Home संस्था गोष्ट फलटणमधील दीडशे गाव-ग्रंथालयांची (Rural School Libraries to Promote Reading)

गोष्ट फलटणमधील दीडशे गाव-ग्रंथालयांची (Rural School Libraries to Promote Reading)

गाव-ग्रंथालयांचा प्रयोग हे सिद्ध करू पाहत आहे, की लेखी मजकूर वाचणे आणि त्याचा अर्थ लावणे ही जादू मुलांना येऊ लागली, की मुले वाचनाला, पर्यायाने पुस्तकाला चिकटून राहतात. त्यांच्या हातात येणारी पुस्तके सुंदर चित्रांची, त्यांच्या भावविश्वातील विषयांची असतील तर पुस्तकांशी जोडली जातात. अन त्यांना मोकळ्या अभिव्यक्तीची संधी मिळाली, की ती कल्पनेत रमतात, व्यक्त होऊ लागतात आणि हीच किमया आहे, पुस्तकांच्या दीडशे गाव-ग्रंथालयांची…

प्रगत शिक्षण संस्थेची सुरुवात महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याच्या फलटण गावात 1978 साली झाली. संस्थेने स्वप्न उराशी बाळगले होते, कोणत्याही मुलाला शिक्षणापासून वंचित ठेवले जाणार नाही आणि त्याचे मन मारले जाईल अशा शाळेत त्याला जावे लागणार नाही ! वंचितांपासून ते उच्चवर्गीयांपर्यंत सर्वांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे गरजेचे आहे आणि प्रत्येक मूल जन्मतः शिकण्याच्या ज्या नैसर्गिक प्रेरणा घेऊन येते, त्या प्रेरणा शिक्षणाच्या प्रक्रियेत मारल्या जाऊ नयेत अथवा त्यांना लगाम बसू नये ही संस्थेची मुख्य तत्त्वे आहेत.

प्रगत शिक्षण संस्थेनेच देशभरात प्रयोगशील म्हणून ओळखली जाणारी ‘कमला निंबकर बालभवन’ ही शाळा सुरू केली. पण संस्थेने हे जाणले, की स्वतःच्या एक-दोन शाळा सुरू करून संस्थेचे व्यापक स्वप्न पूर्ण होणे शक्य नाही. ते स्वप्न सत्यात उतरवण्याचे असेल तर मुख्य प्रवाहातील म्हणजे शासनाच्या शाळांबरोबर काम करणे, त्यांच्या समस्या ओळखून त्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. त्यानुसार, शाळांबरोबर छोटेखानी प्रकल्प सुरू केले. कधी नगरपालिकेच्या शाळा, तर कधी जिल्हा परिषदेच्या शाळा अशा वेगवेगळ्या घटकांचा समावेश केला. त्या लहान प्रकल्पांतून मुख्यत्वे मराठी भाषा विविध आयामांतून कशी शिकवता येईल, मूल शाळेत कसे रमेल आणि त्याचा शाळेतील वावर तणावमुक्त कसा करता येईल याचा विचार केला जात होता. मात्र, विचार मोठ्या पातळीवर पोचावा यासाठी 2014 मध्ये विशेष प्रयत्न सुरू करण्यात आले.

त्या प्रयत्नांना यश ऑक्टोबर 2015 मध्ये आले. शासनाने फलटण तालुक्यातील एकशेपंचेचाळीस जिल्हा परिषद शाळा आणि पाच आश्रमशाळा यांच्यासोबत काम करण्यासाठी परवानगी दिली. US-AID, Tata Trust, Centre for Micro Finance यांनी आर्थिक भार उचलला आणि Nurturing Early Literacy in Primary Schools in Phaltan Block (NELPSPB) हा प्रकल्प अस्तित्वात आला. वाचणे म्हणजे इतर कोणी लिहिलेले शब्द वाचणे आणि लिहिणे म्हणजे स्वतःचे शब्द उतरवणे. मुलांना गोष्टी ऐकण्यातून जो आनंद मिळतो, तोच आनंद गोष्टी वाचतानाही मिळाला तर ती खऱ्या अर्थाने साक्षर झाली असे म्हणता येईल.

मुले अर्थ न समजता वाचतात तेव्हा त्यांना काहीतरी नीट कळलेले नाही हे त्यांच्या लक्षात येत नाही. म्हणजे ती फक्त अक्षरे ओळखण्याचा/वाचण्याचा सराव करत असतात. त्यांना अक्षर-वाचन करणे हे फक्त समजलेले असते. माणूस वाचतो, त्याला त्याचा अर्थ समजला पाहिजे ना ! अर्थासाठी वाचन ही बाब मुलांच्या लक्षात सातत्याने आणून देण्याची असेल तर बालसाहित्य म्हणजे पुस्तके यांच्याशिवाय पर्याय नाही ! म्हणून संस्थेने दीडशे गावांत गाव-ग्रंथालये उभी करण्याचा निर्णय घेतला. त्यात मुख्य सहभाग त्या-त्या गावातील जिल्हा परिषद शाळांचा घ्यावा असेही ठरले.

