Home कला मैफल रागसंगीताची !(Classical Music Consort)

मैफल रागसंगीताची !(Classical Music Consort)

डॉ. सौमित्र कुलकर्णी यांची शास्त्रीय संगीताविषयीची लेखमाला सुरू करण्याचा उद्देश श्रोत्यांना शास्त्रीय संगीतातल्या काही संकल्पना सांगाव्या, शास्त्रीय संगीताचा आस्वाद घ्यायला साहाय्य करता आले तर करावे हा आहे. या लेखात ते सांगत आहेत, शास्त्रीय संगीताच्या मैफिलीची मांडणी कशी असते, मैफिलीत गायल्या जाणाऱ्या रचनांचे स्वरूप कसे असते याविषयी. काही संज्ञा, शब्द; जे वारंवार शास्त्रीय संगीताच्या संदर्भात कानावरून जातात त्या संज्ञांचे, शब्दांचे अर्थही त्यांनी उलगडून सांगितले आहेत. या माहितीचा उपयोग मैफिलीचा आनंद घेताना होईल.

या संदर्भात आणखी काही माहिती आवश्यक आहे असे वाटत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये तसे जरूर कळवा.

‘मोगरा फुलला’ या सदरातील इतर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

-सुनंदा भोसेकर

मैफल रागसंगीताची !

शास्त्रीय गायन अथवा वादन ऐकायला चलतोस का; असे विचारल्यावर बरेचसे लोक विशेष तयार नसतात. या मागचे एक कारण म्हणजे; हे काहीतरी बोजड, समजायला किचकट आणि कंटाळवाणे असेल आणि ते ऐकून आपल्याला काही आनंद मिळणार नाही; असा समज असतो. हा गैरसमज दूर करण्यासाठी आणि रागसंगीताच्या मैफलीचा आनंद सर्वांना मनमुराद लुटता यावा यासाठी हा लेख !

भारतीय उपखंडात पुरातन काळापासून शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीताच्या मैफली होत आलेल्या आहेत. यात प्रामुख्याने राजदरबारात आणि मंदिरामध्ये ध्रुपद, धमार गायन आणि वादन हे सोळाव्या ते सतराव्या शतकात होत असे. अठराव्या शतकापासून ख्याल- परंपरेला सुरुवात झाली आणि आता मुख्यतः मैफलींमधून ख्याल गायकी ऐकायला मिळते. याचा अर्थ ध्रुपद, धमार मागे पडले किंवा लुप्त झाले असा नक्कीच नाही. अनेक उत्तम ध्रुपदिये आहेत आणि ते देशविदेशातील विविध मंचांवरून उत्कृष्ट सादरीकरण करतात; तसेच नवीन शिष्यही घडवतात.

ध्रुपद गायन किंवा वादन, तसेच ख्याल गायन, तंतकारी अंगाचे वादन आणि काही अंशी गायकी अंगाचे वादन असे मैफलींमधील सादरीकरणाचे ढोबळ प्रकार म्हणता येतील.

ध्रुपद गायन आणि वादन ही ख्यालाच्याही आधीची शैली असे मानले जाते. देवळांमध्ये किंवा राजदरबारामध्ये ध्रुपदाचे जे सादरीकरण होत असे. त्यात साहजिकच भक्तिपर किंवा राज्यकर्त्यांच्या स्तुतिपर रचना असत. परंतु काळानुरूप यात बदल होत आले आणि अनेक ध्रुपदियांनी यात त्यांच्या रचनांची भर घातली. विविध विषयांवरील रचना आता आपल्याला मैफलीमध्ये ऐकायला मिळतात.

सध्याच्या ध्रुपदाच्या मैफलीत गायन अथवा वादनाची सुरुवात खर्ज्यातील, धीम्या लयीतल्या आलापीने होते. आलापी म्हणजे त्या रागातील स्वरांचे विविध मेळ; जे त्या रागाची पायरी पायरीने बढत करत नेतात व त्याचवेळी कलाकाराचा विचारदेखील त्यातून प्रकट होत असतो. विस्तृत, कल्पक व भावनापूर्ण आलापी हा कोठल्याही सादरीकरणाचा प्रमुख भाग मानला पाहिजे. कारण रागाचे चैतन्यमय स्वरूप व वातावरण त्यातूनच उभे राहत असते.

