‘अलिप्त नग्नता’ बोचते!

0
33

-दिनकर गांगल

     आजच्या मार्केटच्या जगात माणसाची झालेली वाताहत संजीव खांडेकर त्यांच्या चित्रप्रदर्शनांमधून प्रक्षोभक रीत्या मांडतात. इतकी, की काही वर्षांपूर्वी त्यांना त्यांचे मुंबईतील चित्रप्रदर्शन अश्लीलतेच्या तक्रारीवरून गुंडाळावे लागले होते. खांडेकर चित्रकार म्हणून अतिशय तल्लख बुध्दीचे आहेत. वेगवेगळ्या माध्यमांमधील प्रयोग करण्यातील त्यांचा झपाटा तर विलक्षण आहे. त्यांची चित्रप्रदर्शने पाहिली की या कलाकाराला सेक्सचे …


-दिनकर गांगल

     आजच्या मार्केटच्या जगात माणसाची झालेली वाताहत संजीव खांडेकर त्यांच्या चित्रप्रदर्शनांमधून प्रक्षोभक रीत्या मांडतात. इतकी, की काही वर्षांपूर्वी त्यांना त्यांचे मुंबईतील चित्रप्रदर्शन अश्लीलतेच्या तक्रारीवरून गुंडाळावे लागले होते. खांडेकर चित्रकार म्हणून अतिशय तल्लख बुध्दीचे आहेत. वेगवेगळ्या माध्यमांमधील प्रयोग करण्यातील त्यांचा झपाटा तर विलक्षण आहे. त्यांची चित्रप्रदर्शने पाहिली की या कलाकाराला सेक्सचे ऑब्सेशन आहे की काय असेही बोलले जाते.

     त्यांनी त्यांच्या ‘लोकरंग’मधील (लोकसत्ता) ‘जाणीव’ सदरातील लेखात नग्नतेचा झकास आढावा घेतला आहे. त्यावरून त्यांची भूमिका कळण्यालादेखील थोडी मदत होते. त्यामध्ये त्यांनी नग्नतेच्या संकल्पनेचा ऐतिहासिक दृष्ट्या उहापोह केला आहे. त्यांनी पाश्चिमात्य अनेक संदर्भ दिले आहेत. त्यांना भारतीय प्राचीन संदर्भ मिळाले नाहीत हे आश्चर्य आहे, कारण पुरातन भारतीय शिल्पकला नग्नता व शृंगार यांवर आधारलेली आहे. तथापी ख्रिश्चन तत्त्वज्ञानातील उल्लेख सांगताना त्यांनी एक विधान केले आहे, की नग्नतेची जाणीव येण्यापूर्वी मनुष्यमात्र उघडे राहात होते, तरी त्यांना आपण नागडे आहोत हे कळतच नव्हते, कारण नग्न-अनग्नतेची जाणीव नव्हती. ख्रिश्चन धर्मपंडितांनी त्यांचे स्पष्टीकरण असे दिले की त्यांच्या शरीरावर दैवी आवरण होते आणि त्यांच्या अंगावर कपडे (वल्कले) आले तेव्हा ते दैवी आवरण नष्ट झाले.

     खांडेकर पुढे सद्यकाळात येतात. वर्ल्डकप क्रिकेटमधील विजयासाठी नग्न होऊ पाहणार्‍या तरुणीचा संदर्भ देतात. तिच्या वडिलांचा तिला पाठिंबा होता याचाही उल्लेख करतात. शरीर ही विक्रयवस्तू झाली आहे हे नमूद करतात. हे सारे त्यांच्या प्रदर्शनांमधून कलात्मक रीत्या प्रकट होते. तथापी लेखस्वरूपातील त्यांची ही मांडणी फार तटस्थ वाटते. ती अभिरुचीशास्त्रात (त्यांनी वापरलेला शब्द) योग्य ठरतेही, परंतु ते समकालीन समाजशास्त्रीय वातावरणात जेव्हा येतात तेव्हा तटस्थता बोचते. मार्केट; त्यामुळे जीवित धरून सर्व गोष्टींना प्राप्त झालेले वस्तुरूप यांबाबत विधाने येतात तेव्हा लेखकाने भूमिका घेणे व मार्ग सुचवणे हे क्रमप्राप्त आहे. अन्यथा कलावंत-लेखक हेदेखील सर्वसामान्यांप्रमाणे प्रवाहपतित ठरतील.

     खांडेकर यांच्या लेखाचे शीर्षक ‘अलिप्त नग्नता’ असे आहे. सौदर्यशास्त्रात अलिप्तता शोभते, समाजव्यवहारात ती बोचते.

-दिनकर गांगल

जेष्ठ पत्रकार

{jcomments on}

About Post Author

Previous articleभेट हितकरांची
Next articleवाढदिवशी पुस्तकांचा स्टॉल !
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.