अटलबिहारी वाजपेयी- स्वयंसेवक, प्रचारक ते पंतप्रधान!

-atal-bihari

‘अटलजी-कविहृदयाच्या राष्ट्रनेत्याची चरितकहाणी’ हे पाचशेतीस पानांचे पुस्तक पत्रकार सारंग दर्शने यांनी लिहिलेले आहे. अटलजी चौऱ्याण्णव्या वर्षांचे असून भीष्मासारखे शरपंजरी पडलेले आहेत; तरीही त्यांची लोकप्रियता टिकून आहे. सारंग दर्शने हे संघाचे स्वयंसेवक आणि पुण्याच्या ‘ज्ञान प्रबोधिनी’चे विद्यार्थी. स्वाभाविकच, त्यांना अटलजींविषयी जिव्हाळा आहे. तो पुस्तकातून प्रकट होतोच, पण त्याखेरीज लेखकाचे जे चिंतन ‘अटलवादाची अक्षय देणगी’ या पुस्तकातील शेवटच्या प्रकरणात आहे, तेही मार्मिक आणि लेखकाची राजकीय समजूत दाखवणारे आहे. अटलबिहारी वाजपेयी यांचे हे राजकीय चरित्र आहे. त्यांचे बालपण आणि कॉलेजशिक्षण एवढाच खाजगी चरित्रात्मक भाग पहिल्या एक-दोन प्रकरणांत येतो. अटलजी संघाचे प्रचारक 1947 साली, फाळणीनंतर झाले. त्याबरोबर त्यांचे खाजगी जीवन संपून त्यांची सामाजिक व राजकीय कारकीर्द सुरू झाली. लेखकाने त्यामागील राजकीय पार्श्वभूमी विस्ताराने विवेचन केली आहे. त्यांनी त्या वेळची अटलजींची भूमिका व विचार मांडत चरितकहाणी रंगतदार केली आहे. अटलजींच्या जीवनपटाला संघाचा निष्ठावान स्वयंसेवक, प्रचारक ते पंतप्रधान असा भव्य कॅनव्हास आहे. लेखकाने ललित शैलीत ही चरितकहाणी मांडलेली आहे. त्यामुळे पाचशे पानांहून अधिक असे हे पुस्तक वाचताना वाचकाला कंटाळा येत नाही. लेखकाची शैली कौतुकास्पद आहे, पारदर्शी आहे.

अटलजी कवी आहेत. प्रत्येक प्रकरणाच्या आरंभी त्यांची एकेक कविता दिलेली आहे. अटलजींच्या काव्यपंक्ती राजकारणाचे रंग जसे बदलतील तशा बदलत जातात आणि राजनीती हा त्यांच्या काव्याचा प्राण आहे हे वाचकाच्या मनावर ठसत जाते.

अटलजींचे बालपण बटेश्वर या, उत्तर प्रदेशातील आग्र्याजवळच्या खेड्यात, आजोबा श्यामलाल यांच्यासोबत गेले. बटेश्वर हे मराठ्यांचे उत्तरेकडील ठाणे होते हे वाचून वाचक  चकित होईल. श्यामलाल गावात पंडित म्हणून परिचित होते. ते गावात रामायण, महाभारत, वेद, पुराणे, गीता, भागवत, रामचरितमानस या विषयांवर प्रवचने देत असत आणि कविताही करत. तो वारसा अटलजींचे पिताजी कृष्णबिहारी यांना मिळाला. त्यांनी लिहिलेली प्रार्थना ग्वाल्हेरमधील शाळांत म्हटली जायची. अटलजींनी त्यांच्या कवितेचा उगम लिहिताना म्हटले आहे. ‘कविता मुझे विरासत में मिली’. अटलजी बटेश्वरला सात-आठ वर्षांपर्यंत होते. त्यांची त्या बालवयातील रूढीविरूद्ध जाणारी एक आठवण आहे (ती या चरितकहाणीत नाही). अटल संध्याकाळी मित्रांबरोबर खेळून घरी परतत असताना रस्त्यात पाच-सहा महिला येत होत्या. त्यांत त्यांची भाभी होती. ती घूँघट न घेता मैत्रिणींबरोबर हास्यविनोद करत चालली होती. तिने तिच्या चेहऱ्यावरील घूँघट छोट्या देवरला दुरून पाहताच झटकन खाली ओढला. ते अटलजींच्या नजरेतून सुटले नाही. अटलजी धावत भाभीजवळ गेले आणि तिचा हात पकडून म्हणाले, ‘भाभी सबके सामने घूँघट नही, फिर मेरे सामने क्यों? अटलजींचे ते वय रूढी समजण्याचे नव्हते, पण मानवी व्यवहार त्यांच्या बालमनाला खटकला होता. वडील कृष्णबिहारी ग्वाल्हेरला शिक्षकाची नोकरी करण्यासाठी गेले. तेथे ते शाळेचे मुख्याध्यापकही झाले. अटलजीही हायस्कूलसाठी बटेश्वरहून ग्वाल्हेरला आले आणि ‘आर्य समाजा’च्या ‘आर्यकुमार सभे’त दाखल झाले. संघप्रचारक नारायणराव तरटे त्यांना संघाच्या शाखेत घेऊन गेले. देशभक्तीची प्रखर ज्योत तेथील संस्कारांमुळे त्यांच्यात निर्माण झाली! गांधीजींनी 1942 चे ‘चलेजाव आंदोलन’ छेडले. त्यावेळेस अटलजी मॅट्रिकला होते. अटलजी स्वातंत्र्याच्या प्रयत्नांना गुपचूप साहाय्य करतात हे वडिलांच्या कानावर आले. वडिलांनी अटलजी आणि त्यांचा मोठा भाऊ प्रेमबिहारी यांना त्यांच्या गावी, बटेश्वरला पाठवून दिले, तर तेथे लीलाधर वाजपेयी यांनी साऱ्या गावालाच तेथील जंगलात सत्याग्रह करण्यास नेले.

अटलजी त्यावेळी तेवीस दिवस कारागृहात होते. इंग्रजी अधिकाऱ्याने अठरा वर्षें पूर्ण न झालेल्या सर्वांना नंतर सोडून दिले, पण त्यांच्याकडून त्यांना सोडण्यापूर्वी उर्दूतून लिहिलेल्या एका पत्रावर सही घेतली गेली. कोणालाच उर्दूत काय लिहिले आहे हे वाचता येत नव्हते. पण ती सही पुढे अटलजींना बाधली. जयप्रकाश यांनी इंदिरा गांधी यांच्याविरूद्ध आंदोलनाला 1974 साली सुरूवात केली तेव्हा ग्वाल्हेरच्या काँग्रेसवाल्यांनी ते पत्र हुडकून काढले, ‘ब्लिट्झ’ साप्ताहिकात प्रसिद्ध केले आणि अटलजींनी माफीनामा लिहून सुटका करून घेतली असा अपप्रचार सुरू केला. ते माफीपत्र नव्हतेच, पण अटलजींना त्याचा मनस्ताप मात्र झाला.

-rss-ataljiअटलजी ग्वाल्हेरला आले, मॅट्रिक उत्तीर्ण होऊन व्हिक्टोरिया कॉलेजमधे गेले. त्या काळातील घटनांसंदर्भात आणखी एक आरोप त्यांच्यावर नंतर झाला. त्या काळात ‘स्टुडण्ट फेडरेशन ऑफ इंडिया’ ही कम्युनिस्ट पार्टीची एकमेव संघटना कॉलेजमध्ये होती. अटलजींचा संबंध तिच्याशी थोडा फार आला होता. त्यावरून ते कम्युनिस्ट असल्याचा आरोप पुढे त्यांच्यावर झाला. तसा आरोप होण्यामागे जसे राजकीय कारण आहे, त्याचप्रमाणे तत्कालीन परिस्थिती हेही सामाजिक कारण आहे. जयप्रकाशजी यांच्या आंदोलनात जनसंघ उतरेपर्यंत जनसंघावर जातीयतेचा आरोप सातत्याने होत असे. जातीयवादी पक्षात जातपात न मानणारा, लोकशाही मानणारा उदारमतवादी नेता कसा? असा प्रश्न पुरोगाम्यांना पडत असे. तेव्हा तो कम्युनिस्ट (म्हणजे पुरोगामी असे मानणारे काही लोक आहेत) असला पाहिजे. त्यातूनही तो आरोप केला गेला. त्याचे मूळ पंडित नेहरू यांच्या वक्तव्यात आहे. पंडितजींनी लोकसभेत जनसंघावर मॉटली क्राऊड ऑफ मॉटली थॉट्स (शुद्र विचारांचा शुद्र पक्ष) असा घणाघाती आरोप केला होता. अटलजींनी त्यांच्या भाषणात त्याचा समाचार लोकसभेत घेतला. अटलजी खासदारकीसाठी दुसऱ्यांदा बलारामपूरला उभे राहिले तेव्हा स्वत: पंडित नेहरू तेथे काँग्रेस उमेदवार सुभद्रा जोशी यांच्या प्रचारासाठी गेले आणि म्हणाले, ‘जनसंघात कांही चांगली माणसे आहेत. पण एकूणच तो पक्ष लोकशाही विरोधी आणि जातीयवादी आहे.’ पुरोगामी आणि प्रतिगामी हा वैचारिक संघर्ष जनसंघाच्या प्रगतीत खूप तापदायक ठरला आहे. अटलजींना व्यक्तिश: पुरोगामी ठरवण्यासाठी ते कम्युनिस्ट असल्याचा आरोप करण्यात आला. राजनीती वारांगनेसारखी असते हेच खरे!

