‘अभिवाचन’ का केलं जातं? या प्रश्नाचं खरं उत्तर हे आहे. मजा येते म्हणून, राहवत नाही म्हणून!! कारण त्यामधे अपार आनंद दडलेला आहे.
अभिवाचनाच्या बाबत एक असंही समजलं जातं, की अभिवाचन हे काही ठरावीक साहित्यकृतींचं केलं जातं. ज्यात नाट्य असावं, संवाद असावा, असं काही. म्हणजे, जाहीर वाचन करावं अशा साहित्यकृती आणि एकट्यानं, आपल्याशीच वाचाव्यात अशा साहित्यकृती अशी एक सरळ सरळ विभागणी केली जाते. पण ती विभागणी मला अलिकडे फारशी पटत नाही. माझा पूर्वीही हा समज असावा. पण माझ्या समजाला पहिला छेद दिला तो विजय तेंडुलकर यांच्या वाचनानं! अतुल पेठे यांनी एकदा विजय तेंडुलकर यांचे, त्यांना आवडलेले असे वाचन ठेवले होते. आणि तेंडुलकरांनी श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचे ‘घंटीवाला’ वाचले. श्रीनिवास कुलकर्णी हे माझे आवडते लेखक! कधीही, कुठल्याही वेळेला ‘डोह’, ‘सोन्याचा पिंपळ’, ‘पाण्याचे पंख’ पुस्तकांच्या रॅक मधून काढावं आणि त्यात घुसावं. तेंडुलकरांनी जेव्हा त्यांच्या शांत, धीम्या, गंभीर आवाजात ‘घंटीवाला’ असं म्हटलं, तेव्हा मी हरखून जाण्याऐवजी अस्वस्थ झाले. छे! छे! हे जाहीरपणे कसं ऐकायचं बुवा.. असं वाटलं मला. पण तेंडुलकरांच्या पहिल्याच ओळीबरोबर मी ‘आत’ शिरले, स्वतःशी वाचत असताना येते तशी किंवा वेगळीच पण मी त्यावेळी तन्मयता अनुभवली! एखादा संवेदनासमृध्द कलात्मक अनुभव हा वेगवेगळ्या वाटांनी येत असावा, आपण मोकळ्या मनानं त्याला सामोरं जायला हवं हे मला तेंडुलकरांच्या वाचनानं शिकवलं.
मी माझ्यापुरतं सांगायचं झालं तर अभिवाचनाकडे ‘परफॉर्मन्स’ म्हणून पाहते. मला ते आवडतं किंवा ती माझी भूक आहे. त्या विशिष्ट कथाविश्वात शिरण्याचा, त्या विशिष्ट पात्रामधे उतरण्याचा जो अनुभव असतो, तो थरारक असतो. मला तो घ्यायला, पुन्हा पुन्हा अनुभवायला आवडतं, जिवाला बरं वाटतं. मला वाटतं, की माझ्यातल्या अभिनेत्रीला ते प्रांगण विनासायास मिळालं आहे. आवडलेली कथा घ्यावी, चार ऐकणारे समोर असावेत की झालं! आपण जेव्हा स्वतःशी वाचतो तेव्हा जसे निखळ एकटे असतो, तसे आपण अभिवाचनाच्या वेळी अर्थातच नसतो. एक आभासी विश्व कुणाच्यातरी साक्षीनं आपण प्रत्यक्ष करू पाहात असतो, आपण एकटेच त्या पात्रामधे उतरणार असतो, फक्त ते कुणाच्यातरी साक्षीनं घडणार असतं.
प्राध्यापक या नात्याने मी जेव्हा माझ्या विद्यार्थिनींना साहित्य शिकवते तेव्हा कधी कधी पध्दती-मेथड म्हणून वाचन करते. ते परिणामकारक ठरतं असा माझा अनुभव आहे. उदाहरणार्थ कथेची संरचना समजावी म्हणून उदयप्रकाशांची ‘तिरीछ’ किंवा कधी कधी कथेमधे वातावरण हा घटक नायकाची भूमिका कशी करतो यासाठी शंकर पाटलांची ’वळीव’ ही कथा, अरविंद गोखले यांची ‘कातरवेळ’, ग्रामीण इरसाल नमुन्यांसाठी माडगुळकरांच्या कथा, असं काही वर्गात मुलींसमोर वाचलं जातं. अपेक्षित परिणाम होतोच, शिवाय त्यांना वाचनाची गोडी लागण्याची शक्यताही निर्माण होते. आपण आपलं बालपण आठवलं तर लगेच कळेल, की आजी जी गोष्ट सांगायची त्यातून किती भरभरून मिळत असे… कधीही न संपणारी कापूसकोंड्याची गोष्ट आली कशातून? अखंड गोष्ट ऐकत राहण्याच्या ओढीतूनच ना? गोष्ट ऐकणं ही जशी सहजप्रवृत्ती आहे, तशीच कोणाची तरी गोष्ट वाचून दाखवणं ही सहज(च) प्रवृत्ती असते. ज्यामधे त्या व्यक्तीलाही सुख गवसतं आणि म्हणून इतरांनाही. आणि मग ज्यात सुख आहे ते करावंच की माणसानं…!
डॉ. प्रिया जामकर
मराठी विभागप्रमुख, एसएनडीटी पुणे,
२३ बी, आनंदवन हेरिटेज,
आनंदनगर, सिंहगड रोड,
हिंगणे खुर्द, पुणे – ५१
९४२३२२४३७५
priyajamkar16@gmail.com
‘ तन्मयता ‘ हा अभिवाचनाचा
‘ तन्मयता ‘ हा अभिवाचनाचा प्राण असणे — हे महत्त्वाचे लिहिले आहे !
priya chan lihiles
priya chan lihiles
Khup sunder lekh . Madam
Khup sunder lekh . Madam abhivachan yaver mala tumchashi bolayala aawadel.
उत्कृष्ट सादरीकरण आणि मांडणी.
उत्कृष्ट सादरीकरण आणि मांडणी…
खूप छान, उद्बोधक माहिती…
खूप छान, उद्बोधक माहिती
धन्यवाद.
सुभाष मराठे .६ फेब्रुवारी २०१९
Comments are closed.