Home व्यक्ती आदरांजली हमीद दलवाई व मुस्लिम सत्यशोधक मंडळ (Hamid Dalwai, the Founder Of Muslim...

हमीद दलवाई व मुस्लिम सत्यशोधक मंडळ (Hamid Dalwai, the Founder Of Muslim Reformists Movement)

‘मुस्लिम सत्यशोधक मंडळा’ची स्थापना पुण्यातील ‘साधना’ साप्ताहिकाच्या आंतरभारती सभागृहात 22 मार्च 1970 रोजी झाली. ‘साधना’ साप्ताहिक हमीद दलवाई आणि ‘मुस्लिम सत्यशोधक मंडळ’ यांच्या पाठीमागे सतत खंबीरपणे उभे राहिले आहे. हमीद दलवाई यांना ‘मुस्लिम सत्यशोधक मंडळा’च्या स्थापनेनंतर कार्य करण्यासाठी मोजून पाच-सात वर्षे मिळाली. दलवाई यांचे निधन अकाली, 3 मे 1977 रोजी झाले. यदुनाथ थत्ते, ग.प्र. प्रधान, नरेंद्र दाभोळकर हे ‘साधने’चे जुने आणि विद्यमान संपादक विनोद शिरसाट यांनी दलवाई व मंडळ यांच्यासाठी गेल्या पाच दशकांत केलेले कार्य मोठे व महत्त्वपूर्ण आहे. दलवाई आणि मी, आमची जीवनात प्रत्यक्ष भेट झाली नव्हती, परंतु माझी पीएच डी दलवाई यांच्यावर आहे. मी त्या निमित्ताने दलवाई यांना व्यक्ती आणि त्यांचे कार्य म्हणून बारकाईने समजावून घेऊ शकलो.

हमीद दलवाई यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्याच्या मिरजोळी (चिपळूण तालुका) येथे 29 सप्टेंबर 1932 रोजी झाला. त्यांनी कथालेखनाला सुरुवात वयाच्या अठराव्या वर्षापासून केली. त्यांची ‘लाट’(1961) हा कथासंग्रह आणि ‘इंधन’ (1965) ही कादंबरी ही पुस्तके त्यानंतर काही वर्षांतच प्रकाशित झाली. दलवाई यांचा पिंड ललित साहित्य लिहिता लिहिताच घडला. त्यामुळे त्यांची वैचारिक दिशा त्यांच्या ललित साहित्यातदेखील प्रतिबिंबित होते. त्यांनी ‘मराठा’ दैनिकामध्ये पत्रकारिता 1963 ते 1968 या काळात केली. त्यांनी त्याच काळात भारतातील बुद्धिवंतांशी चर्चा करण्यासाठी अभ्यासदौरा केला. त्या दरम्यानची त्यांची निरीक्षणे ‘मराठा’त क्रमशः प्रकाशित होत असत. त्यांनी काढलेला सात महिलांचा मोर्चा (1966) ही घटना आणि ‘साधना’ने प्रकाशित केलेले ‘मुस्लिम जातीयतेचे स्वरूप: कारणे व उपाय’ असे आरंभीचे साहित्य दलवाई यांचे व्यक्तिमत्त्व समजून घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

अ.भि. शहा आणि दलवाई यांनी ‘इंडियन सेक्युलर सोसायटी’ची स्थापना त्यांच्या पत्रकारितेच्या काळात केली. दलवाई यांची अ.भि. शहा व नरहर कुरुंदकर यांच्याशी गट्टी त्याच काळात जमली. त्यांनी एकमेकांना विश्वासात घेत खूप सहकार्य केले. ते स्वाभाविकपणे घडले, कारण त्यांच्या विचारांत साम्य होते. ते तिघेही प्रागतिक मानवतावादी, सेक्युलर आणि बुद्धिप्रामाण्यवादी होते. शहा हे दलवाई यांच्या मृत्यूनंतर साडेतीन-चार वर्षांत निवर्तले (11 ऑक्टोबर 1981) तर कुरुंदकर त्यानंतर चार महिन्यांनी, म्हणजे 10 फेब्रुवारी 1982 रोजी वारले. मुस्लिम सत्यशोधक मंडळाची उद्दिष्टे निकोप समाजधारणा व्हावी या दृष्टीने आखलेली आहेत – मुस्लिम महिलांना समान अधिकार, स्थानिक भाषेत शिक्षण, भारतीय संविधानातील मूल्यांचा आग्रह, अंधश्रद्धा व जातीयवाद यांना विरोध, कुटुंबनियोजन-आरोग्यरक्षण यांबद्दल समाजात जागृती.