अटलजींना त्यांच्या राजकीय आयुष्यात अशा कितीतरी वैचारिक लढाया झेलाव्या लागल्या. त्यांची स्वपक्षीयांशी शेवटची लढाई वैचारिक होती- ‘गांधीवादी समाजवाद’.

अटलजी राज्यशास्त्र घेऊन एम.ए. होण्यासाठी ग्वाल्हेरहून कानपूरला गेले. ते एमएची परीक्षा पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. तेथून ते पीएचडी करण्यासाठी लखनौला गेले. पण त्यांची जवळीक त्या काळात दीनदयाळ उपाध्याय यांच्याशी वाढली. गुरूजींनी संघाने वर्तमानपत्र काढावे असे सांगताच उपाध्याय यांनी ‘राष्ट्रधर्म’ हे मासिक काढले. संपादक-अटलजी. पहिला अंक प्रकाशित झाला, 31 ऑगस्ट 1947 ला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंधरा दिवसांनी नेहरूंनी त्या काळात लाल किल्ल्यावर 14 ऑगस्टला स्वातंत्र्याची घोषणा करताना ‘नियतीशी करार’ हे प्रसिद्ध भाषण केले. ते अटलजींनी ऐकले नव्हते असे लेखकाने म्हटले आहे. ते चूक आहे. अटलजींनी लिहिले आहे – ‘14 ऑगस्टचे भाषण रेडिओवर ऐकले तेव्हा मला हे ठाऊक नव्हते, की मला पंडितजींना विरोध करण्याची कामगिरी लोकसभेत दहा वर्षांनी करावी लागेल!’

‘राष्ट्रधर्म’नंतर ‘पांचजन्य’ साप्ताहिक निघाले. संपादक -अटलजी आणि थोड्याच दिवसांत ‘दैनिक वीरार्जुन’ सुरू झाले. तेव्हाही संपादक -अटलजी. ते 1950 साल होते. अटलजी फक्त पंचवीस वर्षांचे होते. ते एका दैनिकाचे संपादक झाले याचा वडील कृष्णबिहारींना अभिमान वाटला. पण ‘वीरार्जुन’ लौकरच बंद झाले. अटलजींची संपादकीय कारकीर्द संपली.

अटलजी संघाचे पूर्ण वेळ प्रचारक होते. त्यांनी प्रचारकाचे काम पुन्हा आरंभले.

त्याच काळात श्यामाप्रसाद मुखर्जीं यांचे नेहरूंशी मतभेद होऊन त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. ते अध्यक्ष हिंदुमहासभेचे होते, पण त्यांचे तेथेही मतभेद होऊन त्यांनी ‘पीपल्स पार्टी’ हा नवा पक्ष सुरू केला. त्यांनी गोळवलकर गुरूजींना भेटून संघाने नव्या पक्षात यावे असा आग्रह धरला. गुरूजींनी तो साफ नाकारला. संघाला राजनीती नको, पण गुरूजींनी स्वातंत्र्यानंतर राष्ट्र उभारणीचे काम तितकेच महत्त्वाचे आहे हे लक्षात घेऊन त्यांचे पाच प्रचारक डॉ. मुखर्जी यांच्या स्वाधीन केले. ते पाच प्रचारक म्हणजे दीनदयाळ उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी, बलराज मधोक, जगन्नाथराव जोशी आणि नानाजी देशमुख. गुरूजींची ती निवड इतकी अचूक ठरली की ते पाचही जण जनसंघात अखिल भारतीय नेते झाले. दीनदयाळ संघटनेचे काम पाहू लागले. मधोक पक्षाची घटना लिहू लागले आणि अटलजींना डॉ. मुखर्जीं यांनी वैयक्तिक कार्यवाह म्हणून निवडले. अटलजींचा राजकारणातील प्रवेश दीनदयाळ आणि मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला. जनसंघाची स्थापना 1951 साली झाली. मुखर्जी 1952 च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत बंगालमधून खासदार म्हणून निवडून आले. नंतर निर्मलचंद्र चटर्जी जनसंघात आले आणि जनसंघाचे खासदार तीन झाले. जनसंघाला तीन टक्के मते मिळाली.

-atalji-golvalkarguruji-अटलजींना संसदीय कामाचा अनुभव मुखर्जी यांच्यामुळे मिळाला. मुखर्जी सार्वजनिक सभांना जात तेव्हा अटलजींना बरोबर नेत आणि वक्ता म्हणून बोलायला लावत. त्यातून अटलजींना जनमानसाची नाडी गवसू लागली.

वाजपेयी यांनी पहिला राजकीय धडा मुखर्जी यांच्याकडून घेतला. तो म्हणजे मुखर्जीं यांनी लोकसभेत राष्ट्रीय लोकशाही आघाडी बनवली. त्यात अन्य पक्षांचे खासदार येऊन तीस खासदारांचा गट बनला. अटलजी काँग्रेसला एकट्याने हटवणे कठीण आहे तेव्हा अन्य पक्षांशी मैत्री करायला हवी हा धडा शिकले. त्यांनी तोच पुढे उपयोगात आणला. अटलजींचे वक्तृत्व जबरदस्त आहे, लोकमानसावर मोहिनी घालणारे आहे. मुखर्जीं यांनी ते ओळखले. म्हणून ते काश्मीरमध्ये प्रवेश करताना मागे वळून अटलजींना म्हणाले, ‘वाजपेयी, तुम्ही देशातील जनतेला ओरडून सांगा, की मी काश्मीरमध्ये विनापरवाना प्रवेश केला आहे!’ तो उल्लेख पुस्तकात नाही. तो असायला हवा होता. तसेच, अटलजी यांनी लोकसभेमध्ये पहिले भाषण 1957 साली केले, त्यांत पहिला उल्लेख मुखर्जीं यांच्या अकस्मात संशयास्पद मृत्यूचा होता. अटलजी म्हणाले, ‘मृत्यूची जखम भरून आली असली, तरी वेदना कायम आहे.’ तोही उल्लेख पुस्तकात यायला हवा होता. कारण अटलजींच्या राजकीय भूमिकेत मुखर्जीं यांच्या व्यक्तिमत्त्वाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

मुखर्जी यांचा मृत्यू 1953 साली श्रीनगरच्या इस्पितळात झाला. वाजपेयी तर हळहळलेच; पण नवजात जनसंघाचा संस्थापक व शीर्षस्थ नेता अस्तंगत झाल्यामुळे पक्षाची खूपच हानी झाली. कारण मुखर्जीं यांचे स्थान घेऊ शकेल असा राष्ट्रीय नेताच जनसंघाकडे तेव्हा नव्हता. पक्षाचे शीर तुटले होते पण धड कायम होते. त्यात प्राण फुंकण्याची जबाबदारी कोण घेणार? ते अवघड आव्हान कोण स्वीकारणार? असा जनसंघाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. संघटनेचा प्राणवायू असलेले दीनदयाळही क्षणभर गडबडून गेले. लेखकाने त्याचा उल्लेख पृष्ठ सदुसष्टवर केला आहे, पण तो काहीसा मिळमिळीत वाटतो. ते आव्हान दीनदयाळ यांनी स्वीकारले हे लेखकाचे विधान काहीसे दिशाभूल करणारे आहे. कारण स्वत: दीनदयाळ यांनी ते आव्हान स्वीकारले नाही तर ते आव्हान कोण स्वीकारू शकेल याचा शोध घेणे आरंभले. दीनदयाळ यांनी त्याबाबत गुरूजींचाही सल्ला घेतला असावा. त्याला पुरावा नाही, पण गुरूजींची दूरदृष्टी, माणसांची अचूक पारख हे गुण लक्षात घेता, त्यांनीच दीनदयाळ यांना अटलजींचे नाव सुचवले असावे. गुरूजींनी अटलजींचे अमोघ वक्तृत्व, हिंदी भाषेवरील प्रभुत्व, त्यांची वैखरी वाणी, संघाला अपेक्षित असलेला राष्ट्रवादाचा हुंकार आणि चिंतनशीलता हा गुणसमुच्चय हेरला होता. दीनदयाळ यांनीही तो टिपला. पण अटलजी अवघे एकोणतीस वर्षांचे होते. त्यामुळे दीनदयाळ यांची चलबिचल होत होती. गुरूजींनी अटलजींचे नाव सुचवल्यावर दीनदयाळ यांना धीर आला. ते संधीची वाट पाहत राहिले. संघटना बांधण्याचे दीनदयाळ यांचे कार्य सुरू होतेच.

