ॲनिमल हा सध्याचा प्रचंड लोकप्रिय चित्रपट. या चित्रपटाने हिंदी चित्रपटातील नायकाची प्रतिमा बदलली. शक्तिमान तरीही सहृदय ही नायकाची प्रतिमा मागे सारून नायकाची रासवट, नरपुंगव अशी प्रतिमा या सिनेमाने पुढे आणली आहे. ‘अल्फा-मेल’ अशी संज्ञा या प्रतिमेच्या निमित्ताने चर्चेत आली आहे. हा नायक सभ्य, सुसंस्कृत वागणुकीवर विश्वास ठेवत नाही की शासनव्यवस्थेची पत्रास बाळगत नाही. पुरुषप्रधान व्यवस्थेचे प्रतिनिधित्व करणारा, संवेदनाहीन आणि केवळ हिंसेवर निष्ठा असलेला हा नायक समाजाच्या बदलत्या मूल्यभानाचे प्रतिक ठरत आहे का आणि इथून पुढे हीच प्रतिमा अधिकाधिक बळकट होत जाईल का? याविषयी चर्चा करत आहेत कथालेखक, पत्रकार आणि चित्रपट निर्माती अपर्णा पाडगांवकर. ‘थिंक महाराष्ट्र’वरील ‘मोगरा फुलला’ या सदरात प्रकाशित झालेले इतर लेख वाचण्यासाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करा.
-सुनंदा भोसेकर
ॲनिमल चित्रपटाच्या निमित्ताने…
‘ॲनिमल’ हा चित्रपट तीन आठवड्यांपूर्वी प्रदर्शित झाला आणि त्यासंबंधी मतमतांतरांचे वादळ उठले. हा चित्रपट स्त्री-विरोधी आहे, हा सर्वसाधारण सूर होता. ‘अल्फा मेल’ ही संकल्पना ठसठशीतपणे सिनेमात मांडली गेली आहे आणि कवी-लेखकांची संभावना दुय्यम प्रतीचे पुरुष म्हणून केली गेली आहे. याबद्दल संवेदनशील कवी व अभिनेते स्वानंद किरकिरे यांनी रास्त विरोधी प्रतिक्रिया दिली. सहज कानावर पडलेल्या एका जोडप्याच्या संवादातून असे दिसले की चित्रपटातून जो संदेश जाऊ शकतो, त्याच्या विरोधात पती बोलत होता मात्र त्याच्या पत्नीला चित्रपट बेहद्द आवडला होता.
या उलटसुलट प्रतिक्रियांमुळेच कुतूहलाने मी हा चित्रपट पाहिला. ॲनिमल म्हणजे प्राणी. ॲनिमल इंस्टिंक्ट किंवा किलिंग इंस्टिंक्ट हा शब्द आपण अनेकदा ऐकलेला आहे – विशेषतः खेळांच्या बाबतीत. कॉर्पोरेट युद्धाचे तपशील जनसामान्यांपर्यंत पोचत नसले तरीही तिथेही यशस्वी होणाऱ्याच्या वृत्तीला हेच बिरूद दिले जाते आणि ते अभिमानाने मिरवलेही जाते. दुसऱ्याला मारून किंवा कमाल नुकसान पोचवून आपण यशस्वी व्हायचे, हे ते इंस्टिंक्ट. सर्व्हायव्हल इंस्टिंक्ट आणि किलर इंस्टिंक्ट या दोन संज्ञा परिस्थितीनुरूप एकमेकींच्या विरोधी किंवा समानार्थी ठरतात. या पार्श्वभूमीवर या चित्रकृतीकडे पाहिले पाहिजे.