दलवाई यांनी धर्माकडे कसे पाहवे हा दृष्टिकोन दिला नाही असा एक आक्षेप त्यांच्यावर घेतला गेला. परंतु दलवाई यांच्यामध्ये धर्मापलीकडे पाहण्याची क्षमता त्यांच्या निखळ मानवतावादी व बुद्धिप्रामाण्यवादी भूमिकेमुळे आली होती. त्यामुळे ते हट्टाग्रही परंपरावाद्यांशी दोन हात निर्भीडपणे करू शकले. ऐहिक जीवनाचे महत्त्व कालबाह्य श्रद्धा बाळगणाऱ्या पारंपरिक समाजाला सांगून त्या समाजाला आधुनिक जगात नेण्याच्या प्रयत्नांत काही अंतरापर्यंत धर्माचे बोट धरता येईल. मात्र त्यानंतर सुधारकाला धर्माचे बोट सोडण्याची तयारी दाखवावीच लागते. दलवाई यांनी तेच केले. दलवाई यांचा दृष्टिकोन धर्माच्या नावाने लोकांची दिशाभूल जाणुनबुजून करणाऱ्यांना गोडीगुलाबीने सांगून चालत नाही तर त्यांच्यावर प्रहार करावा लागतो असा होता. अब्दुल कादर मुकादम हे धर्माच्या चौकटीत राहून सुधारणावादी विचार मांडत होते तर दलवाई धर्मचौकटीबाहेरचा विचार मांडणारे होते.

इस्लामचा उदारमतवाद, त्याचा नवा अर्थबोध यासाठी काही जागतिक विद्वानांनी प्रयत्न केलेले आहेत. परंतु त्यांचा प्रभाव त्या त्या देशात फार पडला नाही. भारतातही सर सय्यद अहमद खान, महंमद इकबाल, मौलाना आझाद, असफ ए फैजी, असगर अली इंजिनीयर अशी विचारी व्यक्तींची नामावली आहे. त्या सर्वांनी उलेमा वर्गाला उघडे पाडण्याचा प्रयत्न केला. पण त्यामुळे समाजसुधारणेच्या पारड्यात काय पडले? मौलाना आझाद यांनी धर्माची सकारात्मक चिकित्सा केली. त्यांना किती यश आले? उलट, मुस्लिम समाजाने आझाद यांना नाकारले आणि निधर्मी व धर्मात निषिद्ध गोष्टी आचरणात आणणारे शियापंथीय जिना यांना जवळ केले. दलवाई यांना धर्मचिकित्सेपेक्षा धर्मांध आणि धर्मवादी राजकारणाची चिकित्सा करणे महत्त्वाचे वाटले. दलवाई यांना तशा धर्मसुधारकांच्या परंपरेची री ओढण्यात स्वारस्य नव्हते. त्यांनी विद्रूप गोष्टी बदलण्याचा प्रयत्न केला. दलवाई यांनी धर्मसुधारकांवर टीका केलेली नाही. त्यांनी मुस्लिम समाजप्रबोधनाच्या स्वतंत्र बिजाचे रोपण केले आणि त्यातच ‘मुस्लिम सत्यशोधक मंडळा’चे वेगळेपण आहे. ‘मुस्लिम सत्यशोधक मंडळ’ विज्ञान, इहवाद आणि आधुनिक मूल्ये यांवर आधारित सामाजिक सुधारणा घडवण्यासाठी आणि लोकशाही, समता, व्यक्तिस्वातंत्र्य रुजवण्यासाठी साडेचौदाशे वर्षांपूर्वीच्या धर्मग्रंथाकडे पाहत नाही, तर शपथपूर्वक स्वीकारलेल्या संविधानाचा आधार घेते. मंडळ धर्माकडे व्यक्तिगत श्रद्धेचा भाग म्हणून पाहते.

