Home वैभव वारसा अजरामर ऐ मेरे वतन के लोगो… (Ae Mere Watan Ke logon Memorable...

अजरामर ऐ मेरे वतन के लोगो… (Ae Mere Watan Ke logon Memorable Song)

0

भारतीय संगीतात शेकडो प्रकार गायले आणि वाजवले जातात; किंबहुना गाण्यासाठी भारतात निमित्तच हवे असते. स्वाभाविकच, गेल्या शतकात भारतात चित्रपट माध्यम येऊन पोचले आणि ते रुळले ते संगीतासह. वास्तविक त्या माध्यमात गाण्यांची गरज मानली जात नाही, परंतु भारतीय चित्रपटांचा गाण्यांशिवाय विचारच करता येत नाही. प्रयोग म्हणूनच तसे दोनपाच हिंदी चित्रपट निर्मिले गेले.

भारतीय चित्रपटांबरोबर चित्रपटगीतांचे एक वेगळे मोठे विश्व तयार झाले आहे. ती संगीतकार, गायक आणि त्यांचे चाहते अशी दुनिया आहे. त्यांचे गावोगावी क्लबज, मंडळे आहेत. ते नियमित गाण्यांचे कार्यक्रम करत असतात. त्यापलीकडे बाथरूम गायक व त्यांची आवडती हिंदी चित्रपट गाणी असा गीत रसिकांचा सागर आहे.

हिंदी चित्रपट गाण्यांमध्ये हटके आणि गाण्यांचा सीझनल प्रकार म्हणजे देशभक्तिपर गीते. ती गाणी 15 ऑगस्ट व 26 जानेवारी या भारताच्या राष्ट्रीय दिनी गल्लोगल्ली, गावोगावी वाजवली जात असतात. त्यांतील ‘संदेसे आते है…’ सारखी गाणी, कितीही लाऊड वाजवली तरी डोळ्यांतून पाणी काढतात. हिंदी चित्रपट गाणी हा निव्वळ भावाविष्कार आहे आणि तो रसिकाला सर्वांगांनी रिझवत असतो.

जयंत टिळक यांनी काही निवडक देशभक्तिपर गाण्यांचा उत्कट आढावा स्वातंत्र्य दिनानिमित्ताने घेतला आहे. ते लिहितात – संगीतामध्ये माणसाच्याच काय, पण प्राण्यांच्याही भावना चेतवू शकण्याची ताकद आहे. देशभक्तिपर गीतं नेमकं हेच करतात. ते विशिष्ट सूर कानी पडले की स्फुरण चढतं हे नक्की. आज युद्धाची व्याख्या, युद्धाचं स्वरुप बदललं असलं तरी आजही प्रत्येक देशाच्या सैन्यदलात आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सचं स्वतंत्र बँडपथक असतंच ! काही मूठभर देश सोडले तर प्रत्येक देशावर कधी ना कधी युद्धाची वेळ आलेलीच आहे. त्यामुळे प्रत्येक देशात (कदाचित आपल्याइतकी नसतील) विपुल प्रमाणात देशभक्तिपर गीतं लिहिली व गायली गेली आहेत. जवळजवळ प्रत्येक गीतकार-संगीतकाराने त्याच्या जीवनात एक तरी देशभक्तिपर गीत लिहिलं वा संगीतबद्ध केलं आहेच.

देशभक्तिपर गीतं म्हटली की एक बुलंद आवाज आपल्या कानात घुमतो, तो महेंद्र कपूर यांचा. पहाडी, काहीसा रांगडा पण तरीही भावनांचं प्रकटीकरण करण्यात कुठंही कमी न पडणारा आवाज लाभलेल्या महेंद्र कपूर यांनी केवळ हिंदी नव्हे तर अनेक भाषांत गाणी गायली आहेत. भारत-चीन युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर ‘छोटा जवान’ हा चित्रपट 1963 मध्ये प्रदर्शित झाला. त्यातील ‘जिंकू किंवा मरु…’ हे महेंद्र कपूर यांच्या आवाजातलं गाणं लोकप्रिय ठरलं. त्या गाण्याचा जोष काय वर्णावा ? आपल्याला जिंकायचंच आहे… ते नाहीच तर मरायचं आहे ! अधलंमधलं काही नाही. गीतकार गदिमा आणि त्याला उचित असा स्वरसाज चढवणार्‍या संगीतकार वसंत देसाई यांना त्या गाण्याबद्दल सलाम !

