अपूर्णांकांचं प्रेम

कृ.मु.उजळंबकर
कृ.मु.उजळंबकर

कृ.मु.उजळंबकर     माझे आजोबा त्यांच्या लहानपणी पो-या म्हणून मराठवाड्यातल्या चाकूरच्या बलभीम वाचनालयात कामाला होते. पहाटे ग्रंथालय झाडून ठेवायचे आणि पुस्तकांवरील धूळ झटकून पाणी भरून ठेवायचे, हे त्यांचे काम होतं. माझे आजोबा राहायचे जवळच्या उजळंब नावाच्या खेड्यात. ते तिथून पहाटेच ग्रंथालयात जायचे. पुढे ते ग्रंथालयशास्त्राचे प्रणेते डॉ.शि.रा. रंगनाथन यांचे पट्टशिष्य बनले आणि महाराष्ट्राचे ग्रंथालय संचालक म्हणून निवृत्त झाले. शेवटच्या श्वासापर्यंत, काका म्हणजे माझे आजोबा, कृ.मु. उजळंबकर स्वत:ची ओळख 'निवृत्त ग्रंथालय संचालक' अशी करून द्यायचे. काकांचे ग्रंथालयवेड इतके जबरदस्त होते, की आम्ही सर्व त्यांच्या ग्रंथालयधर्माचे पहिले कन्व्हर्टस होतो. सुट्टया लागल्या, की काकांबरोबर ‘शासकीय विभागीय’मध्ये जायचे आणि हाताला लागतील त्या पुस्तकांचा फन्ना पाडायचा हे ठरलेले होते. सुट्टया लागल्या, की काका ‘शासकीय’मध्ये मुलांच्या पुस्तकांचा कोपरा तयार करायचे. पण ते मुळात लिबरल होते. हाताला लागेल ते कोणतेही पुस्तक वाचायला त्यांची मनाई नसायची. काका भाषावार प्रांतरचनेनंतर पुण्यात आले होते. त्यांचा खाक्या मराठवाडी, निझामशाहीतला-ढिसाळ आणि प्रेमळ, पुस्तकांवर प्रेम करणारा, उदारमतवादी होता.

     काकांच्या ग्रंथालय-धर्मात धर्मांतरासाठी एकच गोष्ट आवश्यक होती, ती म्हणजे पुस्तकांवर प्रेम. एकदा जीव पुस्तकांना चटावला, की मग ते प्रेम सरणार नाही हे काकांना पक्के ठाऊक होते.

डॉ. रंगनाथन     काकांचे गुरू शि.रा. रंगनाथन हे ग्रंथालयशास्त्राचे आद्य प्रणेते मानले जातात. त्यांच्या 'ग्रंथालयाची पाच सूत्रे' जगभर प्रचलित आहेत. रंगनाथन यांची दशांश पध्दत जगभर महत्त्वाची मानली जाते. डॉ. रंगनाथन यांनी ज्ञानाची विभागवार वर्गवारी करून प्रत्येक पुस्तकाला नोंदणी क्रमांक देण्याची शिस्त निर्माण केली. रंगनाथन यांचा विचार, त्यांच्या अगोदर ज्याने वर्गीकरण पध्दतीचा अभ्यास केला होता त्या मेल्विल ड्युईपेक्षा पुढे जाणारा होता. गुगलवर तुम्ही बघितलेत तर भारतातले आद्य आय.टी. प्रणेते म्हणून रंगनाथन यांचा उल्लेख आढळतो. 'याहू'च्या प्रणेत्यांनी आपले आद्य सर्च इंजिन डिजाईन करताना रंगनाथन यांची विचारप्रणाली आधारभूत मानली होती.  इंटरनेटवर  जे सर्च इंजिन असते, त्या सर्च इंजिनमागे रंगनाथन यांचीच माहिती आणि ज्ञानाच्या वर्गवारीची व्यवस्था आहे.  डॉ. रंगनाथन यांच्या वर्गीकरण पध्दतीने ग्रंथालयातली सर्व पुस्तके त्यांच्या त्यांच्या ओळखीने योग्य ठिकाणी सापडतात. भारतीय ज्ञानशास्त्राचा पाया डॉ.रंगनाथन यांच्या वर्गीकरण पद्धतीमागे आहे. डॉ. रंगनाथन यांच्या शिस्तीमुळे हे नोंदणी क्रमांक उर्फ अपूर्णांक भारतातल्या ग्रंथालयातल्या पुस्तकांवर आले. त्यातल्या काही अपूर्णांकांवर माझा तर जीवच जडलेला आहे.