जी मुले अक्षर-ओळखीपासून कोसो दूर होती, ती मुले पुस्तकांच्या साथीने लवकर आणि चांगल्या प्रकारे वाचू लागली आणि मनातील भाव बोलण्यात, कागदावरील लिहिण्यात उतरवू शकली. त्याचे कारण त्यांच्या आवडीची पुस्तके त्यांनाच सहभागी करून घेत वाचून दाखवण्यात आली. त्यातून मुलांची लेखी मजकुराची जाण वाढत गेली, मुलांमध्ये वाचनाविषयी आवड निर्माण होताना दिसली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मुले जे वाचतील त्यावर कोणतीही परीक्षा द्यायची नाही हे मुलांना समजल्यावर ती कोणतेही दडपण न घेता वाचू लागली !

मुलांनी वाचनातून भाषेच्या अनेक लकबी सहज आत्मसात केल्या. लेखी मजकूर वाचणे आणि त्याचा अर्थ लावणे ही जादू एकदा का मुलांना येऊ लागली, की ती वाचनाला चिकटून जातात. त्याच टप्प्यावर त्यांच्या हातात अधिकाधिक चांगली, त्यांच्या भावविश्वातील विषय असणारी पुस्तके पडणे गरजेचे असते. मुलांना आवडतील अशी चांगली पुस्तके शोधणे आणि ती पुरवणे हे विशेष आव्हान आमच्यासमोर होते. आमचे वाचक म्हणजे जिल्हा परिषद शाळांतील ग्रामीण भागातील विद्यार्थी. त्यांची छोटेखानी ग्रंथालये दीडशे गावांत सुरू झाली. चांगले बालसाहित्य मुलांना द्यावे, यासाठी प्रकल्पात गोष्टींची पुस्तके तयार करण्यासाठी विशेष आर्थिक तरतूद केली होती. आठ चांगली ‘रीडर्स’ गेल्या पाच वर्षांत तयार झाली आहेत.

मुलांच्या रोजच्या अनुभवातील विषय आणि भाषा हे मुलांच्या भावमनाला स्पर्शून गेले. सावलीतील शेळी आणि इतर कथा, गाबूशेटचा पंजा, कुंपणाच्या आत कोंबडा ओरडला, चला कुरड्या करू, निळ्याशार आकाशाखाली म्हशी, भुरा लांडगा, मासेमारी अशा तऱ्हतऱ्हेच्या कथा ! त्यातून नवनवीन गोष्टी आणि चित्रे मुलांकडून आपसूक बाहेर आली. त्या गाव-ग्रंथालयांत शाळेतील मुले केवळ पुस्तके घेतात, वाचतात आणि ठेवतात असे होत नाही, तर प्रत्येक गावात त्याच गावातील एक जण ग्रंथपाल असतो. तो मुलांना कधी पुस्तके वाचून दाखवतो, तर कधी पुस्तकांबरोबर काही उपक्रम घेऊन पुस्तकांशी वेगळे नाते जोडून देतो. मुले पुस्तके घेऊन घरी जातात; भन्नाट गोष्टींची ती पुस्तके त्यांच्या आजोबांना, आई-बाबांना त्यांचे काम सुरू असताना वाचून दाखवतात. पुस्तके कधी शेतावर काम करणाऱ्यांकडे जातात, कधी मंदिरात बसलेल्या आजोबांकडे, तर कधी एकदोन वर्षांच्या बाळांकडेही. पुस्तके परत येतात ती त्यांच्या सोबत गावातील, अगदी गावकुसातील आणि डोंगरावरीलही त्यांच्या पुस्तकमित्रांना घेऊन !

