आंदोलनाच्या केवळ आरोळ्या!

0
76

– अनिलकुमार भाटे

अण्णांच्या उपोषणाने उठवलेल्या वादळाचे पडसाद जगभर उमटले. उपोषण संपल्याने त्याचे नेमके फलित काय? ही चर्चा जगभर सुरू झाली आहे. आणि ह्या टप्यावर तरी अण्णांचा लढा तेवढ्यापुरता होता आणि त्या आंदोलनाबरोबर संपला. अशीच भावना तयार झाली आहे. त्याचे कारण काय असावे? हा लढा सरकार विरुद्ध अण्णा असा होता आणि जनता अण्णांच्या बाजूने होती असे चित्र सर्वत्र दाखवले गेले. पण हे खरोखर कितपत खरे?

– अनिलकुमार भाटे

अण्णांचे उपोषण अखेर संपले! या उपोषणाने उठवलेल्या वादळाचे पडसाद जगभर उमटले. ते संपल्याने त्याचे नेमके फलित काय? या प्रश्नाचा विचार करायला आपल्याला भरपूर वेळ आहे.

हा लढा सरकार विरुद्ध अण्णा असा होता आणि जनता अण्णांच्या बाजूने होती असे चित्र सर्वत्र दाखवले गेले. पण हे खरोखर कितपत खरे? त्यामधे ‘मीडिया हाईप’ किती?

सरकार की अण्णा या प्रश्नाचा विचार करताना कोणतीही एक बाजू सोडून द्यायला हवी, नाहीतर मिळणारे उत्तर पूर्वग्रहदूषित (बायस्ड) असेल. मी भारतीय नागरिक नसल्याने अशा घडामोडी अमेरिकेत बसून, लांबून, तिर्‍हाइतपणे पाहत असतो. मी एकेकाळी भारतीय होतो या जाणिवेमुळे, माझा भारतातल्या राजकारणाशी संबंध नसला तरी, मला सामाजिक घडामोडींमध्ये स्वारस्य असते. पूर्वग्रहविरहित (अनबायस्ड) परीक्षण करायचे तर तिर्‍हाईत भूमिकेतून आलेला त्रयस्थपणा हवाच!
 

रामदेवबाबांचे उपोषण झाले तेव्हाच मी ‘उपवासाचे राजकारण  ’ नावाचा लेख लिहिला होता. भ्रष्टाचाराची बाजू घेऊन अण्णांवर टिका करणे हा प्रस्तुत लेखाचा हेतू नाही. पण जे काही घडले, ते पाहताना माझ्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले, ते येथे नमूद करत आहे.

भारतामधे भ्रष्टाचार प्रचंड आहे, त्यामधे सर्वसामान्य माणूस भरडला जात आहे, पावलोपावली नाडला जात आहे. प्रश्न इतकाच, की एकट्या अण्णांनी उपोषण करून भ्रष्टाचाराचे हे भूत भारतीय समाजाच्या डोक्यावरून उतरणार आहे का?

अण्णांनी उपोषण अधिक काळापर्यंत लांबवणे इष्ट नव्हतेच. तेरा दिवस हेच अती झाले. पण त्यांनी ज्या तीन मागण्या मान्य करून घेतल्या, त्या कुठून उपटल्या ते मला समजले नाही. खरे तर सुरुवातीला, पंतप्रधानपद आणि न्यायसंस्था या दोन्ही गोष्टी लोकपालाच्या कक्षेत याव्यात अशी त्यांची मागणी होती. ती मान्य झाल्याचे दिसत नाही. तरीपण अण्णांनी त्यांऐवजी दुसर्‍याच तीन मागण्या मान्य करवून घेऊन उपोषण सोडले, म्हणजे त्यांनी तडजोड केली. माझा प्रश्न असा की ही तडजोड आधीच करता आली नसती का?
 

