अंधांच्या वाचनासाठी कार्यरत

carasole

सुखदा पंतबाळेकुंद्रीअंधांना अभ्यासाव्यतिरिक्त इतर साहित्य वाचायला मिळावे यासाठी धडपडणाऱ्या ठाण्याच्या सुखदा पंतबाळेकुंद्री, पुण्‍याचे उमेश जेरे आणि त्यांच्या तीनशेहून अधिक सहकाऱ्यांनी मराठीतील तीनशेहून अधिक पुस्तकांचा खजिना ब्रेलमध्ये रूपांतरित केला आहे. त्या साहित्याला आणि अभ्यासाला पूरक अशा मराठी ते मराठी या शब्दकोशाचेही रूपांतर ब्रेलमध्ये करण्यात आले आहे.

सुखदा पतबाळेकुंद्री आणि उमेश जेरे हे दोघे मुंबई-पुण्‍यात आपापल्‍या परिने अंधांसाठी मराठीतील साहित्‍य ब्रेलमध्‍ये आणण्‍याचे काम करत होते. कामाच्‍या ओघात दोघांचा परस्‍परांशी संपर्क झाला. उमेश जेरे पुण्‍यातून तर सुखदा मुंबईतून काम करत आहेत. त्‍यांनी मोठ्या प्रमाणात बालसाहित्‍य ब्रेलमध्‍ये आणले आहे. त्‍यांनी त्‍यांच्‍या कामाचा रोख मोठ्यांसाठीची पुस्‍तके ब्रेलमध्‍ये आणण्‍याकडे वळवला आहे.

सुखदा या मूळच्‍या बेळगावच्‍या. त्यांचे पती संजीव यांच्या बँकेतील बदलीच्या नोकरीमुळे त्या महाराष्‍ट्रभर फिरता फिरता १९९४ साली पुण्‍यात आल्‍या. त्‍या पुढे दहा वर्षे पुण्‍यात राहिल्‍या. त्‍यांनी फावला वेळ सत्‍कारणी लावण्‍याच्‍या हेतूने ब्रेल लिपी शिकण्‍यास आरंभ केला. सुखदा यांनी अंधशाळेतून ब्रेल लिपीच्‍या नोटस् मिळवून घरच्‍या घरी ब्रेल लिपी आत्‍मसात केली. त्‍यांनी घरबसल्‍या पुस्‍तके ब्रेलमध्‍ये रुपांतरित करण्‍यास सुरूवात केली. त्‍यांनी अकबर-बिरबलच्‍या कथा, जादूच्‍या गोष्‍टी, प-यांच्‍या गोष्‍टी ब्रेलमध्‍ये रुपांतरित केल्‍या. त्‍यांना त्‍यांचे काम पाहून कोथरूडच्‍या अंध मुलींच्‍या शाळेने २००३ साली ब्रेलमध्‍ये पुस्‍तके रुपांतरित करण्‍यास पाचारण केले. शाळेने सुखदा यांना पुस्‍तके टाइप करण्‍यासाठी ‘ब्रेलर’ (ब्रेलमध्‍ये टाइप करणारा टाइपरायटर) दिला. ब्रेलरवर फक्‍त सहा बटणे असतात. सुखदा यांनी ब्रेलरवर काम करत सव्‍वा वर्षांत मराठी शब्दकोश पूर्ण केला. त्‍या कामात त्‍यांना मुख्‍याध्‍यापक सुलभा पुजारी यांची मदत झाली. ब्रेलमधील तो शब्‍दकोश ‘मराठीतून मराठीत’ असा आहे. त्याची मांडणी मराठी मूळाक्षरांनुसार केली गेली आहे. शब्दाचे लिंग, विशेषण, क्रियाविशेषण, वाक्प्रचार, क्रियापद, अव्यय असे तपशील देत असताना त्याला समानार्थी शब्दही पुरवण्यात आले असल्याचे सुखदा यांनी सांगितले. त्‍याशिवाय बोलीभाषा, भूगोल, रसायन, जीव, मानस, अर्थ शास्त्र या ज्ञानशाखांमधील शब्द आणि संज्ञा यांचाही समावेश असल्याचे त्या म्हणाल्या. मात्र ब्रेलरची एक अडचण होती. टाइपरायटरप्रमाणे ब्रेलरवर तयार केलेल्‍या प्रतीची फोटोकॉपी (झेरॉक्स) काढणे शक्‍य होत नाही. त्‍यामुळे पुस्‍तकाची आणखी एक प्रत हवी असल्‍यास ब्रेलरवर पूर्ण पुस्‍तक पुन्‍हा टाइप करावे लागे.