अशी येणारी मुले त्यांचा प्रवास गाव-ग्रंथालयांत नोंदवतात आणि पुन्हा नवी पुस्तके घेऊन निघतात आगळ्यावेगळ्या नव्या प्रवासाला. जेथे ग्रंथपाल जाऊ शकत नाहीत, तेथे गावातच हे ‘छोटे ग्रंथपाल’ पुस्तके घेऊन तत्पर असतात. ते वाड्या-वस्त्यांवर पुस्तके पोचवतात. अशा आगळ्या-वेगळ्या गाव-ग्रंथालयांमुळे मागील पाच वर्षांत एक नाही, दोन नाहीत, तर तब्बल दीडशे पुस्तकांची गावे तयार झाली आहेत ! दडसवस्तीचे शिक्षक सांगतात, ‘वर्गात मुलांना शांत करणे, वर्गात नुसता गोंगाट न होऊ देणे हे एक आव्हान असते. मुलांना जेव्हा शांत करायचे असते, तेव्हा मी एक छोटे पुस्तक हातात घेऊन वाचण्यास सुरुवात करतो. मुले हळुहळू शांत बसू लागतात. शिक्षक जेव्हा वर्गात नसतात, तेव्हा एखाद्या मुलाला प्रगट वाचनासाठी पुस्तक देऊन वाचण्यास सांगितले तरी मुले चांगला प्रतिसाद देतात.’ जावलीचे ग्रामस्थ म्हणाले, ‘काही गाव-ग्रंथालयांत मुले त्यांच्या पालकांना गोष्टींची पुस्तके वाचून दाखवतात. त्यामुळे कधी न ऐकलेल्या भन्नाट गोष्टी ऐकून पुस्तके नकळत पालकांच्या हातात जातात. काही ठिकाणांहून पालक, आम्हालाही पुस्तके द्या अशी मागणी करत असतात.’

आमचा गाव-ग्रंथालयांचा प्रयोग हे सिद्ध करू पाहत आहे, की लेखी मजकूर वाचणे आणि त्याचा अर्थ लावणे ही जादू मुलांना येऊ लागली, की मुले वाचनाला/पुस्तकाला चिकटून जातात. त्यांच्या हातात येणारी पुस्तके सुंदर चित्रांची, त्यांच्या भावविश्वातील विषयांची असतील तर मुले पुस्तकाकडे का नाही ओढली जाणार? ही पुस्तके मुलांना त्यांची बनवतात. मोकळ्या अभिव्यक्तीची संधी मिळाली, की मुले कल्पनेत रमतात. पूर्वानुभवांचे बोट धरून त्याही पुढे भराऱ्या मारू लागतात. मग ती व्यक्त करू लागतात त्यांच्याच दुनियेतील भन्नाट कल्पना आणि तेच आम्हाला पाहण्यास मिळते आमच्या पुस्तकांच्या दीडशे गाव ग्रंथालयांत !

गाव-ग्रंथालयांचा 2015 मध्ये सुरू झालेला प्रकल्प मार्च 2020 मध्ये संपणार होता. प्रकल्पाची मुदतच साडेचार वर्षांची होती. मात्र, प्रकल्प संपल्यानंतरदेखील काम सुरू राहणे महत्त्वाचे होते. त्यासाठी प्रकल्पाचे बीज पेरतानाच पुरेसा विचार केला होता. आम्ही सुरुवातीपासूनच ती ग्रंथालये अविरत सुरू राहवीत आणि त्यांतील पुस्तके वाढत जावीत यासाठी ग्रामस्थ, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्या संपर्कात होतो. त्यांनी प्रकल्पानंतर हे काम सुरू राहण्यासाठी पुढाकार घ्यावा याबाबत पाठपुरावा करत होतो. आम्हाला त्यात फारसे यश आले नाही. तेव्हा आम्ही असा विचार केला, की ती ग्रंथालये गावातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विलीन करावीत. त्यामुळे शाळा आणि शिक्षक याच प्रकल्पाचा भाग होतील. आम्ही शिक्षकांसाठी ग्रंथालय प्रशिक्षण मार्च 2020 पूर्वी सुरू केले आणि ते पार पाडले होते. सर्व गाव-ग्रंथालये शाळेत विलीन करूनदेखील झाली होती. शिक्षक या पुस्तकांचा वापर करतील अशी आशा होती. मार्च 2020 मध्ये सुरू झालेला कोविड काळ ते काम पूर्णतः थांबवून टाकेल असे वाटत होते. मात्र, पहिले सहा महिने वगळता पुस्तकांचा वापर गावात सुरू असलेला दिसून आला. जेव्हा शाळा बंद होत्या, तेव्हा ग्रामस्थ आणि शिक्षक यांच्या मदतीने मुलांना पुस्तके दिली जात होती. ते काम दीडशे गावांपैकी सदुसष्ट ठिकाणी जिवंत राहिले आहे. तेथे शिक्षक या ग्रंथालयाचा वापर करून मुलांसाठी पुस्तकांचे जग खुले करतात !

 – प्रकाश बापूराव अनभुले anbhuleprakash@gmail.com

(साधना, सप्टेंबर 2018 वरून उद्धृत, संपादित-संस्कारित)

——————————————————————————————————————————

About Post Author

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version