मराठी संस्कृतीचा झळाळता प्रासाद राजकारण, समाजकारण, नाटक, वक्तृत्व आणि पत्रकारिता या पाच प्रमुख स्तंभांवर तोललेला आहे. महाराष्ट्रात कर्तृत्वसंपन्न व्यक्ती त्या एकेका क्षेत्रात होऊन गेलेल्या आहेत. पण एकाच व्यक्तीच्या अंगी हे सारे पैलू असलेली प्रतिभावान व्यक्ती म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे …
आचार्य अत्रे यांनी काव्य, नाटक, कथा, चित्रपटकथा, समीक्षा, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, निबंध असे सारे लेखन प्रकार हाताळले; काव्य आणि नाटक यांवर स्वत:ची नाममुद्रा उमटवली. नाटकांद्वारे हास्यरस आणि करुणरस निर्मिती, काव्याद्वारे विडंबन, पत्रकारितेतून विवेकशून्य, नीतिभ्रष्ट राजकारण्यांवर कोरडे, जे पूजनीय त्याचे उत्कटतेने गुणगान… ही सारी अभूतपूर्व किमया अत्रे यांनी करून दाखवली. त्यांनी त्यांच्या लेखणीने आणि वक्तृत्वाने आयुष्यभर महाराष्ट्रातील जनतेच्या प्रबोधनाची काळजी वाहिली. त्यांचे लिहिणे आणि बोलणे हे समूहासाठी होते. त्यांना सर्वसामान्य माणसाच्या मनातील क्रिया-प्रतिक्रिया, त्यांच्या अपेक्षा, आशा, चिंता यांची जाण होती, म्हणूनच ते जनतेच्या भावनांना हात घालू शकले. अत्रे यांना हास्य, अश्रू, क्रोध, त्वेष या भावनांचा लोकांच्या हृदयात परमोत्कर्ष कसा होईल, कोणत्या वेळी त्यांच्यासमोर कोणत्या प्रकारचे लेखन ठेवावे किंवा वक्तृत्वाचा कोणता बाज लोकांना जिंकून घेऊ शकेल याचे नेमके भान असल्यामुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. गर्दी अत्रे यांच्यासाठी होती; अत्रे गर्दीचे होते ! जनतेने त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील आणि लेखन-वक्तृत्वातील दोषांसहित त्यांच्यावर उदंड प्रेम केले. त्यांच्या लेखणीचा, वाणीचा आणि जगण्याचा बाणा अस्सल ‘मऱ्हाटी’ होता- अमंगलावर प्रहार करताना लेखणीला आणि वाणीला तलवारीची धार तर शिव-सुंदराचे स्तोत्र गाताना फुलांहून फूल असे हळुवार शब्द ! अत्रे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा कवीचा होता. त्यांनी ‘मराठा’त लिहिलेले मृत्युलेख, व्यक्तिपर लेख, छोटी छोटी प्रवासवर्णने ‘श्यामची आई’सारखा चित्रपट या सगळ्यालाच काव्यमयतेचा स्पर्श आहे.
आचार्य अत्रे यांनी आयुष्यात अनेक चढउतार अनुभवले, तरी त्या साऱ्या वादळवाऱ्यांत अत्रे नावाचा बलदंड माणूस कणखर, धीटपणाने जीवनात पाय रोवून उभा राहिला ! किंबहुना तो जीवनावर स्वार झाला आणि त्याने त्याची प्रज्ञा व प्रतिभा यांच्या बळावर यश खेचून आणले. अत्रे यांची वैशिष्ट्ये कोणतेही काम झोकून देऊन, विलक्षण एकाग्रतेने करण्याची वृत्ती, अस्सल मराठी प्रासादिक शैली, जीवनावर उत्कट प्रेम, महाराष्ट्राचा आणि मराठी माणसांचा प्रचंड अभिमान, विजिगीषु स्वभाव ही होती. ते जीवनातील प्रत्येक क्षण भरभरून जगले. त्यांची ऊर्जा ‘प्रचंड’ आणि ‘गेल्या दहा हजार वर्षांत झाले नाही, होणार नाही’ असे अतिशयोक्तिपूर्ण शब्द ही होती. स्वत:बद्दल नि:संकोचपणे स्तुतिपर बोलणारा, त्यांचे यश आणि कीर्ती दोन्ही बाहू उभारून- गर्जून सांगणारा मराठी साहित्यिक दुसरा कोणी नाही.
