Home वैभव प्रथा-परंपरा वसुबारस (Vasubaras)

वसुबारस (Vasubaras)

carasole

वसुबारस (गोवत्सद्वादशी) हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तुत: तो सण वेगळा आहे. वसुबारस या शब्दातील वसू म्हणजे धन (द्रव्य), त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी.

भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथे पशुधनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हिंदू संस्कृतीत गाईला मातेसमान दर्जा देण्‍यात आला असून ती पूजनीय मानली गेली आहे. तिच्‍याप्रतीच्‍या कृतज्ञतेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते.

आश्विन कृष्ण द्वादशी या दिवशी जे व्रत करतात त्यात सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून सकाळी अथवा सायंकाळी सवत्स गायीची पूजा करतात व पुढील मंत्राने तिची प्रार्थना करतात –

तत: सर्वमये देवी सर्वदेवैरलङ्कृते |
मातर्ममाभिलषितं सफलं कुरू नन्दिनि ||

अर्थ – हे सर्वात्मक व सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिनी माते, तू माझे मनोरथ सफल कर.

या दिवशी तेलातुपात तळलेले पदार्थ आणि गाईचे दूध, तूप व ताक खात नाहीत. उडदाचे वडे, भात व गोडधोडाचे पदार्थ करून ते गाईला खाऊ घालतात. उत्तरप्रदेशात त्या व्रताला बछवाँछ असे म्हणतात. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी वासरू असलेल्या गाईची पूजा करण्याची पद्धत आहे. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. हळद-कुंकू आणि अक्षता वाहतात. ज्यांच्या घरी गुरे, वारसे आहेत त्यांच्या घरी पुरणाचा स्वयंपाक केला जातो. मग गाईला निरांजनाने ओवाळून केळीच्या  पानावर पुरणाचा नैवेद्य खायला दिला जातो. या दिवसापासून रांगोळी काढण्यास सुरुवात होते.

समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या अशी कथा आहे. त्यांतील नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे. त्या व्रताची कथा अशी –

एक म्हातारी होती. तिची एक सून होती. त्यांच्या घरात गुरे होती. गव्हाळी-मुगाळी वासरे होती. एक दिवस सासू शेतावर गेली. तिने जाताना सुनेला सांगितले, की गव्हाळे-मुगाळे शिजवून ठेव. तिला सांगायचे होते, की गहू-मूग शिजवून ठेव. पण सुनेने भलताच अर्थ घेतला आणि गोठ्यातील गव्हाळी-मुगाळी वासरे मारून त्यांचे मांस शिजवले. म्हातारी घरी आल्यावर सुनेने पाने मांडली. पानातील मांस बघून म्हातारी घाबरून गेली. तेव्हा सुनेने घडलेला सारा प्रकार तिला सांगितला. त्यामुळे सासू देवापुढे धरणे धरून बसली आणि देवाला विनवू लागली. ‘देवा देवा! कोपू नको. सून अजाण आहे. तिचा अपराध पोटात घाल. माझी वासरे जिवंत कर.’ देवाने त्या म्हातारीचा निर्धार पाहिला आणि सायंकाळी गाई रानातून परत येण्यापूर्वी वासरे जिवंत केली. म्हातारीने मग गाई-वासरांची पूजा केली. त्यांना गोडधोडाचा नैवेद्य दाखवून मग ती जेवली.

गुजरातमध्ये आश्विन वद्य द्वादशीपासून दिवाळी सुरू होते. त्या दिवसाला ‘वाधवारान’ असे म्हणतात. त्या दिवशी स्त्रिया सकाळी उठून सडासंमार्जन करून रांगोळ्या काढतात. त्यात वाघाचे चित्र हमखास असते. ते चित्र भाऊबीजेपर्यंत ठेवतात.

– आशुतोष गोडबोले
(आधार – भारतीय संस्‍कृती कोश)

About Post Author

4 COMMENTS

  1. खुप छान माहिती मिळाली धन्यवाद
    खुप छान माहिती मिळाली. धन्यवाद थिंक महाराष्ट्र!

  2. नवीन पिढीला थोडक्यात माहिती…
    नवीन पिढीला थोडक्यात माहिती देणारा लघु लेख

Leave a Reply to Suvarna Rohit Padole Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version