‘ढवळ’ हे गाव सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याच्या पश्चिम भागात वसलेले आहे. ते गाव फलटण-पुसेगाव राज्य महामार्गावर फलटणपासून एकोणीस किलोमीटर अंतरावर येते. गावची लोकसंख्या पाच हजारांच्या आसपास आहे. सातव्या शतकाच्या प्रारंभी यादव वंशातील सिंघण नावाच्या राजाने ढवळागिरी पर्वताच्या पायथ्याशी ढवळानगरी नावाचे नगर वसवले. त्या ढवळानगरीचे ढवळ हे नाव झाले.
ढवळगावाला कुस्तीची परंपरा मोठी आहे. हे गाव पैलवानांचे गाव म्हणूनच प्रसिद्ध आहे. गावातील काही मल्लांनी महाराष्ट्र चॅम्पियन हा किताबदेखील मिळवला आहे. माणदेशच्या इतिहासात प्रथम ‘महाराष्ट्र केसरी’ ही मानाची गदा सातारा जिल्ह्याला मिळवून देणारे पैलवान बापूराव लोखंडे हे ढवळ गावच्या मातीतले वीर. पैलवान बापूराव लोखंडे यांनी ‘महाराष्ट्र केसरी’ हा किताब नागपूरच्या कुस्ती मैदानात 1981 साली पटकावून सातारा जिल्ह्याचे नाव महाराष्ट्राच्या नकाशावर सुवर्णाक्षरांनी कोरले. ऑलिंपिकवीर कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा वारसा जपत, पैलवान बापूराव लोखंडे यांनी सातारा जिल्ह्याला मान पहिल्यांदा मिळवून दिला.
ढवळगावच्या मध्यभागी एका बाजूला ज्ञानाचे धडे देणारी शाळा आहे तर दुसऱ्या बाजूला मल्लविद्येचे प्रशिक्षण देणारी तालीम उभी आहे. या तालमीत रोज नित्यनियमाने ढवळगावातील लहानांपासून ते तरुणांपर्यंत सर्वजण कुस्तीचे धडे घेत असतात. जोर, बैठका, रस्सी चढणे असे विविध व्यायामप्रकार तालमीत शिकवले जातात. ‘वस्ताद’ मंडळी तालमीत मल्लांना कुस्तीच्या डावांची माहिती कलाजंग, ढाक, मोळी, एकेरी पट, दुहेरी पट, गदालोट, धोबीपछाड असे सर्व डाव असतात. माती विभागाबरोबर आधुनिक गादी विभागातील कुस्तीचे प्रशिक्षण देखील त्या ठिकाणी दिले जाते. त्याचा परिपाक म्हणून कुस्ती क्षेत्रातील विविध स्तरांवरील बहुमान या गावातील तरूण कुस्तीपटूंनी मिळवलेले आहेत.
कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी ढवळ गावच्या वार्षिक जत्रेवेळी, तसेच इतर विविध कार्यक्रमांच्या प्रसंगी कुस्त्यांच्या जंगी फडांचे आयोजन करण्यात येते. राजर्षी शाहू महाराज असे म्हणाले होते, की ‘मल्लविद्या ही केवळ तालमीपुरती मर्यादित नाही तर ती जगण्यासाठीही आवश्यक कला आहे.’ ती कला जोपासण्याचे काम ढवळगावच्या मातीत होत आहे. पैलवानकीची परंपरा अखंड चालू ठेवण्यासाठी ढवळगावातील सर्वजण गट-तट, पक्ष, मतभेद बाजूला ठेवून कार्य करत असतात.
