मी डोंबिवलीमधील टिळकनगरमध्ये दुसरा ब्लॉक साधारणतः 2002 मध्ये घेतला. त्यावेळी माझा चित्रकार मित्र अमोल सराफ, जो अमेरिकेत असून तेथे वेगवेगळ्या प्रकारची चित्रे काढत आहे, याला एके दिवशी सहज म्हणालो, माझ्याकडे खूप स्वाक्षऱ्या आहेत. त्यातील काही भिंतीवर काढशील का? तो एके दिवशी रंग, ब्रश घेऊन आला आणि त्याने त्या स्वाक्षऱ्या जवळ जवळ पस्तीस तासांत माझ्या घराच्या भिंतींवर अप्रतिमपणे रेखाटल्या. पुढे काय? असा प्रश्न माझ्या मनात आला. त्यावेळी बाजूच्या टिळक शाळेत कार्यक्रम चालू होता. तेथे वसंत गोवारीकर हे वैज्ञानिक आले होते. माझे मित्र मोघेसर यांचा त्या कार्यक्रम संयोजनामध्ये हात होता. त्यांना विचारले, डॉक्टर घरी स्वाक्षरी करण्यासाठी येतील का? त्यांनी त्यांना विचारले आणि ते आले !
ती पहिली स्वाक्षरी माझ्या घराच्या भिंतीवर झाली. मला आठवतंय त्यावेळी मी स्टीफन हॉकिंग्जचा मोठा फोटो काढला होता. तो त्यांना लॅमिनेट करून दिला. ते खुश झाले. त्यानंतर सिलसिला सुरू झाला. त्यावेळी अनेकांनी मदत केली व करत आहेत. टिळकनगर गणेशोत्सव मंडळ असो, आमची पै फ्रेंड लायब्ररी असो… अनेकजण मदत करतात. कोणी प्रमुख पाहुणा आला, की माझ्या स्वाक्षरीच्या भिंतीवर स्वाक्षरी करण्यास घेऊन येतात. एकशेसाठच्यावर सेलिब्रिटींनी स्वतः माझ्या घरी येऊन भिंतींवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यामध्ये कवी ग्रेस, रघुनाथ माशेलकर, विजय भटकर, निदा फाजली, गोविंदाचार्य, सचिन तेंडुलकरची आई- रजनी तेंडुलकर, रत्नाकर मतकरी, शिरीष कणेकर, प्रवीण दवणे, निरंजन आणि अनुपमा उजगरे, रवींद्र साठे, उत्तरा केळकर, महेश काळे, शौनक अभिषेकी, वासुदेव कामत (कामत यांनी स्वतः माझ्या भिंतीवर माझे अप्रतिम स्केच काढले आहे), बाबासाहेब पुरंदरे, शरद पोंक्षे, रवी जाधव, वसंत वसंत लिमये, सुरेंद्र चव्हाण, राजन भिसे, अतुल परचुरे, चंद्रकांत लिमये, आनंद भाटे, मुकुंद मराठे, उपेंद्र दाते, आरती अंकलीकर, विठ्ठल कामत, अतुल परचुरे, वीरधवल खाडे, संजीव अभ्यंकर, क्रिकेटपटू जयंतीलाल, सुधीर वैद्य, द्वारकानाथ संझगिरी, प्रणव धनावडे, चेतन दातार, हुल्लड मुरदाबादी, मधु मंगेश कर्णिक, अनंत भावे, दिनकर गांगल, अरुणा ढेरे, उमा कुलकर्णी, सुनील मेहता, अशोक कोठावळे, अच्युत पालव, सदाशिवराव गोरक्षकर, मोहन जोशी, मनोज जोशी, सुदीप नगरकर, जयतीर्थ मेवुंडी.
ते भारतातील पहिले असे घर आहे, म्हणून त्या घराची 2016 मध्ये ‘लिम्का रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली. मी नुसत्या सह्या घेतल्या नाहीत, काही विद्वान नावे ठेवतात, ‘त्यात काय कर्तृत्व’ असे म्हणतात, पण ते तसे नसते. करून पाहा राव. स्वाक्षरीच्या घरामुळे मला नवीन ओळख मिळाली !
