– यश वेलणकर, गजानन पेठे
… झुणकाभाकरी खाऊन वाढलेल्या अण्णांच्या शरीरातील शक्ती व उत्साह तेरा दिवसांच्या उपोषणानंतरही टिकला हे सार्या जगाने पाहिले. अण्णांच्या ऊर्जेचे रहस्य त्यांच्या जीवनशैलीमध्ये दडलेले आहे…
अण्णांच्या शारीरिक ऊर्जेबद्दल यश वेलणकर आणि गजानन पेठे या दोन डॉक्टरांनी केलेली ही मल्लिनाथी…
राळेगणसिद्दीसारख्या छोट्या गावातला एक मराठी माणूस, संपूर्ण भारताचा ‘हिरो’ झाला! झुणकाभाकरी खाऊन वाढलेल्या या माणसाच्या शरीरातील शक्ती व उत्साह तेरा दिवसांच्या उपोषणानंतरही टिकला होता हे सार्या जगाने आश्चर्यचकित होऊन पाहिले.
अण्णा हजारे यांच्या ऊर्जेचे रहस्य त्यांच्या जीवनशैलीमध्ये दडलेले आहे. ते नियमितपणे योगासने करतात, भरपूर चालतात, दिवसभरात एकदाच जेवतात आणि यादवबाबांच्या मंदिरात निवांत झोपतात. भारतीय लष्करात नोकरी करताना ते रम प्यायचे, सिगारेट ओढायचे, पण त्यांना स्वत:च्या आयुष्यातील ध्येयाचा साक्षात्कार झाल्यावर त्या दोन्ही व्यसनांवर विजय मिळवणे सहज शक्य झाले. कारण त्यांनी स्वत:च्या मनावर विजय मिळवला आहे. लौकिक अर्थाने फक्त इयत्ता सहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या अण्णांचे आंतरिक शिक्षण उच्च प्रतीचे आहे. हे आंतरिक शिक्षण स्वत: स्वत:वर केलेल्या संस्कारांतून होत असते. मग ते संस्कार आरोग्याचे असोत वा सामाजिक चारित्र्याचे. सामाजिक चारित्र्याच्या संस्कारांच्या अभावामुळेच आपल्या समाजात भ्रष्टाचाराची कीड पसरत आहे. आध्यात्मिक ज्ञानाचे उगमस्थान म्हणून मिरवणार्या आपल्या देशात आपल्याला प्रत्यक्ष परमेश्वरही भ्रष्टाचारीच आहे असे वाटते! ‘म्हणून मला…. हे मिळू दे मग मी तुला…. हे देईन (अर्पण करेन)’ अशी नवसरूपी लाच आपण साक्षात देवालाही देऊ करतो.
मी कसाही वागेन, सर्व नियम पायदळी तुडवेन, मात्र तरीही मला शिक्षा किंवा त्रास होता कामा नये. मी शिक्षा टाळू शकतो कारण शिक्षा करणाराच भ्रष्ट आहे. त्याला विकत घेता येते. या मनोवृत्तीमधून भ्रष्ट आचार सुरू होतो. चौकातल्या ट्रॅफिक पोलिसापासून ते संसदेतील खासदारापर्यंत सर्वजण ‘मॅनेज’ होऊ शकतात असा विश्वास वाटू लागतो आणि मग घेणार्यालाही त्याची सवय होते. सचोटीने वागणार्याची व नियमानुसार सर्व कागदपत्रे असलेली फाईलसुद्धा ‘वजन’ ठेवल्याशिवाय ‘आदर्श’ होत नाही आणि अशी अडवणूक करणार्याला लगेच शिक्षा झाली असे फार क्वचित वेळा बघायला मिळते.
सर्वसामान्य नागरिक बर्याचदा सज्जनपणाने वागतो, कारण त्याला तसे वागलो नाही तर होणार्या शिक्षेची (किंवा बदनामीची) भीती वाटते. ही भीती नसते तेव्हा त्याच्या सज्जनपणाचा बुरखा गळून पडतो. मग तो सहजपणे भ्रष्टाचार करू लागतो. गर्दीच्या वेळी तिकिट तपासनीस येऊ शकत नाही, म्हणून रेल्वेचे तिकिट न काढता प्रवास करतो. रात्री किंवा ट्रॅफिक हवालदार नसेल तेव्हा सिग्नल तोडून गाडी पुढे नेतो. जनलोकपाल विधेयकातून निर्माण होणारी व्यवस्था ही अशा प्रकारे खालपासून वरपर्यंत होणारा भ्रष्टाचार करताना भीती वाटावी यासाठी केलेला प्रयत्न आहे. अर्थात या कायद्यालाही काही मर्यादा असणारच. मात्र, निसर्गनियमांचा आणि नियतीचा कायदा आहे, तो सर्वोच्च आहे, गुंतागुंतीचा आहे. आणि त्याला कोणत्याही मर्यादा नाहीत. आपण योग्य व्यायाम केला तरच आपल्या हृदयात नवीन रक्तवाहिन्या तयार होतील. आपण शरिरातील सांधे हलवले नाहीत तर ते आखडतील व दुखू लागतील. भीती वाटली की छातीत धडधडणार आणि मनावर ताण असेल तर शांत झोप लागणार नाही. निसर्गाचे हे कायदे व ह्या शिक्षा आहेत. अण्णा त्या कायद्यानुसार वागतात म्हणून या वयातही निरोगी आहेत.