अशी ही आलापी संथ लयीत रि द न नोम किंवा ओम् हरी नारायण अशा नादमय अक्षरांचा वापर करून केली जाते. हळूहळू लय वाढत जाते आणि एक उत्कर्षबिंदू येतो. यानंतर गमकयुक्त झाला गायला जातो. झाला म्हणजे सुरांची जलद लयीतली गमकयुक्त लयबद्ध मांडणी ! या आलापीला ‘खंड आलापी’ असेही म्हटले जाते. यानंतर सूलताल, चौताल, तेवरा अशा तालांमध्ये संथ लयीत वा मध्य लयीत पद किंवा रचना गायली जाते. या रचनेच्या सादरीकरणात लयीचे विविध प्रकार, तालाशी खेळत खेळत केलेले बोल या पद्धतीने विस्तार केला जातो. ही पद्धत कंठसंगीतातील ध्रुपदगायन आणि विचित्रवीणा किंवा रुद्रवीणा अशा वाद्यांवर केले जाणारे ध्रुपद वादन या दोन्हीमध्ये बहुतांशी सारखी असते.

आजच्या काळात पंडित उदय भवाळकर, पंडित गुंदेचा बंधू, मलिक बंधू, पंडित विनोदकुमार द्विवेदी यांसारखे गायक व पंडित बहाउद्दिन डागर यांसारखे वादक हे आघाडीचे ध्रुपद कलाकार आहेत. युवा कलाकारांमध्ये चिंतन उपाध्याय, प्रसन्न विश्वनाथन, आयुष द्विवेदी, पेलवा नाईक असे काही जण उत्तम ध्रुपद सादर करतात. ध्रुपदाच्या मैफलीमध्ये एक सिद्ध म्हणजे प्रचलित, तसेच विस्तृत गायला जाणारा राग घेऊन त्याने सुरुवात होते. त्यानंतर एक किंवा दोन छोट्या रचना किंवा धमार गाऊन क्वचित भजनाने किंवा भैरवीने समारोप केला जातो. ध्रुपदियांमध्ये ज्या विविध शैली आहेत; त्यांच्या तत्त्वांच्या आणि शिस्तीच्या आधारे कलाकार ही कला शिकतो आणि मांडतो. त्यांना बानी असे म्हणतात. डागरबानी, नौहारबानी, खंडहरबानी व गौहरबानी या त्यातील प्रमुख शैली ! यांच्यातूनच पुढे काही घराणी ही जन्माला आली; जसेडागर, दरभंगा इत्यादी.

ख्यालाच्या मैफलीत मात्र गायन व वादन यांच्या सादरीकरण पद्धतीत फरक असतो. कंठसंगीताच्या मैफलीमध्ये एक प्रमुख कलाकार, त्याला तबला तसेच सारंगी किंवा संवादिनीची साथ करणारे संगतकार, तानपुरासाथ व स्वरसाथ करणारे शिष्य असा सगळा कलाकारांचा संच मंचावर असतो. कुठल्याही एका रागातील विलंबित खयालाने मैफलीची सुरुवात होते. विलंबित खयाल ही रचना अत्यंत संथ लयीत गायली जाते व विस्तृत आलापीद्वारे तसेच मिंड, खटका, गमक यांसारख्या विविध अंगांनी रागाची बढत करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. यामध्ये तबलजी स्वच्छ, सुंदर ठेका धरतो; तर कलाकाराच्या गळ्यातून उमटणाऱ्या स्वराकृतींना संवादिनीवादक किंवा सारंगीवादक आपल्या वाद्याद्वारे वाजवतो आणि कलाकाराच्या कल्पनेला, सांगीतिक विचाराला अधिक प्रवाही करण्यास मदत करतो.जाता जाता फक्त काही शब्दांचे अर्थ सांगतो. मींड म्हणजे एका स्वरावरून दुसऱ्या स्वरावर न थांबता घसरत जाणे. आरोही मींड म्हणजे खालच्या स्वरावरून वरच्या स्वरावर घसरत जाणे आणि अवरोही मींड म्हणजे वरच्या स्वरावरून खालच्या स्वरावर घसरत येणे असे मींडचे दोन प्रकार असतात. खटका म्हणजे एखादा स्वर द्रुत लयीत उच्चारतानाच वरच्या व खालच्या स्वराचा किंचित आधार घेणे. आणि गमक म्हणजे गायन-वादन करताना स्वराला कंप किंवा आंदोलित करून स्वर म्हणणे-वाजविणे.

