अमेरिकेत मराठी ‘सारेगम’

1
48

बीएमएम सारेगम स्पर्धेचा विजेता नरेंद्र दातार अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाचे २०१३ सालचे संमेलन गाजले ते सारेगम स्पर्धांमुळे. ते संमेलनाचे प्रमुख आकर्षण होते आणि त्यासाठी त्याआधीची दोन वर्षे तयारी सुरू असल्यामुळे अमेरिकाभर कुतूहलही निर्माण झाले होते. संमेलन जुलैमध्ये प्रत्यक्ष घडून आले. त्या आधी दीड-दोन महिने भारतातदेखील त्या स्पर्धेचा आवाज पोचला व गानजगतात राहणारी मुख्यत: मुंबईची मंडळी, मराठी उपक्रमाच्या परदेशात होणाऱ्या अनुकरणाबद्दल जाणून घेण्यास उत्सुक झाली.

भारतीय हिंदी व अन्य भाषिक चित्रवाणी वाहिन्यांवर ‘सारेगमप’च्या गायनस्पर्धा सुरू होऊन दशक लोटले, पण त्यामध्ये ‘झी-मराठी’वर ज्या स्पर्धा घडून आल्या, त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण स्थान मिळवले. त्याची कारणे मराठीतील लता मंगेशकरांपासूनच्या नामवंतांचा त्यातील सहभाग, अवधूत गुप्ते-पल्लवी जोशी यांनी उचित गांभीर्य राखून त्यामध्ये आणलेला खेळकरपणा आणि कुशल वाद्यवृंदाची स्वरसाथ ही होती. शिवाय, संयोजकांनी वेगवेगळ्या वयोगटांत व प्रकारांत स्पर्धा योजण्याची कल्पकतादेखील दाखवली.

‘झी-मराठी’चे अनुकरण इतर वाहिन्यांनी वेगवेगळ्या स्वरूपात केलेच; पल्लवी जोशी यांनी स्वत:देखील ‘इ-मराठी’वर तसे कार्यक्रम सादर केले, पण ‘झी-मराठी’च्या नाविन्याची झळाळी त्यांना आली नाही. ‘सारेगमप’ची तशीच लहानमोठी अनुकरणे वेगवेगळ्या पातळ्यांवर होत गेली. त्यातील स्थानिक उत्साह व तसाच ‘फ्लेवर’ कलाकारांची उमेद वाढवणारा असतो हे सर्वजण जाणतात.

दुस-या क्रमांकाची विजेती - समिधा जोगळेकर आम्ही न्यू इंग्लंड मराठी मंडळात स्थानिक पातळीवर अशा गायनस्पर्धा २००९-२०१० पासून तीन-चार वर्षे घेत होतो. त्यास प्रतिसाद उत्तम मिळत असे. साऱ्या वातावरणात उत्साह संचारे. एकांकिका-नाटके-लेखकांशी गप्पा असे आमचे उपक्रम चालू असतातच; परंतु सुरांची ‘या हृदयीचे त्या हृदयी’ पोचण्याची अशी ताकद विलक्षणच असते. आम्ही तो अनुभव घेऊ लागलो. त्यामुळे बृहन्महाराष्ट्र मंडळाचे २०१३ चे अधिवेशन, बोस्टनजवळच्या आमच्या प्रॉव्हिडन्स गावी घेण्याचे ठरले तेव्हा कार्यक्रमविषयक चर्चेमध्ये ‘सारेगम’चे आकर्षण असायलाच हवे यावर एकमत झाले. यात मोठा पुढाकार घेतला तो अधिवेशनाचे सह संयोजक अदिती टेलर ह्यांनी. त्यांना योग्य साथ मिळाली ती संयोजक बाळ महाले ह्यांची. या त्याबरोबर तो कार्यक्रम भव्यदिव्य (ग्रँड) व्हायला हवा हाही सर्वांचा सुर उमटला. मग ‘ग्रँड’ म्हणजे काय त्यावर आम्ही खूप चर्चा झाली, कार्यक्रमाच्या यशाचे घटक पाडले आणि निष्कर्षाला आलो, की स्पर्धा मराठी गाण्यांची हवी.

