पुणे जिल्ह्यातील इंदापूर गाव इतर भागांच्या मानाने दोनशे वर्षांपूर्वी, खूपच सुधारलेले होते. तेव्हा आम्हा पंढरी कुटुंबीयांचे अनेक वाडे गावात होते. पंढरी मंडळी सावकारीचा व्यवसाय करत असत. पंढरी यांचे घर एकच गावात शिल्लक राहिले आहे. मंदिराबाबत पणजी (वडिलांची आजी) आख्यायिका सांगत असे. आख्यायिका अशी- पणजोबा जेजुरीच्या खंडोबाचे निस्सीम भक्त होते. ते जेजुरीला दर्शनासाठी अमावास्येला पायी जात असत. त्यांनी वयोमानानाने थकल्यावर खंडेरायांना इंदापूरला येण्याची विनंती केली. खंडोबा येण्यास तयार झाले ! त्यांनी अट घातली, की “मी तुझ्या मागे येईन, पण तू जेव्हा मागे बघशील तेव्हा तेथेच दर्शन देऊन गुप्त होईन.” त्याप्रमाणे खंडोबा खरेच आले. गावाच्या राम वेशीतून आत आल्यावर, घरापासून थोड्या अंतरावर असताना, पणजोबांनी खरेच का खंडोबा देव मागे आला आहे हे बघण्यासाठी मागे वळून पाहिले. खंडोबा खरेच मागे होते. पण ते दर्शन देताच त्याच ठिकाणी गुप्त होऊन गेले. तेथे खंडोबाचे त्याच्या दोन्ही पत्नींसहित मंदिर बांधलेले आहे ! पणजोबांनी बांधलेले दगडी बांधकामातील ते सुंदर मंदिर व्यवस्थित आहे. मंदिराच्या बाजूला बारमाही पाणी साठा असलेली, उतरण्यासाठी पायऱ्या व दगडी कमान असलेली जुन्या काळातील विहीर (बारव) होती. ती दुरुस्ती न झाल्याने काळाच्या ओघात लुप्त झाली आहे.
माझे वडील (मधुसूदन दत्तात्रय पंढरी) जिल्हा परिषदेच्या शाळेत हेडमास्तर होते. त्यांच्या बदल्या होत असत. ते खंडोबाच्या पूजेसाठी न चुकता इंदापूरला दर रविवारी येत असत. मीही कधी कधी वडिलांबरोबर येत असे. एरवी बाळू गुरव पूजा करत असे.
पंढरी कुटुंबातील लग्नकार्य त्या देवळात पूजा करून निमंत्रण पत्रिका अर्पण केल्यानंतरच पार पडते. माझे आजोबा दत्तात्रय पंढरी हे ब्रिटिशकालीन महसूल व्यवस्थेत वरिष्ठ पदावर (उपजिल्हाधिकारी पदाच्या समकक्ष) होते. त्यांनी तत्कालीन बारामती, सुपे आणि इंदापूर परगण्यात महसूल खात्यात नोकरी केली. ते हयात असेपर्यंत पंढरी मंडळींचे सामाजिक, आर्थिक वजन वाखाणण्यासारखे होते. त्यांना पंडित, चिंतामण (स्वातंत्र्यसैनिक पंढरी सर), मधुसूदन (माझे वडील), मोरेश्वर आणि विनायक अशी पाच मुले व दोन मुली होत्या. कुटुंब संयुक्त होते. स्त्रियांनासुद्धा कुटुंबात कसे महत्त्वपूर्ण स्थान होते याचे आमच्या कुटुंबातील उदाहरण वाखाणण्याजोगे आहे. आजोबांच्या बदल्या, कामातील व्यस्तता यांमुळे घराचे व्यवहार तरुणपणी विधवा झालेली त्यांची सख्खी बहीण गीता बघत असे. तिला एवढे महत्त्व होते, की त्यावेळी आमचे अठ्ठावीस एकरांचे शेत ‘गीताबाईचा मळा’ म्हणून प्रसिद्ध होते. पंढरी सर आणि मधुसूदन पंढरी यांच्या पुढील पिढीने इंदापूर सोडले. ते सामाजिक आणि आर्थिक सुस्थितीत आहेत. पंढरी यांचे एकच वडलोपार्जित घर इंदापूरमध्ये राहिले असून तेथे माझे सर्वात धाकटे काका- विनायक राहत होते. ते नगरपालिकेत नोकरीला होते. त्यांनी नोकरी पस्तीस वर्षे केली व जवळपास तेवढीच वर्षे निवृत्ती वेतन घेतले. ते वयाच्या नव्वदाव्या वर्षापर्यंत इंदापूर येथील ब्रह्मवृंद संघटनेत कार्यरत होते.
विनायक पंढरी यांचे 31 जानेवारी 2022 रोजी, म्हणजे वयाच्या ब्याण्णव्या वर्षी निधन झाले. त्यांना कोठलीही व्याधी नव्हती.
– विलास पंढरी 9860613872 vilaspandhari@gmail.com
ओम बंगला,61 अ, वारजे पुणे-411058
———————————————————————————————-