अरुणा सबाने – बाईमाणूस अन् बापमाणुसही!

3
79

अरुणा सबाने हे विदर्भातील आजचे स्त्रीनेतृत्व आहे. अरुणा सबाने या विदर्भातील दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्या. त्यांचे व्यक्तिमत्त्व अनेकपदरी आहे. संवेदनाशील लेखिका, संपादिका, प्रकाशिका आणि खंदी समाज कार्यकर्तीअशी त्यांची ओळख आहे. आकांक्षा मासिक, आकांक्षा प्रकाशन, माहेर महिला वसतिगृह, बहुजन रयत परिषद, अखिल भारतीय जलसंस्कृती मंडळ, दलित मानवाधिकार समिती, प्रगतीशील लेखक संघ अशा अनेक संस्था-संघटनांच्या माध्यमातून त्यांचे काम सुरू आहे. परंतु या सगळ्या कामाच्या तळाशी एकच एक गोष्ट आहे. ती म्हणजे अरुणा यांना स्त्रीजीवनाबद्दल वाटणारी आत्यंतिक तळमळ. त्यांच्या मनाजवळून वाहणारा मानवतेचा, सहृदयतेचा, स्त्रियांविषयी ममत्वाचा झुळझुळ झरा आहे. त्या झऱ्यापाशी दोन क्षण विसावून शांत व्हावे आणि त्या झऱ्यातील जल प्राशन करून, त्यातून चैतन्य घेऊन मार्गक्रमणा करावी असा अनुभव त्यांच्याजवळ येणाऱ्या प्रत्येकीला येतो. अरुणा हे त्यांच्या सगळ्या प्रकारच्या कामांचे आस्था केंद्र आहे. म्हणूनच त्यांचे ‘माहेर’ हे नागपूरातील वसतिगृह उपेक्षित, पीडित, निराधार महिलांसाठी खरोखरीचे माहेर ठरते. त्या पाणी मंचाचे काम करतात तेही बायकांविषयी वाटणाऱ्या तळमळीतून. कारण बाई आणि पाणी यांचे नाते फार घट्ट आहे. अरुणा म्हणजे चैतन्याचा स्त्रोत वाटतो.

स्वतः अरुणा सबाने यांनी हे चैतन्य कोठून मिळवले? वडील पंजाबराव सबाने, भाऊ बाबा सबाने राजकीय क्षेत्राशी संबंधित. घरात राजकारणातील माणसांची उठबस. वडिलांचा, भावाचा पंचक्रोशीत दरारा. त्या वातावरणामुळे अरुणा आणि त्यांच्या बहिणींच्या वाट्याला मुलगी म्हणून दुय्यम वागणूक कधीच आली नाही. ‘तू मुलगी आहेस’ म्हणून हे करू नको, ते करू नको, इकडे जाऊ नको, याच्याशी बोलू नको अशा don’ts ना त्यांना सामोरे जावे लागले नाही. उलट आईने मुलींनी शिकावे, स्वतःचा विचार करावा यासाठी प्रोत्साहन दिले; त्यांच्या मनाची निकोप वाढ होण्यासाठी प्रयत्न केले.

अरुणा या धाडसी वृत्तीच्या. भीती हा शब्द त्यांच्या कोशातच नाही. त्यांनी आंतरशाखीय प्रेमविवाह केला. त्या म्हणतात, “मी माझ्या मनाचा आणि विवेकबुद्धीचा धाक फक्त बाळगते. पण मला भीती म्हटली तर कसलीच, कोणाचीच वाटत नाही. त्या काळात आमच्या पाटीलशाही घराण्यातील माझा पहिला प्रेमविवाह, तोही अत्यंत गरीबीतील मुलाशी. त्यासाठी घरातील लोकांचा मोठा विरोध पत्करावा लागला. लग्नानंतर स्वतःची मोठीच घुसमट, गळचेपी होत आहे, ती सहन न होऊन त्यांनी लग्न मोडले. “ मुलांना घेऊन स्वतंत्रपणे जगण्याचा निर्णयही मी माझ्याच बळावर घेतला. त्या दोन्ही वेळेला घेतलेल्या निर्णयांशी ठाम राहणे आणि त्या दोन्ही निर्णयांची जबाबदारी निभावणे एवढी जिगर माझ्यात होती. त्या सगळ्या प्रवासात माझी आई माझ्या पाठीशी होती. तिने दिलेल्या बळामुळे मी त्या सगळ्या परिस्थितीतून मार्ग काढू शकले.”