ती उत्तर अमेरिकेतील (अमेरिका व कॅनडा) सर्वांना खुली हवी आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे गाणारे स्पर्धक अमेरिकेमधील असतील, ते वगळले तर कार्यक्रमातील बाकी सर्व ताफा भारतातून आणलेला, मूळ ‘सारेगमप’शी मिळता जुळता असायला हवा. हे सारे प्रचंड खर्चिक होणार होते, परंतु ते अपरिहार्यही होते. त्यामुळे अमेरिकेतील मराठी गाणी गाणा-यांना प्रोत्साहन मिळेल हे खरेच होते, पण कार्यक्रमास ‘ग्लॅमर’ येईल ते भारतातून आलेल्या ‘सेलिब्रिटी’ निवेदकांकडून व वाद्यवृंदाकडून. त्यामुळे खर्चाचे प्रमाण भव्यदिव्य होऊ लागले. तरी जिद्दीने संमेलनात ‘सारेगम’ थाटायचेच हे पक्के ठरवले आणि तयारीस लागलो.

उपांत्य फेरीतील स्पर्धक सा रे ग म कार्यक्रमाची पूर्ण जबाबदारी उचलण्यासाठी एका चमूची विभागणी झाली. चर्चा झडत गेल्या, सल्लामसलत-विचारविनिमय होत गेले आणि खंडाएवढ्या पसरलेल्या अमेरिकेत तेरा ठिकाणी प्राथमिक; त्याखेरीज उपांत्य आणि अंतिम अशा तीन फे-या आखण्यात आल्या. मराठी वस्ती ज्या परिसरात जास्त आहे साधारण अशी ठिकाणे ‘प्राथमिकते’साठी मुक्रर केली. कोणाही स्पर्धकास खर्चाच्या व वेळेच्या दृष्टीने चार ते सहा तासापेक्षा जास्त ‘ड्राइव्ह’ करून यायला लागणार नाही – विमानप्रवास तर वगळाच असा कटाक्ष प्राथमिक फेर्यांची ठिकाण ठरवताना ठेवला. तेरा ठिकाणांच्या मराठी मंडळांशी संपर्क प्रस्थापित केला, त्यांच्याबरोबर इमेल-फोन कॉल सुरू झाले.

परीक्षक - राहुल देशपांडे आणि पद्मजा फेणाणी - जोगळेकर क होते, की केंद्रवर्ती समितीचे आम्ही लोक सर्व स्पर्धा ठिकाणी जाऊ शकणार नव्हतो; पुढे, प्रातिनिधिक, सौजन्य व आमची हौस म्हणून एकदोन ठिकाणी गेलो. पण सगळ्या १३ मराठी मंडळांना मराठी स्पर्धा कशी घ्यावी, गाण्याच्या फेऱ्या कशा कराव्या, स्पर्धकांच्या गायनाचे परीक्षण करण्याचे निकष कोणते अशी मार्गदर्शक सूत्रे पाठवली. गुणवान गायक पुढे यावेत यासाठी सारा खटाटोप होता. अशी बरीच पूर्वतयारी केल्यानंतर सप्टेंबर  २०१२ ते जानेवारी २०१३ या काळात सर्व ठिकाणांची प्राथमिक फेरी पार पडली व त्यामधून बेचाळीस स्पर्धक उपांत्य फेरीसाठी निवडले गेले. प्रत्येक केंद्रामधून किती स्पर्धक निवडायचे हे, त्या त्या ठिकाणच्या स्पर्धक संख्येवरून ठरवले होते. स्पर्धकांनी त्यांच्या सहभागाची नोंदणी केंद्रवर्ती समितीकडे म्हणजे आमच्याकडे करायची होती. अशा आधी ठरवल्या गेलेल्या कार्यपद्धतीमुळे प्राथमिक फेरी निर्वेध पार पडली.