संजीव पंतबाळेकुंद्री यांची २००४ साली मुंबईला बदली झाली आणि सुखदा मुंबईत आल्‍या. त्‍यांचे ब्रेलसंबंधातील काम सुरूच होते. त्यांचा ‘नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड (नॅब)’ या संस्‍थेशी संपर्क आला. लुई ब्रेलच्‍या जन्‍माच्या त्रिशताब्‍दीनिमित्त ‘नॅब’कडून अंधांसाठी ‘अखिल भारतीय वाचन स्‍पर्धा’ आयोजित करण्‍यात आली. त्‍या स्‍पर्धेच्‍या अंतिम फेरीसाठी सुखदा पंतबाळेकुंद्री यांना परीक्षक म्‍हणून बोलावण्‍यात आले. तेव्‍हा अंतिम फेरीत पोचलेल्या अंध मुलामुलींचेही वाचन कच्‍चे असल्‍याचे सुखदा यांना जाणवले. ब्रेलमध्ये साहित्य उपलब्ध नसल्यामुळे अंध मुलांचे वाचन कमी आहे, असे त्‍यांना सांगण्‍यात आले. मग अंधांसाठी विविध त-हेचे साहित्य ब्रेलमध्‍ये आणण्‍याच्‍या कामात सुखदा अधिकच गढून गेल्या. त्‍यांनी संगणकावर ब्रेलमध्‍ये टाइपिंग करता येते का याचा शोध घेतला. त्‍यातून त्‍यांना Winbraille आणि Duxbury हे दोन सॉफ्टवेअर गवसले. मात्र संगणकावर ब्रेलमध्‍ये टाइप व्‍हावे मात्र पडद्यावर मराठी अक्षरे उमटावीत अशी सोय असावी, असे सुखदा यांना वाटले. त्‍याच सुमारास उमेश जेरे हे पुण्‍यात ब्रेललिपीसाठी एक सॉफ्टवेअर तयार करत होते.

उमेश जेरे पत्‍नी संगीता जेरे यांसोबतउमेश जेरे यांचा रोबोटिक्‍स आणि इंडस्ट्रियल ऑटोमेशनचा व्‍यवसाय. जेरे पतिपत्‍नीनी त्‍यांच्‍याकडे असलेला वेळ आणि पैसा समाजोपयोगी कामात गुंतवण्‍याचे ठरवले. त्‍यासाठी त्‍यांनी अनाथ मुले, वृद्धाश्रम, मतिमंद मुले अशा अनेक समस्‍यांचा विचार केला. कोथरूड येथील अंध मुलींच्‍या शाळेने त्‍यांना ब्रेलमध्‍ये पुस्‍तके तयार करण्‍यास सुचवले. त्‍यासाठी जेरे दांपत्‍याला ब्रेललिपी शिकण्‍याची गरज होती. मात्र त्‍यामध्‍ये बराच वेळ जाईल असे लक्षात आल्‍याने उमेश जेरे यांनी त्‍यावर सोपा उपाय काढला. त्‍यांनी दोन दिवसांत ‘देवनागरी प्रज्ञा चक्षू’ हे सॉफ्टवेअर तयार केले. त्‍यामध्‍ये फोनेटिक पद्धतीने मराठीत टाइपिंग करण्‍याची सोय होती. तयार झालेला मजकूर ब्रेलमध्‍ये रुपांतरित केला जाई. त्‍यानंतर जेरे पतिपत्‍नीनी ब्रेलमध्‍ये पुस्‍तके तयार करून त्‍या अंध मुलींच्‍या शाळेला दिली. उमेश जेरे यांनी त्‍या शाळेकडे मदत करण्‍याच्‍या इच्‍छेने येणा-या व्‍यक्‍तींच्‍या घरी जाऊन ते सॉफ्टवेअर इन्‍स्‍टॉल करून दिले. त्‍या व्‍यक्‍ती त्‍यावर ब्रेलमध्‍ये पुस्‍तके टाइप करू लागल्या. उमेश जेरे आणि त्‍यांचे सर्व सहकारी जी पुस्‍तके तयार करत, ती छापून त्‍या शाळेच्‍या ग्रंथालयात जमा केली जात.