गावाच्या मध्यभागी ग्रामदैवत भैरवनाथाचे मंदिर आहे. मंदिराच्या सुरुवातीला प्रशस्त मंडप असून गाभाऱ्यात हनुमान, भैरवनाथ, जोगेश्वरी, बाळसिद्धनाथ आणि विठ्ठल-रुक्मिणी यांच्या मूर्ती पाहण्यास मिळतात. मंदिराच्या उंच शिखरावर विविध देवी-देवतांची शिल्पे कोरलेली आहेत. गावाच्या एका बाजूला लक्ष्मीनारायण आणि भगवान शंकर यांची मंदिरे आहेत. भगवान शंकर ढवळगावी वाघेश्वर या नावाने ओळखला जातो. मंदिराचे बांधकाम दगडांत केलेले आहे. त्यात चुन्याचा वापर केलेला नाही. मुख्य प्रवेशद्वाराजवळ जुन्या काळातील मंडप आहे. मंदिराच्या मंडपातील खांबांवर विविध प्रकारची शिल्पे कोरलेली आहेत. मंदिराच्या परिसरात वीरगळ आहेत. गावाच्या दुसऱ्या बाजूला ग्रामदेवी ढवळाई मातेचे मंदिर आहे. पंचक्रोशीतील भाविक दरवर्षी आस्थेने देवीच्या दर्शनासाठी येत असतात. तसेच, गावामध्ये काळसिद्धनाथ, संत सावता माळी यांची मंदिरे देखील आहेत.
भैरवनाथ देवाची जत्रा हे गावाचे मुख्य आकर्षण असते. जत्रा अक्षय तृतीयेनंतर पाच दिवस असते. पहिल्या दिवशी गावातील सुवासिनी एकत्र येऊन मंदिरात भैरवनाथ-जोगेश्वरी यांच्या हळदीचा कार्यक्रम केला जातो. दुसऱ्या दिवशी दुपारी गावाच्या बाहेर मोकळ्या जागेत भैरवनाथ-जोगेश्वरी यांचा विवाह गुलाल-खोबऱ्याची उधळण करत साजरा होतो. त्या दिवशी गावात घरोघरी पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो. तिसऱ्या दिवशी, गावामध्ये विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. चौथ्या दिवशी, कुस्त्यांचा आखाडा भरवण्यात येतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील मल्ल त्या ठिकाणी येऊन त्यांचे कुस्ती कौशल्य दाखवतात. त्यांना भरघोस बक्षिसेही दिली जातात. पाचव्या दिवशी पहाटे देवाच्या पालखीची मिरवणूक गावातून निघते. त्याला देवाचा छबिना असे म्हणतात. भैरवनाथाच्या नावाने चांगभलं असे म्हणत, गुलालाची उधळण करत मिरवणूक चालू असते. सोबत, देवाच्या मानाच्या काठ्यादेखील असतात. गावात लक्ष्मीआई, महादेव, पीरसाहेब यांची मंदिरे आहेत. दरवर्षी, पीरसाहेब देवाचा उत्सव उरूस म्हणून साजरा केला जातो. गावाला अखंड हरिनाम सप्ताह पारायण सोहळ्याची दोन तपांपेक्षा जास्त परंपरा आहे.
गावात प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आहेत. विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी फलटण तालुक्याला जातात. ढवळगावात विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अभ्यासिका तसेच ग्रंथालय आहे. गावातून तरुण मुले-मुली शालेय स्तरावरील विविध कुस्ती स्पर्धांमध्ये सहभागी होऊन गावाचे नाव तालुका, जिल्हा, राज्य व देशपातळीवर उमटवत असतात. ढवळ गावात मुलीसुद्धा आत्मीयतेने कुस्तीची परंपरा जोपासत आहेत. या गावची कन्या सृष्टी शिवाजी करे हिने शमशाबाद (मध्यप्रदेश) या ठिकाणी झालेल्या सदुसष्टाव्या राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत सत्तावन्न किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले.
गावातील लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. त्याचप्रमाणे दुग्ध व्यवसाय केला जातो. अधिकतर लोक शेतमजुरी करतात. कुक्कुटपालन-शेळीपालन असे जोड व्यवसायही आहेत. आठवडी बाजार गावाच्या बाहेर दर शुक्रवारी असतो. बाजारात पंचक्रोशीतील लोक येतात. गावातील लोकांच्या आरोग्याच्या सोयीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. तसेच, जनावरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पशुवैद्यकीय केंद्रदेखील आहे. ढवळगावात आणि एकूणच फलटण तालुक्यात पाऊस कमी पडतो. मात्र कालव्यांमुळे सिंचनाची सोय झाली आहे. गावातील बहुतांश जमीन बागायती आणि थोडी जमीन जिरायती आहे. ऊस हे गावातील मुख्य पीक आहे. गावात उत्पादित होणारा ऊस श्रीराम, साखरवाडी, शरयू ॲग्रो, माळेगाव, स्वराज या साखर कारखान्यांना पुरवला जातो. त्याशिवाय गहू, ज्वारी, बाजरी, मका यांचे उत्पादन घेतले जाते. फळांमध्ये डाळिंब, केळीही अधिक पिकवली जातात.