ती संधी 1956 साली आली. नेहरू यांनी विजयालक्ष्मी पंडित यांना रशियात राजदूत म्हणून पाठवले. त्या लखनौ लोकसभा मतदारसंघातून खासदार होत्या. त्यामुळे लखनौची पोटनिवडणूक जाहीर झाली. दीनदयाळ यांनी अटलजींना लखनौला बोलावून घेतले, पोटनिवडणूक लढवण्यास सांगितले. अटलजी चकितच झाले. कारण तोपर्यंत अटलजींनी नगरपालिकेची निवडणूकही लढवलेली नव्हती. दीनदयाळ यांच्या आज्ञेला एकच रूपेरी किनार होती. ती म्हणजे ग्वाल्हेर ही अटलजींची बालपणची कार्यभूमी तर लखनौ ही अटलजींची तारूण्यातील कर्मभूमी होती. अटलजींनी उमेदवारीचा फॉर्म भरला, तेव्हा दीनदयाळ यांनी त्यांना सांगितले नव्हते, की मुखर्जीं यांनी खाली ठेवलेले शिवधनुष्य त्यांनाच उचलायचे आहे! अटलजी पक्षाचे विचार सर्वसामान्य माणसापर्यंत पोचवण्याची ही संधी आहे एवढेच अटलजी जाणून होते. त्यांनी दीडशे सभा लखनौ मतदारसंघात घेतल्या, मतदारसंघ ढवळून काढला. समोर पंडितजींच्या चुलत भावाची पत्नी उभी होती. त्यामुळे विजयाची आशा नव्हतीच. अटलजींच्या अमोघ वक्तृत्वाने लखनौचे मतदार चकित झाले. तरीही विजयश्रीने अटलजी यांना माळ घातली नाही. त्यांना अवघी अठ्ठावीस टक्के मते मिळून अनामत रक्कम जप्त झाली. विजयश्री दूर हसत उभी होती!

अटलजींचे नाव त्या निवडणुकीने देशभर पोचले. त्यांना सभा घेण्याची बोलावणी ठिकठिकाणांहून येऊ लागली. तोपर्यंत अटलजींचे वकृत्व फक्त संघाच्या स्वयंसेवकाना ठाऊक होते. त्या पोटनिवडणुकीने ते संघ वर्तुळाबाहेरील सर्वसामान्य माणसांना माहीत झाले. दीनदयाळ खूष होते. अटलजींचे वक्तृत्व हाच संघाच्या प्रचाराचा हुकमी एक्का बनला. अटलजींच्या वक्तृत्वाच्या फैरी पुढील दहा वर्षांत देशातील महानगरांत लाखा लाखांच्या सभेत झडू लागल्या. त्यावेळची एक घटना मुद्दाम नमूद करायला हवी. पुस्तकात ती नाही.

अटलजी जाहीर सभेसाठी इंदूरला आगगाडीने पोचले. त्यांना त्याच गाडीत गोळवलकर गुरूजी आहेत हे ठाऊक नव्हते. अटलजींचे स्वागत करण्यास शेकडो कार्यकर्ते स्टेशनवर उपस्थित होते आणि रस्त्यात बघ्ये लोकांची गर्दीही खूप होती. त्यामुळे कोठे कोठे ट्रॅफिक जाम झाला. दोघेही एकाच घरी उतरणार होते. पण अटलजी आधी पोचले. गुरूजी नंतर, तासाभराने पोचले. घरच्या गृहिणीला नवल वाटले. तिने गुरूजींना उशीर का झाला म्हणून विचारले. गुरूजी म्हणाले, ‘राजकीय नेत्याला पाहण्यास गर्दी इतकी झाली, की त्यातून माझ्या मोटारीला अडथळा निर्माण झाला. म्हणून उशीर झाला.’ अटलजी समोरच बसलेले होते. गुरूजींनी विनोदाने तसे म्हणताच अटलजी उठले. त्यांनी खांद्यावरील दुपट्टा गुरूजींच्या पायावर ठेवला आणि म्हणाले, ‘तुम्ही सांगितलेत म्हणून मी राजकारणात गेलो. तुम्हाला नको असेल तर आज्ञा द्या. मी परत संघात येईन.’ तो प्रसंग हास्यविनोदात संपला. गुरूजी मनोमन अटलजींची अतूट संघनिष्ठा पाहून सुखावले.

लोकसभेची दुसरी सार्वत्रिक निवडणूक 1957 साली आली. त्या काळात जनसंघाला उमेदवार मिळणेही शक्य नव्हते. दीनदयाळ यांनी अटलजींना लखनौ, मथुरा आणि बलरामपूर या तीन ठिकाणी उभे केले. अटलजी यांनी पक्षाचे विचार लोकांपर्यंत पोचवण्याची ती संधी म्हणून उमेदवारी अर्ज भरले. ते बलरामपूर मतदारसंघातून विजयी झाले. तेथे त्यांच्या समोर लखनौचे वकील हैदर हुसेन होते. बलरामपूर हे छोटे संस्थान. ते 1948 साली विलीन झाले. पण त्या ठिकाणी जमीनदार मुस्लिम होते. त्यांची दहशत इतकी होती, की पूजेनंतर हिंदूंना शंख वाजवण्याचीही बंदी असे. बलरामपूरमध्ये पक्षाचे काम चांगले होते. अटलजी जीवाला जीव देणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बळावर जिंकले. त्यांचा लोकसभेत प्रवेश झाला. सारंग दर्शने यांनी त्या प्रसंगाचे विस्तृत वर्णन केले आहे, ते उत्तमच आहे.