उमेश जेरे यांच्‍या मनात, संगणकावर टाइप झालेल्‍या त्‍या पुस्‍तकांच्‍या एकापेक्षा अधिक प्रती छापून महाराष्‍ट्रातील इतर शाळांना पुरवता येऊ शकतील, अशी कल्‍पना आली.

त्‍यावेळी सुखदा यांच्‍या ब्रेलसंबंधातील कामाची माहिती लोकांना होत होती. मुंबई-ठाण्‍याचे लोक आपणहून मदत करण्‍याच्‍या इच्‍छेने सुखदा यांच्‍याकडे येत होते. त्‍या त्‍यांना ब्रेललिपी शिकवू लागल्‍या होत्‍या. त्‍याचवेळी उमेश जेरे आणि सुखदा यांची ओळख झाली. एकाच उद्देशाने काम करणा-या त्‍या दोघांचे सूर जुळण्‍यास वेळ लागला नाही. जेरे यांनी तयार केलेल्‍या सॉफ्टवेअरमुळे पुस्‍तके ब्रेलमध्‍ये टाइप करण्‍याचे श्रम आणि वेळ वाचणार होते. मग त्‍या सा-यांनी मिळून काही पैसे गोळा केले. ‘नॅब’ने त्या पैशांतून जेरे-पंतबाळेकुंद्री यांच्‍या गटाला त्‍यांना हवी ती पुस्‍तके ब्रेलमध्‍ये छापून देण्‍याचे मान्‍य केले. ब्रेलच्‍या त्या कामाला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला. लोक स्‍वतःहून पैशांची मदत करू लागले. ते जमा होणारे पैसे नॅबकडे भरले जाऊ लागले. ब्रेलमध्‍ये टाइप केलेली जी पुस्‍तके छापण्‍याची आहेत, ती नॅबकडे पाठवली जाऊ लागली. ‘नॅब’चे महेंद्र मोरे आणि रमण शंकर यांनी त्‍या कामात मोठी मदत केली असल्‍याचे जेरे यांनी सांगितले.

उमेश जेरे यांनी महाराष्‍ट्रातील अंधांसाठीच्‍या शाळांना पत्रे पाठवून त्‍यांची माहिती मागवली. त्‍या माहितीच्‍या आधारे प्रत्‍येक शाळेला किती पुस्‍तके देता येतील याचा अंदाज बांधला. जेरे-पंतबाळेकुंद्री यांच्‍या गटाने गेल्‍या दीड वर्षाच्‍या काळात पंचावन्‍न शाळांना पाच लाख रुपयांची बारा हजार पुस्‍तके मोफत वाटली आहेत.

जेरे म्‍हणाले, की आम्‍ही सुरूवातीला बालसाहित्‍याकडे विशेष लक्ष पुरवले. आम्‍ही लहान मुलांसाठीची तीनशे पुस्‍तके ब्रेलमध्‍ये छापली आहेत.

उमेश जेरे- सुखदा पंतबाळेकुंद्री आणि त्‍यांच्‍या सहका-यांनी आतापर्यंत मराठीतील जी पुस्तके ब्रेलमध्‍ये रुपांतरित केली आहेत; त्‍यामध्‍ये मनाचे श्लोक, अकबर-बिरबलाच्या कथा, स्‍वातंत्र्यसेनानींच्‍या कहाण्‍या, रामरक्षा, इसापनीती, साने गुरुजींच्या बालवाङ्मयापासून अनेक कवितासंग्रह, चरित्रे, आत्मचरित्रे यांचा समावेश आहे. सोबत प्रकाश आमटे यांचे ‘प्रकाशवाटा’ आणि साधना आमटे यांचे ‘समिधा’, विकास मनोहर यांचे ‘नेगल’, मंगला आठलेकर यांचे ‘गार्गी अजून जिवंत आहे’, ‘पु.ल. एक साठवण’ अशी अनेक पुस्‍तके ब्रेलमध्‍ये आणली आहेत. त्‍यात अनिल अवचट, शांता शेळके, आनंद नाडकर्णी, दुर्गा भागवत, डॉ. विजया वाड अशा प्रसिद्ध लेखकांचा समावेश आहे.

