अलौकिक संत आणि स्वातंत्र्यसेनानी – मामासाहेब देशपांडे

mamasaheb carasole

योगीराज श्री श्रीपाद दत्तात्रय तथा मामासाहेब देशपांडे हे अलौकिक संत व स्वातंत्र्यसेनानी होते. मामामहाराजांचे जन्मशताब्दी वर्ष जुलै 2013 ते  जून 2014 या काळात साजरे झाले. प्रत्यक्ष, वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजच पूर्णांशाने मामा देशापांडे म्हणून जन्माला आले अशीच भावना आहे.

मामांचा जन्म टेंबे स्वामी महाराजांचे एक शिष्य दत्तोपंत देशपांडे व अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांच्या पूर्णकृपांकित शिष्य पार्वतीदेवी या भजनशील दांपत्याच्या पोटी 25 जून 1914 रोजी झाला. पार्वतीदेवींना लहानपणी अक्कलकोट स्वामी महाराजांनी मांडीवर घेऊन व मस्तकावर कृपाहस्त ठेवून ‘ही आमची पोर आहे’ असे उद्गार काढले होते.

त्या दांपत्याला गोविंद, रघुनाथ हे दोन मुलगे व अनसुया नावाची मुलगी झाली. पण त्यानंतर संतती जगत नसल्याने त्यांनी श्री क्षेत्र नृसिंहवाडीला श्री दत्तप्रभूंची प्रार्थना केली. टेंबेस्वामी महाराजांनी त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन, ‘लोकोद्धार दीर्घायुषी पुत्र होईल,’ असा आशीर्वाद दिला.

श्रीपाद तीन वर्षांचा असताना दत्तुअण्णांनी त्यांचे बि-हाड नसरापूरला आणले. देशपांडे हे नसरापूरचे वतनदार होते. आई-वडील, दत्तुअण्णा व पार्वतीदेवी, दोघेही ज्योतिष आणि आयुर्वेद यांचे जाणकार. दोघेही परमार्थिक अधिकारी असल्याने श्रीपादाचे परमार्थाचे शिक्षण घरातच सुरू झाले. श्रीपादाची वडिलांबरोबर वयाच्या आठव्या वर्षी हिमालय यात्रा व बाराव्या वर्षी अनवाणी अयाचित वृत्तीने नर्मदा परिक्रमाही झाली होती. त्याला दत्तुअण्णांकडून विविध औषधी प्रयोग, ज्योतिषातील आडाखे, विविध मंत्र इत्यादींचेही ज्ञान मिळाले.

श्रीपाद पाच-सहा वर्षांचा असताना बहिणीच्या मंगळागौरीनिमित्त बेळगावला गेला होता. तो त्यांच्या घरी ध्यानाला बसला असता त्याला प्रत्यक्ष श्रीमंत बाळेकुंद्रीमहाराजांचे दर्शन झाले. श्रीपाद एकदा बनेश्वरच्या जंगलात मित्रांबरोबर खेळत असताना रस्ता चुकला म्हणून घाबरून रडू लागला. तेवढ्यात तेथे पांढराशुभ्र पोषाख परिधान केलेले, पांढरी दाढी असलेले व हातात काठी असलेले तेजस्वी बुवासाहेब नावाचे सिद्ध अद्भुत रीत्या आले. त्यांनी त्याला भाजी-भाकरी दिली, घोंगडी अंथरून त्याला झोपवले व सकाळी घराजवळ आणून सोडले.

श्रीपादाला पुढील शिक्षणासाठी पुण्याच्या भारत हायस्कूलमध्ये दाखल करून जेमतेम एक वर्षही झाले नसेल तोच दत्तुअण्णांनी इहलोक यात्रा संपवली. थोरल्या दिरांनी त्यांचा अधिकार सर्व संपत्तीवर दाखवून पार्वतीबाईंना घराबाहेर काढले. त्या पुण्यात मंडईजवळील रानडे वाड्यात भाड्याच्या घरात राहू लागल्या. त्याच वाड्यात त्यांची मुलगी अनसुयाही राहत होती. तिच्या मुलांमुळे श्रीपादरावांना ‘मामा’ हे नाव पडले व तेच पुढे रूढ झाले.

श्रीपाद चरितार्थासाठी शिकवण्या करू लागला. तो तेल, साबण, उदबत्या घरोघर जाऊन विकत असे. त्याने काही नोक-याही केल्या.

मामासाहेब (श्रीपाद) भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे खंदे कार्यकर्ते होते. असहकार, चलेजाव, स्वदेशी अशा आंदोलनांमध्ये ते सक्रिय होते. ‘समाजकार्यासाठी आधी भगवंतांचे अधिष्ठान हवे. स्वत: आत्मज्ञान प्राप्त करून ते ज्ञान इतरांना दिले पाहिजे’ या पार्वतीमातेच्या सांगण्यावरून त्यांनी अध्यात्ममार्गावर लक्ष केंद्रित केले. आईच्या सांगण्यावरून श्रीपादांनी दासबोध, श्री एकनाथी भागवत व नंतर ज्ञानेश्वरी या क्रमाने पारमार्थिक अभ्यास केला.

