पोटी मनोविकल मूल जन्माला आले, की त्याच्या आई-वडिलांची त्या मुलाच्या संगोपनाची गृहितकेच बदलून जातात. ठाणे येथील बर्वे पती-पत्नी यांना तशा प्रसंगाला तोंड द्यावे लागले, पण त्या दोघांनी त्या परिस्थितीकडे सहृदय चिंतनशीलतेने पाहिले; बसलेला धक्का व मनावरील ताण सोसला आणि त्यांनी त्यांच्या जीवनाची पायवाट बदलली. तशा मुलांचे पालक मानसिक दृष्ट्या श्रमलेले असतात, पण बर्वे तशा पालकांना पैसे भरून पाल्याला एखाद्या संस्थेत ठेवणे एवढ्या अल्प विचाराच्या पुढे नेतात. त्यांना योग्य विचाराच्या रस्त्यावर आणतात आणि त्यांना त्यांच्या पश्चात त्या मुलांचे भवितव्य कसे असावे या विषयी मार्गदर्शन करतात. त्यांनी स्वत: ‘घरकुल’ नावाची संस्था उभी केली आहे. त्या संस्थेची कहाणी त्यांच्या ‘काडी काडी वेचताना’ या पुस्तकात आहे. अविनाश बर्वे यांच्या त्या प्रवासाबद्दल त्यांचे स्नेही दिनकर गांगल यांनी लिहिलेले प्रास्ताविक या लेखात आहे.
– अपर्णा महाजन
‘घरकुल’ – समाजाच्या स्वायत्ततेचे लक्षण (Gharkul – An Autonomous Community !)
भारतात विशेषत: महाराष्ट्रात एक माणूस – एक संस्था अशी घट्ट परंपरा आहे; त्याच वेळी, संस्थाजीवन हे त्या त्या संस्थांमध्ये गुंतलेल्या ध्येयप्रवृत्त माणसांच्या पलीकडे बहरले पाहिजे असेही समाजाला वाटत असते, ‘काडी काडी जमवताना…’ हे अविनाश बर्वे यांचे पुस्तक वाचत असताना या दोन्ही समजुतींचा प्रत्यय येतो आणि विचाराला टोक येऊ शकते. डोंबिवलीजवळच्या खोणी येथील ‘घरकुल’ या त्यांच्या संस्थेची कहाणी ‘काडी काडी जमवताना…’ या पुस्तकात आहे. ‘अमेय पालक संघटना’ या संस्थेतर्फे चालवल्या जात असलेल्या ‘घरकुल’ या वसतिगृहात पंचवीसच्या आसपास मनोदुर्बल स्त्रीपुरुष व्यक्ती कायम स्वरूपी राहत आहेत. त्याभोवती पालकवर्गाचे, हितचिंतकांचे व कार्यकर्त्यांचे एक वर्तुळ झकास विकसित झाले आहे. त्यामधून ‘घरकुल’ म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमांचा अड्डाच होऊन गेला आहे. ते पुस्तक पर्यायाने ‘घरकुल’चे प्रेरक व मुख्य कार्यकर्ते अविनाश बर्वे यांचे आत्मकथनही आहे.
बर्वे दांपत्याने उभी केलेली ‘घरकुल’ ही संस्था एका मोठ्या समाजगटाशी किती सहज-साधेपणाने एकरूप होऊन गेली आहे याबद्दल अचंबा वाटतो. संस्था निकोप रीतीने व आस्थेने चालवली आणि लोकांच्या मनात विश्वास निर्माण केला तर काय चमत्कार घडू शकतो तोच ‘घरकुल’च्या या कहाणीत वाचण्यास मिळतो. व्यक्तीची ध्येयनिष्ठा आणि समाजाचे हितचिंतन या दोन्ही गोष्टी ‘घरकुल’ला लाभल्या आहेत. तो सारा इतिहास पुस्तकातून प्रकट होत असल्यामुळे संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त प्रकाशित झालेल्या या पुस्तकाला त्या प्रसंगापलीकडे महत्त्व प्राप्त झाले आहे.
मनोदुर्बलतेचे एक सामाजिक प्रश्न म्हणून यथार्थ चित्रही या पुस्तकातून उभे राहते. मनोविकल मूल घरात जन्माला येते तेव्हा त्याच्या पालक पती-पत्नींची अवस्था कशी विदारक होते, तेथे या पुस्तकाचा प्रारंभ होतो आणि समाजाच्या सामूहिक प्रयत्नांतून त्या प्रश्नाची सुटका होणे कसे शक्य आहे याचा निर्देश करून पुस्तकाचा शेवट होतो. पुस्तक वेगवेगळ्या व्यक्तींच्या वेगवेगळ्या लेखांतून उलगडत गेले आहे. ‘घरकुल’ या संस्थेच्या पंचवीस वर्षांची, अगदी कल्पनेचे बीज रुजले तेव्हापासूनची हकिगत या पुस्तकातून व्यक्त होते. कोणत्याही संस्थेसाठी अशी दस्तावेजवजा नोंद फार महत्त्वाची असते. ‘घरकुल’ पन्नास-साठ वर्षांचे होईल त्या वेळच्या कार्यकर्त्यांना पायाभूत वाटेल असा हा ‘डॉक्युमेंट’ तयार झाला आहे. पुस्तकात संस्थेमधील घडामोडी, पाहुण्यांच्या भेटीगाठी, सुहृदांच्या आठवणी यांबाबत जसे वाचण्यास मिळते, त्याच बरोबर या समस्येबाबतचे दिशादर्शनही विचारचिंतन करण्यास उपलब्ध होते. त्यामुळे पुस्तकाचे मोल वाढते. यासाठी अविनाश व नंदिनी बर्वे आणि संस्थेचे विद्यमान अध्यक्ष, कल्पक चित्रकार सुनील जाधव यांचे अभिनंदन. जाधव यांनीच या पुस्तकाची आकर्षक मांडणी व चित्ररचना साकारली आहे.