या सगळ्याचा एकत्रित परिणाम असा की त्या रागाच्या भावाचा परिपोष होऊन कलाकार आणि श्रोते या दोघांनाही त्याच्याशी एकरूप होता येते. गायिका सावनी शेंडे-साठ्ये यांनी एका मुलाखतीमध्ये वापरलेली उपमा मला फार आवडली. ती अशी, की ‘रागाची बढत हे एका लहान बाळाला वाढवण्यासारखे आहे. जसे लहान बाळ मोठे होत जाते; तसे ते बसायला शिकते, रांगायला शिकत चालू लागते, मग धावू लागते; अशीच काहीशी ही प्रक्रिया आहे.’

रागातील सर्व स्वरांना गोंजारत, विस्तार करत वरचा षड्ज लागतो; तेव्हा मैफलीमध्ये एक उत्कर्ष बिंदू गाठला जातो असे म्हणता येईल. यानंतर लयकारी, सरगम, बोलतान आणि तान यांद्वारे गाणे पुढे सरकते व द्रुत बंदिश गाऊन सादरीकरण समाप्त होते. या तत्त्वांमधील थोडेबहुत फरक, राग वा बंदिशी मांडण्याची पद्धत यांच्या आधारावर विविध गायनशैली निर्माण झाल्या- ज्याला आपण घराणी असे म्हणतो. अमुक एका घराण्याचा गायक असे जेव्हा आपण संबोधन करतो तेव्हा त्याचा अर्थ इतकाच, की तो त्या शैलीच्या तत्त्वांना अनुसरून त्याची कला सादर करत असतो.

विलंबित बंदिश काय किंवा द्रुत बंदिश काय; यांचे ताल बहुतांशी सारखे असतात (काही अपवाद वगळता). वापरल्या गेलेल्या कल्पना, भाषा हेही बऱ्यापैकी सारख्याच धाटणीच्या असतात; पण लयीतील फरकामुळे त्या बंदिशीच्या चौकटीतून प्रकट होणाऱ्या रागविचाराच्या व्याप्तीवर मात्र द्रुतलयीत थोडे बंधन येते. म्हणून ख्यालगायकीत विलंबित बंदिशीला फार महत्त्व आहे. उस्ताद अल्लादियाँ खाँसाहेब म्हणायचे, की राग हा बंदिशींमध्येच लपलेला असतो; जसे की ‘तिल आड पहाड’.

पहिल्या रागाच्या या विस्तृत सादरीकरणानंतर एखाद्या रागात मध्य लयीची बंदिश किंवा तराणा यांसारखी प्रस्तुती करून कलाकार उपशास्त्रीय व इतर संगीतप्रकारांकडे वळतो. साधारणतः सद्यस्थितीत मैफलीचे हे स्वरूप असले, तरी अनेक कलाकार असेही आहेत, की जे पूर्ण तीनसाडेतीन तास ख्याल सादरीकरण करतात व तितक्याच ओढीने रसिक त्याचा आस्वादही घेतात. डॉक्टर अश्विनी भिडे-देशपांडे, विदुषी मंजिरी असनारे-केळकर, पंडित वेंकटेशकुमार, डॉ पौर्णिमा धुमाळे, पंडित अरुण कशाळकर, पंडित उल्हास कशाळकर, विदुषी श्रुती सडोलीकर यांसारख्या कलाकारांच्या कार्यक्रमांत बराच मोठा भाग हा ख्यालगायनाने व्यापलेला असतो. कोणी किती आणि काय गावे, हा शेवटी ज्या त्या कलाकाराचा प्रश्न असतो; पण श्रोत्यांवरही हे अवलंबून असते. त्यामुळे मैफलीच्या स्वरूपामध्ये आलेले वैविध्य हे अनेक लोकांना अभिजात संगीताच्या कार्यक्रमाकडे ओढून आणते; ही बाब लक्षात घेण्याजोगी आहे.

