अभिमान गीताचे सातवे कडवे

0
48
_AbhimangitacheGitache_SatveKadve_2.jpg

विधानसभेतील विरोधी पक्ष, सरकार प्रत्येक गोष्ट चुकीची व बेपर्वाईने कशी करत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करताना दिसतात किंवा त्यांच्याकडून सरकारी योजनांबद्दल फक्त संशय तरी निर्माण केला जातो. काही वेळा, विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून संप-मोर्चे यांचे हत्यार उपसले जाते. कधी सभासद हौदातही उतरतात! पूर्वी काँग्रेस राजवटीत शिवसेना-भाजप हे विरोधी पक्ष म्हणून असाच गोंधळ घालत. गंमतीचा भाग म्हणजे सरकारी पक्षाकडून त्याची दखल घेऊन कधी उत्तरे दिली जातात; कधी दिली जात नाहीत. त्याचेही विरोधी पक्षास काही वाटते असे जाणवत नाही. मुख्यमंत्री काही वेळा हुशारीने उत्तरे देतात तर कधी चिडून-जोराने बोलतात. ताजे उदाहरण -विरोधी पक्षांनी विशेषत: अजितदादा पवार आणि जयंत पाटील यांनी, मराठी भाषा दिनाला अभिमान गीताचे सातवे कडवे का म्हटले गेले नाही यावरून गडबड-गोंधळ विधानसभेत घातला. आम्ही प्रेक्षकांनी तो प्रकार दूरदर्शनवर पाहिला. कारण काय, तर ‘अभिमान गीता’ची कडवी सहाच मराठी भाषा दिनी विधानसभेत म्हटली गेली. त्यामुळे मराठीचा व महाराष्ट्राचा अपमान झाला. शेवटी मुख्यमंत्री चिडले. त्यांचा आवाज वाढला. त्यांनी उठून सांगितले, की याचा शोध तुम्हीच घ्या. तुम्हीच काय ते समजून घ्या. त्यांनी बाकी काहीच स्पष्टीकरण दिले नाही!

उदय निरगुडकरांनी याच विषयावर ‘न्यूज १८ लोकमत’ या चॅनेल (पूर्वीचे आयबीएन लोकमत) वर रात्री चर्चा घडवून आणली. त्यामध्ये दोन-तीन ज्येष्ठ पत्रकार व कौशल इनामदार यांना बोलावले गेले होते. इनामदार यांनी सांगितले, की ते गीत प्रसिद्ध कवी व गझलकार सुरेश भट यांनी 1960 साली महाराष्ट्र राज्य स्थापन झाले त्यावेळी लिहिले आहे. ते त्यांच्या ‘रूपवेध’ या काव्यसंग्रहात समाविष्ट आहे. त्यामध्ये कडवी सहाच आहेत. ‘रूपवेध’ची दुसरी आवृत्ती 1980 साली निघाली. त्यातही कडवी तेवढीच आहेत. सुरेश भट यांना सातवे कडवे काव्यगायनाच्या वेळी एकदा उत्स्फूर्तपणे सुचले. ते त्यांनी म्हटले, पण त्यांनी ते त्यांच्या नंतरच्या काव्यसंग्रहाच्या आवृत्तीत समाविष्ट केले नाही. त्याचे कारण त्यांनाच माहीत असेल.

कौशल इनामदार यांनी त्या गीताला संगीताचा साज चढवला. ते गीत महाराष्ट्राच्या अभिमानाचे तसेच वैशिष्ट्यपूर्ण तरीही सत्त्व व तेज यांचे प्रतीक होते. इनामदार यांनी मराठी भाषा दिनी (27 फेब्रुवारी 2010) या ‘अभिमान गीता’चे लोकार्पण केले. त्यात महाराष्ट्रातील सर्व प्रथितयश जवळ जवळ तीनशे गायक व वादक सामील झाले. त्यातून एक वेगळीच अतिशय उत्तम अशी रचना तयार झाली. ते गीत अजरामर ठरले आहे! त्या गाण्यामध्ये सहाच कडवी गायली गेली आहेत. त्या गीताची किंवा कार्याची सरकारी पातळीवर विशेष दखल 2008 ते 2014 पर्यंत घेतली गेली नाही. ते यंदा विधानसभेत गाण्याचा प्रसंग सरकारने घडवून आणला. ही घटना कौतुकाची की टीकेची? जयंत पाटील, जे सभ्य-सुसुंस्कृत गृहस्थ म्हणून ओळखले जातात, त्यांनी तरी असा गोंधळ घालणे टाळायला हवे होते.

टीव्हीवरील चर्चेमध्ये कौशल इनामदार यांनी एक सुंदर किस्सा सांगितला. पुढे, ते गीत प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रेहमान यांनी ऐकले. त्यांना त्याचे महत्त्व व त्यामधील सत्त्व जाणवले असावे. त्यांनी तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांना तामिळ भाषेविषयी तसे गीत लिहावे असे सुचवले. करुणानिधी हे कवी व लेखक असल्यामुळे त्यांनी तसे गीत लिहिले. त्याला उत्तम संगीत दिले गेले. त्यासाठी सरकारी पातळीवर आर्थिक मदतही दिली गेली. इनामदार यांनी तो किस्सा बाळासाहेब ठाकरे यांची भेट झाली असता त्यांना सांगितला. बाळासाहेब जात्याच चाणाक्ष व महाराष्ट्राचे, मराठीचे अभिमानी असल्यामुळे ते उत्स्फूर्तपणे म्हणाले, की आपल्याकडे ‘करुणा’पण नाही व ‘निधी’ही नाही. बाळासाहेबांनी स्वत: होऊन अभिमान गीत ऐकण्यासाठी इनामदार यांना बोलावून घेतले होते.

सुरेश भट यांनी रचलेले व कौशल इनामदार यांनी घडवलेले महाराष्ट्राचे ‘अभिमान गीत’ हा अनमोल ठेवा तयार झाला आहे. त्यावर अकारण, टिकेसाठी टीका म्हणून शिंतोडे उडवले जाऊ नयेत.

– प्रभाकर भिडे

About Post Author