अभिनव भगूर दर्शन आणि अभ्यास मोहीम

हर्षल, प्रणव, मनोज आणि त्यांचे काही मित्र व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून 2014 साली एकत्र आले आणि सोशल मीडियावरून अभ्यास मोहिमेच्या कामाला लागले! ही नव्या जमान्याची नवी रीत आहे. त्यांना एकत्र आणणारा घटक ठरला सावरकरप्रेम. त्यांनी सावरकर जयंतीला त्यांच्या जन्मगावी भगूर (नाशिक) येथे जाऊन ‘भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूह’ आणि ‘स्वातंत्र्यवीर सावरकर समूह’ असे दोन गट बनवले. सावरकर यांच्या विचारांचा प्रचार करणे हा त्यांचा उद्देश. त्यांनी त्या गटांच्या वतीने ‘भगूर दर्शन व अभ्यास मोहिमे’चे 28 मे 2017 रोजी आयोजन करण्यात आले. ते फक्त दर्शन नव्हते तर अभ्यासमोहीमसुद्धा होती! मोहिमेत भगूरमधील सावरकर यांच्या आठवणींना उजाळा दिला गेला. दादरा-नगरहवेलीचे स्वातंत्र्यसैनिक वसंत प्रसादे, पवार, यशवंत पाळंदे आणि शंकर परांजपे हे त्या मोहिमेत सहभागी झाले होते. त्यांनी  ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांच्या माहितीचा कोश तयार केला आहे. चंद्रकांत शहासने यांचे मार्गदर्शन त्यांना मोहिमेसाठी मिळत असते. पहिल्या वर्षाच्या त्या अभ्यास मोहिमेत पन्नास-साठ लोकांनी सहभाग नोंदवला.

मोहिमेचे दुसरे वर्ष,2018 च्या मे महिन्यात पार पडले. त्या मोहिमेत मुंबई, पुणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, रत्नागिरी, जालना, बेळगाव, शहापूर, येथून मोठ्या संख्येने सावरकरप्रेमी भगूरला जमले. गुजरात राज्यातूनदेखील काहीजण आले. त्यांना भगूर गावातील बालाजी मंदिरात एकत्र जमण्याची व्यवस्था केली होती. मोहिमेस तेथून सुरुवात झाली. पुण्याचे प्रणव सदरजोशी यांनी मोहिमेतील प्रास्ताविक सादर केले. त्यांनी अभ्यास मोहीम घडवण्यामागील कारण सांगितले. भगूर येथील ‘नुतन विद्या मंदिर’ विद्यालयातील माजी मुख्याध्यापक रामदास आंबेकर गुरुजी यांनी भगूर गावाबद्दल माहिती दिली. त्यांनी भगूरमधील सावरकरांच्या आठवणी सांगितल्या. पुण्याचे शौनक कंकाळ यांनी सावरकरांच्या कार्याविषयी माहिती दिली.

नंतर सगळे सावरकर वाड्याकडे रवाना झाले. महाराष्ट्र शासनाने त्या वाड्याचे बांधकाम केले आहे. जुन्या वाड्याचे बांधकाम ज्या पद्धतीचे होते तशाच धाटणीचा नवा वाडा बांधला गेला आहे. सावरकर यांचा जन्म वाड्यातील ज्या खोलीत झाला तेथे छोटे स्मारक उभारण्यात आले आहे. वाड्यात सावरकर यांची पत्रे, त्यांचे देवघर, धान्य साठवण्याचे ठिकाण (कोठार), वाड्याचे जुने छायाचित्र असे साहित्य पाहण्यास मिळते. वाडा तीन मजली असून त्यात सात जिने आणि तेरा खोल्या आहेत. शौनक कंकाळ आणि प्रणव सदरजोशी यांनी वाड्याविषयी माहिती दिली.
मोहीम वाड्यानंतर लक्ष्मी नारायण मंदिरात गेली. मंदिरातील मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. गरूडावर स्थित लक्ष्मी-नारायणाची मूर्ती आहे. सहसा, गरुड हा मूर्तीच्या बाजूला असतो, पण येथे लक्ष्मी-नारायण या दोघांची मूर्ती थेट गरुडावर आहे. मंदिर कितपत जुने आहे ते नक्की माहीत नाही. तेथे कुलकर्णी नावाचे गृहस्थ राहतात. त्यांनी मंदिराविषयी माहिती दिली.

‘सावरकर अभ्यासिका’ विनायक सावरकर यांचे लहान भाऊ नारायण सावरकर यांच्या नावावर असलेल्या जागेत उभारण्यात आली आहे. अभ्यासिकेत ग्रंथालय आहे. सावरकरांनी लिहिलेली पुस्तके ग्रंथालयात उपलब्ध आहेत. ग्रंथालयाशेजारी क्रांतिसूर्य सभागृह आहे. क्रांतिकारकांचे कार्य छायाचित्रांसहित नोंदलेले त्या सभागृहात आहे. सभागृहाचा उपयोग सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीही होतो. अभ्यासिकेची व्यवस्था स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी करण्यात आली आहे. जागेचा वापर पुरेपूर करण्यात आला आहे. अभ्यासिका पाहिल्यानंतर, मोहीमसदस्य सावरकर ज्या ठिकाणी खेळण्यास जायचे, ज्या नदीत पोहायचे त्या दारणा नदीच्या काठी वसलेल्या श्रीराम मंदिरात येऊन ठेपले. मोहिमेत आलेल्या व्यक्तींसाठी जेवणाची व्यवस्था तेथे करण्यात आली होती. आकाश मेहरे हे श्रीराम मंदिर येथील पुजारी आहेत. त्यांनी मंदिराची माहिती दिली. प्रणव यांनी सावरकर यांनी शिक्षणाचे सुरुवातीचे धडे ज्या शाळेत गिरवले त्या शाळेतील त्यांच्या व त्यांच्या मित्रांच्या आठवणी सांगून त्या काळाचा अनुभव लोकांना दिला.

अभ्यास मोहीम शेवटच्या ठिकाणी, म्हणजेच खंडेराव मंदिरात पोचली. मंदिराच्या आवारात दीपमाळ, वीरगळ पाहण्यास मिळतात. सावरकरांनी शपथ ज्या अष्टभुजा देवीसमोर घेतली होती ती अष्टभुजा देवीची मूर्ती त्या मंदिरात आहे. पाच शिवलिंग असलेली पिंडही मंदिरात आहे. मंदिरातील पुजाऱ्यांच्या पूर्वजांच्या पादुकाही तेथे आहेत. तन्मय पाटील यांनी मंदिरात सगळे एकत्र जमल्यानंतर सावरकर यांच्या ‘माझे मृत्युपत्र’ या विषयावर माहिती दिली. हर्षल देव यांनी ‘सावरकरी राष्ट्रीय विचार’ या विषयावर विश्लेषण केले. मोहिमेची सांगता खंडेराव मंदिरातील आरतीने झाली.

हर्षल देव यांच्या कल्पनेतून साकारलेली ही अभ्यास मोहीम. प्रणव आणि भगूरचे मनोज कुवर यांनी मोहिमेचे नियोजन उत्तम सांभाळले.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी (2019) भगूर अभ्यास मोहीम होणार आहे. सहभागी व्हायचे असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधा.

अभ्यासमोहिमेचे आयोजक – मनोज कुवर (9921469008), प्रणव सदरजोशी (8329684399), हर्षल देव (7756890020)

– शैलेश दिनकर पाटील

About Post Author