सूत्रसंचालक - प्रिया बापट आणि प्रशांत दामलेउपांत्य फेरी स्पर्धकांच्या सोयीसाठी कोठे घ्यावी हा प्रश्न होता, कारण आमचे बोस्टन हे ठिकाण अमेरिकेच्या इशान्येला, देशाच्या एका टोकास येते. शिकागोसारख्या मध्यवर्ती ठिकाणांचा विचार केला, पण बेचाळीस स्पर्धकांपैकी अंतिम फेरीसाठी सहा स्पर्धक जरी तटस्थ व त्रयस्थ परीक्षक निवडणार होते, तरी संयोजन समितीत आम्हा सा-यांना त्यांची गाणी ऐकण्याची इच्छा होती व कार्यक्रमाचा एकूण दर्जा काय राहील याचा अंदाज घ्यायचा होता. पण त्यासाठी स्पर्धकांना मोठा भुर्दंड पडणार होता. मग सर्व स्पर्धकांना प्रत्येकी पन्नास डॉलर प्रतीकात्मक मानधन देण्याचे ठरवले आणि ज्यांची बोस्टनमध्ये निवासव्यवस्था होऊ शकणार नव्हती, त्यांना आम्ही कार्यकर्त्यांनी आपापल्या घरी एक-दोन रात्री सामावून घेण्याचे ठरवले. तशीच, त्यांची स्थानिक प्रवासाची सोय केली. अमेरिकेत या बाबतीत फार परावलंबित्व असते. न्यू जर्सी, शिकागो व व्हँकुव्हर येथील तीन जाणकार तटस्थ व त्रयस्थ परीक्षक नियुक्त केले. उपांत्य फेरीत स्पर्धकांनी प्रत्येकी दोन गाणी गायची होती. एक – त्याचे त्याने निवडलेले व दुसरे – परीक्षकांनी सुचवलेले. उपांत्य फेरी सकाळी साडेनऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत चालली. आम्हा केंद्रवर्ती संयोजकांना ती मोठीच मेजवानी वाटली.

उपांत्य फेरी फार उत्तम झाली. आमचा विश्वास वाढला. गायनाचा दर्जा उत्तम होता. आम्ही खूष झालो व प्रत्यक्ष संमेलनातील अंतिम स्पर्धेच्या तयारीला लागलो. तेथे आमची संयोजनाची कसोटी स्पर्धकांएवढीच होती, कारण तीन हजार प्रेक्षकांसमोर संमेलनाच्या पहिल्या दिवशीच अमेरिकेतील पहिली ‘सारेगम’ स्पर्धा साकारणार होती.

विनोदी किस्से सादर करताना वैभव मांगले आणि आतिशा नाईक उपांत्य स्पर्धा एप्रिल मध्यास संपली व आमचा संपर्क, एका बाजूला अंतिम स्पर्धेकरता निवडलेल्या सहा स्पर्धकांशी व दुस-या बाजूस मुंबईतील वाद्यवृंदाशी, त्यांचा संयोजक कमलेश भडकमकरशी आणि निवेदक म्हणून निवडलेल्या प्रशांत दामले व प्रिया बापट यांच्याशी सुरू झाला. ते अडीच महिने खूप खळबळीचे तरी भरपूर आनंदाचे होते. त्यांचे व्हिसा मिळवण्यापासून त्यांच्याशी ‘वेव्ह लेंग्थ’ जुळण्यापर्यंतच्या अनेक बाबी… अनेक कॉन्फरन्स कॉल्समधून त्या निपटत गेल्या. रोज संध्याकाळी नव्या शंका, नवी धास्ती… आम्ही ऑफिस आटोपून यायचो व भारतात फोन लावायचो. तेव्हा भारतात दिवस सुरू झालेला असे. आम्ही थकलेले तरी उत्साही; उलट भारतातील कलाकार नुकतेच रात्रीच्या झोपेतून जागे झालेले म्हणून उत्फुल्ल तरी परकीय भूमीत, तेथील स्पर्धकांबरोबर आपली कला सादर करण्याबाबत विलक्षण उत्कंठा असलेले. शेवटी, सारे जुळले!

संमेलन जुलैच्या ५-६-७ तारखांना होते. आम्ही सहा स्पर्धक व वाद्यवृंद यांची दिवसभराची रंगीत तालीम ३ जुलैला ठेवली होती. त्यानंतर कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल आमच्या मनात शंका राहिली नाही.