अत्रे प्रसिद्धीच्या झोतात आले, लोकप्रियतेच्या लाटेवर आरूढ झाले ते त्यांच्या विडंबन कवितांमुळे. रविकिरण मंडळातील कवी जोमाने काव्यलेखन 1922 च्या सुमारास करत होते. ‘झेंडूची फुले’मधील कवितांचा जन्म रविकिरण मंडळ रूढ करू पाहत असलेल्या कवितांतील काही कृत्रिमता, विशिष्ट शब्दयोजना आणि मराठी काव्यक्षेत्रात शिरलेल्या काही अपप्रवृत्ती यांची सहज गंमत म्हणून टर उडवावी या हेतूने झाला, ते स्वत:च्या त्या कवितांकडे ‘रिकामपणाच्या वेळी केलेला एक व्रात्यपणा’ या दृष्टीने पाहत होते. अत्रे यांनी बेळगाव, पुणे येथील संमेलनांमध्ये काही विडंबन कवितांचे वाचन केले आणि त्यांना दणदणीत प्रतिसाद मिळाला. ‘झेंडूच्या फुलां’नी मराठी काव्यक्षेत्रात अढळ स्थान काव्याविषयी आस्था, सूक्ष्म जाण, मार्मिक बुद्धी, रचनेवर हुकूमत आणि दिलखुलास विनोद या गुणांमुळे मिळवले.
अत्रे बीए, बीटीटीडी (लंडन) या पदव्या 1928 मध्ये अभिमानाने लावू लागले. त्यांनी पुण्याच्या कँप एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून उत्तम कामगिरी केली. भूगोलाचे तज्ज्ञ शिक्षक म्हणून नाव मिळवले आणि ते शिक्षणतज्ज्ञ ‘नवयुग वाचनमाले’मुळे तर झाले. त्या मालेने तीन-चार पिढ्यांची वाङ्मयीन अभिरूची जोपासली ! ‘दिनूचे बील’, ‘आजीचे घड्याळ’, ‘कुत्र्याचे पिल्लू’ असे बालमनाची स्पंदने टिपणारे पाठ म्हणजे बालकांना मेजवानी वाटली आणि रूक्ष, प्रौढांच्या विश्वातील विषयांवरील बोजड पाठ क्रमिक पुस्तकांत समाविष्ट करणाऱ्यांना अंजन ठरले.
अत्रे यांनी नाटक मागणीनुसार लिहिले. बालमोहन नाटक मंडळीने अत्रे यांच्याकडे नाटक 1933 च्या जानेवारीत मागितले. तो काळ मराठी नाट्यसृष्टीच्या आसन्नमरण अवस्थेचा होता. तिचे चैतन्य, वैभव नष्ट झाले होते. अशा बिकट परिस्थितीत प्रेक्षकांना रंगभूमीकडे खेचून आणणारे नाटक हवे होते. अत्रे यांच्या ‘साष्टांग नमस्कार’चा पहिला प्रयोग 10 मे 1933 रोजी पुण्याच्या विजयानंद नाट्यगृहात झाला आणि नाट्यसृष्टीतील मरगळ दूर झाली. ‘साष्टांग नमस्कार’ लोकप्रिय झाले. नाट्येतिहासातील तो महत्त्वाचा टप्पा ठरला. अत्रे यांनी तेवीस-चोवीस नाटके लिहिली. त्यांनी सुखान्त आणि शोकान्त असे दोन्ही प्रकार आणि मोलिअरचे नाट्यतंत्र हाताळले. त्यांची ‘घराबाहेर’, ‘उद्याचा संसार’, ‘लग्नाची बेडी’, ‘तो मी नव्हेच’, ‘मोरूची मावशी’ ही नाटके विशेष गाजली. ते राम गणेश गडकरी यांना गुरू मानत. काही सामाजिक प्रश्न, वास्तवातील समकालीन घटना, सुटसुटीत संवाद, विनोद हे त्यांच्या नाटकांचे विशेष होत. अत्रे यांची नाटके म्हणजे प्रहसनेच आहेत ! त्यांच्यावर टीका ‘त्यात उदात्त व्यक्तिरेखा नाहीत, उच्च तात्त्विक मूल्ये नाहीत’ अशा प्रकारे झाली, परंतु अत्रे, रांगणेकर, ‘नाट्यमन्वतंर’चे कलाकार, लेखक-दिग्दर्शक यांनी मृतप्राय झालेल्या मराठी रंगभूमीत प्राण फुंकण्याचे कार्य केले, हा इतिहास आहे.
अत्रे यांचे वक्ता म्हणूनही चांगले नाव 1934 च्या आसपास होऊ लागले. त्यांना ‘हशा आणि टाळ्या’ यांचे तंत्र जमले होते. अत्रे सभा जिंकू लागले ते त्यांच्या मार्मिक युक्तिवाद, प्रतिपक्षाची टिंगल, बिनतोड प्रतिपादन, निर्भीड विनोद, श्रोतृवर्गाच्या मानसिकतेचा अचूक अंदाज, भोवतालच्या ताज्या घटनांचे दाखले अशा क्लृप्तींमुळे.
