अशोक सुरवडे – नाशकातला शेतकरी अंटार्क्टिकावर

0
29
_AshokSurwade_NashakatlaShetkari_4.jpg

नाशिकच्या निफाड तालुक्यातील पिंपळस नावाचे छोटेसे गाव आणि पृथ्वीच्या दक्षिण टोकावरील बर्फाळ अंटार्क्टिक खंड यांचा संबंध काय? उत्तर एकच. अशोक सुरवडे!

अशोक हा विलक्षण आणि बहुगुणी माणूस आहे. मी त्याच्या शेतीतील कर्तृत्वाची कहाणी ऐकून त्याला फोन केला. गप्पांच्या ओघात तो अगदी सहजतेने म्हणाला, ”मी अंटार्क्टिका खंडावर जाऊन पेंग्वीन पक्ष्यांवर संशोधन केलं आहे.” मी तीनताड उडालो. नाशिकमधील एक शेतकरी अंटार्क्टिकाला जातो? आणि त्याला तेथे जाऊन पेंग्वीन पक्ष्याबद्दल संशोधन करावेसे वाटते? एक ना अनेक प्रश्न माझ्या मनात रूंजी घालू लागले. अशोकशी बोलताना केवळ त्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत, तर ज्ञानोत्सुक महाराष्ट्राचे प्रतीकात्मक चित्रदेखील नजरेस पडले.

अशोकचा जन्म शेतकरी कुटुंबातला. त्याने Soil Microflora या विषयाच्या ओढीने पुण्यात कॉलेज शिक्षणाकरता मायक्रोबायोलॉजीला प्रवेश घेतला. त्याने बायो डायव्हर्सिटी या विषयाचादेखील अभ्यास सुरू केला. अभ्यासप्रकल्पांच्या निमित्ताने त्याला भटकंती, गिर्यारोहण आणि ‘वाईल्ड लाईफ’ यांची आवड निर्माण झाली.

अशोकच्या वाचनात एडमंड हिलरी यांचे ‘View from the summit’ हे पुस्तक त्याच सुमारास आले. त्यामुळे त्याच्या भटकंतीच्या इच्छेला नवे धुमारे फुटू लागले. NCAOR (National Center for Antarctic and Ocean Research) या संस्थेने अंटार्क्टिक मोहिमेसाठी तरूणांना संधी देण्यात येत असल्याचे घोषित केले. अशोक त्या संधीकडे झेपावला. त्याने पेंग्वीन पक्ष्यांच्या अभ्यासाचा प्रस्ताव सादर केला. NCAOR कडून अशोकची मुलाखत घेण्यात आली. त्यानंतर अशोकने All India Medical Association, दिल्ली, येथील वैद्यकिय चाचणी, हिमालयात Indio Tibetan Border Police यांच्या प्रशिक्षण केंद्रातील शारीरिक चाचणी व गिर्यारोहणाचे प्रशिक्षण आणि गोवा येथे फायर फायटिंगचे प्रशिक्षण अशा सर्व आवश्यक गोष्टींची पूर्तता केली आणि तो अंटार्क्टिक मोहिमेसाठी सज्ज झाला.

_AshokSurwade_NashakatlaShetkari_1.jpgअशोक त्याच्या चमूसह विमानाने केपटाऊन, तेथून आईस क्रशर जहाजाने वीसेक दिवसांचा प्रवास करत अंटार्क्टिकचा किनारा आणि तेथून पुढे हॅलिकॉप्टर अशी मजल-दरमजल करत अंटार्क्टिकावरील भारतीय संशोधन केंद्र ‘मैत्री’पर्यंत पोचला. अंटार्क्टिकाच्या अतिथंड आणि खारट पाण्यात केवळ क्रिल (Krill) मासे अस्तित्वात असतात. पेंग्वीन त्यांना खाण्यासाठी अंटार्क्टिकाला उन्हाळ्याच्या दिवसांत स्थलांतर करतात. पेंग्वीन क्रिल माशांच्या भक्षणानंतर जी विष्ठा सोडतात त्यामध्ये विशिष्ट जंतू आढळतात. ते जंतू हा अशोकच्या अभ्यासाचा विषय होता. अशोकने पेंग्वीनची विष्ठा, त्यांच्या पाणवठ्यांमधील पाण्याचे नमुने, नैसर्गिकपणे मरण पावलेल्या पेंग्वीनचे शरीरविच्छेदन अशा तर्‍हेने अभ्यास पूर्ण केला. त्याने त्यासोबत स्क्वा (Skua) या पक्ष्याचे अस्तित्व आणि प्रजनन यांचीदेखील माहिती घेतली.

