अमराठी भारताचा वेध घेऊया

0
59

'थिंक महाराष्ट्र' या वेबसाइटवर विहार करताना दिसते, की महाराष्ट्राशी ज्यांचे आपुलकीचे नाते आहे, ज्यांना मराठी भाषेविषयी आस्था आहे व जे महाराष्ट्राला मायभूमी वा कर्मभूमी मानतात त्यांच्यासाठी हा प्रकल्प आहे.
 

मराठी माणसाला स्वसामर्थ्याची जाणीव झाली तर तो पुन्हा एकदा अभिमानाने, अस्मितेने देशात उभा राहील या खात्रीने हा प्रकल्प उभारला गेला आहे. फुले –गोखले –टिळक ते आंबेडकर ह्या कालखंडात महाराष्ट्र जसा देशाच्या अग्रस्थानी होता तसा तो पुन्हा एकदा तळपावा अशी तळमळ या प्रकल्पामागे आहे.

दिनांक – 09.05.2011

वसंत म. केळकर

'थिंक महाराष्ट्र' या वेबसाइटवर विहार करताना दिसते, की महाराष्ट्राशी ज्यांचे आपुलकीचे नाते आहे, ज्यांना मराठी भाषेविषयी आस्था आहे व जे महाराष्ट्राला मायभूमी वा कर्मभूमी मानतात त्यांच्यासाठी हा प्रकल्प आहे.
 

मराठी माणसाला स्वसामर्थ्याची जाणीव झाली तर तो पुन्हा एकदा अभिमानाने, अस्मितेने देशात उभा राहील या खात्रीने हा प्रकल्प उभारला गेला आहे. फुले –गोखले –टिळक ते आंबेडकर ह्या कालखंडात महाराष्ट्र जसा देशाच्या अग्रस्थानी होता तसा तो पुन्हा एकदा तळपावा अशी तळमळ या प्रकल्पामागे आहे.
 

लोकमान्‍य टिळकांनी या देशाला न्यूनगंडाच्या खाईतून बाहेर काढले होते. त्यांनी जर लोकांना त्यांच्या दुर्गुणांची यादी देऊन खजिल केले असते तर लोक न्यूनगंडाच्या गर्तेत आणखी कोसळले गेले असते! आगरकर व टिळक यांच्यामध्ये वादाचा हाच मुद्दा मुख्य होता. पूर्वजांचा अभिमान व प्राचीन काळाचे श्रेष्ठत्व प्रज्वलित करून दिल्यास स्वसामर्थ्याची जाणीव होऊ लागते. टिळकांनी तसेच केले. ज्ञानेश्वर , शिवाजी , पेशवे काय किंवा फुले, गोखले-टिळक, आंबेडकर काय… आपण भूतकाळातूनच प्रेरणा घेतो. पण टिळकांच्‍या काळी आगरकर होते व निर्भीड मते व वाद हा त्या काळाचा स्थायिभाव होता. आता शिवाजी, पेशवे, फुले, टिळक, गोखले, आगरकर, यांच्या यशापयशाचे निर्भीड मूल्यमापन करता येणे अशक्य आहे. त्यावर ताबडतोब राजकीय रट्टारट्टी सुरू होते.
 

शिवाजीने हिंदू राज्यकर्त्यांकडून व हिंदू संतांकडून प्रेरणा घेतली असली तरी तो मुसलमानद्वेष्टा नव्हता, अफझलखान देवळे भ्रष्ट करत होता का? पहिल्या बाजीरावा ने जरी हिंदू पदपातशाही हे आपले ध्येय मानले होते व 'बुंध्यावर घाव घाला म्हणजे फांद्या आपोआप खाली पडतील' असे म्हटले होते, तरी तो मोगल साम्राज्यावर चढाईचे धोरण या दृष्टीनेच आपली तत्त्वे विशद करत होता. तो मुसलमानांना धर्माच्या आधारावर शत्रू मानत नव्हता. शिवाजीने जशी देशभावना महाराष्ट्राच्या लोकांमध्ये निर्माण केली तशी देशभावना पूर्ण भारतदेशाविषयी त्यावेळी नव्हती, पेशव्‍यांमध्‍ये नव्हती, महादजी शिंद्यांमध्येपण नव्हती, मोगल साम्राज्याला टक्कर द्यायची मनीषा होती, पण मोगल साम्राज्याला नेस्तनाबूत करून, पूर्ण भारतासाठी स्वदेशभावना निर्माण करून भारत हा स्वतंत्र देश स्थापन व्हावा अशी दृष्टी तेव्हा कोणाचीच नव्हती, मराठ्यांची पण नव्हती.
 