त्यावेळी अरुणा यांना तीन लहान मुलांच्या पालनपोषणासाठी उपजीविकेचे काहीतरी साधन असणे आवश्यक होते. त्यासाठी चिवडा, पापड, शिकेकाई करून विकणे, एखाद्या सायं दैनिकात नाही तर प्रेसमध्ये काम करणे अशा गोष्टी त्यांनी केल्या. हळूहळू, त्यांनी मुलींसाठी वसतिगृह सुरू केले. एका बँकेने विश्वासाने पंचवीस हजारांचे कर्ज दिले. त्या कथालेखनही करत होत्याच. त्यांच्या कथांना प्रतिसाद मिळत गेला. तशात त्यांनी ‘आकांक्षा’ द्वैमासिक सुरू केले. भा.ल. भोळे, बा.ह. कल्याणकर, तारा भवाळकर, मृणाल गोरे यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी व्यक्तींचे सहकार्य लाभले आणि त्यांच्या ‘आकांक्षा’चा पहिला अकूर परिस्थितीची जमीन फोडून बाहेर पडला! “वर्षातच द्वैमासिकाचे रूपांतर मासिकात झाले. ‘आकांक्षा’ने दशकपूर्ती केली आहे.”

त्यांनी सावित्री फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संविधान, कायदे, शिक्षण, कथा, कविता, कवी श्रीधर शनवारे, द.भि. कुलकर्णी, दुर्गा भागवत, वामन निंबाळकर अशा विषयांवरील आणि साहित्यिकांवरील विशेषांक संपादित / प्रकाशित केले. मासिकाबरोबर आकांक्षा प्रकाशनही बाळसे धरत आहे. त्यांनी बा.ह. कल्याणकर, द.भि. कुलकर्णी, श्रीधर शनवारे, आनंद पाटील, तारा भवाळकर, यशवंत मनोहर, श्रीपाद भालचंद्र जोशी अशा मान्यवर लेखकांची पुस्तके प्रकाशित केली आहेत. ‘आकांक्षा’च्या रूपाने त्यांना संपादक-प्रकाशक म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करणारे क्षेत्र मिळाले अशी त्यांची भावना आहे.

अरुणा यांच्याकडे ईर्ष्या, अदम्य जिद्द आणि आत्मविश्वास आहे. त्या जोरावर त्यांनी कामाचा सगळा भार पेलला आहे. अरुणा यांची स्वतःची ‘विमुक्ता’, ‘अनुबंध’, ‘स्त्रीः नाते स्वतःशी’, ‘जखम मनावरची’ अशी पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांच्या लिखाणाच्या केंद्रस्थानी आहे ती स्त्री. कारण स्त्री हा त्यांच्या सगळ्या कामांचा आस्थाबिंदू आहे. त्या म्हणतात, “स्त्रियांच्या अंगी सोशिकता आहे तशी अफाट कर्तृत्वक्षमताही आहे. तिच्याकडे अष्टावधानी वृत्ती असते. एकीकडे कुटुंबासाठी रांधत असताना जवळ रांगणाऱ्या बाळाकडे तिचे लक्ष असते. तिसरीकडे कोण पै पाहुणा आला तर पटकन हसून त्याचे आगतस्वागतही ती करते. घराची स्वच्छता, टापटीप, धनधान्याचा साठा, मुलांचे शिक्षण, त्यांचे दुखले-खुपले, त्यांचा विकास, सासुसासऱ्यांची सेवा, नवऱ्याने दिलेल्या पैशांत घरखर्चाची भागवण हे सगळे ती एकाच वेळी करत असते. आधुनिक शहारातील शिकलेल्या स्त्रियाही घर, मुलंबाळं, करियर हे सगळं नीट सांभाळत असतात. अष्टभूजेची कल्पना या अष्टावधानी स्त्रीवरूनच आली असावी.”