अण्णांच्या उपोषणाचे लक्ष्य मुळात भ्रष्टाचार या मुद्यावर केंद्रित होते. पण नंतर, त्यांनी मोहरा फिरवून ते सरकारवर केंद्रित केले आणि सरकारला भ्रष्टाचारी ठरवून सरकारातल्या सर्वांना लुटारू म्हटले, आणि शेवटी तर ते संसदेच्या विरुद्ध उभे ठाकले! मला त्या तेरा दिवसांतल्या वागण्यात संगती (कन्सिस्टन्सी) दिसत नाही. उलट, ‘हम करे सो कायदा’ असा अट्टाहास दिसतो.
 

मला आश्चर्य वाटते ते असे की याला लाखो लोकांनी दुजोरा दिला. कारण सरकारातले काय किंवा संसदेतल्या इतर पक्षांमधले काय, सर्वच लोकप्रतिनिधी लोकांनी निवडून दिलेले होते ना? मग त्यांना निवडून देताना लोकांची अक्कल कुठे गेली होती? की निवडणुकीत मतदान करताना तमाम भारतीयांनी स्वत:ची बुद्धी कुठे गहाण टाकली होती. गेल्या निवडणुकीनंतर दोन-अडीच वर्षेच उलटली आहेत. त्यापूर्वी भ्रष्टाचार नव्हता? आणि तो भ्रष्टाचार कोण करत होते, त्याची माहिती लोकांना नव्हती? पण त्यांनाच मते कशी मिळाली? आणि ते तथाकथित ‘लुटारू’ (अण्णांच्या भाषेत) असूनही कसे निवडून आले?
 

म्हणजे इकडे अण्णा उपोषणाला बसले, आणि तिकडे लाखो लोकांना जशी एकदम खोकल्याची उबळ यावी तशी अचानक भ्रष्टाचाराची आठवण झाली की काय? कदाचित असे असेल की यापूर्वी इतके दिवस या लाखो लोकांना भ्रष्टाचाराशी लढा द्यायला कोणी ‘मसीहा’ सापडला नव्हता आणि आता अचानक, तो त्यांच्या पुढे आला. पण अण्णा तर गेली कित्येक वर्षे भ्रष्टाचाराविरुद्ध लढत आहेत. त्यांनी यापूर्वीदेखील उपोषणे केली आहेत. मग आताच काय फरक पडला? तसेच, टिम अण्णा -मधल्या इतर लोकांची नावे यापूर्वी अण्णांचे सहकारी म्हणून फारशी ऐकलेली नव्हती. हे ‘उपटसुंभ’ एकदम त्यांचे सहकारी कसे बनले?
 

अण्णांनी आपल्या उपोषणाचे समर्थन करताना त्याला ‘दुसरा स्वातंत्र्यलढा’ असे म्हटले. त्याबद्दलही मला अचंबा वाटतो. स्वातंत्र्य हा शब्दच मुळात स्व+तंत्र असा आहे. परकियांनी, म्हणजे स्व या कॅटेगरीमधे नसलेल्यांनी आपल्यावर लादलेले सर्व प्रकारचे वर्चस्व झुगारून देऊन स्व या कॅटेगरीमधे असलेल्यांचा अधिकार प्रस्थापित करणे. पण अण्णांचा लढा तर परकीयांविरुद्ध नसून स्वकीयांबरोबर होता. मग तो स्वातंत्र्यलढा कसा? यावर कुणी म्हणतील, की जेव्हा स्वकीयच परकीयांसारखे वागू लागतात, तेव्हा त्यांना परकीयच समजायला हवे! पण मग उपोषण सोडताना अण्णांनी त्यांच्याशी तडजोड करून समझौता कसा काय केला?
 

गांधीजींनी अन्यायाविरुद्ध सत्याग्रह करणे, त्यामधे उपोषण हे हत्यार म्हणून वापरणे हे आणले. पण त्यांनी केलेल्या प्रत्येक उपोषणाच्या पाठीमागे काहीतरी विशिष्ट तत्त्व असायचे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या तत्त्वामधे ‘नेमकेपणा’ (एक्झॅक्टनेस, प्रिसीजन) असायचा. गांधीजींनी जरी असे म्हटले, की आपण इंग्रजांशी स्वातंत्र्यप्राप्तीकरता अहिंसेच्या मार्गाने लढतो, तरी ती त्यांची व्यापक भूमिका होती. ते त्यांच्या कुठल्याच उपोषणाचे कारण नव्हते. त्यांचे प्रत्येक उपोषण हे त्या व्यापक भूमिकेमधली विवक्षित (इण्डिव्हिजुअल) घटना होती. गांधीजींनी अशी जितकी उपोषणे केली, त्या प्रत्येक उपोषणामागचे कारण अगदी नेमके (स्पेसिफिक व इण्डिव्हिजुअल) आणि व्यापक भूमिकेहून वेगळे व स्वतंत्र असे होते. ती सर्व उपोषणे एका मोठ्या व्यापक भूमिकेचा भाग होती ही बाब वेगळी.
 

