न्यूयार्क येथील वॉल स्ट्रीट जर्नलच्या पहिल्या पानावर 24 मार्च 1993 रोजी ‘इंडिया डीड इट’ या शीर्षकाखाली एक बातमी आली होती. त्या बातमीच्या केंद्रस्थानी होते डॉ. विजय भटकर. राजीव गांधी पंतप्रधान असताना भारताने अमेरिकेकडे क्रे नावाच्या महासंगणकाची मागणी केली होती. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रोनॉल्ड रीगन यांनी हा महासंगणक भारताला अंतराळ, आण्विक, संरक्षण आणि इतर कोणत्याही प्रगत संशोधनासाठी वापरता येणार नाही या अटीवर देऊ केला होता.
भारताने ह्या अटी नाकारून डॉ.भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपला स्वत:चा महासंगणक बनवण्याचे ठरवले. भटकर हे तेव्हा ‘इलेक्ट्रॉनिक रिसर्च ऍंड डेव्हलपमेण्ट सेण्टर’चे संचालक म्हणून त्रिवेंद्रमला कार्यरत होते. ते महासंगणक बनवण्यासाठी पुण्यातील एनआयसीत आले. तोवर त्यांना महासंगणकाचा कोणताही अनुभव नव्हता. हवामानाच्या अंदाजातील अचूकता वाढवण्यासाठी महासंगणक ही भारताची मोठी गरज होती. त्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने भरारी घ्यायची स्वप्ने पाहणारे पंतप्रधान राजीव गांधीनी सी-डॅक या संस्थेची स्थापना पुणे विद्यापीठात 2 जून 1988 रोजी केली. डॉ.विजय भटकरांनी परम-800 हा महासंगणक अमेरिकेने देऊ केलेल्या किंमतीच्या निम्म्या किंमतीत आणि निम्म्या वेळेत करून दिला. त्याला उद्देशून ‘वॉल स्ट्रीट जर्नलने’ ही बातमी दिली होती.
विजय पांडुरंग भटकर हे मूळचे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील मुरंबा (ग्राहकहित-‘अंबाला’ गावी) या अडीचशे-तीनशे लोकवस्तीच्या गावाचे. जन्म 11 ऑक्टोबर 1946 साली त्यांचे मूळ घर जनावरांचा गोठा आणि पडक्या भिंती असलेल्या जुनाट वाड्यात. त्यांनी आपले इलेक्ट्रिकल इंजिनीरिंगचे शिक्षण मुरंबा, करजागाव, मुर्तिजापूर, अमरावती, नागपूर, वडोदरा आणि दिल्ली अशा अनेक ठिकाणी फिरून पी. एचडी. पर्यंत पूर्ण केले. भटकरांनी शिक्षणाच्या काळात सर्व विषयांतील साधारणत: पन्नास हजार पुस्तके वाचली. शिक्षणानंतर, त्यांना परदेशी नोक-यांची अनेक आमंत्रणे होती, पण त्यांनी भारतातच राहायचे ठरवले होते.
विक्रम साराभाईंच्या अध्यक्षतेखाली इलेक्ट्रॉनिक्स कमिशनची स्थापना 1968 साली झाली. त्या कमिशनवर भटकरांनी दहा वर्षे काम केले. ते इंदिरा गांधीनीं ‘इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार’ साठी 1972 साली नेमलेल्या महत्त्वाच्या समितीचे सदस्य होते. त्यांनी (त्रिवेंद्रममध्ये इलेक्ट्रॉनिक रिसर्च ऍन्ड डेव्हलपमेंट या भारतातील सर्वात मोठया प्रयोगशाळेची स्थापना केली. ते या संस्थेचे 1980 ते 1987 या काळात ते संचालक होते.) भटकरांच्या मार्गदर्शनाखाली केरळमध्ये अठरा कारखाने उभारले गेले. 1982 च्या एशियाडच्या वेळी भारतात दूरदर्शनचे प्रसारण रंगीत असावे असे सरकारला वाटले. इतर ज्येष्ठ शास्त्रज्ञांच्या मते हे शक्य नव्हते, त्यावेळी पंतप्रधान इंदिरा गांधीनी ही कामगिरी भटकरांवर सोपवली. त्यासाठी केल्ट्रॉन आणि तिरुअनंतपूरमच्या इलेक्ट्रॉनिक्स संशोधन संस्थेने भटकरांच्या नेतृत्वाखाली प्रयत्नांची पराकाष्ठा करून हे उद्दिष्ट पूर्ण केले. भटकरांनी इलेक्ट्रॉनिक्सची अनेक उपकरणे व प्रणाली विकसित केली. सुरक्षिततेच्या आणि उत्पादन क्षमतेच्या बाबतीत त्यांनी भिलाई प्लान्टमध्ये सुधारणा करून दिल्या. रस्त्यावरील वाहतूक नियंत्रण प्रणाली, उद्योगातील स्वयंचलित यंत्रणा, कोलकात्ता भुयारी रेल्वेची संगणकीय प्रणाली त्यांनी विकसित केल्या. भटकर टाटा कन्सल्टन्सीत 1987 मध्ये उपाध्यक्ष झाले.