अशोक अंटार्क्टिकावर सहा महिने होता. तो नाशिकला परतला. मात्र अंटार्क्टिकाने त्याला पुन्हा साद घातली. भारताकडून अंटार्क्टिकावर ‘भारती’ नावाचे संशोधन केंद्र निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू झाले. अशोकची निवड त्याच्या पाहणी दौ-यावरील चमूमध्ये झाली. अशोकने पुन्हा एकदा अंटार्क्टिकाच्या भूमीवर पाय ठेवला. त्यावेळी तो तेथील प्राणिगणनेच्या कामातही सहभागी झाला. अशोक म्हणतो, की ”अंटार्क्टिकावर राहण्याचा अनुभव इतर कोणत्याही प्रदेशापेक्षा वेगळा आहे. तेथील प्रदूषणरहित वातावरण, धीरगंभीर शांतता यांमुळे मनाला विलक्षण स्वस्थता लाभते. तो एकांतवास (सॉलिट्यूड) अभूतपूर्व असतो.”

अशोक 2005 आणि 2006 अशा लागोपाठ दोन वर्षांच्या अंटार्क्टिका मोहिमेनंतर नाशिकला आला. त्याने शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. तोपर्यंत त्याच्या शेतामध्ये पारंपरिक शेती केली जाई. अशोकला फळबागांमध्ये जास्त फायदा असल्याचे लक्षात आले. त्यावेळेस नाशिकमध्ये वाईन उद्योग स्थिर होऊ पाहत होता. अशोकने शारडोणे जातीच्या वाईनसाठीच्या खास द्राक्षांची लागवड केली. तो ती द्राक्षे ‘सुला’ वाईनला पुरवू लागला. त्याला स्वत:चा वायनरी प्रकल्प उभा करायचा होता. मात्र त्यासाठी निदान पन्नास-साठ लाख रुपयांची गुंतवणूक हवी असते. अशोक म्हणतो, ”माझ्या त्या धडपडीत वीणा गवाणकरांचे ‘एक होता कार्व्हर’ हे पुस्तक माझ्या मदतीला आले. मी त्यातील ‘उपलब्ध साधनांमधून साहित्य तयार करण्याचा मंत्र’ आचरणात आणला.” अशोकने MIDC मधील कारागीर गाठले. त्यांच्याकडून वायनरीसाठी आवश्यक भांडी तयार करून घेतली आणि वायनरी प्रकल्प केवळ साडेआठ लाखांमध्ये उभारण्याची किमया केली. त्याने त्याचे नाव ठेवले – ‘निफा’! अशोकचे लग्न 2007 साली झाले. त्याची पत्नी ज्योत्स्ना आणि तो, असे दोघे मिळून उद्योगाची जबाबदारी सांभाळू लागले.

अशोकच्या वाईन उद्योगाची क्षमता पंधरा हजार लिटर आहे. कांद्यासारखे नगदी पिक एकरी चाळीस ते पन्नास हजार रुपये मिळवून देते. मात्र अशोक त्याच्या उद्योगातून एकरी पंधरा लाख रुपये कमावतो. त्यातील खर्च वगळता त्याचा फायदा पाच लाखांचा असतो.