हिंसा हा प्राणीज भावनेचा भाग आहे. शिकारी टोळी म्हणून वावरत असण्याचा मानवाचा होमो सेपियन्सचा इतिहास साधारणतः तीन लाख वर्षांपासूनचा आहे. (सर्वात जुने होमो सेपियन अवशेष मोरोक्कोच्या खाणींमध्ये सापडले आहेत) तर शेतीचा शोध आणि तदनुषंगिक नागरीकरणाचा इतिहास हा बारा हजार वर्षांचा आहे. शिकारी असण्याच्या काळात आपण स्वतःही शिकार होऊ शकतो, ही भीती मानवाच्या मनात असणारच. तेव्हा जीवाची भीती असेल तर पळून जायचं किंवा भूक अनावर असेल, तेव्हा काहीही करून समोरच्या प्राण्याचा खातमा करायचा, हेच मानवप्राण्याचं प्राक्तन होतं. हिंसेच्या या दैनंदिन आवश्यकतेचा ठसा मानवी कलेक्टीव अनकॉन्शन्समध्ये (सामूहिक नेणीव) फार खोलवर उमटलेला आहे. याचे प्रारूप पुढे नागरीकरणाच्या ओघात, खेळांमध्ये बदलले. रोमन साम्राज्यामधील कलोसियममध्ये ग्लॅडिएटर झुंज दोन योद्ध्यांमध्ये व्हायची किंवा एक पुरुष व एक सिंह यांच्यामध्ये. जोवर एकजण मरत नाही तोवर हा खेळ सुरू राही. पळ काढा किंवा हार कबूल करा यापेक्षा लोक मृत्यू पसंत करत. याचे कारण एकच – आदिम प्राणीज जाणीवांमधून उतरलेल्या पुरूषार्थाच्या भ्रामक कल्पना. तथाकथीत पुढारलेल्या समाजातही आज बैलांच्या, उंटांच्या झुंजी होतात. महाराष्ट्रात बैलगाड्यांच्या शर्यतीसाठी बैलांना दारू पाजून पराण्या टोचत पळवतात. त्यावर बंदी आणण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा आमची परंपरा आहे, म्हणत लोकांनी निदर्शने केली. तामीळनाडूमध्येही असेच झाले – जलिकट्टू या बैलांच्या जीवघेण्या शर्यतींवरची बंदी उठवावी, म्हणून आंदोलने झाली.
मृत्यूचे, हिंसेचे थैमान पाहण्यात एक वेगळी आदिम नशा आहे. विजयाची झिंग आहे. ॲक्शनपट चालण्याचे तेच एक कारण आहे. याच थीमवर आधारीत स्क्विड गेम नामक एक शो नेटफ्लिक्सवर आहे. जिज्ञासूंनी जरूर बघावा. हे सगळं असताना ‘ॲनिमल’बद्दलच इतकी चर्चा का?
हा चित्रपट सगळ्यांच्या मनातल्या हिंसेला साद घालतो आणि त्या हिंसेला सहज-सार्थ ठरवतो. आपण केलेल्या खून-सत्राचा नायकाला अजिबात पश्चात्ताप होत नाही. ऐंशीच्या दशकातले हाणामारीचे देमार चित्रपट ज्यावेळी नायकाला चोऱ्यामाऱ्या करताना दाखवत किंवा चोराला हाणाताना दाखवत तेव्हा लोक टाळ्या जरूर पिटत. पण शेवटी हा मार्ग चुकीचा आहे, याचाही स्पष्ट संदेश चित्रपटात दिला गेलेला असे. ‘डॉन’ किंवा ‘दिवार’ चित्रपट आठवा – नैतिक विजय सत्प्रवृत्तीचाच होतो, याची खूण चित्रकर्त्यांनी अत्यंत जाणीवपूर्वक पेरलेली आहे. ‘ॲनिमल’ मात्र, त्याच्या पार पलीकडे जात हिंसेचं तत्त्वज्ञान कसलीही भीडभाड न ठेवता मांडतो.
