Home मोगरा फुलला वृत्तबद्ध कविता- स्थिती आणि गती (Poetry Writing in Metre – Present Scenario)

वृत्तबद्ध कविता- स्थिती आणि गती (Poetry Writing in Metre – Present Scenario)

मराठी कवितेच्या सर्वसाधारण वाचकाची अशी समजूत असते की वृत्तबद्ध कविता ही काहीतरी भूतकाळातली गोष्ट आहे. कवितेला वृत्तामध्ये बांधण्यामुळे आशयाला धक्का लागतो किंवा अभिव्यक्तीवर बंधने येतात. वृत्ताविषयी अशीही समजूत असते की व्याकरणाच्या पुस्तकात असतात तेवढीच वृत्ते अस्तित्वात आहेत. प्रत्यक्षात अनेक कवी आजही वृत्तबद्ध कविता लिहितात आणि तीही समर्थपणे लिहितात. नवीन वृत्ते जन्माला येत आहेत. तरुण कवी वृत्तांमध्ये कविता लिहित आहेत.

वृत्तबद्ध कविता लिहिणाऱ्यांमधले महत्त्वाचे नाव म्हणजे आघाडीच्या कवयित्री भारती बिर्जे. त्या ‘वृत्तबद्ध कविता : स्थिती आणि गती’ या त्यांच्या लेखात सांगत आहेत वृत्तबद्ध कवितेच्या सध्याच्या स्थितीविषयी आणि वृत्तबद्ध कविता लिहिताना आलेल्या अनुभवांविषयी. कवितेविषयी आस्था असणाऱ्या वाचकांनी वाचायलाच हवा असा लेख. ‘मोगरा फुलला’ या थिंक महाराष्ट्रवरील दालनातील इतर लेख सोबतच्या लिंकवरून वाचता येतील.

– सुनंदा भोसेकर

वृत्तबद्ध कविता- स्थिती आणि गती

मी एका सजग भाषाशिक्षकाची मुलगी म्हणून व्याकरणाची पुस्तके आवडीने कथाकादंबऱ्यांसारखी वाचली होती आणि किशोर वयापासून कवितेचे वाचनही प्रेमाने केले होते, पण व्याकरणाच्या पुस्तकातील वृत्ते आणि कवितावाचन, कवितालेखन यांचा काही संबंध असतो हे मला खरंच माहीत नव्हते. या दोन्ही गोष्टी चक्क वेगवेगळ्या कप्प्यांत होत्या ! बोरकरांच्या, मर्ढेकरांच्या कविता वाचताना त्यातली नादमयता मोह घालत होती, पण ही तीच त्या, रुक्ष समजल्या जाणाऱ्या व्याकरणाच्या पुस्तकातली वृत्तं आहेत याची जराही जाणीव नव्हती. एकच अगदी साधे उदाहरण देते.

“कचकृष्णकलापविलासित तू
सितवस्त्रसुशोभित पुष्पमयी
कमलाक्षपदे कलहंसगती
शिरता सखि या अभिरामगृही..”

– या, बोरकरांच्या सुंदर संस्कृतप्रचूर ओळी ‘तोटक’ या वृत्तातल्या आहेत हे मला मुळीच माहीत नसताना मोहक लयीमुळेच त्या मनावर कायमच्या कोरल्या गेल्या होत्या.

माझ्या स्वतःच्याही ‘मध्यान्ह’ या पहिल्या कवितासंग्रहातील कवितांमध्ये नकळत काही महत्त्वाची वृत्तं डोकावून गेली आहेत हेही कोणी कधी सांगितले तरी तिकडेही लक्ष वेधले गेले नव्हते. मला ती जाणीव विकसित व्हायला मायबोली या संकेतस्थळावरील आभासी जगतातल्या माझ्या पहिल्या मित्रवर्तुळाची मदत झाली, तेव्हा कोठे खऱ्या अर्थाने वृत्तांकडे माझे लक्ष गेले आणि वृत्तबद्ध कविता लिहिताना वृत्ताची शिस्त पाळायची असते हा पहिला धडा मिळाला. यानंतर सोशल मीडियावरतीच स्वामीजी निश्चलानंद यांच्याशी परिचय झाला आणि वृत्तबद्ध कवितालेखनाचे एक सफल सत्र मी अनुभवले. वृत्तांचे चिंतन चालू असल्याने या दरम्यान ‘नीलमवेळ’ या माझ्या दुसऱ्या संग्रहात प्रचलित, अप्रचलित वृत्तांमध्ये पन्नाससाठ कविता अवतरल्या. पण हा एक पूर्वग्रहविरहित स्वाध्याय होता. जी नकळता स्फुरतात ती वृत्तं आहेत तरी काय हे कवी-कुतूहल त्यामागे होते. तेव्हाही वृत्तबद्ध कवितांच्या सोबतीने मुक्तछंद आणि साध्या पद्यबंधातील अनेक कविताही या संग्रहात होत्या. माझ्या ‘अभिरामप्रहर’ या तिसऱ्या संग्रहात कथनकाव्याचा बाज असल्याने आकृतिबंधांची अशीच सरमिसळ होती.