फुल्‍यांनी वरिष्ठ जातींना बाहेरून आलेले आर्य व कनिष्ठ जातींना भारताचे मूळ रहिवासी असे म्हटले होते का, हे ऐतिहासिकदृष्टया बरोबर आहे का, आंबेडकरांना महाराष्ट्रीय लोक महार ही जात वगळल्यास आपला नेता का मानत नाहीत-का मानायला पाहिजे, वारकरी परंपरेची सध्या स्थिती काय आहे, अशा मुद्यांवर जर माहिती, विचार व मते वेबसाइटवर आली तर शुध्द वैचारिकता मराठी माणसामध्ये जागृत व्हायला मदत होईल. न्यूनगंडाची मानसिकता बदलण्यासाठी चुकीच्या ठाम मतांवर घाला घालायला पाहिजे व त्यावर आलेल्या प्रतिक्रिया कणखरपणे पण प्रांजळपणे झेलता यायला पाहिजेत. ज्ञानकोशा तल्या 'माहिती'मुळे माणसाचा न्यूनगंड जाणे कठीण व त्याला स्फुरण चढणेही कठीण. ज्ञान व मनोरंजन या दृष्टीने चैत्रगौर साजरी कशी करतात, पुरणपोळी तयार करण्याचे प्रकार किती, 'रहाट' या शब्दाची व्युत्पत्ती काय इत्यादी माहिती उपयोगी असेल, पण या माहितीमुळे मराठी माणसाच्या मानसिकतेत बदल होणार नाही. माहिती प्राप्त होऊनसुध्दा मानसिकता तशीच राहील, कारण माझा महाराष्ट्र सर्वांच्या पुढे आहे (पण अमराठी लोक आम्हाला फार त्रास देत आहेत) हीच कल्पना वाढीला लागेल व पूर्वग्रह जसेच्या तसे राहतील. 'थिंक महाराष्ट्र'ची वेबसाइट व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वेबसाइट या पाहिल्या तर, 'मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा' हेच ब्रीदवाक्य दोघांचेही दिसते.
 

अशी ब्रीदवाक्ये सर्व समूहांमध्ये असतात, पण आपण या ब्रीदवाक्याचा ठाम आशय बनवला आहे. शिवाजीच्‍या काळात शहाजी व शिवाजी यांनी ठरवले, की प्रस्थापित राज्यांमध्ये जहागिरी, वतनवाडी मिळवण्यापेक्षा मराठी देश आपण का बनवू नये? सातवाहन, चालुक्य , वाकाटक , राष्ट्रकूट, यादव यांच्या काळापासून मराठी समाज महत्त्वाचा झाला होताच. शिवाजीने आपल्या कर्तबगारीवर हा देश बनवला. त्या भावनेला अनुसरून समर्थांचे 'महाराष्ट्र धर्म वाढवावा' हे ब्रीदवाक्य आहे. पुढे बलाढ्य मोगल बादशहांना निर्भीडपणे प्रत्युत्तर देण्याची परंपरा शिवाजी, संभाजी , संताजी व धनाजी यांनी चालवली व मोगल साम्राज्य मोडकळीला आले, तेव्हाही भूमिका हीच राहिली. 'हा हिंद देश माझा' अशी vision निर्माण झाली नाही.
 

दिल्लीला आमच्याविषयी आकस आहे असेच आम्ही अजूनही समजतो व गरीब बिचारे मनमोहन सिंग औरंगजेब आहेत असे कल्पून त्यांच्यावर चाल करून जातो! आपल्या ब-याच खासदारांना हिंदी, इंग्रजी तितकेसे येत नसल्यामुळे आपल्या अस्मितेकडे दिल्लीत कोणी फारसे लक्ष देत नाही. या दुर्लक्षाचा आपल्याला अधिकच राग येतो. बंगाल्यांना हिंदी कुठे नीट येते? तमिळांना कुठे येते? पण त्याचा त्यांना ढिम्मही न्यूनगंड नाही, पण आपल्याला आहे, कारण हिंदी चित्रपटसृष्टी मुंबईत आहे. आम्हाला उत्तर हिंदुस्थानी ख्याल, ठुमरी, गझल यांचे आकर्षण आहे. लता मंगेशकरां नी हिंदी व उर्दूमध्‍ये अप्रतिम शब्दोच्चार केले आहेत व त्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले आहेत. पु.ल.देशपांडे यांनी (विनोदाने हं!) म्हटले आहे, की जेव्हा मराठे आपली धारदार उर्दू परजत दिल्लीच्या बादशहापुढे चाल करून गेले तेव्हा तो बादशहा घाबरून गेला व म्हणाला, 'तोबा! तोबा! ऐ मराठों, मेरी गद्दी चाहे तो ले लो, लेकिन please उर्दूमें मत बोलो!'
 