वरकरणी ही गोष्ट बाप-मुलाच्या नात्याची आहे. बापावर आत्यंतिक प्रेम करणारा, बापाच्या सहवासासाठी आतुरलेला हा ‘ॲनिमल-नायक’ बापाला सुनावतो की जेव्हा तुम्ही घरात नसता, तेव्हा घरचा पुरूष म्हणून निर्णय घेण्याची जबाबदारी माझीच आहे ना… घरात आई आणि दोन मोठ्या बहिणी असताना ही ‘मॅन ऑफ द हाऊस’ची संकल्पना बायकांना केवळ मूल जन्माला घालण्याचे यंत्र मानते, यात काही मोठे नवल नाही. नवल आहे ते हे की हे म्हणणे फारच उघडपणे मांडले गेले आहे. सेक्स, लिंग-अवयव, वैरभाव, मलमूत्रादी विसर्जनक्रिया आणि अर्थातच हिंसा याबद्दल हा चित्रपट कोणताही आडपडदा न ठेवता बोलतो. हिंदी चित्रपटात चुंबन, मिठी किंवा क्वचित सुहागरात यांचे चित्रण ही फारशी नवलाची गोष्ट राहिलेली नाही. मात्र, त्यातही एक खाजगीपणा, लाजाळू बंदिस्तपणा आजवर दिसून येत होता. ‘ॲनिमल’ मात्र संपूर्ण कुटुंबासमोर लीपलॉक करताना लाजत तर नाहीच, त्याबद्दल बोलतानाही कोणताही संकोच बाळगत नाही. जणू सेक्स ही एकमेव गोष्ट आहे जी करण्यासाठी माणूस जन्माला आलाय. अल्फा मेलची ‘ॲनिमल-व्याख्या’ तीच तर आहे – शिकार आणि संरक्षण करणारा पुरुष. पुरूषसत्ताक व्यवस्थेनेही हीच कामगिरी तर नेमून दिलीय पुरूषाला. मग प्रॉब्लेम आहे कुठे?
मार्गारेट मीड नामक एका ॲन्थ्रोपोलॉजिस्टचा एक किस्सा आहे – त्यांना एका व्याख्यानात विचारले गेले की माणसाच्या संस्कृतिकारणाचा प्रारंभ नेमका कधी झाला? त्या म्हणाल्या की उत्खनन करताना एक मांडीचे हाड सापडले आहे, जे तुटून (फ्रॅक्चर होऊन) पुन्हा जोडले गेले होते. याचा अर्थ त्या पाय मोडलेल्या व्यक्तीची काळजी घेतली गेली होती. ज्या क्षणी माणसाच्या मनात दुसऱ्याबद्दल कणव निर्माण झाली, त्या क्षणी संस्कृतिकारणाची सुरूवात झाली. ‘ॲनिमल’ याच भावनेला नाकारतो. एक प्रसुतीवेदनेने तळमळत असलेली स्त्री समोर असूनही गोळ्या चालवणारा ‘ॲनिमल-नायक’ यापूर्वी हिंदी चित्रपटसृष्टीने पाहिला नसेल.
हिंदी चित्रसृष्टी पुरुषसत्ताक आहेच, पण त्याचे इतके नागवे समर्थन कोणी केले नसेल. आईचे प्रेम हा हिंदी चित्रपटाच्या नायकाचा एक हळवा कोपरा कायम राहिलेला आहे. ‘ॲनिमल-नायक’ मात्र आई सतत त्याच्या बाजूने बोलत असताना आणि त्याच्यासाठी कायम हजर असूनसुद्धा तिची अजिबात दखल घेत नाही… जणू पोषणापुढे (प्रोव्हायडर) पालनाचं (नर्चर) महत्त्व नाहीच. त्याच्या दोन बहिणींवर त्याचे प्रेम आहे, हे तो वारंवार बोलून दाखवतो. मात्र, ते प्रेमही त्याच्या आखलेल्या लक्ष्मणरेषेतच केले जाणार आहे. बाप, बापाचे प्रेम, बापाच्या कर्तृत्वाचा अभिमान, बापाचा वारसा आणि बापाचे वैर हे सगळे परंपरागत चालणार, हे ‘ॲनिमल’ ओरडून सांगतो. आपले घराणे आणि घराण्यासाठी रक्त सांडण्याची तयारी असलेले भाऊबंद हेच वैभव असल्याचे आडपडदा न ठेवता ठसवतो.