अत्रे नाटककार झाले, वक्ता झाले. पण जीवनाचा हा यात्रेकरू कोणत्याही एकाच क्षेत्रात रमणारा नव्हता. तो जमाना बोलपटांचा होता. नाविन्याचे आकर्षण, सर्व क्षेत्रांविषयीची जिज्ञासा, जिद्दी- महत्त्वाकांक्षी स्वभाव, स्वत:वर उदंड प्रेम आणि विश्वास यामुळे अत्रे अनेक क्षेत्रांत डोकावले आणि त्यांनी त्या त्या क्षेत्रातील सर्वोच्च बहुमान मिळवले. त्यांनी त्यांच्या मनावर Top places are always vacant हे ठसवले असावे.
‘हंस पिक्चर्स’ने अत्रे यांचे धर्मवीर, प्रेमवीर, ब्रह्मचारी हे बोलपट काढले. त्यांनी स्वत:ची ‘नवयुग’ चित्रपटसंस्था स्थापन केली. त्यांनी जवळजवळ वीस चित्रपट कथा लिहिल्या. उत्कृष्ट संवादलेखक म्हणून त्यांचा ठसा उमटवला. त्यांच्या ‘श्यामची आई’ चित्रपटाला राष्ट्रपती सुवर्णपदक मिळाले. अत्रे आणि मराठी चित्रपटसृष्टी यांचा तो मोठा सन्मान ठरला. त्या पारितोषिकाची बातमी कळताच अत्रे आणि ‘श्यामची आई’चे संगीत दिग्दर्शक वसंत देसाई प्रथम आळंदीला ज्ञानेश्वरांच्या चरणी माथा टेकण्यासाठी गेले. अत्रे यांचे भावनाप्रधान आणि सश्रद्ध मन त्यातून दिसते.
अत्रे यांना ‘नवयुग’ चित्रपटसंस्थेच्या प्रचारासाठी साप्ताहिकाची गरज भासू लागली. त्यांनी ‘नवयुग’ साप्ताहिकाचा पहिला अंक 19 जानेवारी 1940 रोजी प्रसिद्ध केला. अत्रे यांची ‘शिवशक्ती’ ‘नवयुग’ आणि दैनिक मराठा, यांमुळे पत्रकारितेच्या क्षेत्रात तळपू लागली. त्या क्षेत्रातील त्यांचा आदर्श होता ‘संदेश’कार अच्युत बळवंत कोल्हटकर; अत्रे यांचे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळचे त्यांनी त्यांचे ‘मराठा’मधील लेखन आणि त्यांचे अमोघ वक्तृत्व यांच्या बळावर महाराष्ट्र पिंजून काढला. ते त्यांचे कार्य अविस्मरणीय आहे. त्यांनी वृत्तपत्र हे अग्रलेखासाठी वाचायचे असते याची मराठी माणसांना नव्याने आठवण करून दिली ती ‘मराठा’तील अग्रलेखांनी. ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ हा कालिदासावरील अग्रलेख, रँग्लर र.पु. परांजपे यांच्यावरील ‘नव्वद नाबाद’ हा अग्रलेख, पंडित नेहरू यांना त्यांच्या मृत्यूनंतर तेरा दिवस वाहिलेली श्रद्धांजली, मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी; साने गुरुजी, ‘माझा बाबू गेला’ हे मृत्युलेख… असे कितीतरी लेख ‘मराठा’चे भूषण ठरले. अनेक थोर व्यक्तींविषयी अत्रे यांनी आस्थेने, गुणग्राहकतेने लेखन केले- अनेकदा, अश्लाघ्य टिकाही केली. अमर्याद स्तुती आणि टोकाची निंदा हे त्यांचे विशेष होते. पण त्यांतील अमर्यादा, टोक हे दोष जमेस धरूनही त्यांनी “वृत्तपत्रकार हा प्रथम साहित्यिक असावा लागतो” हे त्यांचे म्हणणे कृतीतून सिद्ध करून दाखवले ! अत्रे जीवनवादी साहित्यिक होते. त्यांचे गुण बुवाबाजी-ढोंग-भ्रष्टाचार-अन्याय याविषयीची चीड, उदात्त मूल्यांविषयी श्रद्धाभाव, मानवी जीवनाविषयी आणि श्रेष्ठ व्यक्तींविषयी कृतज्ञता हे होते. कोणत्याही काळी अनेक प्रसंगी ‘आज अत्रे हवे होते’ असे उद्गार लोकांच्या तोंडी येऊ शकतील असे त्यांचे कर्तृत्व आहे. हे त्यांचे किती मोठे यश आहे !
