अभिजात वाचकाच्या शोधात

0
52
विचारमंथन उपक्रमाचा पहिला विषय – ‘अभिजात वाचकाच्या शोधात’

     ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ आणि ‘माधवबाग’चा साने केअर ट्रस्ट यांनी वेगवेगळ्या विषयांवर दिवसभराच्या सखोल विचारमंथनाचा आगळावेगळा उपक्रम येत्या कोजागिरीचे निमित्त साधून सुरू करण्याचे ठरवले आहे. दर महिन्याच्या चौथ्या रविवारी ‘माधवबागे’च्या खोपोलीजवळच्या आरोग्यकेंद्रात या चर्चा घडून येतील. पहिले ‘विचारमंथन’ ‘अभिजात वाचकाच्या शोधात’ या विषयावर अरुण साधू, सतीश काळसेकर, संजय भास्कर जोशी, सुनील कर्णिक व ‘ग्रंथसखा’ श्याम जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी, २८ ऑक्टोबरला सकाळी १०.३० ते दुपारी ४.३० या वेळात होणार आहे. मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष प्रा. दीपक पवार संचालन करतील. त्यांना सहाय्य साधना गोरे यांचे आहे. चर्चेचे स्वरूप गोलमेज धर्तीचे असणार आहे. त्यामुळे उपस्थितांतील इच्छुकांना चर्चेत भाग घेता येईल.

     समाजातील वाचन कमी होत आहे/वाढत आहे याबाबत वेगवेगळ्या प्रकारचे दावे मान्यवरांकडून होत असतात. मल्टिमीडियाच्या वातावरणात वाचनाचे स्थान काय? त्यापलीकडे स्वत:त मग्न असा शोधक वाचक असतो का? त्याला धुंडाळायचे कुठे व कोणी? असे मुद्दे त्या दिवशीच्या चर्चेमध्ये यावेत हे अपेक्षित आहे. ज्या मंडळींना या कार्यक्रमास यायचे असेल त्यांनी महेश खरे यांना ९३२०३०४०५९ या नंबरवर कळवावे.

– संपादक
thinkm2010@gmail.com

About Post Author

Previous articleमिशन दामोदर कुंड
Next articleकोकणातील दशावतार (Dashavatar in Konkan)
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.