Home संगीत गायन हृदय सजल करणारा- राग हंसध्वनी

हृदय सजल करणारा- राग हंसध्वनी

0

माझी आच संगीतातील हंसध्वनी रागाकडे नाळ बांधल्याप्रमाणे घट्ट जोडलेली आहे. हंसध्वनीवर आधारलेली लकेर वा धून कानावर पडली की आत काही तरी कारंज्यासारखे थुईथुई उल्हसित झाल्यासारखे वाटते. हंसध्वनी राग वृक्षासारखा डोलारा असावा असा नाही. लिंबाच्या झाडासारखा असेल. पिंडातील आतील काही रसायने वा प्लेट्स ‘हंसध्वनी’च्या स्वरांना चुंबकीय गतीने आकर्षित व्हाव्यात तसे मला होते. जीव मोहरून जातो.

मारवा मला दु:खी, रडवेला भासतो. मला भैरवीची कातरणारी, करूणार्द्र आर्ततासुद्धा सोसवत नाही. इतर आवडत्या रागांमध्ये मला यमन, भूप, मारू बिहाग, शुद्ध कल्याण, गोरख कल्याण हे राग गोड लागतात. ‘जा तोसे नहीं मोहे बोलूं कन्हैया’ हे लता मंगेशकर यांच्या आवाजातील गाणे हंसध्वनी रागावर आधारित आहे. फार गोड. ‘आली हासत पहिली रात’ हे लता मंगेशकर यांच्या आवाजातील अतीव गोड मराठी गीत. ‘जयोऽस्तुते श्रीमहन्मंगले’ हे गाणेही हंसध्वनीवर आधारित आहे. त्यातील समूहगानवृंदाचे आरोह-अवरोह सादरीकरण अंगावर शौर्यरसाचे रोमांच आणतात. सावरकर यांनी लिहिलेले ते गीत.

‘राष्ट्राचे चैतन्य मूर्त तूं, नीति-संपदांची, स्वतंत्रते भगवती श्रीमती राज्ञी तू त्यांची’ हे शब्द लता मंगेशकर यांच्या शब्दोच्चारात व स्वरोच्चारात ‘हंसध्वनी’ अंगणात डौलदारपणे खेळत असल्यागत वाटतात. ‘युवतीमना दारूण रण’ हे हंसध्वनीवर आधारलेले नाट्यगीत दणकेबाज, झणझणीत आहे. ते नाट्यगीत प्रभाकर कारेकर यांनीच गावे. त्यांची मैफल म्हार्दोळला श्री महालसा मंदिराच्या मंडपात चालली होती. मी शिफारसीचा चिटोरा त्यांच्यापुढे ठेवला. त्यांनी वाचून सुंदर स्मित केले. स्मित त्यांच्या चेहऱ्यावर कायमच विलसत असायचे. त्यांना ती फर्माईश इतकी आवडली, की त्यांनी मुसंडी मारल्याप्रमाणे गाणे सुरू केले. साथी-तबलजींना काय झाले ते कळते न कळते तो त्यांनीही क्षणार्धात जबरदस्त दादरा ताल सुरू केला. अनेकांनी ‘मानापमान’ नाटकातील ‘युवतीमना’ गाणे गायलेले आहे. ते गीत मूळ एका कानडी चालीवर आधारलेले आहे !

हंसध्वनी हे नावच मला आवडते. हंस म्हणजे आत्मा. हंस-ध्वनी म्हणजे आत्म्याचा ध्वनी, आतील आवाज असा अर्थ. हंसध्वनी आणि शंकरा हे राग एकमेकांपासून वेगळे ओळखण्यास सोपे नाहीत. जिरे आणि बडीशेप दुरून पाहताना गोंधळ उडावा तसे ते प्रकरण. ख्याल गायनात अमीर खांचा हंसध्वनी म्हणजे स्वरांची पूजा ! शांत शांत. मंदिरात धूप वगैरे दरवळावा तसा. रसिकलाल अंधारीया यांचा हंसध्वनी धारदार, भेदक. किशोरी अमोणकर यांचा हंसध्वनी छान, तराणा सुंदर. जसराज यांचा शांत, आकर्षक. पवनपुत्र हनुमान… ही चीज. त्यांचे शिष्य गिरीश वझालवार आणि चंद्रशेखर स्वामी यांचा हंसध्वनीही निर्जन जंगलात गुळगुळीत खडकांवरून शांतपणे निर्झराचे पाणी झुळझुळत यावे तसा. शिवकुमार शर्मा यांचा संतूर हंसध्वनी म्हणजे स्वरतुषारांचा पाऊस कडे-कपाऱ्यांवरून ओघळून खाली कोसळत यावा तसा. मी हे संतूर ध्वनिमुद्रण पुस्तक प्रकाशन सोहळ्याआधी प्रेक्षक जमतात तेव्हा त्यांची एकाग्रता साध्य करण्यासाठी वापरले आहे. मला हरीप्रसाद चौरसिया यांची एक हंसध्वनी कॅसेट पुण्याला मिळाली  होती. पुस्तकाची पारायणे करतात तशी ती कॅसेट मी कितीदा श्रवण केली, याची मोजणी कोण करेल? तुळशीदास बोरकर यांचा हार्मोनियम हंसध्वनी ऐकला आहे. मधुर व मंजुळ. रोणू मुजुमदार यांचा बासरीवरील हंसध्वनी मडगावला ऐकला होता. संस्मरणीय. हंसध्वनीचे माझे संकलन मोठे आहे. राशीद खानचा हंसध्वनी लाजवाब, संपला तरी हृदयात ओलसरपणाने रेंगाळत राहतो.