-rssजनसंघाचे चार खासदार लोकसभेत 1957 साली निवडून आले. त्यात दोन महाराष्ट्रातून- उत्तमराव पाटील आणि प्रेमजीभाई आशर. अटलजी तेव्हा तेहतीस वर्षांचे होते. इतर तिन्ही खासदार त्यांच्यापेक्षा वयाने मोठे होते. तरीही दीनदयाळ यांनी नेतेपदी अटलजींची निवड केली. तेव्हा कोठे मुखर्जीं यांनी खाली ठेवलेले शिवधनुष्य अटलजींनी उचलावे ही दीनदयाळ यांची मनापासून इच्छा आहे हे अटलजींच्या ध्यानी आले. त्यानंतर 2000 पर्यंत अटलजी म्हणजे पक्ष आणि पक्ष म्हणजे अटलजी हे समीकरण जनतेच्या, कार्यकर्त्यांच्या आणि विरोधकांच्या मनातही घट्ट जाऊन बसले. लेखकाने लोकसभेतील अटलजींचे कार्य अचूक मांडले आहे, नेहरू अटलजींच्या प्रेमात पडले असे म्हटले आहे. लेखकाने नेहरू अटलजींच्या प्रेमात का पडले याचे विश्लेषण मात्र केलेले नाही. त्याचे असे झाले, की रशियात ‘बेरीया प्रकरण’ झाले. त्यावर नेहरूंनी त्यांची जाहीर प्रतिक्रिया दिली. तेव्हा अटलजींनी परराष्ट्र खात्यावरील चर्चेत लोकसभेत बोलताना नेहरूंच्या परराष्ट्र धोरणाचे मनापासून स्वागत केले. मात्र त्यांनी ‘बेरीया प्रकरणा’तील नेहरूंच्या प्रतिक्रियेवर टीका केली. अटलजी म्हणाले ‘‘बेरीया का मामला रूस का अंदरूनी मामला है । इसपर हमे बोलना नही चाहीये. बोलने के लिये वाणी की जरूरत होती है | लेकीन चूप रहने के लिये वाणी और विवेक, दोनो की जरूरत है।’’ अटलजींचे ते विचार नेहरूंना पटले. अटलजींनी विरोधासाठी विरोध करणे टाळले. नेहरूंनी लोकशाहीची प्रक्रिया रूजवण्यात अटलजींचे योगदान ओळखले. त्यानंतर त्यांनी परराष्ट्र खात्याला एक सूचना देऊन ठेवली होती, की भारतीय शिष्टमंडळ जेव्हा केव्हा परदेशात जाईल तेव्हा खासदारांच्या चमूमध्ये अटलजी असले पाहिजेत. अटलजींनी खासदारांच्या शिष्टमंडळातून अनेक परदेशदौरे केले. तेव्हाच्या कम्युनिस्ट पोलंडपर्यंत. तो उल्लेख पुस्तकात राहून गेला आहे. अटलजींना त्या दौऱ्यांतून जागतिक राजकारणाचे अचूक भान आले. लेखकाने अटलजींची 1957 ते 1962 ही लोकसभेतील पाच वर्षें विस्ताराने चितारली आहेत. त्याने चिनी आक्रमणाचे संकट, हिंदी भाषेचा आग्रह अशा महत्त्वाच्या विषयांची सखोल व साक्षेपी चर्चा केली आहे. अटलजींच्या प्रचारामुळे जनसंघाला 1957 च्या निवडणुकांत सहा टक्क्यांहून अधिक मते आणि राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळाली.

नेहरू यांनी बलरामपूरमधून लोकसभेच्या तिसऱ्या निवडणुकीत सुभद्रा जोशी यांना अटलजींच्या विरूद्ध उभे केले. तेथे नेहरुंनी जातीचा आधार घेतला. अटलजी उत्तर प्रदेशातील ब्राह्मण. तो काळ असा होता, की उत्तर प्रदेशात ब्राह्मणांबद्दल सर्वसामान्य माणसाला आदर वाटे. म्हणून नेहरूंनी ब्राह्मण सुभद्रा जोशी यांना उभे केले. सुभद्रा जोशी यांनी त्यांच्या प्रचारात अटलजी हे अस्सल ब्राह्मण नाहीत असा प्रचारही केला. जनसंघाला जातीयवादी असे हिणवणाऱ्या पंडितजींना अटलजींचा पराभव करण्यासाठी जातीचा आश्रय घ्यावा लागला हे आश्चर्य नव्हे का? अटलजींनी सुभद्रा जोशी यांच्या प्रचाराला उत्तर देताना ‘मैं क्या कच्चा ब्राम्हण हूँ?’ असा प्रतिप्रश्न केला, पण त्यापलीकडे त्यांनी कधीही ब्राह्मण म्हणून प्रचार केला नाही. वाजपेयी दोन हजार मतांनी हरले. त्यांना पराजयाचे दु:ख झाले नाही, पण नेहरुंनी जातीयवादाचा आश्रय घ्यावा आणि जनसंघावर जातीयवादाचा आरोप करत सुटावे, याचे मात्र तीव्र दु:ख झाले. दीनदयाळ यांनी अटलजींना लौकरच उत्तरप्रदेश विधानसभेतून राज्यसभेवर पाठवले. पुन्हा अटलजी जनसंघाचे गटनेते झाले. अटलजी 1962 ते 1967 राज्यसभेत होते. त्यांनी नेहरू, शास्त्री व इंदिरा गांधी अशा तीन पंतप्रधानांना टीकेचे लक्ष्य केले आहे.

शास्त्रीजींनी मॉस्कोच्या दबावामुळे ‘कच्छ करार’ केला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. अटलजींनी ‘कच्छ करार’विरोधी मोर्चा कच्छमध्ये काढला, त्याला जॉर्ज फर्नांडिस यांनी साथ दिली होती हा उल्लेख पुस्तकात राहून गेला आहे.

इंदिराजी मोरारजीभार्इंचा पराभव करून पंतप्रधान झाल्या, तो काळ संक्रमणाचा होता. नेहरुंची दिलदार वृत्ती इंदिराजींकडे नव्हती. पण त्यांना केवळ नेहरूकन्या म्हणूनच त्यावेळी पंतप्रधानपद मिळाले. ती घराणेशाहीची वाटचाल आहे हे अटलजींनी तत्काळ ओळखले. विरोधक एकत्र लढल्याशिवाय काँग्रेस पराभूत होऊ शकत नाही हे मुखर्जीं यांनी दिलेले सूत्र अटलजींना अवगत होतेच. अटलजींनी संसदेतील विरोधकांत सहकार्याची भावना वाढीस लावण्यास सुरूवात केली.

दिल्लीत गोहत्या बंदीसाठी निघालेला साधूंचा मोर्चा हिंसक झाला. अटलजींना ते मान्य नव्हते. ‘पेट्रियट’ आणि ‘लिंक’ या साम्यवादी पत्रांनी धडाधड खोट्या बातम्या छापल्या. त्यानंतर 1967 च्या निवडणुकांची तयारी सुरू झाली. लोहिया आणि दीनदयाळ या जोडीने विरोधकांच्या एकीचा प्रयत्न केला. काँग्रेस विरूद्ध एक उमेदवार उभा करायचा हा कार्यक्रम राबवण्यात काही प्रमाणात यश आले. इंदिराजींची पक्षावर पकड बसलेली नव्हती, त्याचाही फायदा विरोधकांच्या एकजुटीला झाला. अटलजी बलरामपूरचा मागील पराभव धुऊन काढण्यासाठी बलरामपूरहून उभे राहिले. विरोधात सुभद्रा जोशी होत्याच. एका प्रचारसभेस इंदिराजींनी हजेरी लावली. अटलजींचे वक्तृत्व मुसलमान मतदारांनाही लुभावत होते. शिवाय स्वतंत्र पक्षाने मुस्लिम उमेदवार दिला आणि काँग्रेसची एकगठ्ठा मुस्लिम मतांची आशा मावळली. अटलजींनी सुभद्रा जोशी यांचा पराभव बत्तीस हजार मतांनी करून मैदान मारले. अटलजींकडे पस्तीस खासदारांच्या गटाचे विरोधी पक्षनेतेपद आले.

‘संयुक्त विधायक दला’ची कल्पना लोहिया-दीनदयाळ यांनी नीट राबवून हिंदी प्रांतात जनसंघ सत्तेवर आला. काँग्रेसविरोधी सरकारे साऱ्या उत्तर भारतात बंगाल ते पंजाबपर्यंत स्थापन झाली. काँग्रेसमधून फुटलेले महामाया प्रसाद सिन्हा बिहारमधे मुख्यमंत्री झाले. त्यांना कम्युनिस्ट आणि जनसंघ यांनी पाठिंबा दिला. मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली तेव्हा अटलजी पाटण्यात होते. कम्युनिस्ट असलेल्या मंत्रिमंडळात जनसंघाचे मंत्री झाले. जनसंघाचे नेतृत्व काळाबरोबर बदलू शकते हे कम्युनिस्टांनी लगेच ओळखले. कॉ. डांगे यांनी इंदिराजींचे सरकार सहा महिन्यांत कोसळेल अशी घोषणा संविद (संयुक्त विधायक दल) सरकारांच्या स्थापनेनंतर शिवाजी पार्कवर झालेल्या सभेत केली. काँग्रेस विरोधाची हवा अशी देशभर तापत होती.

त्या पार्श्वभूमीवर केरळमध्ये जनसंघाचे अधिवेशन भरले. उत्तरेतील समजला जाणारा तो पक्ष दक्षिणेत पाय पसरण्यास उत्सुक होता. अध्यक्षपद दीनदयाळ यांच्याकडे आले, परंतु दीनदयाळ यांची हत्या झाल्याच्या 11 फेब्रुवारी 1968 रोजीच्या बातमीने सारा जनसंघच हादरला. दीनदयाळ तेव्हा अटलजींच्या घरी राहत होते. त्यांचा मृतदेह तेथे आणण्यात आला. हजारो कार्यकर्ते जमले. दीनदयाळ यांना अग्नी दिल्यानंतर, जनसंघाच्या कार्यकारिणीची बैठक दिल्लीत झाली. अटलजींनी अध्यक्षपद स्वीकारले. लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद आणि पक्षाचे अध्यक्षपद या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळताना आणि दौरे करताना अटलजींची ओढाताण होई. पक्षाचे पंधरावे वार्षिक अधिवेशन 1969 साली मुंबईत भरले. अटलजी अध्यक्ष असल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह अमाप होता. अटलजींची शोभायात्रा कफ परेड ते चौपाटीपर्यंत पोचण्यास पाच तास लागले! अटलजींनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणांतून जनसंघाचे लक्ष राष्ट्रवादाबरोबरच आर्थिक विषयाकडे वळवले.

