महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 या दिवशी झाली. मराठी बोलणा-या तीन कोटी (त्या वेळची लोकसंख्या) जनतेचे महाराष्ट्र हे राज्य अस्तित्वात आले. तेही मुंबईसह!
‘मुंबई, बेळगाव-कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ अशी घोषणा देत काँग्रेस सरकारशी लढून, संयुक्त महाराष्ट्र समितीने जे रान उठवले, त्या लढ्याला यश मिळाले; तरी बेळगाव-कारवारचा समावेश महाराष्ट्र राज्यात होऊ शकला नाही!
बेळगाव-कारवारमधल्या मराठी भाषिकांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा हा आनंदोत्सव पाहिला, पण दुरून! थोरल्या भावाच्या लग्नाची वरात, रुग्णालयात असलेल्या दोन भावांनी रुग्णालयाच्या खिडकीतून बघावी तशी अवस्था, मराठी राज्य स्थापनेच्या आनंदोत्सवाकडे पाहताना बेळगाव-कारवारच्या मराठी माणसांची झाली होती.
संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण होते. ते सर्वसामान्यांचे आंदोलन होते. केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचे शासन होते. त्यांच्या हातात सत्ता होती. शासनाला भांडवलदारांची साथ होती. संयुक्त महाराष्ट्र समितीकडे मुंबई, बेळगाव-कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या घोषणेशिवाय काहीच नव्हते.
राज्यकर्त्यांकडे बंदुकीच्या गोळ्या होत्या तर समितीकडे आचार्य अत्रे यांचे वाग्बाण होते. बंदुकीच्या फैरी झाडून शासनकर्ते आंदोलकांचे मोर्चे उधळत होते तर आचार्य अत्रे यांच्या नुसत्या शब्दांनी काँग्रेसचे नेते दगड-जोडे खाऊन सभांमधून पळ काढत होते. आचार्य अत्र्यांच्या भाषणांचा महाप्रसाद इतक्या जणांना मिळाला की ते नेते लोकांच्या मनातून कायमचे उतरून गेले.
संयुक्त महाराष्ट्राच्या मुद्यावर काँग्रेस नेत्यांनी आरंभी ज्या वल्गना केल्या आणि कालांतराने, दिल्लीच्या नेत्यांपुढे साष्टांग नमस्कार घातले तो तर या आंदोलनातला मनोरंजक भाग आहे. तो पाहून हसू येते आणि लाजही वाटते. राज्यात स्वाभिमानी, तडफदार असली बिरुदे मिरवणारे आणि दिल्लीत श्रेष्ठींपुढे लोटांगण घालणारे नेते संयुक्त महाराष्ट्राच्या काळातही होते. किंबहुना,राज्यापेक्षा,देशापेक्षा श्रेष्ठींवर निष्ठा ठेवण्याची परंपरा ही संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनकाळापासूनच सुरू झाली.
संयुक्त महाराष्ट्र समितीने लढा उभारला, तो समर्थपणे चालवला, त्यात यश मिळवले, पण मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाल्यानंतर राज्याची सूत्रे आंदोलन चिरडणा-या, आंदोलकांवर गोळीबार करणा-या आणि मुंबई महाराष्ट्राला मिळू नये यासाठी डावपेच खेळणा-या व क्लृप्त्या करणा-या काँग्रेसच्या नेत्यांकडे गेली; आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राला प्रखर विरोध करणारे नेते या राज्याचे मुख्यमंत्री झाले. यंदा महाराष्ट्र राज्य स्थापनेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. हुतात्म्यांच्या कुटुंबीयांचा शोध घ्यायला हवा. त्यातही प्रकर्षाने नाव घ्यावेसे वाटते ते अनंत गोलतकर यांचे! पंडित नेहरूंच्या चौपाटीवरच्या सभेत, अनंत व्ही. गोलतकर यांचे पोलिसांच्या लाठीमारामुळे निधन झाले. ते गिरगावातल्या ‘राष्ट्रवैभव’ छापखान्यात बाइंडिंग खात्यात कामगार होते. ते नेहरूंच्या सभेला गेलेले असताना झालेल्या लाठीहल्ल्यात व पोलिसांनी केलेल्या अमानुष माराने त्यांना प्राण गमावावे लागले, पण पोलिसांनी, त्यांनी प्रेमप्रकरणात अपयश आल्याने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची कहाणी रंगवली.
आचार्य अत्रे यांनी या घटनेवर ‘दैनिक मराठया’तून प्रकाश टाकला. अनंत गोलतकर हे रत्नागिरी जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यामधल्या तोंडपली या गावचे होते. त्यांचे लग्न दोन वर्षे आधी झाले होते, त्या सुमारास त्यांची पत्नी गरोदर होती. घरची ही मंडळी मुळगावी राहत होती. गोलतकर मुंबईत काम करून जी कमाई करत त्यावर त्यांच्या कुटुंबाची गुजराण होत होती. अत्रे गोलतकरांच्या काकांना भेटायला गेले, तेव्हा ते हुंदके देत म्हणाले, ”आईवेगळा पोरगा गेला, म्हणून त्याच्या बापाला कुठल्या तोंडाने कळवू ? तुझं मूल जन्माआधीच पोरकं झालं हे त्याच्या बायकोला कसं सांगू?”
हे वाचताना आजसुध्दा आतडयांना पीळ पडतो. गोलतकरांना आपल्या अपत्याचे मुखावलोकन करण्याची संधीसुध्दा मिळाली नाही. त्या पोराने किंवा पोरीने आपला बापही पाहिलेला नाही. अशा स्थितीत आज ते कुटुंब काय परिस्थितीत असेल? जन्माला येण्यापूर्वीच ज्याच्या बापाला हौतात्म्य आले, ते बालक या महाराष्ट्राचे नागरिक आहे आणि ते कोणत्या परिस्थितीत आहे? ह्या विचाराने सुन्न व्हायला होते.
अशा आणखी गोष्टी आंदोलनाच्या बाबतीत घडल्या. ज्यांनी लाठ्या खाल्ल्या, गोळ्या झेलल्या, संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी घसे फोडून घेतले ते महाराष्ट्र राज्यात सामान्य नागरिकाप्रमाणे राहिले आणि ज्यांनी विरोध केला त्यांनी मात्र पोळी पिकवून घेतली आणि सर्वात महत्त्वाची शोकांतिका आहे ती बेळगावची.
12 मे 1946 या दिवशी ज्येष्ठ कादंबरीकार ग.त्र्यं.माडखोलकर यांच्या
अध्यक्षतेखाली जे साहित्य संमेलन झाले, त्या संमेलनात आचार्य अत्रे यांनी संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापनेबाबतचा ठराव मांडला होता आणि त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन सुरू झाले. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या स्थापनेचा ठराव ज्या बेळगावात झाला, तेच बेळगाव महाराष्ट्रात राहिलेले नाही!