_AshokSurwade_NashakatlaShetkari_3.jpgअशोकने वाईन उद्योगाला पर्यटनाची जोड दिली आहे. त्याच्याकडे लोकांचा राबता असतो. विशेषत: शनिवार-रविवारी त्याच्याकडे गर्दीचा माहोल असतो. महिन्याकाठी वाईनच्या हजारभर बाटल्यांची विक्री होते. अशोकने वाईन बनवण्याच्या वेगळ्या वाटादेखील धुंडाळल्या. त्याने करवंदे आणि जांभळे यांपासून प्रायोगिक तत्त्वावर वाईन तयार केली. त्याने मधुमक्षिका पाळून मधाची वाईन तयार करण्याचा प्रयोग केला. मात्र तशा प्रयत्नांसाठी शासकीय धोरण अनुकूल नाही. त्याला त्या प्रयोगांचे उद्योगात रूपांतर करणे शक्य झालेले नाही. अशोकच्या उद्योगाचा काळ हा थंडीच्या दिवसांतील. त्यामुळे उरलेल्या दिवसांत काय करावे या विचाराने अशोकने चिज आणि योगर्ट तयार करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

अशोकने त्याचे मोहिमेतील ज्येष्ठ सहकारी अरूण चतुर्वेदी यांच्यासोबत मिळून ‘Antarctica – The coming impact’ हे पुस्तक 2016 मध्ये लिहिले. त्यामध्ये अंटार्टिकावरील भारताचे संशोधन आणि जगातील घडामोडींचा अंटार्क्टिकावरील आणि पर्यायाने मानवी जीवनावरील परिणाम अशी दुहेरी मांडणी आहे. अशोक अंटार्क्टिका मोहिमेच्या सहकार्‍यांसोबत किंवा तिथे जाऊन आलेल्या लोकांशी संपर्कात असतो. तो शालेय उत्सुक मुलांसोबत अंटार्क्टिका या विषयावर स्लाईड शोसह गप्पा मारतो. त्यांच्यासमोर ‘अंटार्क्टिका’ हा अभ्यासाचा नवा पर्याय ठेवतो. त्याचे स्थानिक नियतकालिकांमधून त्या विषयावर लेखन सुरू असते. अशोकने अंटार्क्टिका येथे केलेले संशोधन NCAOR च्या गोवा संग्रहालयात उपलब्ध आहे. Wildlife Institute of India, Zoological surey of India किंवा National institute of oceanography आणि अशा तर्‍हेच्या इतरही संस्थांना विविध विषयांतील संशोधनात अशोकच्या अभ्यासाचा फायदा होतो. त्याने त्या अभ्यासादरम्यान काढलेली छायाचित्रे अंटार्क्टिकासंदर्भातील आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये वापरण्यात आली आहेत.

अशोक शेती, भटकंती, लेखन, उद्योग, प्रयोग अशा तर्‍हेने जीवनाच्या चहुबाजूंना भिडतो. त्या भिडण्यात आवेग आहे आणि कल्पकतादेखील. म्हणूनच अशोक रूढ सीमारेषांच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करू शकला. त्याच्या हातून जे काही घडले, ते सारे त्याच्या पराकोटीच्या जिज्ञासेमुळे! त्याच्या प्रत्येक प्रयत्नांत ज्ञानप्राप्तीची आस ठळकपणे जाणवते. तोच त्याच्या उत्कर्षाचा गाभा आहे.

अशोक सुरवडे – 9922793839, nipha.estate@gmail.com

– किरण क्षीरसागर

About Post Author

Previous articleअंधांना दृष्टी मिळवून देणारे गुरुजी
Next articleशिक्षकांना आवाहन
किरण क्षीरसागर यांनी ग्रॅज्‍युएशननंतर पत्रकारितेचे शिक्षण घेतले. त्‍यानंतर वृत्‍तसंस्‍था, दैनिक 'मुंबई चौफेर' आणि आकाशवाणी अशा ठिकाणी कामांचा अनुभव घेतल्‍यानंतर 'थिंक महाराष्‍ट्र'सोबत 2010 साली जोडले गेले. त्‍यांनी चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेतले असून त्‍यांचा 'डिपार्टमेन्‍ट', 'अब तक छप्‍पन - 2', 'अॅटॅकस् ऑफ 26/11', 'क्विन', 'पोस्‍टर बॉईज' अाणि 'शेण्टीमेन्टल' अशा व्‍यावसायिक चित्रपटांच्‍या संकलन प्रक्रियेत सहभाग होता. ते 'बुकशेल्फ' नावाचे पुस्तकांचा परिचय करून देणारे युट्यूब चॅनेल त्यांच्या सहकाऱ्यांसोबत चालवतात. लेखकाचा दूरध्वनी 9029557767