणाबार्इंची गाणी घरोघरी पोचवली. त्यांचे शब्द ओठाओठांवर उमटू लागले. त्यांतील जीवनतत्त्वज्ञान विशेषत: गृहिणींच्या हृदयात बंद झाले, बहिणाबार्इंचा यापरता काय मोठा सन्मान विद्यापीठास नाव दिल्याने होणार आहे? विद्यापीठात त्यांच्याबाबत अधिक संशोधन व्हावे- ते जगभर पोचवावे हे उचित नाही का?
सोलापूर, जळगाव ही विद्यापीठे स्थापन होऊन पंधराहून अधिक वर्षें लोटली. त्या विद्यापीठांनी त्यांची नावे प्रस्थापित होण्याच्या दृष्टीने कोणताही आगळावेगळा शैक्षणिक प्रकल्प वा उपक्रम हाती घेतल्याचे ऐकिवात नाही. उलट, तेथील अध्यापनाचा व अध्ययनाचा दर्जा बेताचाच मानला जातो. ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ला सोलापूर विद्यापीठाच्या संदर्भात मुद्दाम लिहावेसे वाटते, याचे कारण आम्हा संयोजक कार्यकर्त्यांच्या मनात त्या विद्यापीठाबद्दल हळवी भावना आहे. ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ने तीन वर्षांपूर्वी ‘सोलापूर जिल्हा संस्कृतिसंचित’ नावाचा माहिती संकलनाचा उपक्रम हाती घेतला. तेव्हा विद्यापीठाशी व विद्यार्थ्यांशी संपर्क आला होता. एक-दोन सत्प्रवृत्त व्यक्तींचे अपवाद वगळता सर्वत्र नोकरशाहीचा अनुभव होता. विद्यापीठातील पत्रकारितेच्या वर्गातील पदव्युत्तर पंचवीस विद्यार्थी ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या माहिती संकलन मोहिमेत प्रत्येकी तीन दिवस सहभागी झाले. त्यांना ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ प्रकल्पाशी अभिमुख करण्याकरता काही खास अभ्यासवर्ग योजले गेले. परंतु पंचवीसांपैकी एक-दोन अपवाद वगळता कोणी विद्यार्थी वा विद्यार्थिनी खास छाप पाडू शकले नाहीत. ना त्यांच्यापैकी कोणी या वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पाबद्दल औत्सुक्य दाखवले.
तीच गोष्ट अन्य विभागांची कमीजास्त प्रमाणात असणार असे विद्यापीठातील फेरफटक्यामध्ये ध्यानात येते. येथे हे नमूद केले पाहिजे, की पुणे-मुंबई विद्यापीठांसारख्या जुन्या संस्थांमध्ये देखील शैक्षणिकदृष्ट्या सोलापूरसारखीच अवनत अवस्था जाणवत असते. तेव्हा सुशिक्षित व सुसंस्कृत समाजाचा मुख्य भर असला पाहिजे तो अशा शैक्षणिक संस्थांचा दर्जा सुधारता कसा येईल यावर. अशी कामे सरकार वा प्रस्थापित संस्था यांच्याकडून साधली जाऊ शकत नाहीत. त्यासाठी समाज संवेदनाशील व विचारी आणि सजग राहिला पाहिजे, तो एकवटला पाहिजे. सुशिक्षित लोकांनी समाजाला भावनालोटाच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी झटत राहिले पाहिजे.
– दिनकर गांगल