अधिवेशनांत एक विनोद घडला. आचार्य अत्रे यांचा सत्कार अटलजींच्या हस्ते झाला. तेव्हा त्यांची ओळख करून देताना अटलजी म्हणाले, ‘अत्रेजी की टीकाटिप्पणी इतनी तेज होती है की कभी कभी उनके विरोधक हत्यार छोडके मैदानसे भागते है।’ आचार्य अत्रे मराठीतून बोलले. त्यांनी अटलजींचे तरुण नेता म्हणून कौतुक केले. महाराष्ट्र सरकारने शासकीय लॉटरी त्याच वेळी सुरू केली होती. त्याच्यावर टीका करताना अत्रे म्हणाले, ‘लॉटरी सुरू करणारे हे काँग्रेस सरकार अजब आहे. उद्या हे लोक सरकार भाड्याने चालवण्यास कोणाला तरी देतील!’ अटलजींना मराठी समजत होते, पण त्यांना अत्रे यांच्या भाषणातील भाड्याने म्हणजे रेंटवर हा अर्थ समजला नाही. हिंदीत ‘भाड्या’ ही शिवी आहे. ते वाक्य ऐकताच अटलजी मराठीत म्हणाले, ‘जाऊ द्या ना अत्रेसाहेब…’ आणि अत्रे यांचे भाषण अटलजींनी तेथेच थांबवले.

अटलजींची ती अध्यक्षीय कारकीर्द अनेक बाह्य कारणांनी गाजली. इंदिराजींनी गिरी यांना राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून उभे करून काँग्रेस पक्षाच्या संजीव रेड्डी या उमेदवाराचा पराभव केला आणि संघटनेवर ताबा मिळवला. काँग्रेस फुटली. कामराज, एस.निजलिंगप्पा, मोरारजी देसाई, स.का. पाटील, अतुल्य घोष हे बुजूर्ग नेते संघटना काँग्रेसमध्ये आणि इतर सारे इंदिरा काँग्रेसमध्ये आले. इंदिराजींनी बँकांचे राष्ट्रीयीकरण आणि संस्थानिकांचे तनखे रद्द करून काँग्रेस पक्षफुटीला तात्त्विक मुलामा दिला. अटलजींना ते विषय पुढील जाहीर सभांतून टीका करण्यास आयतेच सापडले. मात्र काँग्रेस घराणेशाहीकडे जात आहे हे अटलजींनी त्या फुटीमुळे ताडले.

इंदिराजींनी लोकसभा 28 डिसेंबर 1970 रोजी बरखास्त केली. काँग्रेस 1969 साली फुटल्यानंतर, इंदिराजी अल्पमताचे सरकार कम्युनिस्टांच्या पाठिंब्यावर चालवत होत्या. त्यामुळे मुदतपूर्व लोकसभा निवडणूक अटळ होती. अटलजींनी 1971 च्या मध्यावधी लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांची आघाडी बनवली, पण इंदिराजींच्या ‘गरिबी हटाव’ या घोषणेने विरोधकांचा पार धुव्वा उडाला. जनसंघाचे कार्यकर्ते इतके निराश झाले, की पक्षाचे काम थंडावले. तेव्हा अटलजींनी ‘हम इलेक्शन हारे है, हिम्मत नही हारे है।’ ही घोषणा देऊन पक्षकार्यकर्त्यांत चैतन्य निर्माण केले. इंदिराजींनी बांगलादेशच्या विजयाने 1972 च्या विधानसभा निवडणुकांत, पुन्हा बाजी मारली. अटलजींच्या अध्यक्षीय कारकिर्दीत जनसंघाला निवडणुकांत पराजयालाच सामोरे जावे लागले. अटलजींनी अध्यक्षपद सोडले आणि लालकृष्ण अडवाणी यांना अध्यक्ष केले. तो सारा इतिहास लेखकाने अचूक मांडला आहे. पण ‘संघटनेला दृढ चालवावे’ हे संघाचे व्रत अटलजींना जमले नाही, हेच खरे. ते कार्य अडवाणी उत्तम पार पाडतील असे अटलजींना वाटले, म्हणून त्यांनी अडवाणींना अध्यक्ष केले.

लेखकाने विधानसभेतील पराभव आणि बांगलादेशची निर्मिती यांचा आढावा मोजक्या अचूक शब्दांत घेतला आहे. मात्र अटलजींना संघटना बांधणे जमत नाही असे म्हटलेले नाही. पण ती वस्तुस्थिती होती. अटलजींना त्यांच्या मर्यादेची कल्पना होती. ते वल्लभभाई पटेल यांच्या जयंती सभेत म्हणाले, ‘वल्लभभार्इंची पकड संघटनेवर होती. वल्लभभाई उमेदवार ठरवणे, त्यासाठी निधी गोळा करणे, निवडणुकीची स्ट्रॅटेजी ठरवणे हे सारे काम करायचे. नेहरू जाहीर सभेत वक्तव्ये द्यायचे. आंतरराष्ट्रीय राजकारणावर बोलायचे. मी ते काम जनसंघात करतो.’

बांगला देश युद्धात साठ हजार पाकिस्तानी युद्धकैदी भारताच्या ताब्यात आले. त्यांना सोडवण्यासाठी भूत्तो भारतात आले. प्रसिद्ध ‘सिमला करार’ झाला. पाकिस्तानी सैनिक मायदेशी परतले. त्या करारावर विरोधकांपैकी फक्त अटलजींनी टीका केली. संजय गांधी यांनी मारूती मोटार कारखाना त्याच वेळी भल्याबुऱ्या मार्गाने सुरू केला. त्याची लक्तरे अटलजींनी लोकसभेत टांगली. गोळवलकर गुरूजी यांचे निधन 1973 साली झाले. इंदिराजींची वाटचाल हुकूमशाहीकडे 1973 नंतर होऊ लागली होती. त्यांनी जयप्रकाश नारायण यांनाही जुमानले नाही. जयप्रकाश यांनी भ्रष्टाचारविरूद्ध आंदोलन छेडले. अटलजींनी त्या आंदोलनात मनसा-वाचा-कर्मणा उतरण्याचे हे ठरवले. अटलजींचा आग्रह, पक्ष अधिक लोकांपर्यंत पोचवायचा तर लोकचळवळीत सामील व्हायला हवे असा होता. तो अध्यक्ष अडवाणी यांनी मानला. जयप्रकाश यांनी 1975 साली लोकसभेला भ्रष्टाचाराच्या मुद्यावर महाघेराव घालण्याची हाक दिली. त्या महाघेरावमध्ये जनसंघाचेच कार्यकर्ते अधिक होते. जनसंघाचे अधिवेशन दिल्लीत दुसऱ्या दिवशी होते. अटलजींच्या मनात आले- जे.पी.ना बोलवावे का? त्यांनी अडवाणी यांना विचारले. त्यांनी ती कल्पना पसंत केली. दोघे जे.पी.ना भेटले. त्यांनी येण्याचे कबूल केले. अनेक समाजवादी व गांधीवादी जयप्रकाश यांना त्यावेळी भेटले. त्यांनी फॅसिस्टांच्या अधिवेशनाला जाऊ नका असा आग्रह धरला. पण जे.पी. बधले नाहीत. जे.पी. गेले आणि ते त्यांच्या भाषणांत म्हणाले, की जनसंघ हा पक्ष फॅसिस्ट नाही हे मला सांगायचे आहे. पुढे ते म्हणाले, की जनसंघ फॅसिस्ट असेल तर हा जयप्रकाशही फॅसिस्ट आहे! फॅसिझमचा उदय दुसरीकडेच होत आहे. (तो टोला इंदिराजींना होता) जेपींचे जनसंघाच्या व्यासपीठावर जाणे ही जनता पार्टीची सुरूवात होती हे कोणाच्याच तेव्हा लक्षात आले नाही.

