Home कला डॉ. मेधा गुप्ते-प्रधान – ‘चंदाराणी’ची चैतन्यदायी चरित्रकथा (Medha Gupte-Pradhan – Marathi Child...

डॉ. मेधा गुप्ते-प्रधान – ‘चंदाराणी’ची चैतन्यदायी चरित्रकथा (Medha Gupte-Pradhan – Marathi Child Artist to Veteran Doctor)

डॉ. मेधा गुप्ते – प्रधान

नाच रे मोरा…हे मराठी चित्रपटातील प्रसिद्ध बालगीत आहे. राम गबाले दिग्दर्शित; पु.ल. देशपांडे यांची पटकथा, संवाद व संगीत; आणि ग.दि. माडगूळकर यांची गीते असलेला देवबाप्पा (1953) हा चित्रपट आणि त्या चित्रपटातील आशा भोसले यांच्या मधाळ आवाजातील ते अमर लोकप्रिय गाणे ! चित्रपटात चंदाराणी या छोट्या मुलीची भूमिका केली होती पुण्याच्या पाच वर्षे वयाच्या बालतारका मेधा गुप्ते हिने! मेधाने चंदेरी दुनिया तेथेच सोडली आणि त्या डॉक्टर झाल्या. मनोरंजनातून प्रेक्षकांचे हृदय काबीज करणारी मेधा गुप्ते या सिनेतारका म्हणून उदयास येण्याऐवजी, डॉ. मेधा गुप्ते-प्रधान नामक एक निष्णात डॉक्टर झाल्या आणि त्यांची कारकीर्द तेवढीच दैदिप्यमान झाली! मेधा यांनी त्यांचे वैद्यकीय शिक्षण रुग्णालयातील पीडितांच्या शारीरिक वेदना कमी करण्यासाठी (पेन मेडिसिन) कामी आणले! डॉ. मेधा गुप्ते-प्रधान ह्यांच्या जीवनातील सिनेतारका म्हणून संभाव्य ग्लॅमर तसे राहिले नाही.

मेधा यांची वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षणाची वाटचाल पुण्याच्या मॉडर्न हायस्कूलमधून अकरावी, फर्ग्युसन कॉलेजमधून बी एस्सी पदवी (1966), पणजी (गोवा) येथील वैद्यकीय महाविद्यालयातून एम बी बी एस आणि मुंबई विद्यापीठाच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमधून (1970-73) ॲनेस्थेसियॉलॉजीमध्ये एम डी अशी झाली. त्यांनी अमेरिकेतील वैद्यकीय क्षेत्रातील डॉ.अविनाश प्रधान ह्यांच्याशी विवाह केला आणि मेधा गुप्ते-प्रधान ह्यांचे अमेरिकेस न्यू यॉर्क येथे आगमन 1973 च्या हिवाळ्यात झाले. त्यांनी न्यू यॉर्क युनिव्हर्सिटीतून एमडी, रेसिडेन्सी व कार्डियो-व्हॅस्कुलर ॲनेस्थेसिया ट्रेनिंग आणि अल्बनी मेडिकल कॉलेज (न्यू यॉर्क) येथून पल्मोनरी मेडिसिन ट्रेनिंग पूर्ण केले. त्या पेन मेडिसिनमध्ये फेलोशिप, जॉर्जिया येथील मेडिकल कॉलेजमध्ये असोसिएट प्रोफ़ेसर… अशा वैद्यकीय क्षेत्रातील वेगवेगळ्या जबाबदाऱ्या निभावत चाळिसाहून अधिक वर्षे कार्यरत आहेत.