भटकरांनी 1993 मध्ये परम-800 तर 1998 मध्ये परम-1000 संगणक बनवले. परम म्हणजे सर्वश्रेष्ठ, हा संगणक प्रती सेकंद एक अब्ज गणिते करू शकतो. अंतराळ संशोधन, भूगर्भातील हालचाली, तेलसाठे संशोधन, वैद्यकीय हवामान, अभियांत्रिकी, लष्करी अशा अनेक क्षेत्रांसाठी हा संगणक उपयोगी पडतो. विकसनशील देशातील असा हा एकमेव संगणक आहे. एवढ्या क्षमतेचा संगणक अमेरिका आणि जपान सोडता फक्त भारतात आहे.
हे ही लेख वाचा –
सिंधुदुर्ग येथील सागरमंथन आणि मूर्तींचा शोध
जयंत भालचंद्र उदगावकर – पार्किन्सनवरील उपचाराच्या शोधात
त्यांनी भारतातील सर्व भाषा संगणकांवर आणून साक्षरच काय पण निरक्षरही संगणक साक्षर व्हावा असा प्रयत्न केला. त्यांनी पुण्यातील सी-डॉकमध्ये (Centre for Development of Advanced Computing) प्रगत संगणकीय शिक्षण केंद्र सुरू करून हजारो मुलांना संगणकाचे शिक्षण दिले. तेथील मुले आज जगात भारताचे नाव उज्जवल करत आहेत. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी ही पदव्युत्रर शिक्षणाची संस्था त्यांनी स्थापन केली. महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेततेसाठी त्यांनी स्पेशल प्रोटेक्शन ग्रूपला संगणकीय प्रणाली बनवून दिली. त्यांनी एसएमएससाठी भारतीय भाषांची प्रणाली विकसित केली. शाळेपर्यंत न पोचणा-या मुलांसाठी ‘एज्युकेशन टू होम’ (इटीएच) ही संकल्पना मांडून त्यासाठी 1998-99 मध्ये इटीए संशोधन शाळा सुरू केली. त्यामुळे भारत हा जगातील सर्वात मोठा संगणक साक्षर देश बनेल, ग्रामीण भागात संगणक शिक्षणाचा प्रसार अधिक होण्यासाठी डिजिटल स्कूल काढून त्याद्वारे वीस लाख लोकांना शिक्षण दिले. त्यांनी घरात येणा-या एकाच वायरमधून आपल्याला फोन-टिव्ही आणि संगणक चालवता येतील अशी ब्रॉड ब्रँड प्रणाली विकसित केली. भटकरांनी महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन, डीव्हीनेट, मल्टिया, डिशनेट या संस्थाही स्थापन केल्या.
भारत देशाला अध्यात्माची हजारो वर्षांची परंपरा आहे. ती न घालवता आणि आधुनिक विज्ञानाबरोबर त्याची सांगड घालण्यासाठी त्यांनी भारत विश्र्व विद्यापीठाची स्थापना केली. इंडिया हेरिटेजतर्फे त्यांनी ज्ञानेश्वरी संगणकावर आणली. तीर्थक्षेत्रे ज्ञानक्षेत्रे बनण्यासाठी आळंदी आणि शिर्डीला प्रयोग सुरू केले. त्यांच्या कार्यासाठी त्यांना 2001 चा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर झाला.