माझ्या दुसऱ्या निबंध संग्रहाचे नावच ‘हंसध्वनी’ असे आहे. ते कोकणी पुस्तक कला अकादमीत 2008 साली प्रकाशित झाले. त्या पुस्तकात हंसध्वनी हा निबंध आहे. प्रमोद प्रियोळकर यांना मी माझी तीन गाणी संगीतबद्ध करून पुस्तक प्रकाशनाआधी गाण्याची विनंती केली होती. एक गाणे हंसध्वनीवर असावे हा माझा आग्रह. त्यांनी ‘यो गो यो गो शेवण्या, सांग गो म्हज्या काना…’ हे पहिले गीत हंसध्वनीवर सादर केले. संपूर्ण सभागृहात स्वर थुईथुई नाचू लागले. नंतर तिन्ही वक्ते म्हणाले – स्वर भारीत सभागृहामुळे आमचे शब्द फिके पडले. ते प्रेक्षकांपर्यंत पोचतच नव्हते. रिबाऊंड होऊन परत  फिरत होते. संगीताची, स्वरांची, वाद्यांची, ताकद ती ही. फक्त शास्त्रीय संगीतावर आधारित सुस्वर पेशकश पाहिजे.

एक हृयस्पर्शी प्रसंग आठवतो. मी गोवा विद्यापीठाच्या कोंकणी ज्ञानकोश विभागात संशोधन सहाय्यक म्हणून सहा वर्षे काम केले. आकाशवाणीवर नव्या सेवेत रूजू होण्याआधी विद्यापीठात निरोप समारंभ झाला. भाषणे झाली. मला काही गिफ्ट्स मिळाली. स्वप्नातसुद्धा कल्पना नव्हती, इतके आनंदाश्चर्य वाटले. एक गिफ्ट होते -त्यात दोन हंसध्वनी सीडी होत्या. एक गायन व दुसरे सतारवादन. माझे हंसध्वनी प्रेम हे सर्वज्ञात.

स्त्री वा पुरूष कलाकार, गायन वा वादन, काहीही असो पण हंसध्वनी अवघ्या सात सेकंदात माझे अंतरंग भिजवून टाकतो.

काही मनुष्यांमध्ये जात्याच एक चमक, चुणूक असावी तशी हंसध्वनी रागामध्ये आहे. काही माणसे नितांत कुटुंबवत्सल असतात तसा हा हंसध्वनी वाटतो. कवी ग्रेसनी ‘व्यथालय’ हा सुंदर शब्द वापरला आहे. हंसध्वनी हे माझे व्यथालय होय. त्याचे सजल स्वर अंतरंग संतृप्त करतात. मी हयातभर हंसध्वनी श्रवण करत आलो. पोट नाही भरले. कृतज्ञतेने अजून ऐकत राहीन. नाही तर तो बिचारा मला विसरून जायचा !

– मुकेश थळी 9545827662 anushanti561963@gmail.com

About Post Author

Previous articleसोहनी झालासे कळस
मुकेश थळी हे बहुभाषी साहित्यिक, अनुवादक आहेत. त्यांना गणित आणि शास्त्रीय संगीत या विषयांत रूची आहे. ते गोवा विद्याप्रसारक मंडळाच्या शाळांत शालेय स्तरावर गणित विषयाचे अध्यापन करत. गोवा विद्यापीठाच्या कोंकणी विश्वकोश विभागात संशोधन सहायक, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागात वृत्तनिवेदक आणि भाषांतरकार म्हणून काम केले. त्यांचे कोंकणी भाषेत चार ललित लेख संग्रह आणि एक नाटक प्रकाशित आहे. कोकणी-इंग्रजी शब्दकोशाकरता सहसंपादक, कोकणी कथांचे इंग्रजी अनुवाद जे साहित्य अकादमी व फ्रंटलाईन अशा राष्ट्रीय स्तरावरच्या नियतकालिकांत प्रसिध्द आहेत. कथा, कविता, गीते आणि नाटकांचे लेखन तसेच कोकणी, इंग्रजी, मराठी नियतकालिकांसाठी स्तंभलेखक, सूत्रसंचालक, मुलाखतकार म्हणून काम केले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version