लेखकाने जयप्रकाश यांची भ्रष्टाचार विरोधाची चळवळ, इंदिराजींनी लादलेली आणीबाणी आणि नंतर 1977 मध्ये जनता पार्टीने केलेला इंदिराजींचा पराभव हा सारा इतिहास आणि अटलजींची त्यांतील भूमिका व वक्तव्ये उत्तम रीतीने रेखाटली आहेत. ते लेखन मुळातून वाचायला हवे इतके चटकदार व पारदर्शी झाले आहे. लेखकाने जनता पार्टी सरकार स्थापन करतेवेळी चरणसिंग यांची पंतप्रधान होण्याची धडपड, बाबू जगजीवनराम पंतप्रधानांच्या शर्यतीत उतरणे येथपासून ते 1979 मधे जे.पी. यांचे निधन, जनता सरकार पडणे आणि मधू लिमये यांनी दुहेरी निष्ठेचा खंजीर जनसंघाच्या पाठीत खुपसणे हा सारा माहोल खुमासदारपणे व वेधक शब्दांत मांडला आहे. भारतीय जनता पार्टीची (पक्षाची नव्हे) स्थापना 1980 साली झाली. अटलजींचे विरोधकांनीही स्वागत केले होते. चंद्रशेखर अटलजींपेक्षा दोन वर्षांनी लहान होते, पण ते अटलजींना गुरू मानत होते.

जनता पार्टीतून बाहेर पडल्यावर पुन्हा जनसंघाचे पुनरूज्जीवन करायचे की नवे नाव घ्यायचे हा निर्णय अडवाणी यांनी अटलजींवर सोपवला होता. अटलजींना तीस वर्षांचा अनुभव सक्रिय राजकारणातील होता. संघाचा शुद्ध राष्ट्रवाद चारित्र्य घडवण्यास पुरेसा होता, पण राजकीय पक्षाला राष्ट्रवादाबरोबर अर्थकारण, समाजकारण यांचा विचार करावा लागतो. तो नसेल तर केवळ भावनिक मुद्यावर पक्ष स्थिर पायावर उभा राहू शकत नाही. लोकमानसाची पकड घेऊ शकत नाही. लोकांचा सर्वंकष पाठिंबा मिळवू शकत नाही. दीनदयाळ यांनी त्यासाठीच ‘एकात्म मानववाद’ हा डॉक्युमेंट तयार केला. गुरूजी, मुखर्जी, दीनदयाळ यांच्या बरोबरच लोक चळवळ उभारणारे जयप्रकाश हे अटलजींचे स्फूर्तिस्थान जनता पार्टीच्या काळात बनून गेले होते. म्हणून अटलजींनी जनता पार्टीतून बाहेर पडल्यावर पक्षाचे नवे नामकरण केले. नाव – भारतीय जनता पार्टी, ध्वजाचा रंग बदलला आणि चिन्ह कमळ हे आले असे विश्लेषण लेखकाने केलेले नाही. त्याने अटलजींचा प्रयत्न पक्षाला उजवीकडून डावीकडे आणण्याचा होता असे ढोबळ विधान केले आहे. त्या संदर्भात अटलजींच्या मानसिकतेचा वेध थोडे मागे जाऊन घेतला तर काही गोष्टी स्पष्ट होतील. जनसंघाचे पूर्व उपनगरांतून उमेदवार 1971 च्या निवडणुकीत होते- मुकुंदराव आगासकर. अटलजींनी त्यांची व्यथा त्यांच्या मुलुंड येथील प्रचार सभेत मांडली होती. भारतीय संस्कृतीच्या आधारे पक्षबांधणी हे जनसंघाच्या घटनेतील प्रीअॅडम्बल होते. तेव्हा अटलजी म्हणाले, ‘भारतीय संस्कृती हा शब्द आला, की वरील वर्गातील लोकांना ऋषिमुनी आठवतात, पण दलितांना आणि खालील वर्गातील लोकांना अत्याचार व पिळवणूक समोर येते. साऱ्या समाजाला घेऊन पुढे जायचे असेल तर हा शाब्दिक आग्रह सोडला पाहिजे.’ अटलजींच्या राजकीय अनुभवाची ती शिदोरी होती. समाजमनाचे भान अचूक होते. म्हणून ‘भारतीय जनता पार्टी’ हे नाव आणि जयप्रकाश त्यांचे प्रेरणास्थान ठरले; पण म्हणून नव्या पक्षाने ‘संपूर्ण क्रांती’चा विचार घेतला नाही.

अटलजींची पंचसूत्री 1980 च्या मुंबईतील अधिवेशनात कार्यकारिणीसमोर आली तेव्हा विजया राजे यांनी गांधीवादी समाजवाद या सूत्राला विरोध केला होता. विरोध दोन कारणांनी झाला. एक गांधी व समाजवाद हे दोन -ataljiशब्द संघ-जनसंघाला अॅलर्जिक होते. गुरूजींनी त्यांच्या बौद्धिकातून समाजवादाची खिल्ली उडवताना जगातील सगळी संपत्ती एकत्र करून सर्वांना वाटली तर प्रत्येक नागरिकाला दोन पैसेसुद्धा मिळणार नाहीत असे त्रैराशिक मांडले होते आणि गांधीवादाबद्दल जनसंघ कार्यकर्त्यांत एक विनोद प्रचलीत होता; तो म्हणजे खादी-खजूर-उपवास हे आम्हाला मान्य नाही. गांधीजींनी दिलेले सत्याग्रहाचे आयुध मात्र जनसंघाला मान्य होते, कारण ते लोकशाहीत बसणारे होते. विरोधाचे दुसरे कारण स्पष्ट दिसून येत नव्हते, पण अटलजी हे भाष्यकार होते. दीनदयाळजी यांच्याप्रमाणे सूत्रकार नव्हते आणि तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे भाषाप्रभू अटलजींना नवे शब्द सुचले नाहीत! त्यांनी गांधीवादी समाजवादी ही संघवर्तुळात बदनाम झालेली शब्दावली वापरली. त्यातून गैरसमजच वाढले. सारंग दर्शने यांनी त्याची चर्चा थोडी फार केली आहे, पण ती पुरेशी नाही. अटलजींच्या लेखी ‘गांधीवादी समाजवाद’ हा एकात्म मानववादाचा पुढील अवतार होता आणि त्यावर अटलजी ठाम होते. एक प्रसंग सांगितला पाहिजे. पुस्तकात तो नाही. अडवाणी अहमदाबादला एका पत्रकार परिषदेत म्हणाले, की गांधीवाद विकेंद्रीकरण सुचवतो तर समाजवाद साऱ्या संपत्तीचे केंद्रीकरण सुचवतो. हा विरोधाभास आहे. दुसऱ्याच दिवशी अटलजी ‘संडे ऑब्झर्वर’च्या मुलाखतीत म्हणाले, अडवाणी यांनी गांधीवादी-समाजवादाचा अर्थ लावला तो चुकीचा आहे. ते दोन शब्द एकत्र केल्यावर त्यांतून तिसरा अर्थ निर्माण होतो.

अटलजी पुढे काही वर्षांनी एनडीटीव्हीवर प्रणव रॉयला मुलाखत देताना म्हणाले होते, इंदिराजींनी आणीबाणीत घटनेचे प्रीअॅेम्बल बदलून त्यात समाजवाद हा शब्द घातला आहे. इंदिराजी त्या मुद्यांवर भाजपावर बंदी घालू शकल्या असत्या. आंबेडकर यांना समाजवाद मान्य नव्हता. त्यांनी घटनेच्या प्रीअॅाम्बलमधे तो घातला नव्हता. नेहरू यांनीही घटनेत समाजवादाचा आग्रह धरला नव्हता. त्यांनीही ‘मिक्स सोशॉलिझम’ची अर्थव्यवस्था स्वीकारली होती. काहीही असो! अटलजी सूत्रकार म्हणून मान्य झाले नाहीत हे सत्य आहे.

