अविनाश बर्वे यांचा मैत्रभाव

0
57
_avinash_barve

अविनाश बर्वेसरांना प्रवास हा तर आवडीचा. तोही फक्त रेल्वे किंवा लाल बसगाडी (एसटी) यांचा. कारण आता तर त्याला निम्मे तिकिट पडते, त्यांनी वयाचा अमृतमहोत्सव नुकता साजरा केला. शाळेतील त्यांच्या अनेक मित्रांचा ग्रूप दरवर्षी सहलीस जात असे. आता, तो ग्रूप फक्त दोघांचा राहिला आहे – अविनाश बर्वेसर व सुबोध देशपांडेसर. बर्वेसर शहात्तर वर्षांचे, तर सुबोधसर ब्याऐंशी वर्षांचे! दोघेच दरवर्षी, कधी कधी वर्षातून दोन वेळाही प्रवासास जात असतात. त्या दोघांचा भारतातील सर्वांत लांबचा रेल्वे प्रवास पूर्व-पश्चिम, दक्षिण-उत्तर आणि विविध दिशांनी सुरू असतो. जास्तीत जास्त काळ रेल्वेत बसायचे – खिडकीतून बाहेरील दृश्ये, निसर्ग, नवनवीन गावे-खेडी-नगरे – तेथील माणसे, त्यांच्या वेशभूषा आदी गोष्टी न कंटाळता पाहत राहायचे आणि गीतरामायण मोबाइलवर ऐकायचे, तेवढाच त्या काळातील त्या दोघांचा छंद! बाकी प्रसिद्ध ठिकाणे पाहणे वगैरे सहज जमले तर – त्याचा आग्रह नाही. रेल्वेने सर्वदूर जाणे आणि परत येणे हेच महत्त्वाचे उद्दिष्ट. स्टेशनवर जे मिळेल ते खाद्य आणि मिळेल ते पाणी अजूनही चालते त्यांना!

स्वत: सर्व प्रकारची झीज सोसून इतरांना मदत करणे हे तर बर्वे यांचे नेमीचेच. ते त्यांच्या ‘सर्वसामान्य’तेत अचूक बसते. डोंबिवलीच्या ‘विद्यानिकेतन’ या आदर्श शिक्षणसंस्थेचे संचालक विवेक पंडितसर आमचे आणि अर्थातच ‘घरकुल’चे फार चांगले मित्र आहेत. पंडितसर आणि इतर विश्वस्त यांनी निरपेक्ष व पारदर्शीपणे चालवलेला चॅरिटेबल ट्रस्टचा ‘स्नेहबंधन’ वृद्धाश्रम जांभुळपाड्याजवळ आहे. आम्ही एकदा तो पाहण्यास गेलो होतो. शहरांपासून दूर असणाऱ्या त्या आश्रमातील वृद्धांना औषधे सहज उपलब्ध होत नाहीत. बर्वेसर गेली दोन वर्षें प्रत्येक महिन्याअखेरीस तेथील पंधरा-वीस वृद्धांची औषधे, त्यांच्या यादीप्रमाणे ठाण्याहून घेऊन जातात, वृद्धांसाठी असणाऱ्या सवलतीच्या किंमतींत. वृद्ध त्या प्रत्येकाच्या खोलीत औषधे पोचल्यावर मग पैसे देतात – क्वचित एखाद्यास पैसे देणे जमतही नाही!

‘एखादा माणूस स्वार्थाशिवाय काही काम करू शकतो’ यावर लोकांचा विश्वास सहजी बसत नाही. प्रथम, त्या वृद्धांना वाटे, की बर्वेसरांना त्यात काही ‘कमिशन’ मिळत असावे. आता, ते प्रत्येकास त्याच्या औषधांची स्वतंत्र पावती देतात. हा ‘महात्मा’ स्वत:च्या खर्चाने एसटीतून (लाल डबा) जाता येता मिळून सात-आठ तास प्रवास करत असतो; शिवाय, त्या आश्रमात जेवल्यावर स्वत:च्या जेवणाचे पैसेही स्वत:च देत असतो हे कितीजणांना ठाऊक आहे, ते देव जाणे!

‘जन हे दिल्या घेतल्याचे’ हे चांगल्या अर्थाने मोठी माणसे आचरणात आणत असतात. खरा ‘मैत्रभाव’ त्यातून प्रकट होत असतो.

‘मैत्रभाव’ म्हणजे काय आणि ‘खरा मित्र’ काय करू शकतो याचे बर्वेसरांच्याबाबतीत एक फार चांगले उदाहरण आहे. बर्वेसर आणि ठाण्याच्या एम एच शाळेतील त्यांचे मित्र यांनी ते करून दाखवले – पुढाकार अर्थातच बर्वेसरांचा! डी एम पवारसर हे शाळेतील त्यांचे एक सहशिक्षक. बर्वेसरांचा नुसता ‘मित्र’ कोणीच नसतो तर सगळेच जिवाभावाचे – जिवाला जीव देणारे असतात. पवारसरांच्या दोन्ही किडनी वयाच्या चाळिशीमध्ये फेल झाल्या. त्यावेळी मुंबईच्या पेडर रोडवरील जसलोक हॉस्पिटल वगळता इतरत्र कोठेही त्यावर उपचार होत नसत. रक्तशुद्धीकरण उपचारपद्धत महागडी होती. त्यावर इलाज म्हणजे एक तरी किडनीदाता मिळवून किडनीरोपण केले पाहिजे असे डॉक्टरांनी सांगितले. एका शिक्षकाकडे असून असून कितीशी पुंजी शिल्लक असणार? पवारसरांच्या दोन मुली शाळा-कॉलेजांत शिकत होत्या. सर्वच सहकारी शिक्षकमित्र संसाराच्या मध्यावर सारख्याच जेमतेम आर्थिक कुवतीचे!

_caption_barveबर्वेसरांनी पवारसरांसाठी आर्थिक मदतीचा एक ट्रस्ट स्थापन केला. बर्वेसर इतरांना मदतीचे आवाहन करताना, नेहमी स्वत:चा प्रथम चेक ठेवतात. त्यांनी अनेक लोकांपर्यंत जाऊन त्यासाठी निधीसंकलन केले. एकीकडे, बर्वेसरांच्या जसलोक हॉस्पिटलच्या फेऱ्या, डॉक्टरांना भेटणे, उपचार चालू ठेवणे, घरच्या लोकांना धीर देणे हे चालूच होते.

पवारसरांची आई (वय वर्षें साठ) खानदेशातील लहान खेड्यातून आली होती. तिची किडनी पवारसरांना चालणार होती. बर्वेसरांनी तिची मानसिक तयारी केली. ‘तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या मुलाला जन्म देणार आहात’ हे सांगितले. बाई मोठ्या धीराच्या आणि अर्थातच, त्या पुत्रप्रेमामुळे ऑपरेशनसाठी तयार झाल्या. खेड्यातील त्या बाईने वयाच्या साठीपर्यंत एकही इंजेक्शन अथवा साधी गोळीही औषध म्हणून घेतली नव्हती. पण तरीही त्या सर्व अवघड तपासण्या आणि ऑपरेशन यांना सामोऱ्या गेल्या. किडनीरोपणाचे ऑपरेशन यशस्वी झाले. पवारसर त्यानंतर चोवीस वर्षें जगले. त्यांनी नोकरी व सर्व सांसरिक जबाबदाऱ्या पूर्ण केल्या.

केवळ आई आणि खरेखुरे मित्रच असे करू शकतात!

– नंदिनी बर्वे
avinash.d.barve@gmail.com

About Post Author