त्यांनी त्यांचे पती डॉ.अविनाश ह्यांच्या वैद्यकीय पेशातील नोकरी निमित्ताने डेन्व्हर (कोलोराडो), नंतर अटलांटा (जॉर्जिया) असे स्थलांतर केले. आणि त्याच वेळी मेधा यांनी अतिदक्षता विभागात स्टाफ फिजिशीयन, ॲनेस्थिसियालॉजी प्रमुख, शारीरिक वेदनाहरण आणि पुनर्वसन औषधांचे प्रशिक्षण यांसह पेन मेडिसिनमध्ये फेलोशिप या, वैद्यक शाखांशी संलग्न बोर्ड सर्टिफिकेशन्स, जॉर्जिया येथील मेडिकल कॉलेजमध्ये सहयोगी प्राध्यापक असे स्वत:चे उत्तम करिअर केले. त्यांच्याकडे ॲलबामा आणि जॉर्जिया अशा दोन राज्यांतील वैद्यकीय सेवेचा परवाना आहे. त्यांना घर, संसारात रमत असताना दोन मुलींचे मातृत्व लाभले. त्यांचे त्यांच्या दोन मुली – एक डॉक्टरदुसरी वकील, जावई, नातंवडे असे विस्तारित कुटुंब आहे. त्यांचे सर्व कुटुंब त्यांच्या नातवाच्या ऑटिझम(स्वमग्नता) या रोगावर मात करण्यासाठी प्रयत्नशील राहिले. त्या प्रयत्नांत त्यांना त्यांच्या बुद्धिकल्पकतेतून काही नवीन गोष्टींचा शोध लागला. नाट्यशास्त्राच्या आधारे आणि संस्कृत श्लोकस्तोत्रांच्या पठणातून आवाज उच्चार यांची तयारी, आधुनिक स्पीच थेरपी, संगीत, चेहऱ्यावरील स्नायूंचे व्यायाम आणि काही खेळ यांतून मानसिक आधार व आत्मविश्वास निर्माण केल्यामुळे नातवात सुधारणा दिसून आली. त्यांनी त्या अनुभवांतून जाताना सकारात्मक वृत्ती जोपासली.

डॉ. अविनाश प्रधान आणि डॉ. मेधा गुप्ते-प्रधान

 

मेधा आणि अविनाश ह्यांनी उतारवयात, 2018 पासून अमेरिकेत वैद्यकीय क्षेत्रात अर्धवेळ काम चालू ठेवले आहे. मॉण्टगोमेरी, ॲलबामा येथे मेधाताई बॅप्टिस्ट मिशन आउटरीच प्रोग्रामअंतर्गत पेन क्लिनिकमध्ये ना नफा तत्त्वावर वैद्यकीय सेवा आणि महाराष्ट्राती रुग्णालयांसाठी पेन क्लिनिकचे प्रशिक्षण देतात. त्यांनी पूर्वी बोन मॅरो मॅचिंगमोहिमांचे आयोजन केले आहे. त्यांनी अमेरिकेतील व भारतातील जवानांच्या विधवा पत्नी व मुले यांना छोट्या छोट्या देणग्या दिल्या आहे. त्यांचे सामाजिक कार्य मानसिक विकलांग मुलांसाठी पुण्यामध्ये राजभवन येथे आणि ऑटिस्टिकमुलांसाठी पुणे व मुंबई येथे परफॉर्मिंग आर्ट्सकार्यक्रम प्रायोजित करणे आणि ऑटिझमविषयी जनजागृती असे चालू आहे.

          मोहन आगाशे, वीणा देव (अभिनेत्री मृणाल कुलकर्णी- हिची आई), विद्या सिन्हा (रजनीगंधा चित्रपट फेम) शा काही समवयस्क कलाकारांशी त्यांची बालवयात झालेली ओळख मैत्रीपूर्ण राहिली आहे. त्यांचे पहिले प्रेम चित्रपट आणि नाटक हेच नेहमी राहिले आहे असे त्यांचे सांगणे ! त्यांचे आनंदनिधान एक उपयुक्त व्यक्ती, उपयुक्त डॉक्टर, एक प्रेमळ आजी ही त्यांना आयुष्यात लाभलेली बिरुदे हे आहे.