लेखकाने पक्षाच्या स्थापनेबाबतची अन्य चर्चा साक्षेपाने केलेली आहे आणि ती अचूक आहे. अटलजी मुंबई अधिवेशनात शिवाजी पार्क़वर अध्यक्षीय भाषणाची सुरूवात करताना म्हणाले होते, ‘हे अध्यक्षपद म्हणजे पद नव्हे तर परीक्षा आहे.’ सन्मान नसून आव्हान आहे. ते भाषणाचा समारोप करताना त्यांच्या भावपूर्ण हिंदीत म्हणाले होते. ‘‘सूरज निकलेगा, अंधेरा छटेगा, कमल खिलेगा।’’

अटलजींची दुसरी अध्यक्षीय कारकीर्द असा आशावाद जागवून सुरू झाली होती. पण भाजपाला यश 1984 सालच्या निवडणुकांत मिळाले नाही. इंदिराजींच्या हत्येने राजीवला सहानुभूतीची लाट मिळाली आणि खुद्द अटलजींचाही पराभव ग्वाल्हेरमध्ये झाला. अवघे दोन खासदार लोकसभेत निवडून आले. ग्वाल्हेरचा पराभव अटलजींच्या जिव्हारी लागला. ग्वाल्हेरला आयत्या वेळी अटलजींच्या विरोधात जनसंघातून काँग्रेसमध्ये गेलेल्या माधवराव शिंदे यांना उभे करण्याची कल्पना अर्जुनसिंग यांची. ग्वाल्हेरच्या निवडणुकीत गंमतच झाली. माधवरावांची आई राजमाता विजयाराजे भाजपात, त्यामुळे ग्वाल्हेरच्या राजवाड्यात एका बाजूला अटलजींचे निवडणूक कार्यालय आणि दुसऱ्या बाजूला माधवराव शिंदे यांचे कार्यालय! अटलजी त्यांच्या भाषणांत म्हणाले, की हा सामना राजा विरूद्ध प्रजा असा आहे. शेवटी, प्रजेने राजालाच निवडले!

अटलजींच्या त्या काळ्याकुट्ट पराजयाला चंदेरी किनार आहे. त्यांची तत्त्वनिष्ठा निवडणुकीच्या बाजारातही अचल राहिली. तो किस्सा पुस्तकात नाही. तो अटलजींची ओळख पटण्यासाठी सांगायला हवा. माधवराव शिंदे मराठा. ग्वाल्हेरचे राजपुत्र. तेथील मराठा समाजाने त्यांना त्यांच्या ज्ञाती संस्थेत बोलावले व त्यांचा सत्कार केला आणि माधवरावांना मत देण्याचा फतवा काढला. ते पाहून तेथील ब्राह्मण समाज जागा झाला. त्यांच्या संस्थेचे कार्यकर्ते अटलजींकडे गेले. त्यांनी त्यांना संस्थेत येण्याचे निमंत्रण दिले. ते निवडणुकीसाठी निधी देऊ; मत द्यायलाही सांगू असे म्हणाले. अटलजींनी त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि निर्धाराने म्हणाले, ‘मी संघाचा स्वयंसेवक आहे. संघ जातपात मानत नाही. मला तुमचा निधी नको आणि सत्कारही नको. माझा पराभव झाला तरी हरकत नाही, पण मी एका ज्ञाती संस्थेचा सत्कार घेणार नाही.’कार्यकर्ते परतले, अटलजींचा पराजय निवडणुकीत झाला. पण अटलजींना तत्त्वच्युती न केल्याचे समाधान लाभले.

अटलजींनी अध्यक्ष म्हणून लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवाची जबाबदारी स्वीकारली. संघाने लाल कृष्ण अडवाणी यांना पक्षात अध्यक्ष बनवण्याची सूचना केली. अटलजी मुंबईतील कार्यकारिणीत अडवाणी यांच्या अध्यक्षपदाला पाठिंबा देताना म्हणाले, ‘अडवाणी पहेले भी अध्यक्ष थे | जब कभी अडवाणीजी अध्यक्ष होते है तब पार्टी इलेक्शन जीतती है ।’ दिल्लीचे अधिवेशन नंतर झाले.

अडवाणी यांनी गांधीवादी समाजवाद गुंडाळून ठेवला आणि हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा उचलला त्याचे तात्कालिक कारण शाहबानो खटल्यातील सुप्रीम कोर्टाचा निर्णय आणि राजीव गांधी यांनी मुस्लिम तुष्टीकरणासाठी केलेली घटनादुरूस्ती हे होते. अडवाणी यांनी, पार्टी राममंदिर आंदोलन हाती घेईल असे मुंबईत सूचित केले. अटलजी ऑपरेशनसाठी अमेरिकेला गेले. अटलजींचे ऑपरेशन यशस्वी होऊन ते हसतमुखाने राजधानीत परतले तेव्हा ‘विश्व हिंदू परिषदे’ने राममंदिराचा मुद्दा लावून धरलेला होता. गृहमंत्री बुटासिंग सर्व पक्षांशी चर्चा करत होते. अडवाणी यांनी पालमपूर अधिवेशनात रामजन्मभूमी आंदोलन व रथयात्रा हा मुद्दा मान्य करून घेतला. कार्यकारिणीने हिंदुत्वाचा मुद्दा घेतलेल्या शिवसेनेशी युती करण्याचेही मान्य केले.

व्ही.पी. सिंग यांनी जनता दल स्थापन करून भाजपा व देवीलाल यांच्याशी जागावाटप करून 1 ची989 निवडणूक लढवली. भाजपाने दोनवरून शहाऐंशी जागांवर उडी मारली. जनता दलाला एकशेत्रेचाळीस जागा मिळाल्या. राजीव गांधी यांच्या काँग्रेसला एकशेसत्त्याण्णव जागा मिळाल्या, पण राजीव गांधी यांनी मंत्रिमंडळ बनवण्यास नकार दिला. व्ही.पी. सिंग यांनी भाजपा आणि कम्युनिस्ट यांची पाठिंबापत्रे घेऊन पंतप्रधानपदाची शपथ घेतली. व्ही.पी. सिंग यांना भाजपाचा पाठिंबा हवा होता, पण दुसऱ्या बाजूने ते ‘भाजपा’ला संपवण्यासही उत्सुक होते. त्यांनी काँग्रेसने पेटीत ठेवलेला ‘मंडल आयोग’ अहवाल बाहेर काढला. तो राखीव जागांचा गेम डेंजरस होता. अडवाणी यांनी त्याला शह देण्यासाठी रामरथयात्रा काढण्याचे निश्चित केले. ‘विश्व हिंदू परिषद’ अयोध्येत 30 ऑक्टोबरला कारसेवा करणार होती. अटलजींचा रामरथयात्रेला आणि शिवसेनायुतीला विरोध होता, पण त्यांनी गप्प राहणे पसंत केले. त्यांनी पंतप्रधान आगीशी खेळत आहेत हे ऐकवण्यास कमी केले नाही.

‘रामजन्म भूमी न्यास’ आणि ‘बाबरी मस्जीद कृती समिती’ यांच्यात चर्चा सुरू होती. व्ही.पी. सिंग यांना रामजन्म भूमीचा प्रश्न सोडवायचाच नव्हता. शेवटी चर्चा निष्फळ ठरली. अडवाणी यांची रथयात्रा निघाली. लोकांचा प्रतिसाद अभूतपूर्व होता. लालूंनी रथयात्रा बिहारमध्ये अडवली. अडवाणी यांना अटक केली. व्ही.पी. सिंग यांचे सरकार भाजपाने पाठिंबा काढून घेतल्याने कोसळले. चंद्रशेखर यांचे अल्पमतातील सरकार आले आणि गेले. 1991ची लोकसभा निवडणूक आली. निवडणूक अर्धी उरकलेली असताना राजीव गांधी यांची हत्या झाली. काँग्रेसचा विजय झाला. भाजपा एकशेवीस जागा जिंकून प्रमुख विरोधी पक्ष बनला. ते अडवाणी यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीतील हे दुसरे मोठे यश होते.