अशा प्रत्येक उपोषणामागच्या नेमक्या कारणाच्या पाठीमागे काहीतरी तार्किक सूत्र असायचे आणि त्यातल्या तर्कामुळे सरतेशेवटी इंग्रज सरकारला गांधीजींचे म्हणणे मान्य करणे भाग पडायचे.
 

एवंच, गांधींनी सत्याग्रह आणि उपोषण ही फक्त साधने म्हणून जरी वापरली, तरी त्या साधनांच्या यशस्वीतेमागचे रहस्य असे होते, की त्या यशस्वीतेचा बराच मोठा हिस्सा त्या सत्त्वाच्या पाठीमागे असलेल्या तर्कामुळे, सत्याग्रहाच्या पाठीशी दडलेल्या ‘सत्या’मुळे असायचा. त्या यशस्वीतेमधे निव्वळ साधनाच्या जोराचा (एफिकसीचा) भाग खरेतर फार थोडा असायचा. त्यातला खरा भर सत्यावर होता, साधनावर नव्हे.
 

पण अण्णांच्या उपोषणामागे असा नेमका हेतू मला दिसला नाही. भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा ही व्यापक भूमिका झाली. परंतु अशी व्यापक विधाने नेहमीच पसरट, विसविशीत आणि भोंगळ असतात, कारण ती सर्वसमावेशक अशा विस्तृत भूमिकेशी (ब्रॉड स्ट्रॅटेजी) संबंधित असतात. त्यामधे नेमकेपणा कधीच नसतो. पण प्रत्येक उपोषण हे स्ट्रॅटेजिक नसून स्ट्रॅटेजीमधली फक्त एक ‘टॅक्टिकल मूव्ह’ असते. त्यामागच्या हेतूमधे नेमकेपणा असावाच लागतो. तो मला अण्णांच्या उपोषणाच्या बाबतीत दिसला नाही. अण्णांनी तेरा दिवसांमधे त्यांचा रोख तीन वेळा बदलला. मूळ स्ट्रॅटेजीनुसार त्यांचा रोख प्रथम भ्रष्टाचारावर होता आणि अटक झाल्यावर तो रोख सरकारवर आला आणि सरतेशेवटी संसदेवर येऊन ठेपला!

पण भ्रष्टाचार निर्मूलनाकरता व्यवस्थित स्ट्रॅटेजी बनवायला हवी. नुसत्या गर्जना करून व भावनिक आरोळ्या ठोकून हे काम होणार नाही.
 

शिवाय गांधीजींनी उपोषणे केली त्याकाळी भारतात लोकशाही नव्हती. पण आज भारतात लोकशाही आहे. एका व्यक्तीने उपोषण करून देशाच्या सरकारला वेठीला धरणे हे लोकशाहीच्या तत्त्वप्रणालीमधे कसे काय बसू शकते बुवा?
 

