– ऋचा गोडबोले
मोठे आकडे म्हणजे मोठा परिणाम, असा हिशोब आपल्या डोक्यात असतो. त्यामुळे आकडेवारी दिसली, की तिची फार चिकित्सा न करता, त्यावर बेतलेली अनुमाने बघून काही महत्त्वाचे वाचल्याचे समाधान आपण मिळवतो. आयत्या, संदर्भहीन आकड्यांच्या ताटात नक्की कोणत्या पद्मिनीचे दर्शन घडवायचे आहे हे आकडे वाढणार्यांनाही माहीत करून घ्यावेसे वाटत नाही.
– ऋचा गोडबोले
‘एकशेएक टक्के खात्री’, ‘एकशेचौतीस टक्के वाढ’ असे आकडे आपण शीर्षके, मथळे आणि सूचना यांमधे नेहमी वाचत असतो. मुद्दे आकड्यांत व्यक्त केल्याने निकडीने दखलपात्र होतात असा सार्वत्रिक समज असल्याचा हा परिणाम. करतो त्या विधानात अतिव्याप्ती टाळण्यासाठी, नेमकेपणा आणण्यासाठी सर्वसामान्य भाषेत गणिती आकडेवारी मोलाची असते. त्याबरोबर आकड्यांमधून दिसणार्या नेमकेपणासाठी बरेच व्यावहारिक तपशील गाळावे लागतात हे भान महत्त्वाचे असते. असे असल्याने कोणतीही आकडेवारी सत्याला पर्याय ठरू शकत नाही. मुख्य म्हणजे आकडेवारी ही कृतीला पर्याय ठरू शकत नाही. मोठे आकडे म्हणजे मोठा परिणाम असा हिशोब आपल्या डोक्यात असतो. त्यामुळे आकडेवारी दिसली की तिची फार चिकित्सा न करता, त्यावर बेतलेली अनुमाने बघून काही महत्त्वाचे वाचल्याचे समाधान आपण मिळवतो. आयत्या, संदर्भहीन आकड्यांच्या ताटात नक्की कोणत्या पद्मिनीचे दर्शन घडवायचे आहे हे आकडे वाढणार्यांनाही माहीत करून घ्यावेसे वाटत नाही, त्यांची तेवढी क्षमताही बर्याचदा नसते.
गणिताची मूळ प्रेरणा बाहेरच्या जगाचा यथातथ्य आकृतिबंध तयार करून, ते समजून घेण्याची असते. तीन पदे माहीत असली तर त्यांतला परस्परसंबंध हुडकून त्यानुसार चौथे पद कोणते यावे ह्याचा भविष्यदर्शी प्रयत्न गणितात चालतो. ह्यातल्या ‘यथातथ्य’चा परिणाम म्हणजे तयार केलेला आकृतिबंध कोणत्या मर्यादांत खरा आहे ही जाणीव तो वापरताना सतत स्पष्ट हवी. शब्द, विशेषणे व भाषा यांपेक्षा आकडे मुळातून तपासण्याच्या सोयीमुळे विधानांची सत्यता ठळक करू शकतात ती मर्यादांच्या जाणिवेमुळे.
कुपोषित बालकांच्या संख्येत शंभर टक्के वाढ ही मुळात एकाच्या जागी दोन बालके आढळली तरी होतेच! एक बालकही कुपोषित राहते हा समाजाचा नाकर्तेपणा, करंटेपणा आहे हा मुद्दा बाजूला ठेवला, तर शंभर टक्के वाढीची समस्या दूर करायच्या दृष्टीने अशा विधानांना काहीही अर्थ राहत नाही. कुपोषणाच्या व्याख्येत किंचित बदल करून ह्याच आकडेवारीने एखादा तालुका कुपोषणमुक्तही घोषित करता येईल, पण तिकडच्या मुलांची शारीरिक व बौद्धिक वाढ त्यामुळे जरासुद्धा सुधारणार नाही. भूक ही आकड्यांत न मावणारी पण सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. पोषणतत्त्वे, उष्मांक, धान्यपुरवठा, उत्पादन हे अनुषंगिक आकडे अप्रत्यक्षपणे भूक दर्शवतात. ह्या समस्येवर उपाय हे प्राधान्याने पोटे भरण्याचे हवेत, वरचे कुठलेही आकडे सुधारण्याचे असून चालणार नाहीत. अशा असंख्य गोष्टी सरळपणे आकड्यांत येत नाहीत, त्यामुळे दुर्लक्षल्या जातात. एकशेएक टक्के खात्री शंभर टक्क्यांहून कितपत जास्त आश्वासक हे मूळच्या शंभर टक्क्यांवर ठरते.
प्रत्येक आकडेवारीमागचा असा मूलाधार शोधायची सवय असली म्हणजे त्यावरच्या कृतीत समतोल राहतो. त्यात गृहित धरलेले असे, की सर्व चर्चेअंती काही कृती करायची आहे. तसे नसेल तर आकडेवारीचे फुलोरे फुलवून काहीही करण्याचे सहजपणे टाळता येते. समाजशास्त्राच्या संदर्भात येणारी आकडेवारी बर्याचदा अशा तर्हेने कुरचुक आढळते.
सध्याच्या वायदेबाजारातल्या घटनांबद्दल, देशाच्या आर्थिक भवितव्याबद्दल बोलताना आकडेवारीची खैरात होत असते. शंभर कोटींहून जास्त आपल्या लोकसंख्येत प्रत्यक्ष भागभांडवलधारक टक्काभरही (0.7 टक्के) नाहीत, पुन्हा ह्या बाजारात काही सकारात्मक बदल घडवण्याची क्षमता कोणा एकाच्या हातात नाही. ह्याउलट, आपली साठ टक्के लोकसंख्या शेतीशी संबंधित उद्योगांखाली येते. ह्या क्षेत्रात एकेक व्यक्ती प्रत्यक्ष उत्पादन वाढवू शकते. पण वर्तमानपत्रांत होणारी दोन्ही विषयांबद्दलची चर्चा कॉलम स्पेसमध्ये मोजली तर वायदेबाजार खूपच वरचढ ठरतो. हे द्योतक नक्की कशाचे असावे?