नरसिंहराव पंतप्रधान झाले. अटलजींनी अडवाणी यांना विरोधी पक्षनेते केले. नरसिंहराव सरकारने मार्केट इकॉनॉमीचे आर्थिक धोरण 24 जुलैला स्वीकारले. रामजन्म भूमीचा मुद्दा थोडा मागे हटला. भाजपा उत्तर प्रदेशमध्ये सत्तेवर येऊन कल्याणसिंग मुख्यमंत्री झाले. विश्व हिंदू परिषदेने पुन्हा राममंदिराचा मुद्दा उचलून धरला. ‘मंदिर वही बनायेंगे’चा जयघोष सुरू झाला. कारण बाबरी मशिदीचा ढाँचा 6 डिसेंबर 92 च्या कारसेवेत जमीनदोस्त केला गेला. कल्याणसिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. तो सारा इतिहास लेखकाने विस्तृत वर्णन केला आहे. अटलजी रथयात्रेच्या विरूद्ध आरंभाला होते. त्यांना रामजन्मभूमी हा भाजपाचा निवडणूक मुद्दा होऊ शकत नाही याची जाणीव होती. आंदोलनाने जेव्हा उग्र रूप घेतले तेव्हा अटलजींनी मंदिर-मस्जीद वादावर शिवाजी पार्कच्या जाहीर सभेत तोडगा सुचवला. त्याचा उल्लेख पुस्तकात नाही. तो यायला हवा होता. त्यांनी तो तोडगा संघाला विचारूनच लोकांपुढे ठेवला आहे असे स्पष्ट सांगून अटलजी म्हणाले, हिंदूंना रामाचा जन्म झाला त्या भूमीत रस आहे, तर मुसलमानांना वरच्या मशिदीच्या ढाँच्यामध्ये. ढाँचा आधुनिक इंजिनीयरिंगच्या साहाय्याने अलगद उचलून दहा किलोमीटर दूरवर नेऊन उभा करता येईल. दोन्ही समाजांनी ते मान्य करावे.’ वाद कोर्टात गेला तेव्हा अटलजी म्हणाले, रामाचा जन्म तेथे झाला ही हिंदूंची श्रद्धा आहे. त्यावर कोर्ट निर्णय देऊ शकत नाही.

अटलजींचे ते मूलभूत विचार ऐकण्यास आंदोलनाच्या गदारोळात कोणी तयार नव्हते. मशीद पडताच नरसिंहराव सरकारने भाजपाची तीन राज्यांतील मंत्रिमंडळे बरखास्त केली.  आंदोलनामुळे भाजपाला बसलेला तो धक्का जोराचा होता, पण त्यामुळेच सामान्य मतदार भाजपाकडे आकर्षित झाला. त्याला भाजपा सत्तेवर आला तर राममंदिर बांधले जाईल असा विश्वास वाटू लागला.

मुंबईचे अधिवेशन त्या पार्श्वभूमीवर 1995 साली भरले. संघ अटलजींवर नाराज होता. त्यामुळे अटलजी अधिवेशनात गप्प होते. तो भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. संघ नाराज असला तरी भाजपात तशी नाराजी नव्हती. अध्यक्ष अडवाणी तर अटलजींचा धाकटा भाऊ असेच वागत होते. ते नाते घट्ट होते. संघाच्या नाराजीने त्यात वितुष्ट येणार नव्हते. ते सारे असले तरी जो उत्साह अटलजींमध्ये 1980 च्या स्थापना अधिवेशनात सळसळत होता तसा उत्साह अटलजींकडे 1995 च्या अधिवेशनात राहिला नव्हता. प्रकृतीही साथ देत नव्हती. अटलजींनी वयाची सत्तरी ओलांडली होती.

अध्यक्ष अडवाणी यांनी शिवाजी पार्कच्या जाहीर सभेत अनपेक्षित बॉम्ब टाकला. अडवाणी म्हणाले, ‘पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीनंतर अटलजी पंतप्रधानपदाचे भाजपाचे उमेदवार असतील.’ अडवाणी तशी काही घोषणा करतील याची अटलजींना सुतराम कल्पना नव्हती. कार्यकर्त्यांनी त्या घोषणेनंतर ‘अगली बारी अटलबिहारी’ अशा आरोळ्या ठोकल्या. टाळ्यांचा गजर झाला. अटलजी उत्तर देताना शांतपणे काहीशा सावधपणे म्हणाले. ‘अगले ईलेक्शन में भाजपा को स्पष्ट बहुमत मिला और पार्लमेंटरी पार्टीने मुझे नेता चुना तब मै ना नही कहुँगा.’ अटलजींच्या उद्गारात पंतप्रधान हा शब्दच नव्हता.

भाजपा 1996 च्या निवडणुकीत एकशेएकसष्ट जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष बनला. अटलजींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली, पण अल्पमतातील ते सरकार फक्त तेरा दिवस टिकले. दर्शने यांनी तेथून ते 2004 ला भाजपाचा केद्रात पराभव होईपर्यंतचा राजकीय प्रवास सविस्तर मांडलेला आहे. अटलजी पंतप्रधान असताना अणुस्फोट, पाकिस्तानी आक्रमण, कारगीलचा विजय, विमान अपहरण, संसदेवरील हल्ला असे अनेक प्रश्न समोर आले. नी रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया मुंबईत 2002 मध्ये करण्यात आली. प्रकृती साथ देत नव्हती. अटलजी निराश होऊ लागले. त्यांनी पक्षातील लक्ष केव्हाच काढून घेतले होते. त्याचा आणि त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याचा परिणाम सरकारी कामकाजावरही होऊ लागला. त्यांचे एकाकीपण वाढले.

पंतप्रधान मोदी यांनी अटलजींना भारतरत्न हा देशातील सर्वोच्च 2015 मध्ये किताब दिला आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी तो त्यांच्या घरी जाऊन त्यांना प्रदान केला.

लेखकाचे शेवटचे प्रकरण ‘अटलवादाची अक्षय देणगी’ हे उत्तम उतरले आहे. अटलजींच्या सहा दशकांच्या राजकीय चरित्राचा समारोप उत्कृष्ट जमला आहे.

अटलजींची विनोदबुद्धी आणि कवितेतून आलेली चिंतनशीलता यांचा उल्लेख या चरित्र-कहाणीत नाही. अटलजींच्या विनोदाचे दोन नमुने नमूद करतो. मोरारजी देसाई अर्थमंत्री 1969 मध्ये असताना इंदिराजींनी त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकले. तेव्हा मोरारजी म्हणाले, ‘मुझे आलू और बैंगन की तरह काटा गया?’ त्यावर अटलजी म्हणाले, ‘किचन कॅबिनेटमे और क्या हो सकता है?’ विनोदबुद्धी असलेला माणूस स्वत:ची टोपी उडवण्यासही कमी करत नाही! अटलजींच्या एकसष्टीची सभा शिवाजी पार्कवर होती. त्यांना एकसष्ट लाखांची थैली द्यायची होती. स्वागताध्यक्ष होते राम जेठमलानी. त्यामुळे त्यांचे भाषण होणे महत्त्वाचे होते. अटलजींची जन्मतारीख 25 डिसेंबर, म्हणजे ख्रिस्ताचा जन्मदिवस. म्हणून जेठमलानी यांनी त्यांच्या भाषणांत अटलजींना ईसा मसीहाची उपमा दिली व त्याच वर्णनाची लांबण लावली. अटलजी उत्तर देताना म्हणाले, ‘‘25 दिसंबर मेरा जन्मदिन है ये कोई बडी बात नही. आज बंबईकी अस्पतालो में आप जायेंगे तो पता लगेगा कितने बालकोंने 25 दिसंबर को जन्म लिया है।’’ विनोदी व्यक्तिमत्त्वामध्येच समतोल दृष्टी असते. अटलजींकडे ती होती. असे असंख्य विनोद त्यांच्या भाषणातून येत असत. अटलजींचे राजकीय चरित्र पुढील पिढ्यांना प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही याबद्दल लेखकाचे अभिनंदन.

– सुधीर नांदगांवकर
cinesudhir@gmail.com

About Post Author

Previous articleजोडीदार निवडीतील विवेकी विचार
Next articleअध्यापन – एक परमानंद
सुधीर नांदगावकर यांनी मुंबई विद्यापीठातून मराठी विषय घेऊन एमए पूर्ण केले. त्यांनी 'दैनिक मराठा'त चित्रपट समीक्षक म्हणून पत्रकारितेचा अभ्यास केला. अटलबिहारी बाजपेयी यांच्या भाषणाने प्रेरित होऊन राजकीय क्षेत्रात सहभाग घेतला. ते 1973 ते 1977 या काळात भाजपचा पूर्वावतार जनसंघाचे कार्यकर्ता म्हणून कार्यरत होते. त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या अनेक हिंदी भाषणांचे मराठीत अनुवाद केले आहेत. त्यांचे 'अटलजींचे आवाहन' हे अनुवादित मराठी लेखाकंचे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यांनी 'राजनीती के उस पार' या पुस्तकाचा देखील मराठीत अनुवाद केला आहे. तसेच, त्यांनी अटलजींच्या राजकारणा व्यतिरिक्त भाषणांचे संपादन केले आहे. लेखकाचा दूरध्वनी 9323941897