          पण त्या पलीकडे त्यांना गवसलेली लेखनाची क्लृप्ती त्यांना खूप समाधान देते. त्यांची आकांक्षा माझे लिखाण वाचकांसाठी मनोरंजक व प्रभावशाली असावे हीच राहिली आहे. त्यांची दोन मराठी पुस्तके म्हणजे नाच रे मोरा आणि चंदाराणी(उत्कर्ष प्रकाशन) व अनोखा अमेरिकी रंग’ (अविरत प्रकाशन) ही ! त्याशिवाय त्यांची एक इंग्रजी कादंबरी लिहून पूर्ण आहे; प्रकाशित होत आहे. त्या पु.ल. देशपांडे लिखित पूर्वरंग, उत्तररंग या पुस्तकांच्या वाचनाने प्रभावित होऊन लेखन करू लागल्या आणि त्यांनी अनोखा अमेरिकी रंगहे पुस्तक लिहिले असे सांगतात. नाच रे मोरा आणि चंदाराणीहे पुस्तक म्हणजे मेधा गुप्ते-प्रधान यांची, त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर, ‘दोन खंडांतील तीन अंकी जीवनसहल आहे. बालपणी घडलेल्या चंदेरी दुनियेच्या सफरीचे अनुभव, त्यानंतरची वाटचाल… काही हलक्याफुलक्या, रंजक आणि काही अंतर्मुख करण्या लावणाऱ्या वास्तव घटना नाच रे मोरा आणि चंदाराणी या पुस्तकातून उलगडतात. पुस्तकातील प्रत्येक प्रकरणाचे शीर्षक काव्यात्मक आणि समर्पक दिल्याचे जाणवते. मेधा गुप्तेप्रधान त्यांचे मेधाहे नाव अशा विविध प्रकारे संपन्न आयुष्याने सार्थ करतात.
प्रभाकर गुप्ते आणि इंदू गुप्ते

 

         मेधा गुप्तेप्रधान यांना त्यांचे आयुष्य हे काही प्रमाणात खाण तशी मातीअसे असल्याचेही जाणवते. त्यांचे स्वत:चे वडील प्रभाकर गुप्ते यांचा स्वत:चाही चित्रपट आणि नाट्यक्षेत्रातील निर्मिती, दिग्दर्शन याचा अनुभव होता. त्यांनी मेधाची देवबाप्पातील चंदाराणी भूमिकेसाठी निवड झाल्यावर खुबीने लहानग्या मेधाला मार्गदर्शन केले, तिची तयारी करून घेतली. नंतर, 1955 मध्ये प्रभाकर यांनी महाराष्ट्र नाट्य विद्यालयसंस्थेची स्थापना केली. त्यातून काही नावाजलेले चित्रपट व रंगभूमी कलाकार घडले. मेधाची आई इंदुमती यांचे हॉस्पिटलमध्ये नर्सिंग आणि शल्यक्रिया यांसाठी मदतनीस म्हणून शिक्षण झाले होते. तिच्या दोन्ही आज्यांनी सहकुटुंब ब्रिटिश राजवटीविरूद्ध भारतीय स्वातंत्र्यलढ्यातीचले जावआंदोलनात भाग घेतलेला ! तसेच आई, आजी, आत्या आणि घरातील सर्वांचा स्वातंत्र्यपूर्व नंतरही साक्षरता मोहिमेत सहभाग होता. मेधाचे बालपण अशा देशभक्त, कलासक्त आणि सुशिक्षित कुटुंबीयांच्या संस्कारात गेले.