रेकॉर्ड क्रमांक दोन
माझा लागोपाठ दुसऱ्या वर्षी लिम्का रेकॉर्ड झाला तो राहुल द्रविडच्या स्वाक्षऱ्यांचा. राहुल द्रविड म्हणजे भारतीय संघाची भिंत- ‘द वॉल’. साधारणतः 2010 हे वर्ष असेल. राहुल द्रविड सी.सी.आय.ला (क्रिकेट क्लब ऑफ इंडिया) येणार होता, रणजी सामन्यासाठी. ही गोष्ट मला जेव्हा कळली तेव्हा मी माझे ठाण्यातील मित्र अवी सुळे यांना विचारले- मला राहुल द्रविडची जितकी शतके आहेत तितक्या स्वाक्षऱ्या घेता येतील का? सुळे यांनी अनेक सामन्यांचे मॅनेजरपद सांभाळले होते. ते हयात नाहीत. त्यावेळी राहुल द्रविडने एकदिवसीय सामन्यांत आणि कसोटी सामन्यांत मिळून छत्तीस शतके केली होती. सुळे म्हणाले, ‘मी तेथे आहे, तू ये.’ मी त्या दिवशी दुपारी चार लहान क्रिकेट बॅट्स घेऊन ब्रेबॉर्न स्टेडियमवर गेलो. राहुल द्रविड समोरच बसला होता. सुळे यांनी त्याला माझ्याबद्दल सांगितले. मग मी मराठीत राहुल द्रविडला माझा हेतू सांगितला, की मला त्याच्या छत्तीस स्वाक्षऱ्या हव्या आहेत. तो लगेच तयार झाला. मग आम्ही दोघे समोरासमोर बसलो आणि त्याने एकेक अशा छत्तीस स्वाक्षऱ्या अत्यंत शांतपणे दिल्या. तो त्या देत असताना मी माझ्याबद्दल, माझ्या कलेक्शनबद्दल सांगत होतो. मला त्याने काहीही नखरे न करता स्वाक्षऱ्या दिल्या हे पाहून त्याच्या माणूसपणाबद्दल खात्रीच पटली !
त्या वेळी माझ्याकडे दुर्दैवाने कॅमेरा नव्हता. राहुल द्रविड कसोटी क्रिकेटमधून निवृत्त 2012 मध्ये झाला. तोपर्यंत त्याने आणखी बारा शतके केली. मला त्या उरलेल्या बारा स्वाक्षऱ्या घ्यायच्या होत्या, पण तो योग येत नव्हता. मी संधी शोधत होतो, मात्र ती मिळत नव्हती. मला त्यासाठी वाट 2015 सालापर्यंत बघावी लागली. राहुल द्रविड एका कार्यक्रमासाठी वानखेडे स्टेडियमला येणार आहे, असे समजले. मी तेथे गेलो. तो घाईत होता. त्यावेळी तो एका हॉलमध्ये बोलत होता. त्याचे बोलणे झाल्यावर मी त्याला 2010 साली घेतलेल्या स्वाक्षऱ्यांच्या बॅटचे फोटो दाखवले आणि म्हणालो, तुम्ही 2010 नंतर बारा शतके केली आहेत. त्या स्वाक्षऱ्या मिळतील का? कधी मिळतील? त्यावर तो म्हणाला, ‘त्यात काय, आत्ता देतो.’ लगेच तो जवळच्या खुर्चीवर बसला आणि दोन बॅटवर बारा स्वाक्षऱ्या करू लागला. आता, परत प्रश्न फोटोचा होता. तितक्यात माझा फोटोग्राफर मित्र पीपी म्हणजे प्रकाश पार्सेकर कॅमेरा घेऊन समोर फोटोसाठी सज्ज होता, तो दिसला. त्याने खूण केली- ‘तू तुझे काम कर, मी फोटो काढत आहे.’ खरेच सागतो, पीपी म्हणजे प्रकाश पार्सेकर देवासारखा माझ्या मदतीला धावला ! त्याने जे फोटो काढले, ते जबरदस्त काढले आहेत. त्यांमुळे माझ्या आयुष्यात दुसऱ्या लिम्का रेकॉर्डसाठी शिक्कामोर्तब झाले. कारण ते फोटो रेकॉर्ड करण्यासाठी पुरावा ठरला. रेकॉर्ड सबमिट करताना ते फोटो उपयोगी पडले. मी पीपीची ती मदत कधीही विसरणार नाही. मी नेहमी म्हणतो, मी हजारो हातांनी मोठा झालो आहे. त्यात माझ्या मित्राच्या प्रकाश पार्सेकरच्या कॅमेऱ्याचा ‘हात’ होता.