अशी सुरुवात करून टिळक म्हणतात- मात्र एका गाण्याविषयी लिहिलं नाही तर चित्रपट संगीतविषयक सर्व लेखन अपुरं ठरेल. ते गीत आहे – ऐ मेरे वतन के लोगो… त्याच गीताची ही कहाणी.

गीतकार प्रदीप, संगीतकार सी. रामचंद्र आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर या तिघांच्या प्रतिभेचा त्रिवेणी संगम असलेलं ‘ऐ मेरे वतन के लोगो… हे गीत कोणत्याही चित्रपटात नाही. ते कोणत्याही स्टुडिओत रेकॉर्ड झालेलं नाही. त्या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यात करुण रसातून वीरश्री निर्माण केली गेली आहे. सीमेवर लढणारे जवान किती हालअपेष्टा सोसतात, रक्त गोठवणार्‍या थंडीत- बर्फात दिवस-रात्र काढत, तळहातावर शीर घेऊन ते देशासाठी कसे लढतात हे प्रदीपजींनी त्यांची प्रतिभा पणाला लावून प्रभावीपणे त्या गाण्यात सांगितलं आहे.

संगीतकार प्यारेलाल यांनी त्या गाण्याची विविध भारतीवर कथन केलेली जन्मकथा मोठी मनोरंजक आहे. ‘दिल्लीतील स्टेडियमवर 27 जानेवारी 1963 रोजी एक भव्य कार्यक्रम होणार होता. अन्य कार्यक्रमांबरोबर मदन मोहन, अनिल विश्वास, जयदेव आणि सी. रामचंद्र या चार संगीतकारांना त्यांचं एकेक गाणं सादर करण्याची त्यात संधी मिळणार होती. पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यासमोर गाणं सादर करायला मिळणार म्हणून सी. रामचंद्र खुषीत होते. पण त्यांना 1962 मधे एकही चित्रपट मिळाला नसल्यानं त्यांच्याकडे नवीन गाणं नव्हतं. त्यामुळे कार्यक्रमात कोणतं गाणं सादर करावं असा विचार करत ते कवी प्रदीप यांच्याकडे गेले. ते त्यांना म्हणाले, ‘गदिमांनी लिहिली आहेत तसं एखादं समरगीत लिहून द्या’. प्रतिभावंत प्रदीप यांनी फक्त पंधरा दिवसांत तब्बल शंभर कडव्यांचं गाणं लिहून अण्णांच्या हाती ठेवलं. त्याचे शब्द होते…

ऐ मेरे वतन के लोगो.. तुम खूब लगा लो नारा…
ये शुभ दिन है हम सबका, लहरा लो तिरंगा प्यारा…
पर मत भूलो सीमापर वीरोंने प्राण गँवाए…
कुछ याद उन्हे भी कर लो, जो लौटके घर ना आये…

खरं तर गाण्याची सगळी कडवी चांगली होती. त्यातली चार-पाच कडवी निवडली गेली. 19 जानेवारीपर्यंत काव्य आणि चाल फायनल झाली. पण गाण्याची चाल सी. रामचंद्र यांना ‘सिक्रेट’ ठेवायची होती. म्हणून त्यांनी रिहर्सल न करता 22 तारखेला कोरस गायकांना बोलावून फक्त पहिल्या ओळीची चाल सांगितली (शब्द नाही) आणि वादकांना फक्त शेवटच्या तीन ओळींचं नोटेशन लिहून दिलं. त्यांनी तेच फक्त वाजवायचं होतं. गाणं आशाकडून गाऊन घ्यायचे होते. काही कारणानं ते रद्द होऊन लताकडे आले. गाण्याची सुरूवात हॅपी मूडमधे आहे. ते नंतर सॅड होतं. गाणं सिक्रेट ठेवण्याचं कारण हे होतं की करुण रसातील गाणंसुध्दा देशभक्तिपर गीत होऊ शकतं. त्यासाठी प्रत्येक वेळी वीररसाचा आवेश असलाच पाहिजे असं नाही. सी. रामचंद्र यांची ही कल्पनाच काहीशी वेगळी होती. लताकडून गाण्याची रिहर्सल फक्त आदल्या दिवशी म्हणजे सव्वीस जानेवारीला केली गेली. कोरस गायक आणि वादक यांनी मात्र त्यांना आधी नोटेशन दिल्याप्रमाणे रिहर्सल केली होती. सत्तावीस तारखेला दुपारी दोन वाजता कार्यक्रम होता. त्याच दिवशी कोरसचे गायक, सर्व वादक मंडळी सकाळी 11 वाजता दोन विमानं भरून दिल्लीत आली.