सुखदा म्‍हणाल्‍या, की लेखक-प्रकाशन ब्रेल रुपांतरासाठी आनंदाने परवानगी देतात. अच्‍युत गोडबोले यांनी त्‍यांच्‍या ‘किमयागार’, तर मिलिंद बोकिल यांनी ‘झेन गार्डन’ या पुस्‍तकांच्‍या थेट सॉफ्टकॉपी उपलब्‍ध करून दिल्‍याचे त्‍यांनी सांगितले. याबाबत एक आठवण सांगताना सुखदा म्‍हणाल्‍या, की लता मंगेशकर यांच्‍या ‘फुले वेचिता’ या पुस्‍तकासाठी परवागनी मिळवण्‍यासाठी पत्रव्‍यवहार केला असता त्‍यांनी स्‍वतःच्‍या हस्‍ताक्षरात पत्र लिहून परवानगी दिल्‍याचे कळवले.

अनेक व्‍यक्‍ती सुखदा किंवा जेरे यांच्‍याकडे सहकार्य करण्‍यासाठी संपर्क करतात. त्‍या व्‍यक्‍तींना इमेलद्वारे ब्रेलचे सॉफ्टवेअर आणि फॉण्‍ट पाठवले जाते. ते संगणकात इन्‍स्‍टॉल करण्‍याच्‍या सूचना इमेलने किंवा फोनवरून दिल्‍या जातात. त्याबाबतच्‍या अडचणीही फोनवरूनच सोडवल्‍या जातात. कार्यकर्ते त्‍यांना रुपांतरासाठी सुचवलेली पुस्‍तके वाचनालयातून आणून घरी टाइप करतात आणि मेलने जेरे किंवा सुखदा यांच्‍याकडे पाठवून देतात. याप्रकारे जेरे आणि सुखदा तीनशे कार्यकर्त्‍यांच्‍या कामाचे संयोजन करत आहेत. सर्व काम ऑनलाइन होत असल्‍याने त्यांपैकी नव्‍वद टक्‍के व्‍यक्‍तींनी त्‍या दोघांना पाहिलेलेही नाही.

तीनशे कार्यकर्त्‍यांमध्‍ये बावीस ते नव्‍वद वर्षे वयोगटातील व्‍यक्‍तींचा समावेश आहे. मुंबई, पुणे, नागपूर, हैदराबाद या भारतीय शहरांमधील व सिंगापूर, वेस्‍ट इंडिज, अमेरिका आणि कॅनडा या देशातील तीनशे कार्यकर्ते या कामाशी जोडले गेले आहेत. तळेगाव येथील नव्‍वद वर्षांच्‍या पद्मा चाफेकर यादेखील ब्रेलमध्‍ये पुस्‍तके टाइप करून सुखदा यांच्‍याकडे पाठवत असतात. त्‍यांनी गेल्‍या पाच वर्षांमध्‍ये प्रकाशवाटा, चिपर बाय द डझान, मुक्‍ती पत्रे, कार्यरत, श्री गाडगे महाराज, अश्रूंची झाली फुले आणि ती फुलराणी, गोंदण अशी एकूण चौदा पुस्‍तके ब्रेलमध्‍ये रुपांतरित केली आहेत.

सुखदा आणि उमेश यांना यांच्‍या कामाचा परिणाम कधीकधी जाणवतो. त्‍यांना अंध व्‍यक्‍तींकडून फोन येतो. त्या व्‍यक्‍ती पुस्‍तके वाचून आनंदित झालेल्‍या असतात. काहींनी त्‍यांच्‍या मुलांचे संगोपन करताना त्या पुस्‍तकांचा उपयोग झाल्‍याचे कळवले. काहीजण तर प-यांच्‍या-जादूच्‍या गोष्‍टी वाचून हरखून गेले होते. कुर्ल्‍याला राहणा-या एका अंध आजोबांना काही श्‍लोक आणि त्‍यांचा अनुवाद असलेले ‘सार्थ पंचरत्‍न हरिपाठ’ हे पुस्‍तक ब्रेलमध्‍ये हवे होते. सुखदा यांनी प्रयत्‍न करून त्‍यांना ते पुस्‍तक ब्रेलमध्‍ये उपलब्‍ध करून दिले. त्‍यानंतर ते आजोबा ते पुस्‍तक घेऊन सुखदा यांना भेटायला आले. ‘‘त्यांना झालेल्‍या आनंदामध्‍ये आमच्‍या कामाचं चीज झाल्‍यासारखं वाटलं’’ असे सुखदा म्‍हणाल्‍या.