माझ्या मनात आसक्ती किंवा द्वेष नसतो तेव्हा मी आनंदित असतो हा निसर्गनियम आहे, जेव्हा मी तो पाळत नाही तेव्हा मला लगेच त्याची शिक्षा होते. म्हणजे माझे मनस्वास्थ नष्ट होते. मी अधिकाधिक भ्रष्ट व अनैतिक वागू लागतो. यामुळेच भ्रष्टाचार करणार्याला आंतरिक शांती मिळवण्यासाठी बाह्य उपाय शोधावे लागतात. मग वेगवेगळ्या देवस्थानांना देणग्या दिल्या जातात. आध्यात्मिक शांतीचे पॅकेज देणार्या मध्यस्थांकडे (विविध बुवा, बाबा, बापू किंवा माँ) लाखोंनी गर्दी गोळा होऊ लागते. सामान्य माणसांपासून ते सत्ताधार्यांपर्यत सर्वांना या सत्याची जाणीव करून दिल्याने भ्रष्टाचाराचे मूळ कारण दूर होऊ शकते.
डॉ.यश वेलणकर भ्रमणध्वनी : 9422054551, इमेल : yashwel@gmail.com
मरणाची भीती संपली !
अण्णा हजारे यांच्या आंदोलनाने सारा देश पेटून उठला. ते तिहार जेलमधून बाहेर पडल्यावर रामलीला मैदानाकडे जाताना अक्षरश: जनसागर उसळला होता! उपोषणाच्या पाचव्या दिवशी, वाटेत, गांधी स्मारकाकडे जाताना, अण्णांनी जी धाव घेतली ती पाहून सारा देश स्तिमित झाला! त्यांचा उत्साह, चेहर्यावर दिसणारा आनंद, जोश पाहून मनात आले, किरकोळ शरीरयष्टीच्या, सत्तरी पार केलेल्या आणि उपासाच्या पाचव्या दिवशी अण्णांना ही ऊर्जा कशी आणि कोठून मिळाली? त्याचे उत्तर अण्णांनीच देऊन टाकले. लोकांचा प्रचंड उत्साह आणि त्यांच्या आंदोलनाला मिळत असलेली साथ, लोककल्याणासाठी नि:स्वार्थी विचारांनी प्रेरित झालेले अण्णा… ह्या सार्याचा परिणाम म्हणजे त्यांच्या मनातून हद्दपार झालेली मरणाची भीती! ही भीती एकदा नाहीशी झाली की माणूस कसा आनंदी, मनाने तरुण राहतो, तसेच तो शारीरिक दृष्टीनेही कसा सुदृढ राहतो (अण्णांचा रक्तदाब, रक्तातील साखरेची मात्रा दीर्घ उपोषणानंतरही नॉर्मल होती) ह्याचे अण्णा हे मूर्तिमंत उदाहरण आहेत!
ह्या पार्श्वभूमीवर मला आठवते ती, साठी पार केलेली, माझ्या दवाखान्यात येणारी बाई! ती काहीतरी किरकोळ कारणांनी वारंवार माझ्याकडे येत असे. आली की तिच्या चेहर्यावरून तिला काहीतरी असह्य त्रास होतो हे जाणवायचे. एके दिवशी तिची चौकशी केली, तपासले. मी तपासत असताना तिचे तोंड सतत चालू होते. डोळ्यांत अश्रू दाटून येत होते. ती म्हणत होती, ‘डॉक्टर मला ह्या क्षणी आठवतोय तो ‘आनंद’ ह्या सिनेमातील नायक, तो कॅन्सरसारख्या रोगाने पीडित आहे. मरण जवळ येऊन ठेपलेले त्याला माहीत आहे. पण त्या मरणापर्यंतचा प्रत्येक क्षण तो खर्या अर्थाने जगतो, आनंदी राहून! एवढेच नव्हे तर दुसर्यांच्या जीवनात आनंद फुलवण्याचा प्रयत्न करतो. मरण फक्त एका क्षणाचे पण त्या आधीचे असंख्य आनंददायी क्षण प्रत्येकाच्या वाट्याला आलेले असतात. मंगेश पाडगावकर म्हणतात तसे हे क्षण आनंदात घालवायचे की रडतकढत घालवायचे हे आपल्याच हातात नाही का?
डॉ.गजानन पेठे, भ्रमणध्वनी : 9322248001
(‘आरोग्य संस्कार’- सप्टेंबर 2011 मधून)
संबंधित लेख –
देवीदेवतांपासून भ्रष्टाचार
उपवासाला विचारांचे अधिष्ठान!
{jcomments on}
अतिशय सुंदर लेख वअनुकरणिय आहे
अतिशय सुंदर लेख वअनुकरणिय आहे
mind relax
mind relax
Comments are closed.