व्यवसायोपचार हा रुग्णाला त्याच्या स्वत:च्या पायावर उभा करतो. त्याला जीवन जगण्याची जिद्द देतो. शारीरिक अथवा मानसिक दृष्ट्या अपंग असणाऱ्यांच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन तज्ज्ञांनी वैद्यकशास्त्राच्या सूचनेनुसार विकसित केलेल्या विकासात्मक कृतींद्वारे दिला जाणारा उपचार म्हणजे व्यवसायोपचार. विशिष्ट अवयवाला व्यायाम देण्यासाठी त्या उपचार पद्धतीत एखाद्या व्यवसायाची निवड केली जाते. त्यात विणकाम, शिवणकाम, क्रोशेकाम, सुतारकाम, हातमाग, वेताचे विणकाम यांसारख्या विविध व्यवसायांचा अंतर्भाव होतो. एखादी विशिष्ट हालचाल एखादा व्यवसाय करताना वारंवार झाली तर ती कंटाळवाणी वाटत नाही; अवयवाला भरपूर व्यायाम होतो आणि नवनिर्मितीचा आनंदही मिळतो. रुग्णाला व्यायाम प्रकार म्हणून त्याच्या आवडत्या व्यवसायाची निवड करता येते. व्यवसायोपचाराचे तंत्र भारतातच नव्हे तर आशियातही प्रथम आणले ते कमलाबाई निंबकर यांनी.
मात्र व्यवसायोपचार हा केवळ व्यवसायाद्वारे शारीरिक व्यायाम देणारा उपचार नाही, तर व्यवसायोपचार तज्ज्ञ रुग्णाला कृत्रिम अवयव, बूट, कॅलिपर इत्यादी साधने कशी वापरावीत आणि ती वापरताना दैनंदिन वर्तनव्यवहारात योग्य ते बदल कसे करावेत याचे प्रशिक्षण देतात. व्यसायोपचार तज्ज्ञ नुकत्याच अपंग झालेल्या व्यक्तीला रोजचे खाणेपिणे, कपडे घालणे, वेणी घालणे, लिहिणे इत्यादी व्यवहार त्याचे अपंगत्व स्वीकारून कसे करता येतील याचे प्रशिक्षण देतात. व्यवसायोपचाराने भावनिक उद्रेकांचे नियमन करणे व तीव्र भावनांचा निचरा करणे यांसही मदत होते. हा उपचार मनोरुग्ण व इतर व्यक्ती यांच्यामधील आंतरसंबंध चांगल्या प्रकारे विकसित करण्यासही मदत करतो. व्यवसायोपचार तज्ज्ञ रुग्णाच्या कामाच्या ठिकाणी जाऊन, रुग्णाची शारीरिक मर्यादा समजावून सांगून त्याच्यासाठी त्या मर्यादेत करता येईल असे पर्याय शोधू शकतो व त्या पर्यायांसाठी लागणारी कौशल्ये शिकवतो. व्यवसायोपचाराच्या या प्रचंड आवाक्यामुळे तो केवळ अस्थिव्यंग असणाऱ्यांना नव्हे तर कुष्ठरोगी, क्षयरोगी, भाजलेले रुग्ण, मनोरुग्ण, हृदयरोगी, मतिमंद, अंध, वृद्ध, तुरुंगातील कैदी अशा अनेकांना नवे आयुष्य, नवी दिशा देऊ शकतो.
– डॉ. मंजिरी निंबकर 9822040586 manjunimbkar@gmail.com
————————————————————————————————————-