अन्नातील ग्लुकोज, रोगनियंत्रण आणि रसिका

_Rasika_Vartak_Karandikar_1.jpg

अन्नातून निर्माण झालेले ग्लुकोज माणसाला ऊर्जा देते ही एक गुंतागुंतीची आणि सूक्ष्म शारीरिक प्रक्रिया असते. तिच्या यंत्रणेचा अभ्यास करून त्यापासून रोगनियंत्रण शक्ती शरीरात निर्माण करण्याचे संशोधन जागतिक पातळीवर सुरू आहे. त्या संशोधनात सहभागी आहे, लग्नानंतर ठाण्याची सून झालेली डॉ. रसिका वर्तक-करंदीकर. रसिका सध्या जगातील प्रतिष्ठित असलेल्या स्टॅनफर्ड विद्यापीठ (कॅलिफोर्निया) येथे त्या विषयावरील संशोधन करत आहे. त्‍या सॅन होजे येथे त्‍यांच्‍या पतीसह वास्‍तव्‍यास आहेत.

रसिकाने मुंबई विद्यापीठातून सूक्ष्म जीवशास्त्र विषयात पदवी ग्रहण करून पुणे विद्यापीठातून आरोग्य विषयात उच्च शिक्षण घेतले. त्यावेळी तिला प्राध्यापक सुखात्मे शिष्यवृत्ती मिळाली. तिने अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठातील टेक्सास हेल्थ सेंटर, सॅन अॅन्तिनो येथे पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी २००८ साली प्रवेश घेतला. तेथे रसिकाला विशेष गुणवान विद्यार्थ्याला मिळणारी ‘डेव्हिड कॅरिलो’ शिष्यवृत्ती लाभली होती. तिला ‘बरोज वेलकम’ची विशेष शिष्यवृत्ती २०१२ आणि २०१३ या दोन्ही वर्षीं मिळाली.

मनुष्याने खाल्लेल्या अन्नापासून ग्लुकोज निर्माण होते. ते ग्लुकोज त्याच्या शरीरात ऊर्जा निर्माण करण्यास मदत करते. त्याच्या अन्नात कर्बोदके, प्रथिने आणि पिष्टमय पदार्थ यांचा समावेश असतो. त्या घटकांचे विघटन त्याच्या पेशींमधील विशिष्ट जैविक रसायनामुळे होते. ते विघटन होताना नवीन वाटा निर्माण होतात. त्या वाटा त्याच्या शरीरात असणाऱ्या लक्षावधी पेशींमधील मिटोचोंड्रिया या अतिसूक्ष्म ऑरगॅनेलेसमध्ये शिरकाव करतात. एकपेशीय जीवांमध्ये ते ऊर्जा निर्मिती केंद्र असते. परंतु तेथे ऊर्जा निर्मितीची प्रक्रिया तांत्रिक आहे. त्याला एटीपी जनरेशन म्हणतात. मायटोकॉनड्रियामध्ये शिरकाव करून घेतलेले घटक त्याच्याबरोबर असलेल्या इलेक्ट्रॉन, पाच रेस्पिरेटरी कॉम्प्लेक्समधून जातात. त्यांची १, २’ ३’ ४’ ५’ अशी सरळ गणना केली जाते. त्या कॉम्प्लेक्समधील घटकांमध्ये जर दोष निर्माण झाला तर पेशींमधील ऊर्जा संपून पेशी नाश पावतात. त्याचा परिणाम साहजिक त्या त्या अवयवांवर होतो आणि रोगांना निमंत्रण मिळते.

त्या पुढील गुंतागुंतीची प्रक्रिया म्हणजे कॉम्प्लेक्समधील कॉम्प्लेक्स १ हा सर्वात मोठा घटक आहे. त्याचा आकार इंग्रजी ‘एल’सारखा असतो आणि त्यामध्ये प्रथिनांचे एनडी १ ते एनडी ४५ असे पंचेचाळीस उपघटक असतात. त्या उपघटकांमधील एनडी १, ४, ५ आणि ६ हे साधारणत: दुर्बल अथवा अकार्यशील असतात आणि त्यामुळे कॉम्प्लेक्स १ हे कमजोर होते.

रसिकाचा पीएच.डी.चा संशोधनाचा विषय हा कॉम्प्लेक्स १च्या जडणघडणीचे गूढ उलगडणे हा होता. पंचेचाळीस उपघटकांचा सहभाग असलेल्या कॉम्प्लेक्स १मध्ये एकमेकांशी समन्वय साधण्याची पद्धत निश्चित असणार. ती पद्धत शोधण्यासाठी तिने एनडी १, ४, ५ आणि ६ या उपघटकांवर लक्ष केंद्रित करून त्यांचा अभ्यास केला. तिने अभ्यासातून कॉम्प्लेक्स १मधील उपघटकांची जडणघडण शोधून काढली; त्यांतील दूषित उपघटकामुळे कॉम्प्लेक्स १वर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला. रसिकाच्या त्या संशोधनामुळे तिला प्रतिष्ठित ‘स्टॅनफर्ड विद्यपीठाती’ल ‘आरोग्य संशोधन केंद्रा’त पारकिन्सन आणि अल्झायमर या रोगांवर अभ्यास करण्याची संधी मिळाली आहे. मानवी शरीरातील पेशींच्या नाशाचे कारण हे अनेक रोगांचे मूळ असते. त्या विषयावरील संशोधनामुळे काही घातक रोगांवर उपचार उपलब्ध होण्याची शक्यता तयार होते.

रसिका यांनी लिहिलेला ‘A New Way To Deliver Drugs’ हा लेख वाचण्‍यासाठी क्लिक करा.

सुरेन्द्र दिघे, 9820137576

 

About Post Author