यातली खुबी अशी आहे की या चित्रपटातली नायिका लोकांना फार शक्तिशाली वाटू शकते. ती वेळेला नायकाच्या अंगावर ओरडते, त्याला थोबाडीतही मारते, त्याचा लॅपटॉप फेकून देते. मग नायक त्याच्या भावांना सांगतो की संसारावर आपली पकड हवी. तरच मान राहतो. बहिणीची छेड काढणाऱ्यांना ‘ॲनिमल-नायका’ने मारणे ही तिला आपल्या संरक्षणाची हमी वाटते. हीच नायिका नायकाला त्याच्या बापाविरूद्ध एक शब्दही बोलू शकत नाही. बापासाठी तो करत असलेल्या हिंसेला थांबवू शकत नाही, त्याचा निषेधही करत नाही. मात्र, जेव्हा तो एका परस्त्रीबरोबर सेक्स करतो, तेव्हा ती त्याला त्या बाईला ठार मारायला सांगते. ही फसवी नायिका पुरुषसत्ताक पद्धतीची बळी आहे, हे आपल्या वटपौर्णिमा आणि करवाचौथ साजरा करणाऱ्या स्त्रियांना कधी कळणार? तिने त्याला थोबाडीत मारल्याने नायकाच्या मनस्थितीत किंवा कार्यपद्धतीत काहीही फरक पडत नाही, हे लक्षात घेतले तर तिच्या शक्तिशाली प्रतिमेचा फोलपणा लक्षात येईल.
या चित्रपटातली दृश्यात्मकता फारच महत्त्वाची आहे. त्या देखणेपणामुळे या विचारांचा जुनाटपणा लक्षात येत नाही. हीच गोष्ट एखाद्या आदिवासी पाड्यावरही प्रागैतिहासिक काळात घडू शकते – जिथे कपड्यांनी शरीर झाकण्याविषयी किंवा उघड्या आकाशाखाली सेक्स करण्याविषयी काही अवडंबर माजवले जात नसे. तेव्हा हिंसा- मग ती प्राण्यांची असो की शत्रूची – अपरिहार्य धर्म होती. विनोदाच्या बाबतीतही तेच. विनोदाच्या आवरणाखाली हिंसक किंवा अश्लील गोष्टींचे समर्थन करणे, हे अधिक भयानक आहे.
त्याहून अधिक भीतीदायक आहे, ते शासनव्यवस्थेचे अदृश्यपण. हिंदी सिनेमात निदान हाणामारी संपल्यावर अटक करण्यापुरते तरी पोलीस येत. ‘कानून अपने हात में मत लो,’ म्हणणारी एखादी तरी सहृदय व्यक्ती असे. इथे त्यांचा उल्लेख देखील नाही. बहिणीची छेड काढली म्हणून भाऊ त्या मवाल्यांचा माग काढत त्या वर्गात जातो. तिथे वर्गात बसलेली मुलंमुलेही जे काही बोलतात किंवा हा नायक-भाऊ जे काही करतो, त्याला वर्गातली शिक्षिका एका हुंकारानेही विरोध करत नाही. समाजातल्या व्यवस्थेविरोधात आजवर खूप काही बोलले गेले (‘अर्धसत्य’सारखे चित्रपट) पण त्या व्यवस्थेची दखलही न घेणे, त्यांना अनुल्लेखाने मारणे हे चित्र अधिक धोकादायक आहे. आजच्या भारतीय समाजव्यवस्थेवर हा कवडसा टाकला, म्हणायचा का?