जगाच्या इतिहासामधे आजवर घडलेल्या सर्व मोठ्या घटनांच्या मागे तितकेच मोठे असे काहीतरी सूत्र होते. फ्रेंच राज्यक्रांतीच्या मागे राजसत्ता उखडून टाकून लोकशाही स्थापन करणे हे सूत्र होते. अमेरिकेच्या राज्यघटनेच्या मागे मानवी हक्कांची (ह्यूमन राईटस) प्रस्थापना हे सूत्र होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या मागे लोकमान्य टिळकांच्या ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ या सूत्राची प्रेरणा होती. पण अण्णांच्या उपोषणामागे असे कोणतेही सूत्र असल्याचे दिसत नाही. भ्रष्टाचाराला विरोध करणे हे सूत्र असू शकत नाही. कारण भ्रष्टाचार म्हणजे नक्की काय? याची नेमकी व्याख्या कुणी केलेली नाही. भ्रष्टाचाराचे अनेकविध प्रकार असतात. तो वेगवेगळ्या पातळ्यांवर अनेक वेगवेगळ्या प्रकारे घडत असतो. त्यांतल्या प्रत्येक प्रकारालादेखील पैलू असतात. त्यांतल्या प्रत्येक पैलूच्या पाठीमागे असलेली कारणपरंपरा वेगवेगळी असते. सगळ्यात कहर म्हणजे मुळात भ्रष्टाचार ही अनेक पायर्‍यांची किंवा अनेक कप्प्यांची घडवंचीसारखी मांडणी असते. त्यामधे विश्वास (म्हणजे ‘लॉयल्टी’) हा मोठा भाग असतो. लाच देणारा आणि घेणारा या दोघांच्यामधे परस्परविश्वास असल्याखेरीज भ्रष्टाचार घडूच शकत नाही. एवंच दरोडेखोरांच्यात जशी त्यांची स्वत:ची, नेहमीच्या नीतिमत्तेपेक्षा वेगळी, पण चोरीच्या नियमांवर आधारलेली अशी नितिमत्ता असते, तशीच ती भ्रष्टाचाराच्या बाबतीतदेखील असते.
 

कुठल्याही तात्त्विक विचारसरणीमधे पर्टिक्युलर आणि जनरल असे दोहोंचे मिश्रण होऊन वैचारिक गोंधळ निर्माण होतो. भ्रष्टाचाराच्या बाबतीत भ्रष्टाचार हा जनरल आणि उपोषण हा पर्टिक्युलर असे प्रकार पडले गेले. कुठल्याही वैचारिक भूमिकेमधे, ती भूमिका प्रत्यक्ष घडवताना या दोहोंमधला फरक प्रथम ध्यानात घ्यायचा, आणि त्या दोन्हींचा वेगवेगळा विचार करायचा, आणि मग सरतेशेवटी त्यांचा परस्परांशी असलेला संबंध ध्यानात घेऊन त्या परस्परसंबंधावर आधारलेला निष्कर्ष काढायचा असे करावे लागते. तरच ती भूमिका शास्त्रीय रीतीने तर्कशुद्ध बनू शकते. यालाच तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रामधे 1.थिसिस, 2.अॅण्टी-थिसीस, आणि सरतेशेवटी त्या दोघांचा केलेला 3.सिन्थेसिस असे म्हणतात आणि या सर्व विचारप्रक्रियेला ‘डायलेक्टिक्स’ असे म्हणतात. कुठल्याही विषयावर शास्त्रशुद्ध पद्धतीने, शुद्ध वैचारिक स्वरूपामधे विचार करताना हीच पद्धत अवलंबणे योग्य असते, असे तब्बल दोनशे वर्षांपूर्वीच हेगेल या जर्मन तत्त्वज्ञाने सांगून ठेवले आहे.
 

अण्णांच्या उपोषणाच्या संपूर्ण प्रकरणाच्या बाबतीत तत्त्व, लॉजिक, वैचारिकता यांचा मागमूसदेखील आढळला नाही. दिसला तो फक्त कमालीचा भावनिक उद्रेक आणि कानावर ऐकू आल्या, त्या फक्त भावनिक (एक्सेसिव्हली इमोशनल) उद्रेकापोटी ठोकलेल्या आंदोलनाच्या आरोळ्या!
 

-डॉ.अनिलकुमार भाटे – निवृत्त प्राध्यापक, विद्युत अभियांत्रिकी, संगणक विज्ञान, माहिती तंत्रविज्ञान आणि मॅनेजमेण्ट एडोसम शहर, न्यू जर्सी राज्य, अमेरिका, इमेल: anilbhate1@hotmail.com 

संबंधित लेख
 

उपवासाचे राजकारण

पर्याय काय?  

About Post Author