‘घरकुल’ ही संस्था मानसिक दृष्ट्या विकल असलेल्या मुलांचा सांभाळ करते. मनोदुर्बल मुलांच्या पालकांना ‘घरकुल’मधील लेखनातून प्रेरणा व स्फुरण, दोन्ही मिळेल. बर्वे यांच्या पाठिंब्याने महाराष्ट्रात तशा धर्तीच्या आणखी दोन-तीन संस्था वेगवेगळ्या ठिकाणी सुरू झाल्या असल्याचेही पुस्तकाच्या एका प्रकरणात दिसून येते, ही विशेष आनंदाची गोष्ट होय. मनोदुर्बल मुले त्यांचे जीवन पूर्वीच्या एकत्र कुटुंबपद्धतीत मिळुनमिसळून स्वाभाविकपणे जगू शकत. त्या काळी त्यांना सरसकट ‘वेडी मुले’ असेच गणले जाई. त्यात सहानुभूती, अनुकंपा असे. आधुनिक काळात मनुष्यातील मनोदुर्बलता किती तीव्र आहे याचे मोजमाप होते व त्याप्रमाणे तशा मुलांच्या जीवनाची व्यवस्था लावणे शक्य होते. आता त्यांना ‘दिव्यांग’ असे गणले जाते, त्याबरोबर मनोविकारांसंबंधी, मेंदुबाधेसंबंधी संशोधनही खूप पुढे गेले आहे. शिक्षण-प्रशिक्षण व पुनर्वसन असे त्या मुलांच्या विकासाचे टप्पे मानले जातात. काही प्रभावी उपचारही विकसित झाले आहेत.
महाराष्ट्र राज्य सरकारने मनोविकल मुलांच्या पुनर्वसनासाठी एक स्वतंत्र खाते/महामंडळ स्थापन केले आहे. सरकारच्या वतीने दिव्यांग व्यक्तींकडे विशेष लक्ष देणे 1995 पासून सुरू झाले. त्या वर्षी दिव्यांगांच्या जीवनहक्कासंबंधीचा कायदा पास झाला. सरकारने दिव्यांगांना सेवासुविधा देण्याचा कार्यक्रम 2017 साली जाहीर केला. तो जिल्हा स्तरापर्यंत पोचला आहे. सरकारच्या विस्तारत जाणाऱ्या या योजनांना समाजाकडून प्रतिसाद मिळायचा तर ‘घरकुल’सारख्या स्वयंसेवी संस्थांची आवश्यकता आहे. भारतात मतिमंद व्यक्ती एक कोटीहून अधिक आहेत. सरकार व समाज यांच्या समन्वयातूनच मतिमंद मुलांच्या प्रश्नावर सार्वत्रिक व कायम स्वरूपाची तोड निघू शकेल.
सरकारने धोरण आखले व कार्यक्रम राबवला म्हणून ते काम सरकारवर सोपवून द्यायचे का? तर तसे नाही. अशा कोणत्याही कार्यासाठी पुढाकार समाजातून यावा लागतो. तेव्हाच संस्था व तिचे कार्य सक्षमपणे चालू शकते. ‘घरकुल’च्या स्थापनेत व विकासात वेगळे वैशिष्ट्य असे दिसते, की ती संस्था पूर्णतया समाजाने स्वबळावर उभी केली व आस्थेने चालू ठेवली. अविनाश व नंदिनी बर्वे आणि त्यांची वेळोवेळी बदलत गेलेली नवनव्या कार्यकर्त्यांची फौज हे सारे लोक ती संस्था चालण्याला निमित्त आहेत. त्यांनी तसा विश्वास समाजात निर्माण केला आहे. हेच समाजाच्या स्वायत्ततेचे लक्षण असते. खरोखरीच, ‘घरकुल’सारखी संस्था या आपल्या महाराष्ट्र समाजात आहे याचा अभिमान वाटतो.
(‘काडी काडी जमवताना’ या पुस्तकाची प्रस्तावना)
– दिनकर गांगल 9867118517 dinkargangal39@gmail.com
———————————————————————————————-
बर्वे दांपत्याचे कार्य सोपे नव्हे,श्री अविनाश व सौ.नंदिनी बर्व्यांचे जाहिर अभिनंदन!