         मेधा यांचा पेन मॅनेजमेंट या, गेल्या दोन दशकांत विकसित झालेल्या उपचारक्षेत्राशी संबंध सतत अद्ययावत राहिला आहे. त्या जवळ जवळ निवृत्तीनंतरही त्या विषयातील ज्ञान मिळवत असतात. त्यांनी व्हिएतनाम युद्धामध्ये जखमी झालेल्या काही अमेरिकी जवानांचे दु:ख जवळून पाहिले. त्यांना भारतातील वाहन अपघातात जखमी अशा काही रुग्णांच्या वेदनांवर उपचार करावे लागले. त्यांनी तशा परिस्थितीत पायांच्या अँप्युटी(विच्छेदन झालेल्या) रुग्णांना, शरीरातील गमावलेल्या आणि उर्वरित पायाच्या भागात होणाऱ्या तीव्र वेदना पाहिल्या. त्यांच्या पाहण्यात पाठदुखीने त्रस्त आणि मधुमेही काही जण तीव्र वेदनांनी ग्रस्त असलेले रुग्णही आले. तेव्हा त्यांनी तशा प्रकारच्या रुग्णांच्या वेदनाशमनासाठी काही करू शकतो, या जाणिवेने विशेष वैद्यकीय प्रशिक्षण (Pain management advanced Medical Training) घेतले. मेधा पाठीच्या ण्याच्या वेदना शमनासाठी पेसमेकरप्रकारच्यातंत्रज्ञानामध्येही ज्ज्ञ आहे. पाठीच्या कण्याजवळ इलेक्ट्रोड ठेवल्याने वेदनासंवेदना दडपल्या जाऊ शकतात (गेट कंट्रोल थिअरीचा वापर करून – 1970 मध्ये कॅनेडियन संशोधकांना त्यासाठी नोबेल पुरस्कार मिळाला). तसेच, बॉस्टन सायंटिफिक मेट्रोनिक्सतर्फे न्यूरोमॉड्युलेशन या तंत्रज्ञानाचाही रुग्णांच्या वेदनाशमनासाठी 1998 पासून वापर केला जातो. त्यामुळे बर्‍याच रुग्णांना आराम मिळाला आहे. या क्षेत्रात 2020 सालापासून फूड अँड ड्रग (FDA) ने मंजूर केलेले, विशिष्ट परिघीय मज्जातंतू उत्तेजित करून रुग्णांचे वेदनाशमन करणारे नवीन तंत्रज्ञान अधिक चांगलेकमी गुंतागुंतीचे आहे असे मेधा सांगतात.

मानवजातीच्या वेदनांवर इलाज करणारा डॉक्टर म्हणजे देवबाप्पा’/देवमाणूस अशी बहुतांशी समाजाची धारणा असते. डॉ. मेधा गुप्ते-प्रधान तशीच चैतन्यदायी प्रतिमा त्यांच्या वैद्यकीय ज्ञानाचा यथायोग्य वापर करून आणि संवेदनशील कृतीतून सार्थ करत आहेत.  

———————————————————————————————-————————————————————————————

बालतारकेचे विश्व ! मेधा गुप्ते-प्रधान यांच्या पुस्तकातून

पाच वर्षे वयाची ही बालतारका म्हणजे आताच्या – डॉ. मेधा गुप्ते – प्रधान

 

देवबाप्पाच्या सेटवर 1953 साली चित्रीकरण चालू असताना शेजारच्याच सेटवर हिंदी अभिनेत्री मधुबाला हिच्या एका चित्रपटाचे शूटिंगदेखील चालू होते. तेथे रिकाम्या वेळात, दररोज छोट्या मेधाला पाटीपेन्सिल घेऊन थोडाफार अभ्यास करावा लागे. मेधाच्या त्या अभ्यासात व्यत्यय नको म्हणून मधुबाला दुरूनच तिच्याकडे बघून गोड हसायची. मधुबाला (मूळ नाव – मुमताज बेगम जहाँ देहलवी) लहान वयात चित्रपटसृष्टीत आली. तिने तिच्या स्वत:च्या बदललेल्या नावाप्रमाणे, मेधाचे नाव चंदेरी क्षेत्रास योग्य असे बदलावे अशी खेळकर सूचना केली. मेधा गुप्ते-प्रधान पुढे लिहितात, “माझ्या आईवडिलांनी माझ्या जन्मवेळी त्यांच्या एकुलत्या एक मुलीचे नाव असामान्य असावे म्हणून अमरकोश धुंडाळून प्रज्ञा स्मृति मेधा धृतितून मेधाशोधली होती. त्या काळी मेधा हे नाव फारसे प्रचारात नव्हते. मेधा ड्रायव्हिंग स्कूल, ‘मेधा उपाहारगृह अशा आस्थापनाही 1947 साली अस्तित्वात नव्हत्या. तरीसुद्धा चित्रपटासाठी माझे नाव बदलण्याची सूचना अर्थात माझ्या वडिलांनी नम्रतेने ऐकली आणि लगेच नाकारली. मधुबाला यांनीही माझ्या वडिलांबद्दल अढी न दाखवता गोड हास्य केले आणि त्या त्यांच्या कामात मग्न झाल्या.