वृत्तांविषयी अगदी थोडक्यात आणि सोपे करून सांगायचे, तर शब्दोच्चारांच्या वजनानुसार त्यांच्या लघु आणि गुरु मात्रा ठरतात. जेव्हा कवितेच्या प्रत्येक चरणातील प्रत्येक अक्षराचे नियमन विशिष्ट लघु-गुरु क्रमाने केलेले असते, तेव्हा ते अक्षरगणवृत्त (जसं की भुजंगप्रयात, शार्दूलविक्रीडित, शिखरिणी) असते आणि जेव्हा प्रत्येक ओळीतील एकूण मात्रांची आवर्तने सारखी असतात, तेव्हा ते मात्रावृत्त असते. हरावर्तनी, भृंगावर्तनी, अग्न्यावर्तनी आणि पद्मावर्तनी अशी, मात्रावृत्तांमध्ये अनुक्रमे पाच सहा सात आणि आठ मात्रांची आवर्तनं असतात. त्यामुळे एका ओळीतील एकूण मात्रा समान असल्या तरी त्यांची अंतर्गत घटना वेगवेगळी असू शकते. मात्रावृत्तात एका गुरु अक्षराऐवजी दोन लघु अक्षरे या प्रकारची सूट घेता येते. जेथे प्रत्येक ओळीत अक्षरांची संख्या समान, ते छंद. या सर्व नियमनातून कवितेत निरनिराळ्या प्रकारची लयबद्धता प्रकटते. आशयही तोलामोलाचा असल्यास कवितेचे सौंदर्य आणि प्रभाव वाढतो. ही प्रक्रिया अंत:स्फूर्तीने होते. कवितेचे साकार होणे ही एक व्यामिश्र प्रक्रिया आहे. अभ्यास आणि आनंद यांतला कोणताही घटक कमी महत्त्वाचा नाही. या दोन्हींच्या संतुलनातून जेव्हा वृत्तबद्ध कविता साकारते तेव्हा तिच्यातून डॉ. प्रतिभा कणेकर यांच्या शब्दात सांगायचं तर “कवीचा रियाज प्रकट होत असतो”.

मराठी भाषेत ह्या विषयावर सर्वप्रथम आणि सर्वाधिक अभ्यास कवी माधव जूलियन अर्थात प्रा.माधवराव पटवर्धन यांच्या ‘छंदोरचना’ या ग्रंथात आलेला आहे. या ग्रंथाचं वाचन करताना छंद आणि वृत्तांच्या संस्कृत साहित्यामधून आलेल्या आणि नंतर अरबी-फारसी छंदशास्त्राच्या अभ्यासातून गझल या आकृतिबंधाच्या मागोमाग भारतात आलेल्या अशा अनेकानेक आकृतिबंधांच्या  महासागरात आपण अक्षरशः गटांगळ्या खातो. अलीकडच्या काळात कवयित्री वर्षा बेंडीगेरी कुलकर्णी यांनी अभ्यासपूर्वक आणि स्वरचित उदाहरणे देऊन अनेक महत्त्वाच्या वृत्तांचा ऊहापोह करणारं ‘वृत्तबद्ध कविता – कला आणि शास्त्र’ हे पुस्तक लिहिलेलं आहे.