अत्रे यांनी कारवारच्या प्रवासाचे वर्णन, रशियाच्या प्रवासाचे वर्णन, ‘साने गुरुजींच्या जन्मभूमीत’ हे कोकणाचे वर्णन अशी प्रवासवर्णने लिहिली आहेत. ती त्यांच्या कविवृत्तीची, रसिकतेची, सूक्ष्म निरीक्षणशक्तीची साक्ष पटवणारी आहेत. त्यांना असेलेले निसर्गाचे वेड, त्यातून होणारे भावनांचे उन्नयन हे त्या लेखनातून जाणवते.
अत्रे यांनी अनेकदा त्यांचा साहित्यविषयक, जीवनविषयक दृष्टिकोन व्यक्त केला आहे. ती त्यांनी केलेली जीवनाची, साहित्याची समीक्षाच आहे. साहित्य निर्मिती विषयी त्यांचे चिंतन, ‘स्फूर्ती हा परमेश्वरी चमत्कार नसून ती भावनात्मक तल्लीनतेची एक सूक्ष्मतरल अवस्था आहे.’ किंवा ‘वाङ्मय म्हणजे जीवनातील मधु. वाङ्मय म्हणजे मधाचे पोळे. पोळ्यातील कलेला महत्त्व नाही. मधाला महत्त्व. मध म्हणजे जीवन. वाङ्मयात शब्दांना महत्त्व नाही; कलेला नाही, तंत्राला नाही. त्यात मधु आहे की नाही हाच प्रश्न महत्त्वाचा.’ यांसारख्या वाक्यांतून दिसते.
अत्रे यांच्यावर ज्ञानेश्वर-तुकारामादी संतांचे संस्कार होते. त्यांची वृत्ती भक्तिमान अंत:करण आणि गुणपूजन अशी होती; प्रसंगी शत्रूचेही गुण मान्य करण्याची, भांडणे-वैर मिटवून टाकण्याची दिलदार होती. अत्रे-माटे, अत्रे-भावे, अत्रे-फडके हे वाद मराठी साहित्यात खूप गाजले. अत्रे यांनी हार आणि प्रहार हे दोन्ही आयुष्यभर झेलले. भांडणे केली आणि मिटवलीही. अत्रे यांच्यामध्ये अनोखे मिश्रण रांगडा पुरुषार्थ आणि अध्यात्म प्रवण, निसर्गपूजक, निरागस कविमन यांचे दिसते. त्याचे प्रतिबिंब त्यांच्या लेखनात आहे.
त्यांनी त्यांचा जीवनपट ‘मी कसा झालो’ आणि ‘कऱ्हेचे पाणी’चे पाच खंड या आत्मचरित्रपर ग्रंथात उलगडलेला आहे. त्यात उणिवा असल्या तरी आत्मचरित्राचा असा बृहत् प्रकल्प अन्य कोणा लेखकाने हाती घेतलेला नाही.
13 ऑगस्ट 1898 रोजी सासवड येथे जन्म घेतलेले ते वादळ 13 जून 1969 रोजी शांत झाले ते लाखो मराठी माणसांच्या मनात लखलखती स्मृती जागी ठेवून !
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे
जन्म 13 ऑगस्ट 1898, निधन 13 जून 1969
काव्य
- गीतगंगा, 2. झेंडूची फुले, 3. पंचगव्य
प्रमुख नाटके
- साष्टांग नमस्कार, 2. घराबाहेर, 3. भ्रमाचा भोपळा, 4. उद्याचा संसार, 5. लग्नाची बेडी, 6. जग काय म्हणेल, 7. तो मी नव्हेच, 8. मोरूची मावशी, 9. ब्रह्मचारी
कथासंग्रह
- ब्रँडीची बाटली, 2. बत्ताशी व इतर कथा, 3. हास्यकथा भाग 1 व 2, 4. कशी आहे गम्मत (राजकीय कथा व लेख), 5. आत्रेय कथा, 6. अशा गोष्टी अशा गमती, 7. चित्रकथासंग्रह भाग 1 व 2
कादंबरी
- महाराष्ट्र मोहरा, 2. मोहित्यांचा शाप, 3. चांगुणा
चरित्र
- जन्मठेप, 2. सूर्यास्त, 3. इतका लहान ! इतका महान !, 4. मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी : सानेगुरुजी
वृत्तपत्रीय. लेखन – निबंध – स्फुटलेखन
- अत्रे उवाच, 2. पत्रकार अत्रे, 3. मराठी माणसे, मराठी मने, 4. दुर्वा आणि फुले
व्याख्यान संग्रह
- हशा आणि टाळ्या
विनोद
- विनोदगाथा
प्रवास वर्णन
- केल्याने देशाटन, 2. भ्रमन्ती, 3. साहित्ययात्रा
– मेधा सिधये 9588437190 medhasidhaye@gmail.com
व्यंकटेश अपार्टमेंट, 1204 सदाशिव पेठ, लिमयेवाडी, पुणे 411 030
————————————————————————————————————————————————————