           यथावकाश देवबाप्पाचे चित्रीकरण पूर्ण झाले. सिनेमाला पुढे अनेक वर्षें मराठी रसिकांनी भरभरून दाद दिली आणि पाच वर्षांची मेधा महाराष्ट्रात मोठी बालतारका बनून प्रसिद्धीच्या प्रकाशझोतात आली. फोटोंचे प्रखर दिवे, पत्रकारांचा गराडा, तिला टेबलवर उभे करून पुष्पगुच्छ, चॉकोलेट्‌स्‌सह तिचे कौतुक, सत्कार-समारंभ, मायक्रोफोनसमोर धीर गोळा करून, आईआजीआत्यानी लिहून दिलेली छोटी भाषणे प्रस्तुत करणे, आजीआईकडून शिकूनसराव करून तिच्या अनेक चाहत्यांसाठी स्वत:च्या असंख्य फोटोंवर सह्या करणे, काही प्रोमोशनल इव्हेंट्‌स्‌ना हजेरी, पुण्याच्या पेशवे पार्कमध्ये लहान मुलांसाठी 1953 साली सुरू झालेल्या फुलराणीनामक, अरुंद रुळाच्या छोट्या आगगाडीच्या उद्‌घाटनप्रसंगी खास-आमंत्रित म्हणून उपस्थिती, आकाशवाणी पुणे केंद्रावर बालोद्यान कार्यक्रमासाठी को-होस्ट बनून सई परांजपे यांनी दिलेल्या स्क्रीप्टचे वाचननाट्यवाचनासाठी आवाज मुलायम व्हावा म्हणूस्पीच थेरपीअसे अनेक अनुभव मेधा गुप्ते-प्रधान यांनी वर्णन करून लिहिले आहेत. मेधाला महाराष्ट्राची शर्ली टेम्पलबनवण्याच्या इराद्याने मराठी, हिंदी चित्रपट-व्यावसायिकांच्या ऑफरयेऊ लागल्या. त्या न स्वीकारल्याने काही अफवा, धमक्या यांना ऊत आला. लहानग्या मेधाचे आणि अर्थात तिच्या आईबाबांचे आयुष्यही काही काळ बदलून गेले.… अशा अनेक प्रसंगांनी मेधा गुप्ते-प्रधान यांचे पुस्तक रंगत गेले आहे.
डॉ. मेधा गुप्ते -प्रधान medhapradhan@yahoo.com

विनता कुलकर्णी  (शिकागो) vinata@gmail.com

————————————————————————————————–——————————————-

About Post Author

6 COMMENTS

  1. फार छान.अभिनेत्री होण्याची चालून आलेली संधी बाजूला सारून इतक मोठं करीअर करणाऱ्या मेधा गुप्ते प्रधान यांना सलाम.

  2. मेधा गुप्ते प्रधान यांच्या जीवन प्रवासाला सलाम.काहींचे संपूर्ण जीवनच अलौकिक असते.इतरांसाठी प्रेरणादायी असते.नाच रे मोरा च्या खुप छान आठवणी वाचण्यास मिळालेल्या.उपलब्ध करून देणाऱ्यांचे आभार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version