Home व्यक्ती आदरांजली आबासाहेब काकडे – झुंजार लोकनेते

आबासाहेब काकडे – झुंजार लोकनेते

आबासाहेब काकडे हे नगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील मोठे व्यक्तिमत्त्व. त्यांच्या जीवनात गेल्या शतकातील सर्व प्रभाव यथार्थ जाणवून जातात हे विशेष होय. त्यांच्या घराण्याचा इतिहास शिवकाळापर्यंत मागे जातो. त्या मंडळींना परिस्थितीवश बीड जिल्ह्यातून स्थलांतर करावे लागले. ब्रिटिश काळातील घराण्याचा आब, त्याबरोबर देश स्वातंत्र्याची आस, शिक्षणाची ओढ आणि घरातून व आधुनिक शिक्षणातून लाभलेले संस्कार – त्यातून उभी राहिलेली आंदोलने व घडलेले शिक्षण प्रसारासारखे विधायक काम… आबासाहेबांचे आयुष्य अनेकविध घटनांनी भरलेले आहे. त्यांना कीर्तनकार करण्याचे घरच्यांचे स्वप्न, शिक्षणप्रवाहात त्यांच्यावर प्रभाव पडतो तो कोल्हापुरातील शाहू महाराज, माधवराव बागल यांच्या सामाजिक सुधारणांचा, ते पुन्हा शेवगावी येतात तर त्यावेळी नगर जिल्ह्यात कम्युनिस्ट चळवळ फोफावलेली, ते दत्ता देशमुख, मधुकर कात्रे वगैरेंच्या डाव्या मोहिमेत सामील होतात – शेतकरी, कष्टकरी यांच्या राज्याचे स्वप्न पाहतात. स्वातंत्र्य मिळाल्यावर ते स्वप्न विरते – त्यातील विफलता जाणवते आणि आबासाहेब वळतात, त्या काळाची खरी निकड अशा शिक्षणप्रसाराच्या कार्याकडे. ते शेवगाव व शेजारचा पाथर्डी तालुका येथे शिक्षण संस्थांचे आणि विद्यार्थी वसतिगृहांचे जाळे विणतात. आबासाहेब काकडे यांनी स्थापलेली शेवगावची ‘दि फ्रेंड्स ऑफ दि डिप्रेस्ड लिग, शेवगाव’ शिक्षणसंस्था नगर जिल्ह्यात अग्रगण्य मानली जाते.

आबासाहेब काकडे यांचे डाव्या चळवळीतील गोरगरिबांसाठी रोमहर्षक लढे हा त्यांच्या जीवनातील क्रांतिकाळ आहे, परंतु त्यांनी जाणले, की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, त्याच गोरगरीब जनतेला जीवनात उभे करण्यासाठी विधायक, रचनात्मक कार्याची गरज आहे, त्यासाठी समाजबांधणीचे कार्य आवश्यक आहे. त्यांच्या जीवनातील  आंदोलनात्मक पर्व तेथे संपले आणि त्यांनी समाजशिक्षणाचे कार्य हाती घेतले. आबासाहेबांच्या शैक्षणिक कार्यात दृष्टी आहे. त्यांनी प्रथम गरीब मुलामुलींसाठी वसतिगृहे बांधणे आरंभले. सरकारी-निमसरकारी शाळा होत्या तेथे गरिबांना जाणेयेणे परवडत नव्हते. त्यांची राहण्या-जेवण्याची सोय नजीकच्या परिसरात होणे आबासाहेबांना महत्त्वाचे वाटले. त्यांनी पहिली शाळा 1961 साली सुरू केली -श्रीराम माध्यमिक विद्यालय, ढोरजळगाव. ती शेवगाव तालुक्यातच आहे.

लोकांत मिसळलेला लोकाभिमुख तरी स्वतःची दृष्टी असलेला असा हा नेता होता. त्याचे जीवन गेल्या शतकात घडले – विकसित झाले. गेल्या शतकाचे सर्व प्रभाव त्यांच्या जीवनात दिसतात आणि त्यांची सांगता विधायकता, रचनात्मकता अशा योग्य मुद्द्यावर होऊन होते. तेथूनच त्यांचे चिरंजीव शिवाजीराव त्यांच्या कार्याची धुरा उचलतात.

आबासाहेब यांचे जीवन, त्यांची कारकीर्द आणि त्यांच्यावरील जीवन प्रभाव अशा तीन लेखांत विभागले आहे. लेखक – सुभाष खर्चन. लेखांक 1. आबासाहेब काकडे : प्रेरणा कोल्हापूरची, लेखांक 2. आबासाहेब काकडे – सर्वसामान्यांचे नामांकित वकील, लेखांक 3. आबासाहेब काकडे : क्रांतिकार्यातून विधायकतेकडे.

– नितेश शिंदे, सहाय्यक संपादक

—————————————————————————————–

About Post Author

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version