ढवळगावाला ऐतिहासिक परंपरादेखील लाभली आहे. गावातील लोखंडे घराण्याचा इतिहास प्रसिद्ध आहे. ढवळगावचे वतनदार लोखंडे-पाटील असल्याचे पुरावे आढळतात. लोखंडे घराण्याच्या ऐतिहासिक काळातील ढवळगावची वतनदारी ज्यांच्याकडे होती ते होनाजी लोखंडे व जोगोजी लोखंडे यांची स्मृतिस्थळे गावाच्या मध्यभागी मुख्य मंदिराच्या बाजूला आहेत.
बापूराव लोखंडे यांनी मुंबईच्या लालबहादूर शास्त्री आखाड्यात महाराष्ट्र केसरी पैलवान शिवाजीराव पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला (1981). त्यांनी विविध स्तरांवरील कुस्ती स्पर्धांमध्ये मुंबईचे प्रतिनिधीत्व केले होते. मात्र त्यांना महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी मुंबई संघातून सहभागी होता आले नाही. तेव्हा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. तशा परिस्थितीत सातारा जिल्हा तालीम संघाने पैलवान बापूराव लोखंडे यांचा पुरस्कार केला. त्यांना नागपूर येथे होणाऱ्या एकोणिसाव्या ‘महाराष्ट्र केसरी’ मानाच्या गदेसाठी सातारा संघातून प्रवेश मिळाला. त्यावेळी त्यांचे वय एकवीस वर्षे होते. बापूराव यांनी माती विभागात महाराष्ट्राच्या दिग्गज अशा मल्लांशी मुकाबला करत कमाल केली. त्यांनी पैलवान इस्माईल शेख, पैलवान विष्णू जोशीलकर अशा दिग्गज मल्लांना पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या बाजूने गादी विभागातून मूळचे इंदूरचे मात्र कोल्हापूरचे प्रतिनिधित्व करत असलेले सरदार खुशहाल हे अंतिम सामन्यात समोर होते. पहिली पंधरा मिनिटे काटा लढत होऊनही कोणी गुण मिळवू शकले नाही. एकोणीस मिनिटे पूर्ण झाली तेव्हा पैलवान सरदार खुशहाल यांनी सुरेख बगल काढून बापूराव लोखंडे यांची कंबर धरली न धरली, तोच तितक्याच चपळाईने बापूराव लोखंडे यांनी ‘गदालोट’ डाव मारून सरदार खुशहाल यांना चितपट केले. प्रथमच, ‘महाराष्ट्र केसरी’ची मानाची गदा सातारा जिल्ह्याला मिळवून दिली. बापूराव लोखंडे यांना महाराष्ट्र शासनातर्फे 2004-2005 चा शिवछत्रपती पुरस्कार देण्यात आला.
या गावात प्रत्येक घरात पैलवान पाहण्यास मिळतात. सळसळत्या रक्ताला उकळी फोडणारे, ऐन तारुण्यात मस्तीचा खुराक खाऊन साधुसंतांप्रमाणे राहणारे, रोज लाल मातीत घामाने चिखल करणारे अनेक पैलवान ढवळगावात घडत आहेत. ढवळगावामध्ये जन्माला आलेला प्रत्येक जण लाल मातीला आई मानून तिची मनोभावे सेवा करण्यासाठी पैलवान होत असतो असे म्हणतात.
ढवळगावच्या जवळ ताथवडा हे ऐतिहासिक गाव आहे. त्या गावात संतोषगड नावाचा किल्ला आहे. तसेच, शेजारी उपळवे गाव असून त्या गावाच्या बाजूला सीतामाईचा डोंगर आहे. ढवळगावच्या आजूबाजूला छोट्यामोठ्या प्रकारची बरीचशी गावे आहेत. त्यामध्ये वाखरी, शेरेवाडी, दालवडी, तरडफ अशांचा समावेश होतो. ढवळगावचे नागरिक जादातर सरकारी नोकरीत सैनिक, पोलिस तसेच शिक्षक सेवेमध्ये आहेत.
-राजू बबन लोखंडे 8691923434
———————————————————————————————