     काकांनी डॉ. रंगनाथन यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला होता. त्यामुळे डॉ. रंगनाथन हे नाव लहानपणापासून परिचयाचे होतं. काकांबरोबर बोलताना कायम ग्रंथालयांचाच विषय निघायचा. ते ग्रंथालय संचालक झाल्यापासून तयांचे ऑफिस 'एशियाटिक'च्या इमारतीत होते. तेव्हापासून माझ्याही 'एशियाटिक'च्या फे-या सुरू झाल्या. तिथल्या नोंदणी क्रमांकांत दडलेल्या पुस्तकांचा परिचय होऊ लागला.

     नोंदणी क्रमांक घालण्यापूर्वी अनेक पुस्तके काकांकडे ग्रंथालयात यायची. 'इथे बसून वाचणार असशील तर वाचायला देतो' या अटीवर काकांच्या ऑफिसात बसून एका बैठकीत पुस्तके वाचून संपवायला त्यांनी शिकवले. नंतर अमेरिकेतून फोन केला तरी काका गावाची, प्रवासाची चौकशी करायच्या अगोदर गावातल्या लायब्ररीची चौकशी करायचे. युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियाची वॅन डर बिल्ट लायब्ररी, माझ्या स्कूलची अरिझोना स्टेटची हेडन लायब्ररी, न्यूयॉर्कची पब्लिक लायब्ररी, वॉशिंग्टनची फेमस अमेरिकन काँग्रेसची लायब्ररी… काकांमुळे हे प्रत्येक ग्रंथालय जणू मंदिर आहे अशा भक्तिभावाने तिथे प्रदक्षिणा केल्या, पुस्तके वाचली, जागच्याजागी परत ठेवली आणि काकांना त्यांची वर्णने ऐकवली.

     एका समर सेमिस्टरला मला रिसर्च स्कॉलरशिप नव्हती. तेव्हा मध्ययुगीन युरोपचा अभ्यास करणारा एक गट अरिझोनात होता. त्यांना असिस्टंटची गरज होती. दिवसभर ग्रंथालयात बसून काम करायचे होते. विद्यार्थी या कामाला तयार नसायचे. ती नोकरी मला मिळाली. मध्ययुगीन युरोपचे सर्व संदर्भ एकत्रित करायचे काम होते. त्यासाठी मला रोजचे पुस्तकांचे, जर्नल्सचे नोंदणी क्रमांक मिळायचे. त्या नोंदणी क्रमांकांच्या खाली येणारे प्रत्येक पुस्तक आणि प्रत्येक जर्नलचा प्रत्येक अंक तपासून त्यातल्या मध्ययुगीन युरोपच्या संदर्भांना एकत्रित करावे लागे. काकांच्या कोलॉन क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरणाच्या शिस्तीमुळे नोंदी करण्याचे काम मला कधीच अवघड   वाटले नाही.  मध्ययुगीन युरोपातली माणसे थेट आपल्या जुन्या भारतीयांसारखी होती की- असे कित्येकदा लक्षात यायचे. एका स्कॉटिश मासिकात, मध्ययुगीन इंग्लंडमध्ये बोट जुनी झाली, की तिचा दफनविधी कसा साग्रसंगीत करण्यात यायचा याचे वर्णन होतं. वस्तूंनाही नात्याने बांधणारे मध्ययुगीन 'रिलेशनल कॉसमॉस' या प्रकल्पात असे अनेकदा भेटले. माझे सहकारी मला 'लायब्ररी-मोल' म्हणायचे. मी उन्हाळ्याच्या सुटीत तासनतास त्‍या जुन्या जर्नल्समधून मध्ययुगीन संदर्भ काढून नोंदवण्याचे  काम केले. आधुनिक विज्ञानापूर्वीचे युरोपिअन वास्तव त्यामुळे परिचयाचे झाले. जगावर वसाहतवादी आक्रमण करण्यापूर्वी युरोपीयन अंगीकारलेल्या अंतर्गत -वसाहतवादाचे स्वरूप नजरेसमोर आले. काकांनी लहानपणापासून काळजात पेरलेले 'ग्रंथालय प्रेम' त्या उन्हाळ्यात कामी आले.

     अमेरिकेतल्या प्रशस्त, सर्व सोयींनी युक्त ग्रंथालयात मोकळेपणाने फिरताना मजा येत असे.  दिवसाचे बारा तास या ग्रंथालयात प्रकल्पाचे काम करताना घालवले तरी त्रास होत नसे. सर्व सोयींनी युक्त ग्रंथालये म्हणजे पुस्तकावर प्रेम करणा-या माणसांची पंढरीच होती. तिथे मला त्‍या अपूर्णांकांवर जडलेले प्रेम खरे कामाला आले. अमेरिकेत ओळखपत्र असलेला प्रत्येक नागरिक विद्यापीठाच्या ग्रंथालयाचा लाभ घेऊ शकतो. याउलट, पुण्यात परत आल्यावर मी जयकर ग्रंथालयात जेव्हा सभासद होण्यासाठी गेले तेव्हा, आम्ही 'इंडिपेण्डण्ट स्कॉलर' असे काही  मानत नाही. तुम्ही विद्यार्थी नसाल तर इथे सभासद होता येणार नाही' असंे खास पुणेरी उत्तर मिळाले.