कोठलाही छंद आपण आपल्या वकुबाने जोपासावा. त्यासाठी फालतू राजकारण किंवा ‘जेलस’पणा अनेकजण करतात, तेथे ओढ नसते तर वखवख असते. अशी वखवख मी कधीच केली नाही, पण हा छंद जोपासताना मी एक गोष्ट ठरवली की काम योग्य प्लॅन करून करावे. घाई कधीच करू नये आणि कधी कोठे थांबावे हे समजले पाहिजे.
रेकॉर्ड क्रमांक तीन
माझा लागोपाठ तिसऱ्या वर्षी लिम्का रेकॉर्ड झाला, परंतु त्याची रुजुवात 1990 साली झाली होती. त्याही आधी, 24 फेब्रुवारी 1988 रोजी विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर या जोडीने हॅरिस शील्डमध्ये रेकॉर्ड केला होता. मी त्यानंतर दोघांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या होत्या. कधी मैदानावर तर कधी एखाद्या कार्यक्रमात जेव्हा जेव्हा सचिन तेंडुलकर असे, तेव्हा मी त्याच्या दोन-चार स्वाक्षऱ्या घेत असे. पण रेकॉर्ड वगैरे हा प्रकार मनातही नव्हता. माझा मुलुंडचा मित्र सतीश शिंदे म्हणजे शिशिर शिंदेचा मोठा भाऊ. सतीश शिंदे हे शांता शेळके, रमेश तेंडुलकर ह्यांचे आवडते विद्यार्थी. त्यांचे तेंडुलकर यांच्याकडे जाणेयेणे असे (1996). सतीश शिंदे जबरदस्त मनस्वी माणूस. त्यांचे हस्ताक्षर जबरदस्त चांगले होते. मी तोपर्यंत तसे अक्षर कोणाचेच बघितले नव्हते.
त्याच कालखंडात माझी ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये मोठी मुलाखत झाली, ती ‘टाइम्स’च्या अनिल शिंदे या फोटोग्राफरमुळे. अनिल शिंदे हा देखील जबरदस्त मनस्वी माणूस. त्याला माझ्या स्वाक्षरी कलेक्शनबद्दल समजले. त्याने एके दिवशी घरी येऊन फोटो काढले, संध्याकाळीच ‘टाइम्स’च्या अश्विनी शेखर यांचा फोन आला. मी उद्या सकाळी तुमच्या घरी तुमचे ‘कलेक्शन’ बघण्यास येत आहे. मी एकदम गॅसवर ! मला रात्रभर झोप लागली नाही. सकाळी ती आली, तिने प्रश्न विचारले आणि ती निघाली. मी तिला म्हणालो, याचे काय करणार? ती म्हणाली, ‘माहीत नाही, बॉसने सांगितले आहे.’ दुसऱ्या की तिसऱ्याच दिवशी ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या सर्व एडिशनला माझा मोठा फोटो आणि मोठा राइटप. अनिल शिंदेने एका दिवसात मला ‘टॉप’ला नेले. त्यानंतर काही दिवसांत प्रवीण दवणे याने मोठा लेख लिहून, मला माझे दुसरे नाव देऊन बारसे केले… ते नाव होते ‘सह्याजीराव’. मी त्याच नावाने ओळखला जातो.