साठोत्तरी, नव्वदोत्तरी, आधुनिक, आधुनिकोत्तर अशा ज्या काव्यचर्चा घडत आहेत त्यांत वृत्तबद्ध कवितेला किंवा एकूणच कवितेच्या प्राचीन आकृतीबंधांना नाक मुरडण्याची एक सरसकट वृत्ती मराठीत, देशात आणि जगभरही आहे, तर दुसरीकडे वृत्तबद्ध कवितेला अगदी वाहून घेऊन लेखन करणारे असेही गट तयार झाले आहेत. यांत चांगले वृत्तबद्ध कवितालेखन करणारी अनेक नावे आहेत. क्रांती साडेकर, अमेय पंडित, संतोष वाटपाडे ही तीन ठळक नावे घेते. तिसरीकडे या कोणत्याच गटात नसलेले पण विशुद्ध कवितेवर प्रेम करणारे असेही लोक आहेत.

या सर्वच प्रकारच्या आग्रहांपलीकडे जाऊन कवितेचा महाप्रवाह न्याहाळला पाहिजे. कवींना कविता पूर्वी आणि आजही अनेकदा पद्यामध्येच सुचलेली आहे. ही प्रक्रिया कवितेच्या समग्रतेत पूर्वापार सामावली गेलेली आहे. कवितेचं सुंदर पद्यमय आकृतिबंधात प्रकट होणे हा कवीसाठी खूप मोठा थरार आहे. कवी असण्याची ती एक महत्त्वाची नीजखूण आहे. ही अशी अजाणता स्फुरलेली कविता कोणत्या तरी प्रचलित वृत्ताच्या कमीअधिक जवळ असते, कारण त्या वृत्ताच्या नादलहरी भाषिक संस्कारांमधून कवीच्या नेणिवेत साठवल्या गेलेल्या असतात.

कवितेच्या रसिकासाठी यात सर्वाधिक आनंदाची गोष्ट ही असते, की पद्य किंवा वृत्तबद्ध कविता तिच्या नादमयतेमुळे मनात घर करून राहते, उद्धृत करता येते. इथे एक बारकावा असा आहे की सर्वसामान्य रसिक वाचकाला साधे पद्य आणि वृत्तबद्ध कविता यांच्यातल्या फरकाशी काही देणेघेणे नसते आणि तो त्यांच्या श्रेणीही लावत नाही. वृत्तबद्ध लेखनातल्या काटेकोर चुका किंवा त्यात घेतली गेलेली सूट त्याच्या गावीही नसते. त्यामुळे सहजासहजी त्याचा रसभंगही होत नाही. कोणतेही त्याला भावलेले पद्य त्याच्या लक्षात निश्चितपणे राहते. या सर्व कोलाहलात वृत्ताची शिस्त पाळणे, व्रतस्थपणे निव्वळ वृत्तबद्ध लिहिणे ही गोष्ट सोपी नाही. आजही स्वामीजी निश्चलानंद यांच्यासारख्या कवींनी हे व्रत अंगीकारलेले आहे. लय निसर्गातच अंतर्भूत असतात हा ठाम विचार यामागे आहे.

मात्र याच निसर्गात लय विस्कटलेले, ओबडधोबड, आकृतिबंधात न बसणारे असेही रूपाविष्कार असतात, तसेच ते कवितेतही असू शकतात. या वस्तुस्थितीचा स्वीकार वृत्तबद्ध कवितेचे उपासक करणार नाहीत आणि दुसऱ्या बाजूला मुक्तछंदाच्या समर्थकांना वृत्तबद्धता कायमच कृत्रिम वाटत राहील. कवयित्री सुनंदा भोसेकर यांच्या शब्दांत थोडा बदल करून सांगायचं तर – “चिरायू होवोत हे भेदाभेद आणि संघर्ष, आपण चांगल्या कविता अनुभवत राहू !”

