Home मराठी मराठी कम्युनिटी

मराठी कम्युनिटी

मराठी (व एकूणच स्थानिक) भाषा व संस्कृती ही मुळात टिकणार कशी हा प्रश्न जाणकार (मराठी) जनांना भेडसावत असतो. त्याच बरोबर भाषा व संस्कृती यांच्या संवर्धनाच्या गोष्टीही काही डोक्यांत असतातच. त्याकरता क्रियाशील मंडळी त्यांच्या त्यांच्या परीने वेगवेगळ्या तऱ्हांची कामे करत असतात. मराठीतील पाच संस्थांमार्फत आम्ही असे ठरवत आहोत, की जगातील साऱ्या कर्तबगार मराठी जनांना, त्यांच्या कार्याला एका सांस्कृतिक दुव्याने जोडून घ्यावे – त्यांच्याकडील माहितीचे व ज्ञानाचे आदानप्रदान व्हावे आणि अशा तऱ्हेने मराठी माणसाचे शक्तिसामर्थ्य प्रकटावे. तेच ‘मराठीकारणा’चे स्वप्न ! शिवाजी राजांना रयतेचा राजा म्हटले जाते, ते वेगळे काय होते? ते स्वप्न जगभर पसरलेल्या मराठी समाजाने नव्याने साकारण्याचे आहे. जागतिकीकरणाच्या काळात मराठी समाजाच्या इष्ट वृत्तिप्रवृत्ती, स्वभावविशेष, सवयी, इच्छाआकांक्षा जपल्या तर जाव्यातच; पण त्याबरोबर त्यांना जागतिक चित्रात अढळ व अव्वल स्थान मिळावे ही भावना आहे. बदलत्या काळात मराठी भाषा बदलणार, नवे रूप घेणार; ते जाणून घ्यावे आणि त्याच वेळी मराठी भाषेचे संवर्धन सार्वजनिक पातळीवर निकोप पद्धतीने व्हावे यासाठी ‘इंटरअॅक्टिव्ह’ पद्धतीने प्रयत्नशील राहवे असा हा व्यापक प्रयत्न अभिप्रेत आहे.

एमकेसीएलचे विवेक सावंत यांच्या पुढाकाराने हे काम सुरू झाले. त्यातून एमकेसीएल, व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन, मराठी अभ्यास परिषद (पुणे), मराठी अभ्यास केंद्र (मुंबई) या चार संस्था एकत्र आल्या. त्यांनी पुणे-मुंबई येथे निमंत्रितांच्या बैठका घेतल्या. त्यानंतर मराठी प्रसाराचे कार्य अधिक जोमाने करावे लागेल असे वाटले. मराठीबद्दल मोठ्या समुदायात आस्था आहे. मराठीच्या प्रसारासंबंधी व भविष्यासंबंधी बऱ्याच जणांच्या मनात काळजीदेखील आहे. ती मंडळी त्यांच्या त्यांच्या परीने मराठी भाषेसाठी प्रयत्नही करत आहेत. परंतु या साऱ्या घडामोडींना हताशतेचे अस्तर आहे. त्यावर उपाय काही लाखांची ‘मराठी कम्युनिटी’ इंटरनेटवर ऑनलाइन स्वरूपात सतत जागती ठेवणे हा सुचतो. त्याला पूरक म्हणून ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’, ‘साहित्यसृष्टी’ यांसारख्या अनेक वेबसाइट्स सघन करणे व त्यांना अनुषंगून विविधतेचा खात्रीशीर बिनचूक ‘कंटेण्ट’ लोकांसमोर ठेवणे- त्यासाठी जरूर तर एक चोखंदळ व चिकित्सक व्यवस्था निर्माण करणे महत्त्वाचे ठरेल.

सारंग दर्शने यांनी ‘भाषा आणि जीवन’च्या जुलै-सप्टेंबर 24 अंकात ‘भाषा सैनिकांची फौज उभी करा’ असा एक लेख लिहिला आहे. त्यात ते म्हणतात, “न्यायालयांचे कामकाज मराठीत चालवण्यासाठी न्यायिक आणि कायदेशीर संज्ञा मराठीत आणण्यासाठी जे काम राज्य सरकारने हाती घेतले होते, ते अनेक दशके चालले. तरीही ते पुरे झाले नाही. ते काम पुरे झाल्याशिवाय आणि ते सारे शब्द सर्व स्तरांवर रुळल्याशिवाय कामकाज मराठीत होणार कसे आणि मुळात ते अर्थपूर्ण तरी कसे होणार?

“नव्या धोरणाच्या आठव्या कलमातील चौथे उपकलम म्हणते, “राज्य शासनाने दुय्यम न्यायालयांच्या कामकाजांची भाषा मराठी करण्यासाठी 21 जुलै 1998 रोजी काढलेल्या अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत स्थापन केलेल्या अंमलबजावणी समितीच्या पुनरुज्जीवनाची शिफारस मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीकडे करण्यात येईल…” या वाक्यरचनेवरून हा प्रवास किती दूरचा आहे, हे लक्षात येईल.