सुखदा आणि उमेश यांचा भारतातील इतर भाषांमध्‍येही हा उपक्रम राबवण्‍याचा मानस आहे. उमेश आणि सुखदा शासकिय ग्रंथालये, तसेच महाविद्यालयीन ग्रंथालये यांमध्‍ये ब्रेल विभाग सुरू करण्‍याचे प्रयत्‍न करत आहेत. ब्रेलमध्ये रूपांतरित केलेली पुस्तके उमेश जेरे यांनी तयार केलेल्‍या www.blindbooks.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ब्रेलमध्‍ये उपलब्‍ध असलेल्‍या सर्व पुस्‍तकांची यादी तेथे उपलब्‍ध करून देण्‍याचा जेरे यांचा प्रयत्‍न आहे. त्‍यामुळे पुस्‍तके पुन्‍हापुन्‍हा ब्रेलमध्‍ये रुपांतरित होऊ नयेत आणि संबंधित व्‍यक्‍तींचा वेळ-श्रम वाचावेत हा त्‍यामागचा उद्देश असल्‍याचे जेरे यांनी सांगितले. अंधांच्‍या शाळा किंवा इतर वाचनालये यांनी संकेतस्‍थळावरील पुस्तकांची मागणी केल्यावर त्यांना त्‍या पुस्तकाची हार्डकॉपी देण्‍यात येते. सर्व कार्यकर्ते स्‍वयंसेवा वृत्तीने काम करतात असे सुखदा यांनी सांगितले. मुंबईतील लोकमान्‍य सेवा संघाने ब्रेलमध्‍ये मराठी साहित्‍य आणण्‍याच्‍या या कामाची नोंद घेत सुखदा पंतबाळेकुंद्री आणि उमेश जेरे यांना मे २०१४ मध्‍ये ‘गोपाळ गणेश आगरकर पुरस्‍कारा’ने सन्‍मानित केले.

सुखदा पंतबाळेकुंद्री
९८३३९०८०८८, ०२२२१७१२१७६
sukhada_pantbalekundri@yahoo.co.in
sukhada.pantbalekundri@gmail.com

उमेश जेरे
९८२२०२१७२६
jereuv@vsnl.com

किरण क्षीरसागर
९०२९५५७७६७
thinkm2010@gmail.com

About Post Author

Previous articleटिक्केवाडीचे ग्रामदैवत – भुजाईदेवी
Next articleमाहुली गडावरील स्वच्छता मोहीम
किरण क्षीरसागर यांनी ग्रॅज्‍युएशननंतर पत्रकारितेचे शिक्षण घेतले. त्‍यानंतर वृत्‍तसंस्‍था, दैनिक 'मुंबई चौफेर' आणि आकाशवाणी अशा ठिकाणी कामांचा अनुभव घेतल्‍यानंतर 'थिंक महाराष्‍ट्र'सोबत 2010 साली जोडले गेले. त्‍यांनी चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेतले असून त्‍यांचा 'डिपार्टमेन्‍ट', 'अब तक छप्‍पन - 2', 'अॅटॅकस् ऑफ 26/11', 'क्विन', 'पोस्‍टर बॉईज' अाणि 'शेण्टीमेन्टल' अशा व्‍यावसायिक चित्रपटांच्‍या संकलन प्रक्रियेत सहभाग होता. ते 'बुकशेल्फ' नावाचे पुस्तकांचा परिचय करून देणारे युट्यूब चॅनेल त्यांच्या सहकाऱ्यांसोबत चालवतात. लेखकाचा दूरध्वनी 9029557767

2 COMMENTS

  1. Dear Jere Sir you done a
    Dear Jere Sir you done a great job, due to you lot of people will be able to read a good literature
    and you done that through a software it too good …. really people must learn from you, I wishes best of luck to u r work and efforts thanks sir

  2. you had done GOD work for
    you had done GOD work for blinds. may you both continue your GOD work till all books were converted for blinds.

Comments are closed.