‘ज्ञानेश्वरी हा नुसता पारायणाचा ग्रंथ नाही तर त्यातील ओवी आणि ओवी जगता आली पाहिजे. देहाची तीन चिमट्या राख होईपर्यंत नेमाने व प्रेमाने, न चुकता साधना करत राहायची’ असे पार्वतीदेवी सांगत असत. पार्वतीदेवी अध्यात्मातील अधिकारी होत्या. त्यांच्या मानसपूजेतील उपचार प्रत्यक्ष दिसत असत.

वयाच्या पंचविसाव्या वर्षी मामांचा म्हणजे श्रीपादांचा बोपर्डीकरांच्या मुलीशी विवाह झाला. परंतु पत्नी दोन वर्षांतच बाळंतपणात मुलासह देवाघरी गेली. मामांना संसारातून विरक्ती आली व ते ध्यानात जास्त काळ रमू लागले. ते पाहून मातोश्रींनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अनुज्ञेने मामांना शक्तिपात अनुग्रह करून परंपरेचे दीक्षाधिकार प्रदान केले.

मामांनी 15 जून 1948 रोजी स्वामी समर्थांच्या अनुज्ञेने एक तांब्या व दोन पंचे घेऊन गृहत्याग केला. त्यांनी आळंदी, पंढरपूर, द्वारका येथे यात्रा करून नंतर ते राजकोटला गेले. तेथे त्यांनी हठयोग, अष्टांगयोग वगैरेचा अभ्यास केला. ते ध्यानधारणा, योगासने यांमध्ये वेळ घालवू लागले. मामांनी राजकोटला असताना गिरनार, द्वारका, हिमालय येथे यात्रा केल्या. पंढरीची आषाढी वारीसुद्धा केली.

मामांना पहिले प्रवचन करण्याचा योग 1953 च्या रामनवमीला राजकोट येथील राममंदिरात अचानक आला व त्यानंतर हयातभर त्यांनी ज्ञानसत्रे करून लोकांना ज्ञानेश्वरीची व संतवाङ्मयाची गोडी लावली. मामांनी 1936 ते 1948 अशी सलग बारा वर्षे पंढरीची वारी केली. पुढे, बत्तीस वर्षे त्यांनी देशमुख महाराजांच्या दिंडीतून पायी वारी केली.

टेंबेस्वामी महाराजांनी दृष्टांत देऊन सांगितल्याप्रमाणे श्री गुळवणी महाराजांनी मामांना कुरवपूरला तपश्चर्येसाठी जाण्याची आज्ञा केली. कुरवपूरहून अष्टविनायक, काशी, गया, प्रयाग, जगन्नाथपुरी या ठिकाणी यात्रा करत पुण्याला परत आल्यावर गुळवणीमहाराजांनी त्यांना आणखी बारा वर्षे प्रसाद-वार्ता गुप्त ठेवून साधनेवर अधिक भर देण्यास सांगितले.

मामांची ग्रंथसंपदा मोठी आहे. केशवराव देशमुख महाराजांनी केलेले ज्ञानेश्वरीचे तीन खंडांतील सुलभ ग्रंथ रूपांतर मामांनी छापून प्रसिद्ध केले. तसेच हरिपाठ, अभंगमालिका, नारद भक्तिसूत्र, विवरण  इत्यादी ग्रंथ प्रकाशित केले. त्यांनी ‘संतकृपा’ नावाचे मासिकही सुरू केले. त्यांनी 1983 मध्ये श्री वामनमहाराज त्रैमासिकाची सुरुवात केली. अनेक वर्षे ज्ञानेश्वरीवर प्रवचने केली व ‘श्री ज्ञानेश्वरी वाङ्मय अभ्यास मंडळ’ स्थापन करून ज्ञानेश्वरीचा प्रचार केला. त्यांनी इंग्लंडलाही ज्ञानेश्वरीवर प्रवचने केली होती.

त्यांनी 1973 मध्ये ‘संप्रदाय सेवाकार्यासाठी स्वतंत्र पीठ स्थापन करावे’ या गुळवणी महाराजांच्या आज्ञेनुसार सिंहगड रस्त्यावरील हिंगणे खुर्द येथे ‘माऊली’ आश्रमाची स्थापना केली. मामांचा शक्तिपात योग संप्रदायाच्या सर्व एकशेचौसष्ट प्रकारांचा सखोल अभ्यास व अधिकार होता. पुढे, मामांनी श्री दत्तप्रभूंच्या आज्ञेने कोयनानगरजवळील हेळवाक या गावी डोंगरावर भगवान श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांच्या मूर्तीची स्थापना केली. त्या समारंभानंतर मात्र मामा निरवानिरवीची भाषा बोलू लागले. त्यांनी मंगळवारी, 21 मार्च 1990 रोजी योगमार्गाने देह सोडला.

मामांनी लावलेल्या संप्रदायाच्या रोपट्याचे रूपांतर मोठ्या वृक्षात झाले आहे. ‘श्रीपाद सेवा मंडळ’ या ट्रस्टच्या अंतर्गत अनेक प्रकल्प राबवले जातात. पुण्यात ‘श्रीसंत मामासाहेब देशपांडे सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय’ व वामनराज प्रकाशन कार्यालये आहेत. आळंदी येथे ‘ज्ञानदेव सिद्धबेट तपोवन’ या संस्थेमार्फत ‘श्री निवृत्तीनाथ महाराज ग्रंथालय’ चालवले जाते.

( आदिमाता मासिकावरून )

– नेहा देशपांडे

About Post Author