     आता किंडल, फ्लिपकार्ट आणि जेसटोर यांचे आशीर्वाद लाभल्यावर ग्रंथालये रोज हाताशी नसली तरी आयुष्य धकते. पण इंटरनेटने समृध्द या सा-या माहितीची पायाभरणी डॉ. रंगनाथन यांनी केली आहे हे आठवले, की प्रत्येक वेळी ऊर भरून येतो. ९ ऑगस्ट हा डॉ. रंगनाथन यांचा जन्मदिवस. माझे आजोबा हयात नाहीत. ते प्रत्येक ९ ऑगस्टला रंगनाथन-स्मृती समारंभ आयोजित करत असत. मला वाटते, प्रत्येक ग्रंथालयप्रेमीसाठी ९ ऑगस्टचा दिवस हा महत्त्वाचा असायला हवा. वाचणा-या, ग्रंथालयात जाणा-या प्रत्येक माणसावर डॉ. रंगनाथन यांचे केवढं मोठं ऋण आहे!

पाब्लो नेरूदा     रंगनाथन यांच्या वर्गीकरण पध्दतीत साहित्य 'O' या वर्णामध्ये वर्गीकृत केलेले सापडते. आठशे एकवीस पूर्णांक तेवीस (८२1.२३) हा जगभरातल्या कवितासंग्रहांचा नोंदणी क्रमांक होता. मुंबईत म्हाता-या 'एशियाटिक'च्या आचळांना लुचताना तो क्रमांक माझ्या प्रथम परिचयाचा झाला. आठशे एकवीस पूर्णांक तेवीस’च्या पुढ्यात मी दिवसेंदिवस घालवले आहेत.  त्या वयाला शोभेशा पाब्लो नेरूदाच्या कविता पहिल्यांदा भेटल्या. रिल्केचे 'सॉनेटस ऑफ ऑर्फिअस' पण ‘आठशे एकवीस पूर्णांक तेवीस’मध्येच सापडले. पाऊल त्सेलान, येहुदा अमिचाई , शिम्बोरस्का, मांदेलश्ताम,  लॉर्का — लिटिल मॅगेझिनवाल्यांनी मराठीत ज्या ज्या कवींची नावे माझ्या ओळखीची करून दिली होती, त्या प्रत्येक नावाला मी ‘आठशे एकवीस पूर्णांक तेवीस’ या खिंडीत गाठले. अजूनही सवयीने प्रत्येक ग्रंथालयात पाऊल टाकले, की मी पहिल्यांदा 'जागतिक कवितेचा कप्पा' शोधते. तिथे नेहमीची बोदलेअर, रिम्बाँ, त्स्वेतयेवा ही स्टेशने लागतात का? ते तपासून बघते. 'लॅण्डमार्क', 'क्रॉसवर्ड' मध्ये हे वर्गीकरण वापरत नाहीत, त्यामुळे मी वैतागते.

रेइनर रिल्के     माझे आजोबा कृ.मु.उजळंबकर हे डॉ. रंगनाथन यांचे लाडके विद्यार्थी. त्यांनी काळजात पेरलेल्या ग्रंथालयप्रेमाने  जगभरची कविमंडळी मला भेटली हे आठवून मला भरून येतं. 'एशियाटिक'मध्ये आयुष्यातल्या इतक्या उनाड दुपारी काढल्या, की अजूनही डोळे मिटले तरी 'एशियाटिक'चे नोंदणी क्रमांक डोळ्यांसमोर येतात. समाजशास्त्र ३००, मार्क्सवाद ३१३ असे… एकदा अ‍ॅण्ड्रिआ डवॉरकिनचे 'इंटरकोर्स' नावाचे स्त्रीवादी समीक्षेचे पुस्तक जेव्हा इतर इरॉटिक पुस्तकांसमवेत सापडले तेव्हा फुटलेले हसूही आठवते. अशा अपूर्णांकांची प्रेमं आता नामशेष होताना दिसतात. तरीही या इंटरनेटच्या, सर्च इंजिनच्या सांगाड्यांना तेच अपूर्णांक बिलगून बसलेत या कल्पनेने मला तसल्ली मिळते आणि डॉ. रंगनाथन यांच्याविषयी मनात अपार कृतज्ञता दाटून येते.

ज्ञानदा देशपांडे

भ्रमणध्वनी : 9320233467
dnyanada_d@yahoo.com

About Post Author