हे सत्य गेल्या पिढीतल्या मराठी कवींना निश्चितच माहीती होते आणि म्हणून पाडगावकर, बापट आणि करंदीकर या रसिकमान्य कवित्रयीने अनेक वृत्तांमधून आणि मुक्तछंदातही मुक्तपणे कवितालेखन केले होते. ग्रेस यांच्या कवितेत मुक्तछंद आणि वृत्तबद्धता या दोन्हींचा गूढमधुर, सौंदर्यविलासी असा आविष्कार आहे. अगदी बंडखोर कवी दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनीही प्रासंगिक कवितालेखन वृत्तबद्धतेत केले आहे. मात्र या सर्वांनी वृत्तांमधून लिहितानाही वृत्ताच्या शिस्तीपेक्षा आशयाला अग्रक्रम दिला असे अनेक ठिकाणी जाणवते आणि मला ते योग्यही वाटते. कवी अनिल यांनी काळाची आणि आकृतिबंधाची सहृदयतेने सांगड घालणारे कवितालेखन केले. न ठरवता साकारलेल्या ‘दशपदी‘ या दहा ओळींच्या अभिनव कविता-आकृतिबंधात अनिलांनी यमक आणि मात्रा यांचा अनाग्रही, सैलसर असा वापर करून कवितेला मोकळा श्वास घेऊ दिला आणि रसिकांना एक ताजी रसानुभूती दिली.

कवितेचे नैसर्गिक सौंदर्य, तिच्यात सामावलेली साक्षात्कारासारखी सहजता शब्दांच्या वजनामापाला अधिक महत्त्व दिल्याने वृत्तबद्ध कवितेत गमावली जाऊ शकते. अर्थात कवी जितका अभ्यास आणि परिशीलन वाढवेल तितका व्याकरणीय निर्दोषतेच्या जवळ जाईलही, पण  कवी बहुधा अभ्यासापेक्षा उत्स्फूर्ततेला अधिक महत्त्व देणारा असतो, बंधन पाळण्यापेक्षा फेटाळणारा अधिक असतो. विरचनावादाच्या या काळात ही वृत्ती अधिकच बळावली आहे, त्यामुळे व्याकरणीय शिस्तीच्या चौकटीत कवीने किती काळ राहवे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. वृत्तबद्ध कविता ही भूतकाळाची देणगी आहे. मात्र वर्तमानकाळाचा प्रभावही ह्या कवितेवर दिसायला लागला आहे. बदलत्या वर्तमानाची भाषा, कवितेला व्यापणारा समकालीन अवकाश, बदललेली वेळापत्रके, दिनमान, आयुष्यमान, ज्ञानशाखांवर आणि प्रतिभाविलासावरही झालेले अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे आक्रमण, युद्धखोरी, दहशतवाद हे समकालीन कवींच्या संवेदनाविश्वाला म्हणजेच पर्यायाने कवितेला वेढणारे पर्यावरण आहे.

नवा आशय जुन्या वृत्तांमध्ये पेरण्याची क्षमता मुळातच असावी लागते. जशी ती कालच्या पिढीत मर्ढेकरांकडे होती. त्यांनी तर सर्वच लेखन वृत्तांमध्ये केले आहे. उलट मुक्तछंद लिहिण्यासाठी त्यांना इरेस पडावे लागले असे त्यांनी त्यांच्या एका प्रसिद्ध कवितेत म्हटले आहे. त्यांनी मुक्त अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य घेतलेच असेल तर तुलनेने सोपा आकृतिबंध मानल्या गेलेल्या अभंगांची निर्मिती करून. हे अभंगही आशयदृष्ट्या महायुद्धकालीन पार्श्वभूमीवरचे “नतद्रष्ट अभंग” होते हे विसरता येत नाही. बालकवी यांच्या “हिरवे हिरवे हिरवे गार गालिचे | हरित तृणांच्या मखमालीचे ||”- या पादाकुलक वृत्तात लिहिलेल्या सुरम्य कवितेशेजारी, त्याच वृत्तांत मर्ढेकरांच्या “पिपात मेले ओल्या उंदिर ” किंवा “येशिल तेव्हा जपून ये तू | ठिसूळ माझ्या पहा बरगड्या”; या आणि अशा  धक्कादायक अपारंपरिक आशयाच्या त्याच वृत्तातील ओळी ठेवून पाहता येतील.