भारतातील संगणक प्रगती आणि डॉ. विजय भटकर ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हा महासंगणक बनवण्याच्या साहसी मोहिमेत तीनशे गिर्यारोहक सामील झाले होते. तो 15 ऑगस्ट 1991 रोजी तयार झाल्याची घोषणा केली गेली. हा महासंगणक स्वित्झर्लंडच्या एका प्रदर्शनात नेण्याची नामी संधी भटकरांकडे 1990 साली चालून आली. भटकरांच्या मते हा महासंगणक ‘ब्रेनचाइल्ड’ होता. या प्रकल्पाला चांगलाच प्रतिसाद मिळाल्याने भटकरांसाठी तो बॅचमार्क ठरला.
प्रत्यक्षात, त्यांनी महासंगणकाच्या प्रकल्पाबरोबरच इतरही समांतर बाबी प्रकल्पांद्वारे सुरू केल्या.त्यातील महत्त्वाचा प्रकल्प होता संगणकावर भारतीय भाषा आणण्याचा. त्यासाठी भटकर व त्यांच्या सहका-यांनी ‘जिस्ट’ (Graphic & Intelligence Based Script Technology) हे तंत्रज्ञान विकसित केले. भाषक संगणक प्रणालीसाठी आशियाई देशही भारताकडे आदराने पाहू लागले. डॉ. भटकरांनी रामायण, महाभारत, वैदिक वाङ्मय, ज्ञानेश्वरी आदी पौराणिक-आध्यात्मिक ग्रंथांना संगणकावर नेण्याचा प्रकल्पही सीडी रॉमच्या स्वरूपात (Internet) हाती घेतला. त्यांच्या मते संत साहित्य नव्या पिढीसाठी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात येणे गरजेचे आहे. ‘सी-डॅक’ मध्ये असताना आणि नंतर ‘ईटीएच’ (Education to Home) यांच्या माध्यमातून त्यांनी याबाबतचे प्रकल्प प्रत्यात आणले आहेत. आळंदी, देहू, पंढरपूर, शिर्डी आदी तीर्थक्षेत्रांचे ज्ञानक्षेत्रात रूपांतर करण्याचा प्रकल्प त्यांनी हाती घेतला. त्यांनी आळंदीत एमआयटीच्या मदतीने मल्टिमीडिया प्रकल्प पूर्णत्वास आणला.
देश संगणकाभिमुख व्हावा व संगणक तंत्रज्ञान लोकाभिमुख व्हावे यासाठी डॉ. भटकर प्रयत्नशील असतात. त्यातूनच घरोघरी विषेशत, खेड्यापाड्यांत संगणकाद्वारे शिक्षण देण्याची कल्पना त्यांना सुचली. हे मोठे काम सामुहिक प्रयत्नांनी होणार असल्याच्या जाणिवेपोटी राज्य शासनाच्या प्रकल्पातही त्यांनी पुढाकार घेतला आहे.
तर्कशुध्द विचार करणारा शास्त्रज्ञ, त्याचबरोबर भारतीय संस्कृतीच्या सर्व बलस्थानांची मनोमन पूजा बांधणारा हा पुजारी. त्यांच्यात शास्त्रीय दृष्टिकोन आणि संस्कृतीह्यांचा सुंदर मिलाफ जाणवतो.
आपला देश, संस्कृती हे त्यांच्या आस्थेचे विषय आहेत. त्यांची ईश्वरावर श्रध्दा आहे. ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे. योगाभ्यास, अध्यात्मावर निष्ठा आहे. त्यांच्या मनी भारतीय संतांबद्दल अढळ श्रध्दा आहे. त्यांनी ज्ञानेश्वरीची पारायणे केली आहेत. त्यांच्या घरी सणवार साजरे होतात. ते किसनमहाराज साखरे यांच्या प्रवचनांतही रमतात. वारकऱ्यांइतक्याच भक्तिभावाने आळंदीला जातात.
– थिंक महाराष्ट्र
विजय भटकर याची अभ्यासू…
विजय भटकर याची अभ्यासू वृत्ती आणि मनासी त्यांनी केलेला निर्धार याचा प्रत्यकाने विचार केला तर भारत अमेरिकेला सुद्धा मागे टाकू शकतो हे विजय भटकर यांनी दाखवून दिले
Comments are closed.