वादनाच्या कार्यक्रमात गायकी अंगाच्या वादनापेक्षा तंतकारी अंगाचे वादन जास्त ऐकायला मिळते. गायकी अंगाचे म्हणजे ख्यालगायकीसारखे कंठसंगीताच्या जवळ जाणारे! विदुषी एन. राजम यांनी  व्हायोलिनवर ख्यालगायकी अंगाची शैली विकसित केली आणि आता अनेक कलाकारही शैली आत्मसात करून सादर करत आहेत आणि त्यात भरही घालत आहेत. सारंगी हेदेखील कंठाच्या अत्यंत जवळ जाणारे वाद्य. दुर्दैवाने एकल सारंगीवादनाचे कार्यक्रम म्हणावे तितके होत नाहीत. गेल्या काही वर्षांत संवादिनीदेखील एकल वादनाचे वाद्य म्हणून सशक्तपणे पुढे येत आहे. संवादिनीवरही गायकी अंगाचे सादरीकरण करता येते व अनेक कलाकार करतातही !

याउलट तंतकारी अंगाच्या सादरीकरणात सुरुवातीला आलाप, जोड, झाला द्वारे रागाचा विस्तार केला जातो व त्यानंतर वेगवेगळ्या तालांत बांधलेल्या स्वररचना ज्याला गत असे म्हणतात; त्या तान, लयकारी, तिहाई यांचा वापर करत सादर केल्या जातात. तबलजीशी केला जाणारा सवाल-जवाब अनेक रसिकांसाठी सादरीकरणातला आकर्षक क्षण असतो. एखादी धुन, भजन अथवा ठुमरी यांसारखी रचना वाजवून कार्यक्रमाचे समापन होते. सतार, सरोद, बासरी, संतूर यांसारख्या वाद्यांच्या एकल कार्यक्रमात बहुतांशी या शैलीचे सादरीकरण असते.

असे हे मैफलीतील रागसंगीताचे स्वरूप ! शेवटी सांगायची गोष्ट अशी, की हा एक संवाद आहे; एका आत्म्याचा दुसऱ्या आत्म्याशी होणारा! गानसरस्वती किशोरीताई म्हणतात तसे; संगीत ही मनाची भाषा आहे. अनेक अव्यक्त भावना किंवा शब्दांत न सांगता येणाऱ्या गोष्टी सूर आपल्यापर्यंत पोचवतात आणि मनाच्या अशा काही कोपऱ्यांना स्पर्श करतात, की ज्यांचे अस्तित्व तोवर आपल्याला ठाऊकच नसते. रागसंगीत हे स्वतःच्या आतमध्ये डोकावायला व त्या दिशेने प्रवास करायला शिकवते. म्हणूनच सूर व त्यांची भाषा ही सर्व जिवांवर खोल परिणाम करते आणि त्यामुळेच शाश्वत असते.

रागसंगीतातले विविध राग, त्याबद्दलचे चिंतन, त्यावर आधारलेली गाणी व विविध कलाकारांचे किस्से घेऊन भेटुया पुढील भागांमध्ये ! तोवर नमस्कार !

डॉ. सौमित्र कुलकर्णी 9833318384 Saumitrapk94@gmail.com
विशेष आभार – आयुष द्विवेदी

About Post Author

2 COMMENTS

  1. Very studiously put and articulated piece with clarity of many nuances that go unobserved. Best wishes for the series and looking forward!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version