Home लक्षणीय उद्धृते तूर : दुष्काळावर उपाय (Tur as a crop may relieve famine conditions)

तूर : दुष्काळावर उपाय (Tur as a crop may relieve famine conditions)

‘चारा हेच पीक घेतल्यास दुष्काळ खूपच सुसह्य होईल.’ शेतीचे अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते संपतराव पवार हे साधार पटवून देत आहेत. दुसरा मार्ग चीनने दाखवला आहे. तूर ही बहुगुणी आहे हे आपल्याला कळते, पण वळल्याचे पुरावे दिसत नाहीत. चीनमध्ये जनावरांसाठी प्रथिनयुक्त पौष्टिक चारा, जळण, मातीची धूप रोखण्यास व पाणी धरून ठेवण्यास उपयुक्त, पाचोळ्यापासून खत असा तुरीचा सर्वोपयोगी वापर केला जात आहे. चीनला तूर डाळ 2000 सालापर्यंत अजिबात माहीत नव्हती. त्यांना बियाणे पुरवली हैदराबादच्या ‘इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर सेमी एरिड ट्रॉप्स- इक्रिसॅट’ या संस्थेने !

चीनमध्ये दहा लक्ष हेक्टरवर तुरीचे पीक उभे आहे. इतकेच नाही तर माळरान, पडिक जमीन, रस्त्याचा उतार, खडकाळ जमीन कोठलाही भाग त्यांनी वर्ज्य ठेवला नाही. ‘इक्रिसॅट’ व संशोधक, दोघेही भारतामधील असूनही भारतीय कृषी व्यवस्थापकांना काहीच का जमत नाही? निर्गुण काळाला चांगला किंवा वाईट करण्याची किमया पाण्याची आहे. गाव असो, राज्य असो वा राष्ट्र कोणालाही घडवण्याचा व बिघडवण्याचा विशेषाधिकार पावसाकडे आहे. हवामान आधीच लहरी, त्यात हवामान बदलामुळे पदरात पडणाऱ्या पावसाचे काटेकोर नियोजन केले नाही, तर हलाखी वाढत जाणार आहे. लोकप्रतिनिधी, अधिकारी, शेती संशोधक, हवामानशास्त्रज्ञ, जलअभियंते, मृदा शास्त्रज्ञ, भूगर्भ शास्त्रज्ञ, समाज शास्त्रज्ञ यांची गोलमेज परिषद भरवून दुष्काळावर कायमस्वरूपी योजना आखता येतील. त्यानंतर तशा कार्यक्रमाधिष्ठित राजकीय मागण्या करणे आवश्यक आहे. राजकीय दडपण आले नाही तर ही अवस्था बदलणे कठीण आहे.

– अतुल देऊळगावकर,  लातूर atul.deulgaonkar@gmail.com

(साधना, 21 मे 2016 च्या अंकातून)

———————————————————————————————————————————–

About Post Author

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version