वृत्तं ही लघुगुरूक्रमाचे सातत्यपूर्ण आकृतिबंध असल्याने नवी वृत्तं कवींकडून लिहिली जाणेही शक्य आहे. दोन स्वानुभव सांगते. ‘नीलमवेळ’मधली “कृष्णा” ही कविता अशाच अप्रचलित वृत्तात असल्याने (याची लगावली लगागागा लगागागा लगागा गागागागा अशी, म्हणजेच वियद्गंगा या वृत्ताअखेरीस अधिक तीन गुरू जोडून झालेली) मी त्या वृत्ताचं “कृष्णा” असं नामकरण केलं. “जसे तू प्राण लिहिले हे तशा प्रेमाने कृष्णा | हवेवर मी प्रकाशाचे लिहावे गाणे कृष्णा ||” अशा या मुसलसल (एकाच विषयावरील) गझलेच्या पहिल्या दोन ओळी होत्या. कालिदासांच्या ‘ऋतुसंहारा’तील शरद्ऋतुवर्णन अनुवादताना अजूनच गंमत झाली. हे मला शिखरिणी वृत्तात करायचे होते, पण मी लिहिताना शिखरिणीचे वृत्तलक्षण चुकून बदलले. “लगागागागागा लललललगा गाल ललगा” ऐवजी “लगागागागागा लललललगा गालगा गालललगा” अशा क्रमात, पण सातत्याने सगळे लिहून झाल्यावर जेजुरीचे स्नेही अतुल सुलाखे यांच्या “सत्संग” समूहातील विचक्षण मित्रांनी ही चूक काढली. आता हे सगळे बदलणे मला अशक्य होते. मग या चुकीतून जन्मलेल्या नव्या वृत्ताचं तरूण प्राच्य विद्याभ्यासक हेमंत राजोपाध्ये यांनी “सद्भारती” असे नामकरण केले. (हे क्लिष्ट वाटू शकेल, म्हणून रचनेची लिंक सोबत जोडली आहे.)

कवींच्या मनात असंख्य नव्या लयी जन्मू शकतात, सातत्य ठेवून त्यांची निर्मितीही होऊ शकते. मात्र त्या नक्की नव्या आहेत ना याची खात्री विद्वत्जनांकडून करून घ्यायला हवी कारण माहीती नसलेली पण अस्तित्वात असलेली वृत्तंही अनेकानेक आहेत.

वृत्तांचे सौंदर्य हे जर कवितेचे एक लक्षण असेल तर तिची दुसरी ओळख परिचिताला अपरिचित आणि अपरिचिताला परिचित करण्याची तिची शक्ती ही आहे. ही ओळख न हरवता वृत्तांमध्ये लिहिण्याची क्षमता असेल तर ते कवितालेखन काळाच्या कसोटीवर टिकून राहील. वृत्तबद्ध कविता समकालीन आणि सर्वकालीन आशयाची निश्वसिते पेलू शकली तर ती निश्चितपणे सखोल आनंदाचा अधिक रसपूर्ण अनुभव रसिकांना देईल. अन्यथा प्रेम, निसर्ग, अध्यात्म या चाकोरीत ती जुने वळण नव्याने गिरवत फिरत राहील. वृत्तबद्ध कवितेच्या विरोधी आणि संवादी अशा या दोन्ही बाजू समजून घेऊन समकालीन वृत्तबद्ध कवितेकडे आपण अपेक्षेने पाहिले पाहिजे.

भारती बिर्जे 8080744022 bharati.diggikar@gmail.com

About Post Author

10 COMMENTS

  1. अभ्यासपूर्ण लेख.
    अनिल यांच्या दशपदी च उल्लेख आवडला.
    लहानपणी वृत्ते लक्ष्यात ठेवण्यासाठी
    “न न म य य गणानी मालिनी वृत्त होते”
    “होई वसंततिलका त भ जा ज गा गी”
    असे गण लक्ष्यात ठेवण्यासाठी पाठ केले होते ते ही य लेखाने pop up zale.

  2. लेख नक्कीच अभ्यासपूर्ण आणि छान माहिती देणारा आहे. आज मराठी भाषेच्या वापराबद्दल चिंता वाटण्यासारखी परिस्थिती असताना मराठी साहित्यातील ‘ कविता ‘ या काहीश्या दुय्यम ठरल्या ( का ठरवल्या) गेलेल्या साहित्य प्रकाराबाबत अश्या प्रकारचे लेखन सातत्याने वृत्तपत्रात आणि ‘ e ‘ माध्यमांवर येत राहणे खूप गरजेचे आहे.

  3. खूप छान लेख, वाचल्याने ज्ञान मिळाले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version