मराठीच्या सर्वच क्षेत्रांतील दैनंदिन वापरामध्ये किंवा उपयोजनांत हा व असे अनेक प्रश्न आहेत. ते केवळ नव्या धोरणाने सुटणार नाहीत. त्यासाठी राज्यभर जाणत्या तसेच तंत्रकुशल भाषासैनिकांची भलीमोठी फौज उभी करावी लागेल ! हे काम एकतर सरकारला करावे लागेल किंवा भाषाप्रेमींचे जाणते दल उभे राहायला हवे. मराठीच्या अस्तित्वाची लढाई केवळ शाळा, महाविद्यालये, कचेऱ्या, अभ्यासवर्ग, सरकारी कार्यालये इथे लढण्यापुरती राहिलेली नाही. जवळपास प्रत्येक घर आणि रस्त्यावरचा प्रत्येक भाषा-व्यवहार टिकवण्यापर्यंत ती येऊन भिडली आहे.”

योगायोगाने रंगनाथ पठारे यांचा चांगला लेख अलिकडेच प्रसिद्ध झाला आहे. त्याचे शीर्षकच ‘भाषा दूषित होत नाही; तर ती विस्तारते… !’ हे बोलके आहे आणि त्यातील मांडणी सुबुध्द मराठी वाचकांच्या विचारांशी मिळतीजुळती आहे. पठारे यांचाही ‘मराठी कम्युनिटी’च्या आपल्या कल्पनेला पाठिंबा आहे. ते व अन्य मराठी लेखक-कवी व सांस्कृतिक विचारकर्ते या प्रयत्नांत सामील होतील असा विश्वास आहे.

– दिनकर गांगल 9867118517 dinkargangal39@gmail.com

मराठी कम्युनिटी

मराठीचा विषय मराठी समाजासमोर विविधांगांनी सतत जागता ठेवण्यासाठी ‘मराठी कम्युनिटी’ नावाचा एक संस्थात्मक प्रकल्प हाती घेत आहोत. त्यामध्ये मराठी भाषेसंबंधातील सर्व घडामोडी, छोटेछोटे उपक्रम, प्रशासकीय निर्णय आणि भाषेच्या घडणीबाबतची चर्चा अशी विविध तऱ्हेची माहिती रोजच्या रोज लोकांसमोर मांडली जाईल आणि त्यापाठोपाठ त्यासंबंधीचे साद-प्रतिसाद, चर्चाविनोद हेदेखील प्रकट केले जातील. यामुळे मराठी सतत मनात व जनांत राहील. ती इंटरनेटवर असेल; तसेच त्याला अनुषंगून व्हॉट्स ॲप, इन्स्टाग्राम, फेसबुक अशा सर्व सोशल मीडियावर असेल. मात्र त्यासंबंधात चहाटळपणा व अश्लाघ्य प्रकार घडू नयेत यासाठी अशा सर्व माध्यमांतील प्रसिद्धी ही संयोजकांच्या हाती ठेवण्यात येईल. ‘मराठी कम्युनिटी’वर व्यक्त होण्यासाठी कम्युनिटीचे सदस्यत्व हे ठरावीक फॉर्ममध्ये स्वीकारावे लागेल.

——————————————————————————————————- 

फॉर्म

नाव :   ……………………………………………………

जन्मतारीख :  ……………………………………………

शिक्षण/अभ्यास : ……………………………………………

माझे उपरोल्लेखित प्रकल्पासाठी अशा प्रकारचे योगदान असेल-

…………………………………………………………….……………………………………………………………………..…………………………………………………………………………………………………………………………………………………..

ही माहिती info@thinkmaharashtra.com वर किंवा 9892611767 नंबरवर पाठवावी. 


button to change this html

फोटोवर क्लिक करून महाभूषण प्रकल्पाची वेबसाइट पाहता येईल

About Post Author

Previous articleविस्ताराच्या विज्ञानाद्वारे मराठीकारण
Next articleविनोबांच्या मानसकन्या: कालिंदी सरवटे
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.

4 COMMENTS

  1. खूप छान कल्पना आहे, ” मराठी कम्युनिटी ” प्रकल्पाची. त्याने आपली मायमराठी नक्कीच जिवंत राहील. तिचा प्रसार, प्रचार व संवर्धनही होईल. सरांच्या या कार्याला हार्दिक शुभेच्छा.
    संजीवनी साव.

  2. खूप छान उपक्रम आहे. पन्नास वर्षा पूर्वीचा ग्रंथालीचा काळ आठवला. अनेक बदल झाले. दिनकर गांगल यांचा उत्साह तोच
    राहिला आहे.

  3. नवीन नवीन अभिनव कल्पना अंमलात आणणे हा गांगल सरांचा आवडता छंद. छंद जोपासण्यात वय आडवे येत नाही हे ते कृतीने दाखवून देतात. नवीन उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा…ही योग्यच आणि माय मराठीच्या संवर्धनासाठी गरजेची कल्पना आहे.प्रत्येक मराठीप्नेमीने सामील व्हायला हवे.अर्थात मला शक्य होईल त्याप्रमाणे माझा सहभाग असेलच.

Leave a Reply to YOGESHCHANDRA DATTATREYA LOHOKARE Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version