सुप्त मनातल्या हिंसेला साद घालणारा, सभ्यतेचे संकेत-नियमन झुगारून देणारा हा चित्रपट यशस्वी होतो, याचा अर्थ बहुतेकांना ते पाहताना आनंद मिळतो आहे. नायक जेव्हा जीवघेण्या आजारातून बाहेर येतो, तेव्हा तो बागेत नागव्याने फिरतो. ते पाहायला सगळे स्त्रीपुरूष हजर आहेत. पण कुणालाही त्याला शब्दानेही खडसवण्याची हिंमत नाही. ही पुरूषार्थाची नवी व्याख्या होऊ पाहील का? फार काही न करता सोशल ड्रिंकिंग करून आधुनिक बनण्याचा मार्ग जसा सहजसोपा झाला, तसा हा पुरूषार्थही. जे सोपे, ते लोकप्रिय या नात्याने या चित्रपटाच्या अधिकाधिक भ्रष्ट्र आवृत्त्या निघत राहिल्या तर नवल वाटायला नको. तसेही याच दिग्दर्शकाचा आधीचा कबीर सिंग (हिंदी आवृत्ती) याच प्रवृत्तीचा होता. “माझ्या प्रेयसीने मला धोका दिला, आता मला हव्या त्या मुलीला, मला हवे तेव्हा उपभोगता आले पाहिजे” म्हणणाऱ्या या वृत्तीचे “अरेरे ! बिचारा प्रेमात आयुष्याचे नुकसान करून बसला”, म्हणत तेव्हाही कौतुक झाले, ही स्वतःला सुसंस्कृत म्हणवणाऱ्या समाजाला लज्जास्पद गोष्ट आहे.
कला हा समाजाचा आरसा असतो. आजच्या जगातही सगळीकडेच मागे वळून पाहत चालण्याचे जे प्रयोग चालू आहेत (आठवा– ‘मेक अमेरिक ग्रेट अगेन’ किंवा ‘अखंड भारत’ घोषणा) त्याचाच परिपाक आहे ‘ॲनिमल’. राजकारणातही मर्द-नामर्द, तलवार-गदा, निधडी छाती, गनिमी कावा, बांगड्या नाही भरलेल्या… हेच व तत्सम शब्द ऐकू येतात. विसाव्या शतकात लोकशाही मूल्ये रूजवण्याचे झालेले प्रयत्न सहन न होणारे, दोन महायुद्धांची झळ सोसूनही नव्यानव्या युद्धांना आवेशाने सामोरे जाणारे जग ‘ॲनिमल’ म्हणायचे नाही, तर काय म्हणायचे?
– अपर्णा पाडगावकर 9833661213 aparna@dashami.com
खूपच उत्तम आणि सयुक्तिक मांडणी आणि ह्या विषयावर लीहिण्याबाबत खूप आभार. दोनेक वर्षांपूर्वी पुष्पा चित्रपट आला होता आणि त्यातही प्रचंड हिंसा आणि गुन्हे करणाऱ्या व्यक्तीस glorify करून नायक बनवले गेले. संपूर्ण यंत्रणा ह्या नायकासाठी फोल ठरवली जाते. अशा चित्रपटांतून जनतेस काय मेसेज जातो ह्याबाबत विचार होत नाही.
Animal सारखाच ह्याच दिग्दर्शकाचा कबीर सिंह हा चित्रपट प्रदर्शित झालेला आणि त्यातही स्त्री वर मालकी हक्क असण्याचे glorification केले होते.
शेवटी चित्रपट हे आपल्या समाजाचे प्रतिबिंब आहे असे मानले तर खरच आपला आजूबाजूचा समाज नैतिक पातळीवर इतका खालावत आहे का, ह्याबाबत सजगपणे पाहिलं पाहिजे.
अतिशय योग्य मांडणी. मी हा चित्रपट बघितला नाही.इच्छाच होतं नाहीये. त्याला पोषक असंच वातावरण आहे सध्या. पुरुषार्थाचा जल्लोष चालूच आहे. निनिराळ्या पातळ्यांवरची हिंसा आपण बघतो आहोत. अत्यंत अभ्यासपूर्ण आणि संवेदनशील, शास्त्रीय विश्लेषण केलं आहेस, अपर्णा. 🙏
खूप स्पष्ट विश्लेषण केलं आहे. ही प्रतिक्रिया फार फार महत्वाची आणि सयुक्तिक. माणूस म्हणून जाणिवा समृद्ध करायच्या की बोथट हा प्रश्न पडूच नये इतक्या जोरात माध्यमांचा भडिमार असताना ही प्रतिक्रिया विशेष महत्वाची.