तरी समाजात सर्वाधिक नाडली, पिडली, दडपली जाते ती स्त्री. कौटुंबिक सामाजिक हिंसाचारांचा बळी असते ती स्त्री. कौटुंबिक छळ, हुंड्यावरून, कामावरून, संशयावरून, दिसण्यावरून, मूलबाळ न होण्यावरून तिचा शारीरिक, मानसिक छळ केला जातो. टाकून देणं, जाळणे, मारहाण करणे, बलात्कार, जबरदस्तीने देहविक्रय करायला लावणे, तिच्या पोटातील स्त्री गर्भाची हत्या करण्यास भाग पाडणे हे सगळे अत्याचार सोसावे लागतात ते स्त्रियांनाच. त्यामुळे स्त्रियांना असहाय्य, असुरक्षित निराधार जीवन जगावं लागतं. जवळची म्हणवली जाणारी माणसेही त्यांना धुत्कारतात. काही स्त्रिया अशा वेळी आत्महत्या करून जीवन संपवून टाकतात. त्यांना धीर देणारे, त्यांचे मनोबल वाढवणारे, त्यांना आर्थिक, सामाजिक आधार देणारे जिव्हाळ्याचे असे कोणीतरी हवे असते, अरुणा तशा स्त्रियांसाठी मोठे आधारस्थान आहेत. कुटुंबात ज्या व्यक्तींपासून स्त्रीला त्रास होतो त्यांच्याशी बोलून, समुपदेशन करण्यापासून पोलिस केस आणि तात्पुरत्या निवाऱ्यापर्यंत, त्या स्त्रीला जगण्यासाठी पुन्हा उभे करण्यापर्यंत सर्व प्रकारची मदत त्या पीडीत स्त्रियांना देतात. त्यांच्यातील सूप्त क्षमतांना जागे करतात.

अरुणा यांच्या लिखाणापाठीमागेही तोच दृष्टिकोन आहे. त्यांच्या कादंबरीतील ‘विमुक्ता’ या नायिकेप्रमाणे स्‍त्रीने स्वतंत्र जग निर्माण करावे, स्वतःला सिद्ध करावे असाच संदेश त्यांना त्यांच्या लिखाणातून द्यायचा असतो.

पाणी मंच हा अरुणा यांच्या कामाचा आणखी एक महत्त्वाचा भाग. तेही काम स्त्रियांच्या जीवनाविषयी वाटणाऱ्या आस्थेतून उभे राहिले. पाणी हा स्त्रियांच्या दैनंदिन जीवनाशी जवळचा विषय आहे. महाराष्ट्रातील जवळजवळ पन्नास टक्के स्त्रियांचा दिवसातील सर्वाधिक वेळ जातो तो पाणी आणणे, पाणी भरणे यांतच. म्हणून पाणी मंचाचे काम सुरू झाले. अरुणा जलसाक्षरता, जलसंवर्धन, जलव्यवस्थापन, जलसंस्कृती या बाबतींत विदर्भात जाणिव जागृती व्हावी यासाठी कार्यक्रम घेतात.

जल साहित्य संमेलन हा देखील पाण्याच्या समस्येवरच्या कार्यक्रमांचंच एक विस्तार कक्ष आहे. मुळात जलसाहित्य ही संकल्पनाच अरुणाताईंच्या कल्पक प्रतिभेतून स्फुरलेली आहे. सुरूवातीला ‘जलसाहित्य म्हणजे काय’ असं म्हणून साहित्यिकांनी भुवया उंचावल्या. त्या म्हणतात, “मग ती संकल्पना त्यांना समजावून सांगावी लागली. पाण्याच्या समस्येच्या संदर्भात या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून जनसामान्यांत अवेअरनेस निर्माण व्हावा हाच उद्देश या संमेलनाच्या पाठीमागे होता, आहे.”

गेली अनेक वर्ष विविध शहरांत त्या जलसाहित्य संमेलनं भरवत आहेत. शासकीय पातळीवर राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांतील त्या क्रियाशील कार्यकर्त्या आहेत. महानगरपालिकेच्या त्या वॉटर फ्रेंड आहेत. अ.भा. जलसंस्कृती मंडळ, इंडिया वॉटर पार्टनरशिप अशा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थांशी त्या निगडित आहेत. त्यांनी स्वतःला १९९४ पासून त्या कामात झोकून दिले आहे.