संयुक्त महाराष्ट्र चळवळी बद्दल मला आदर आहे. मी लहानपणी अत्र्यां ची भाषणे ऐकली होती. आपण म्हणतो, की दिल्ली दरबाराला महाराष्ट्राविषयी आकस आहे, दिल्ली दरबाराला मराठी माणसांची भीती वाटते, जशी औरंगजेबाला शिवाजीची वाटत होती तशीच. पण माझ्या मते, हे असे नाही. दिल्ली दरबार महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करतो, कारण इतरांसारखी मुत्सद्देगिरी दाखवून आपले मिळवून न घेता आपण मनातल्या मनात रागावत राहतो. मुंबई तेथील उद्योगधंद्यांमुळे अमराठी जगात प्रसिध्द आहे. अमराठी जग राज कपूर , देव आनंद यांच्यामुळे तेव्हा मुंबईला ओळखत असे. अजूनही शाहरूख खान, आमीर खान यांच्यामुळे ओळखते. ‘टाटा , भाभा यांची मुंबई’ अशीच नेहरूं ची समजूत होती. आपले मराठी व्यवहार सांस्कृतिक पातळीवर मुंबईत चालत होते, पण मरीन ड्राईव्हवर कोणी सहस्रबुध्दे, देशपांडे, मेश्राम, कदम कधीच राहत नव्हते. मुंबई महाराष्ट्राची व मुंबई गुजराथची अशा दोन्ही पक्षांच्या आपापल्या प्रांजळ कल्पना होत्या. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी त मजूर मराठी व मालक अमराठी असे स्वरूप होते व म्हणूनच कम्युनिस्ट पक्ष या चळवळीत संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने राहिला.
 

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी ने अमराठी लोकांच्या कल्पनेला जबरदस्त हादरा बसला, पण वरिष्ठ मंडळी मुंबईत अमराठी व कनिष्ठ मंडळी मराठी हे तत्त्व अजूनही कायम आहे. कोणत्याही क्षेत्रात वरिष्ठपद पटकावण्याच्या बाबतीत आपले औदासीन्य जबरदस्त आहे. आज जर बाळ गंगाधर टिळक असते तर ते रतन टाटा झाले असते किंवा सी. व्ही. रामन झाले असते. प्रस्थापित राजवटीच्या विरोधात उभे राहणे व त्या राजवटीचे तुकडे करणे याला जे साहस लागते ते शिवाजी व टिळक यांच्याजवळ होते. पण ती राजवट समाप्त झाल्यानंतर (किंवा केल्यावर) आपला स्वतंत्र देश स्थापन करण्याची हुषारी त्यांच्यात होती व जाहरलाल नेहरूंमध्‍येही होती. अंगच्या हुषारीने रिझर्व्‍ह बँकेचे गव्हर्नर बनू. उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा बनू, नोकर्‍या मागण्याचे बंद करून नोकर्‍या देणारे बनू अशी ही मानसिक स्थिती बनवण्यासाठी आपण भारत देशाचा विचार करायला सुरुवात केली पाहिजे व 'मराठा तितुका मेळवावा' म्हणत दिल्लीच्या बादशहांना मुसंडी मारण्याची मानसिकता सोडायला पाहिजे. अमराठ्यांच्या प्रगतीची आम्हाला माहिती नाही. आम्ही आमच्यातच गुंग आहोत.
 

टिळकांनी भारतीयांची अस्मिता जागृत केली पण ते असंतोषाचे जनकही होते. गोरा साहेब हा कोणी अतिशय हुषार व आमच्यापेक्षा वरचढ प्राणी नसून त्याच्यामध्ये आमच्यासारखेच गुणदोष आहेत, तेव्हा त्याला घाबरून जाण्याचे कारण नाही, ही भावना त्यांनी रुजवली. मराठी माणसांच्या सध्याच्या अमराठी लोकांविषयीच्या रागात, 'अमराठी लोकांपेक्षा आपण खालच्या दर्जाचे आहोत' असा न्यूनगंड लपून बसला असावा असे मला वाटते. विशेषतः, मला मुंबईत असे प्रकर्षाने जाणवते. अमराठी लोकांना मराठी लोकांची भीती वाटत नाही व मराठी लोकांचा राग पण येत नाही. ते फक्त मोकळे असतात, खूष असतात, ही वस्तुस्थिती आहे. ते मराठी माणसाला वचकून नसतात, कारण राजकारण वगळल्यास मराठी माणसे कोणत्याही क्षेत्रात क्वचितच वरिष्ठपद पटकावून बसलेली आढळतात. मेधा पाटकरांना जर भारताचे पंतप्रधान बनवले तर त्यांना ही उचलबांगडी फारशी आवडेल असे वाटत नाही, कारण तिथे जबाबदारी अंगावर घ्यावी लागते!
 