एकीकडे हे घडत होते, त्याचवेळी सतीश शिंदे यांचा फोन आला, की मी एका व्यक्तीला तुझ्या घरी घेऊन येतो. ‘कलेक्शन’ नीट ‘डिस्प्ले’ कर. सतीश शिंदे त्या व्यक्तीला घेऊन आले. त्या व्यक्तीचे नाव होते रमेश पारधे. रमेश पारधे म्हणजे सचिन तेंडुलकरचा बालपणीचा मित्र. ते त्याच्यासाठी जवळजवळ सर्व महत्वाची कामे करत असत, ते सचिन तेंडुलकर सोबत असत. असा मित्र एखाद्यालाच लाभतो जो शून्यापासून टॉपपर्यंत साथ देतो.
घरी गेलो, माझ्या छातीत धडधडत होते. मी कोण ते सांगितले. गप्पा सुरू असताना बाजूला सचिनचे मोठे बंधू अजित तेंडुलकरही ऐकत होते. ते पटकन म्हणाले, ‘सह्याजीराव का?’ मी पार आडवा. म्हणजे आपली ‘कीर्ती’ येथेही पोचली का? थँक्स ‘मटा’, थँक्स प्रवीण दवणे.
सचिनची आजी मागच्या बाजूला होती, त्याची आई, तेंडुलकरसर आणि मधूनच अजित तेंडुलकर. आम्हा सर्वांच्या गप्पा सुरू होत्या, चहापाणी झाल्यावर निघताना, भाऊंना म्हणालो, ‘सर, तुमची सही द्या.’ ते म्हणाले, ‘नाही रे, हात कापतो, मग देईन.’ पण मी हट्टच केला. मग त्यांनी सही दिली. आम्ही सचिनच्या इमारतीच्या पायऱ्या उतरत असताना, मनात एक वेडा विचार आला, आयला, आपले नाव सचिनच्या घरातही माहीत आहे ! बस्स, तेथून मात्र संधी मिळेल तेव्हा मी सचिनच्या स्वाक्षऱ्या जमवू लागलो ! सतीश शिंदे यांनी मला अनेक स्वाक्षऱ्या घेऊन दिल्या. मग रमेश पारधे यांच्याशीही माझी मैत्री झाली. आम्हा एकमेकांच्या घरात खूप प्रॉब्लेम झाले, आजारपणे झाली. रमेश पारधे यांनी माझ्या मुलाच्या आजारपणात इतकी मदत केली, की सख्खा भाऊ करणार नाही. रमेश पारधे यांचे भाऊ सिद्धार्थ पारधे. सिद्धार्थ यांच्या पत्नी, त्यांच्या घरातील सर्वानी, तसेच सिद्धार्थ पारधे, रमेश पारधे यांच्या आई यांनी मला माझ्या संकटाच्या काळात साथ दिली. सचिनच्या अनेक स्वाक्षऱ्या हळूहळू वाढत होत्या.
माझा स्वाक्षरी जमा करण्याचा छंद सुरूच होता. सचिन तेंडुलकरची शेवटच्या सामन्याआधी ब्रेबॉर्न स्टेडियममधील एका कार्यक्रमात शेवटची स्वाक्षरी 2013 मध्ये घेतली. माझ्या संग्रही त्याच्या सुमारे दीडशे स्वाक्षऱ्या जमा झाल्या होत्या. तो सगळा प्रवास सहजपणे घडला असे समजू नका, श्रम तर होते आणि जबरदस्त इच्छाशक्तीही आणि स्वतःच्या कामाविषयी प्रामाणिकपणा.
तेव्हा ठरवले, की सचिन तेंडुलकरच्या शंभर स्वाक्षऱ्या आणि शंभर शतके ह्यांचा लिम्का रेकॉर्ड करायचा. सगळे पेपरवर्क तयार केले. माझ्या मुलाने करणने सर्व नीट करून ‘सबमिट’ केले. सचिन तेंडुलकरची शंभर शतके आणि शंभर स्वाक्षऱ्या. रेकॉर्ड झाला खरा, परंतु तेथेही अनेक हातांनी मला मदत केली आहे ह्याचे भान मला आहे, त्या सर्व हातांना माझा सलाम !