अरुणा यांनी एकटीने त्यांच्या तीन मुलांनाही घडवले आहे. त्यांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात भक्कमपणे उभे राहवे यासाठी त्यांची जडणघडण केली आहे. आईच्या कामाविषयी मुलांना अभिमान, आस्था वाटतात. त्यांची मोठी कन्या समीक्षा ‘आकांक्षा’ची कार्यकारी संपादिका म्हणून काम करतात, तर स्वप्नीलने स्वतःचा व्यवसाय उभा केला आहे. धाकटी पियुषा मुंबईला मरचंडायझर म्हणून काम करते. त्या संदर्भातील एक मजेशीर पण हृद्य किस्सा अरुणा यांनी ऐकवला. त्या म्हणाल्या, “परवा त्यांच्या एका मित्रानं ‘फादर्स डे’ला त्यांना संदेश पाठवला. तो म्हणाला, “मी फादर्स डे ला तुम्हाला जाणीवपूर्वक अभिवादन करत आहे. कारण तुम्ही मुलांच्या आई तर आहातच पण तुम्ही मुलांच्या वाढीला आवश्यक वडलांचा भागही समर्थपणे सांभाळत आहात! म्हणून केवळ ‘बाईमाणूस’च नाही तर तुम्ही ‘बापमाणूस’ही आहात!”

अरुणा यांना त्यांच्या कामाची पावती वेगवेगळे मानसन्मान आणि पुरस्कार यांनी मिळाली आहे. अभिव्यक्ती मिडिया सेंटरने केलेल्या पाहणीमध्ये देशातील वेगळे काम करणाऱ्या दहा कर्तृत्ववान महिलांमध्ये त्यांचा समावेश आहे. त्याशिवाय त्यांना सामाजिक कार्याबद्दल स्मिता पाटील पुरस्कार, कस्तुरबा गांधी पुरस्कार, वंचित मित्र पुरस्कार, आंबेडकर पत्रकारिता पुरस्कार, नागपूर महानगरपालिकेचा जलमित्र पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या साहित्यिक कामागिरीलाही म.सा. संस्कृती मंडळाचा पुरस्कार, अनंत फंदी पुरस्कार, पतंगराव कदम फाऊंडेशन पुरस्कार, समाज प्रबोधन पुरस्कार, साहित्य साधना पुरस्कार, राष्ट्रीय युवा पुरस्कार, मैत्री पुरस्कार, ना.ह. आपटे पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित झाल्या आहेत. अरुणा म्हणतात, “आयुष्यात मी दोन वारांगना स्त्रियांना सन्मानाने आयुष्य देऊ शकले, अनेक स्त्रियांना त्यांच्या आयुष्यात उभ्या करू शकले, हे समाधान कोठल्याही पुरस्कारापेक्षा शब्दातीत आहे.”

अरूणा सबाने, 9970095562

– अंजली कुलकर्णी

About Post Author

Previous articleअरुंधतीदर्शन न्याय
Next articleकोकणचा खवळे महागणपती
अंजली कुलकर्णी या पुण्‍याच्‍या कवयित्री. त्‍यांनी आतापर्यंत काव्‍यसंग्रह, ललित लेखसंग्रह, संपादीत अशी एकूण बारा पुस्‍तके लिहिली आहेत. त्‍यांनी लिहिलेले 'पोलादाला चढले पाणी' हा रशियन कादंबरीचा अनुवाद प्रसिद्ध झाला आहे. त्‍यांनी अनेक कवितांचे हिंदी आणि इंग्रजीतून अनुवाद केले आहेत. त्‍यांच्‍या लेखनाला आतापर्यंत महाराष्‍ट्र राज्‍य शासन, यशवंतराव प्रतिष्‍ठान यांसारख्‍या संस्‍थांकडून अनेक पुरस्‍कार प्राप्‍त झाले आहेत. लेखकाचा दूरध्वनी - 9922072158

3 COMMENTS

  1. एका चांगल्याव धाडसी स्त्री
    एका चांगल्या व धाडसी स्त्री व्यक्तीमत्वाची कथा वाचायला मिळाली. धन्यवाद.

  2. आजच सभासद नोंदणी केली आहे.
    आजच सभासद नोंदणी केली आहे. संकल्पना अतिशय आवडली. वेबसाईटला रोज भेट देऊन माहिती घ्यायला हवी. शुभेच्छा!

Comments are closed.