स्टेडियमवर चार संगीतकारांना त्यांचं त्यांचं एकेक गाणं सादर करायचं होतं. सी. रामचंद्र यांच्या गाण्याचा नंबर चौथा म्हणजे शेवटचा होता. बरोबर दुपारी 2.30 वाजता पंतप्रधान नेहरू आले. मदन मोहनचं ‘आपकी नजरोने समझा’ आणि जयदेवचं ‘अल्ला तेरो नाम’ ही गाणी लतानं गायली. ती 1962 मधील चित्रपटांतली नवीन गाणी होती. मग सी. रामचंद्र यांचा नंबर आला. ते काय सादर करणार आहेत हे कोणालाच माहीत नव्हतं. स्टेजवर स्वत: सी. रामचंद्र, लता आणि वादक होते. कोरस गायक नव्हते. गाण्याची सुरुवात ज्येष्ठ वादक मनोहारी सिंग यांच्या बासरीच्या पीसनं होणार होती. ‘वन.. टू.. थ्री..’ झालं, पण रिहर्सल पुरेशी झालेली नसल्यानं मनोहारी तो पीस विसरला. पुन्हा एकदा ‘वन टू थ्री’ होऊन इंट्रो म्युझिक संपलं. नंतर ‘ऐ मेरे वतनके लोगो, तुम खूब लगा लो नारा…’ या मुखड्यालाच गाण्यानं पकड घेतली. श्रोते तल्लीन होऊन, मन लावून ऐकू लागले.

सोफ्यावर आधी आरामात टेकून बसलेले पंडितजी पहिल्या तीन-चार ओळींनंतर पुढे सरकून एकटक लावून शब्दन् शब्द ऐकू लागले. शेवटी कोरसचा ‘जय हिंद… जय हिंदकी सेना..’ असा आवाज येऊ लागला, तेव्हा ते इकडे तिकडे पाहू लागले. स्टेजवर कोरस गाणारे गायक नव्हते. ते पडद्यामागे होते, पण कोरसला इको इफेक्ट दिला गेला होता. त्यामुळे ‘जय हिंद… जय हिंद की सेना… या ओळी जणू काही सर्व भारतीय, सर्व हिंदुस्तानी म्हणत आहेत असा परिणाम साधला गेला होता. गायक समोर न दिसता आवाज येत असल्याने अप्रतिम परिणाम साधला गेला होता !

या गाण्याबाबत सी. रामचंद्र यांनी त्यांच्या ‘माझ्या जीवनाची सरगम’ या पुस्तकात लिहिलं आहे, ‘सगळ्यांना गाणं आवडलं होतं. त्यातही माझ्या आवडत्या पंडितजींना ! नौशाद, राजकपूर, दिलीपकुमार यांनी अभिनंदन केलं. मेहबूबखान तर म्हणाले, ‘आपने फिल्म लाईनकी नाक उँची कर रखी !’ खरंच, तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस होता. माझ्यातल्या कलाकाराची यापेक्षा जास्त तारीफ कधीच होणार नाही ! प्रोग्रामनंतर पंतप्रधानांच्या घरी चहापान होतं. मी गेलो तेव्हा पंडितजी आणि इंदिराजी जिन्यात स्वागतासाठी उभे होते. माझे दोन्ही हात हातात धरून पंडितजी म्हणाले, ‘आपने हमको रुला दिया…’ मी काही न बोलता रडू लागलो.

प्रदीपजी, सी. रामचंद्र आणि लतादीदी या तिघांनी अजरामर करुन ठेवलेल्या गीताची अशी ही भावस्पर्शी कहाणी !

– जयंत टिळक 9819405245 jayant.tilak@gmail.com

About Post Author

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version