दलवाई यांनी त्यांच्या शेवटच्या काळात मंडळाचा उत्तराधिकारी नेमला नाही असा एक आक्षेप आहे. वास्तविक दलवाई यांनी त्यांचे व्यक्तिगत जीवन आणि वैचारिक अधिष्ठान यांत तफावत किंवा लपवालपवी केलेली नाही. ते त्यांचे विचार व वर्तन याबाबत स्वीकारलेली भूमिका शेवटपर्यंत जगले. त्यांचे मत ‘मुस्लिम सत्यशोधक’ ही नास्तिक आणि निधर्मी कार्यकर्त्यांची चळवळ व्हावी असे नव्हते. त्यांनी मृत्यूपूर्वी काही दिवस आधी मंडळाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना रामटेक येथे बोलावून चर्चा केली. तसेच, मंडळाचा राजीनामाही दिला. आम्ही दलवाई यांनी उत्तराधिकारी म्हणून कोणावरही जबाबदारी दिली नाही याकडे दोष म्हणून पाहत नाही. उलट, त्यांनी मंडळ लोकशाही पद्धतीने सामूहिक जबाबदारी स्वीकारून पुढे चालवण्याचे संकेत दिले असेच म्हणावे लागेल.

दलवाई आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळ यांच्या कार्यामुळे मुस्लिम समाजात इस्लामचा उदारमतवाद सांगणारे लोक आणि संघटना पुढे आल्या. अनेक महिलांनी उलेमांना आव्हान तर दिलेच; शिवाय, सर्वोच्च न्यायालयापर्यंत पुढे जाण्याचे धाडस दाखवले.

मंडळाने अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यात शहाबानो प्रकरण, बाबरी मस्जिद, गुजरात हिंसाचार, बॉम्बस्फोट, जागतिक दहशतवादी कारवाया, भारतातील वाढता हिंदुत्ववाद अशा घटना व मुद्दे यांचा समावेश होतो. मुस्लिमांना लक्ष्य करणाऱ्या घटना वाढून त्या समाजाचे अस्तित्व आणि त्या लोकांची सुरक्षितता हे प्रश्न देशात निर्माण झाले आहेत. हिंदुत्ववाद्यांकडून इस्लाम आणि मुसलमान यांच्याविषयी गैरसमज आणि द्वेष वाढवण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे मंडळाने नवा जाहीरनामा तयार केला आहे. त्याशिवाय मंडळाने भारतीय मुस्लिम महिला आंदोलनासारख्या विविध प्रवाहांशी समन्वय साधला. त्यावेळी काहींनी ‘मुस्लिम सत्यशोधक मंडळ’ दलवाईद्रोह करत असल्याचे आक्षेप नोंदवले.

दलवाई यांनी पेरलेले आधुनिक मूल्यांचे बीज त्यांच्याच पद्धतीने जोपासून ते वाढवण्याचा मंडळातील कार्यकर्त्यांचा निर्धार आहे. बदलत्या परिस्थितीची नोंद घेऊन मंडळाचा उद्देश व भूमिका यांत काही नवीन प्रकरणांचा समावेश करण्यात आला आहे. मुस्लिम सत्यशोधक मंडळाने मुस्लिम समाजातील मागास जातींसाठी आरक्षणाची मागणी केली आणि तशी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात 2015 मध्ये दाखल केली होती. तिचा निकाल देताना न्यायालयाने गरजू मुस्लिमांना पाच टक्के शिक्षणासाठी आरक्षण द्यावे अशी शिफारस केली आहे. परंतु तो विषय गेल्या आठ-नऊ वर्षांतील राज्यातील सत्तांतरात मागे पडून गेला आहे.

– शमसुद्दीन तांबोळी 9822679391 tambolimm@rediffmail.com

About Post Author

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here