रेकॉर्ड क्रमांक चार
माझा लागोपाठ चौथा लिम्का रेकॉर्ड करण्यासाठी घटनाच तशी घडली होती. क्रिकेट विश्वात अगदी वेगळी घटना 5 जानेवारी 2016 रोजी घडली. प्रणव धनावडे कल्याणला अंडर सिक्स्टीन क्रिकेट सामन्यात रेकॉर्ड करणार असे कळले आणि मी कल्याणच्या मैदानावर धाव घेतली. कारण तो एकशेसोळा वर्षानी ए. ई. कोलीन्सचा सहाशेअठ्ठावीस धावांचा रेकॉर्ड मोडणार असे दिसत होते. माझ्याप्रमाणे अनेकांनी तिकडे धाव घेतली. सर्व मीडिया तेथे होता.
माझी प्रणवच्या आई-वडिलांशी ओळख झाली होती. मामा राजेशची आधीपासून होती. तेव्हा दररोज त्याच्या मुलाखती येत होत्या. मी प्रणवला सुमारे सहा महिन्यांनंतर माझ्या घरी माझ्या स्वाक्षरीच्या भिंतीवर स्वाक्षरी करण्यास बोलावले. तो, त्याचे वडील आणि त्याचा मामा राजेशही बरोबर आले होते. कितीही कोणी म्हटले तरी रेकॉर्ड हा रेकॉर्ड असतो !
प्रणव घरी आल्यावर चहा पाणी झाले आणि मी एक मोठी बॅग उघडली. त्यात तेहतीस क्रिकेटच्या लहान बॅट्स होत्या. सर्वप्रथम प्रणवची स्वाक्षरी माझ्या ‘स्वाक्षरी म्युझियम’मध्ये अग्रस्थानी घेतली. कारण क्रिकेट माझा पहिल्यापासून वीक पॉईंट होता आणि आजही आहे. क्रिकेटसाठी सबकुछ !
त्याला म्हणालो, प्रणव तुला ह्या बॅट्सवर तीनशेतेवीस स्वाक्षऱ्या करायच्या आहेत. सगळेच हैराण, पण मी त्याच्या वडिलांना कल्पना दिलेली होती. मी त्याच्या तेहेतीस बॅट्सवर तीनशेतेवीस स्वाक्षऱ्या घेतल्या. कारण त्याने 323 चेंडूंत नाबाद 1009 धावा केल्या होत्या !
एका मराठी मुलाने एकशेसोळा वर्षाचा, इंग्लंडमधील क्रिकेटच्या पंढरीतील मुलाचा रेकॉर्ड मोडला होता !
अनेकांनी मला वेड्यात काढले. अर्थात ते नेहमीच होत असते. कारण कोणाच्या फुटपट्ट्याप्रमाणे मी कधीच वागलो नाही. त्यामुळे मला टीका नवीन नव्हती. समाधान मला माझ्या ‘लिम्का रेकॉर्ड’चे होते. त्याचबरोबर प्रणवच्या त्या खेळीचा मी रिस्पेक्ट केला होता. धोनीने त्याच्याबद्दल जे उद्गार काढले ते मी विसरणार नाही. तो म्हणाला होता, इतका वेळ कोणीही मैदानात राहणेच कठीण आहे ! धोनीचे म्हणणे खरे आहे, कारण तो डिफेन्सिव्ह खेळत नव्हता. क्रिकेटमध्ये समोरचा खेळाडू हा कितीही मोठा किंवा छोटा असो, शेवटी त्यावेळी तो खेळाडू असतो. प्रणवचे वडील रिक्षा चालवतात. तरीही प्रणवबरोबर त्यांचीही लढाई चालू आहे. प्रणव खेळत आहे… प्रयत्न करत आहे… बेस्ट लक प्रणव… तू जो विक्रम केला आहेस, तो परत शंभर वर्षे अबाधित राहील ! कोणताही विक्रम हा विक्रमच असतो !
– सतीश चाफेकर 9820680704 satishchaphekar5@gmail.com