सारेगमच्या मंचावर नृत्य सादर करताना भार्गवी चिरमुले अंतिम स्पर्धेच्या तीन फे-यांपैकी प्रत्येक फेरीनंतर उपस्थित प्रेक्षकांनी त्यांच्या आवडत्या स्पर्धकाला एसएमएस करून मते द्यायची व मिळालेल्या मतांची आकडेवारी स्टेजवरील स्क्रीनवर दाखवायची अशी व्यवस्था केली होती. अंतिम स्पर्धेस परीक्षक भारतातून आलेलेच होते. पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांचा संमेलनात कार्यक्रम होता व राहुल देशपांडे नाटकात काम करणार होते. त्या दोन मातब्बर कलाकारांनी परीक्षक म्हणून काम करण्याची आमची विनंती मान्य केली. त्यामुळे कोणाच्याच मनात गानकलेच्या परीक्षणाबाबत संशय निर्माण होणे शक्य नव्हते. त्यांनी रवी दातार व समिधा जोगळेकर या दोन स्पर्धकांना अनुक्रमे पहिला व दुसरा क्रमांक दिला. ती दोघे कॅनडातील, तेथेच जन्मास आलेली, त्यामुळे त्यांचे मराठी स्वरोच्चार शुद्ध कसे असणार? परंतु गंमत अशी, की त्यांच्या संभाषणात ‘अॅक्सेंट’ आला तरी त्यांचे गाणे शुद्ध असे. तशा पूर्ण मराठी उच्चारात तीन हजार श्रोत्यांसमोर गाणे म्हणायचे हा प्रकार सर्वसामान्य नव्हता, पण त्या तरुण गायकांनी तो पराक्रम साधला व परीक्षकांबरोबर श्रोतृवृंदाची, संयोजकांची मने जिंकली.

अंतिम स्पर्धेच्या दरम्यान अधुनमधून वैभव मांगले, भार्गवी चिरमुले अशा मराठीमध्ये गाजणा-या कलावंतांकडून चुटके व नृत्य सादर केले गेले. त्याचेही नियोजन उत्तम झाले होते. आमच्याकडून एक मोठी स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली गेली. त्यामधून अमेरिकेतील गुणवत्ता प्रकट झाली व महाराष्ट्रातील कलाकारांशी आमचे हार्दिक संबंध निर्माण झाले. आम्हा संयोजकांना खूप समाधान वाटले.

बीएमएम सारेगम मागची टीम त्यानंतर, लॉस एंजलीसला २०१५ साली होणा-या संमेलनात पुन्हा ‘सारेगम’ होणार का? तो प्रश्न तेथील संयोजकांचा आहे. शिकागो येथील २००७ च्या संमेलनात याच पद्धतीने बृहद् अमेरिकेच्या पातळीवर एकांकिका स्पर्धा झाल्या होत्या. आमची एकांकिका त्यावेळी उपांत्य फेरीपर्यंत पोचली होती. नंतर त्या स्पर्धा घेतल्या गेल्या नाहीत. ‘सारेगम’ स्पर्धेचेही तसे होईल कदाचित, पण तरी आमचे समाधान, आनंद चिरकाल राहणार आहे, कारण महाराष्ट्रातून येथे आलेले लोक त्यांच्या आयुष्यात वेगवेगळे कलाछंद जोपासतात. त्यांची मुळे त्यांच्या पूर्वायुष्यात असतात, परंतु आमच्या अंतिम ६ स्पर्धकांमध्ये २ स्पर्धक तरी भारताबाहेर जन्मलेले होते आणि स्पर्धाविजेता रवी दातार हा तर जेमतेम अठरा वर्षांचा. ही मुले त्यांच्या मराठी खुणा जपत आहेत हे अभिमानाचे वाटते ना? त्या अभिमानास निमित्त आम्ही झालो हे सुख चिरकाल लाभणार आहे.

ऋचा लोंढे
rucha.londhe@nemm.org

About Post Author

1 COMMENT

Comments are closed.