गोर्‍या साहेबाचा भारतावर राज्य करण्याचा हक्क नव्हता. त्याच्यावर रागावणे न्यायोचित होते. पण अमराठी लोकांवर रागावणे न्यायोचित नाही. ते आमचे आहेत, त्यांच्याशी स्पर्धा 'हा हिंद देश माझा' हे ब्रीदवाक्य डोळ्यांसमोर ठेवून व्हायला पाहिजे. वरिष्ठपदे प्राप्त करणे म्हणजे चंगळवाद नाही. उद्योगधंद्यांमधले सर्वेसर्वा अंबानी , मित्तल , नारायणमूर्ती, अझीम प्रेमजी, किरण मुजुमदार, आय.ए.एस. अधिकारी, किंवा शासकीय व खाजगी उद्योगात गुंतलेले तरुण, तरुणी चंगळवादी नाहीत. त्यांना महत्त्वाकांक्षा आहे. या अमर्यादित संधींबरोबर निराशा, मत्सर, वैफल्य, हाव इत्यादी रिपूंच्या भोव-यात आजच्या जगाचे भवितव्य अडकलेले आहे.
 

मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या अर्थव्यवस्थेत आबादीआबाद आहे असे मला मुळीच म्हणायचे नाही. अमेरिकन मॉडेलवर आधारलेली जगाची ही अर्थव्यवस्था समाजात शांती, समाधान व आनंद टिकवून ठेवणारी आहे किंवा नाही याबद्दल वाद होऊ शकेल. पर्यावरणाचे धोके या अर्थव्यवस्थेला कितपत समजतात याबद्दल मेधा पाटकरांना बरेच काही सांगायचे असेल. Inclusive growth नसल्याची चिन्हे दिसत आहेत. गरीब व श्रीमंत यांमध्ये द-या पडत आहेत. माओ / नक्षलवादींची चढाई हे या क्षोभाचे द्योतक आहे. प्रशिक्षित माणसे सुशिक्षित नसल्याचे दिसून येत आहे.
 

पण पूर्ण बाजू समजून घेण्याची जी तयारी मनमोहन सिंग सदैव दाखवत असतात त्याला इतर अमराठी लोकांप्रमाणे मराठी लोकांनीही साद द्यायला पाहिजे. आपल्या सध्याच्या degenerate अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी मराठी माणसांनी अमराठी माणसांशी दोस्ती करायला पाहिजे, वैर नाही. त्यांच्या भाषा शिकायला पाहिजेत, त्यांना समजून घेतले पाहिजे.
 

राजकीय क्षेत्रात टिळकांचे पंजाब बंगाल व संपूर्ण भारतात वजन होते. अशी वजनदार राजकीय मराठी माणसे उदयाला यायला पाहिजेत. संपूर्ण देशाची vision जशी सुशिक्षित अमराठी लोकांना आलेली आहे तशी सुशिक्षित मराठी लोकांना अजून आलेली नाही. म्हणजे त्यांना 'हा भारत देश माझा' असे वाटत नाही, पण सगळीकडे जो सावळागोंधळ चालला आहे त्यात सुधारणा करायची झाली तर शांत, समजूतदार, कुशल, शूर महाराष्ट्रच ते काम करू शकेल अशी आमची जी ठाम समजूत आहे ती जरा दूर सारून आपण अमराठी भारताचा वेध घ्यायला पाहिजे. शेवटी मी म्हणेन, की ‘थिंक महाराष्ट्र’ या वेबसाइटला 'केसरी'चे स्वरूप यायला पाहिजे.
 

– वसंत म. केळकर
भ्रमणध्वनी: 9969533146

{jcomments on}

About Post Author

Previous articleलादेननंतरही दहशतवादाची टांगती तलवार कायम
Next articleमहाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सवी जागर
Member for 11 years 11 months वसंत केळकर नागपूरचे आहेत. त्यांचे शालेय शिक्षण पटवर्धन हायस्कूल मध्ये झाले. विज्ञान महाविद्यालय नागपूर येथून ते फिजिक्स या विषयात एम एससी झाले. भारतीय डाक सेवा या शासकीय सेवेत ते १९६६ ते २००१ पर्यंत होते. बंगलोर येथून मुख्य पोस्टमास्तर जनरल या पदावरून २००१ साली ते सेवानिवृत्त झाले. आवड म्हणून जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय दिल्ली येथे फ्रेंच आणि इतिहास या विषयांचा अभ्यास करीत आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9969533146