शांताबाई शेळके यांच्या ‘ही वाट दूर जाते…’ या गीताची ध्वनिमुद्रिका लोकप्रिय आहे. त्या गीतात दोन कडवी आहेत. पहिल्या कडव्यात शांताबाई स्थळाचे वर्णन करतात तर दुसऱ्या कडव्यात तिच्या मनाची स्थिती. पहिल्या कडव्यात हवेसे वाटणारे स्थळ उभे केल्यावर शांताबाई एकदम निराशेकडे झुकणारा सूर का लावतात असा प्रश्न पडू शकतो. त्या कुतूहलासारखेच आणखी एक कुतूहल माझ्या मनात गेली काही वर्षें आहे.
मी बँकेच्या कामाला वापी येथे बारा-तेरा वर्षांपूर्वी गेलो होतो. संध्याकाळी, खासगी गाडीने परतायचे होते. बरीच संध्याकाळ झाली तरी गाडीचा मालक, जो काही काम संपवण्यास गेला होता तो आला नाही. गाडीचा चालक मराठी होता. त्याने मराठी गाण्यांची एक कॅसेट लावली. ती कॅसेट आशा भोसले यांनी ऑस्ट्रेलियामध्ये एका कार्यक्रमात गायलेल्या गाण्यांची होती. ‘ही वाट दूर जाते…’ सुरू झाले आणि त्यात तोपर्यंत न ऐकलेले कडवे सुरू झाले – घे सावली उन्हाला कवळून बाहुपाशी/ लागोन ओढ वेडी खग कोटराशी येती/ एकेक चांदणीने नभ दीप पाजळावा/ हे शब्द सुखावून तर गेले. चाल मूळ गाण्याशी सुसंगत होती. शिवाय, पहिल्या कडव्यात स्थळाचे वर्णन केल्यावर दुसऱ्यात काळाची निश्चिती होते आणि अखेरीस मनोवस्था प्रस्थापित होते. म्हणजे एखादी घटना सांगताना आवश्यक तो क्रम सांभाळला गेला आहे असे जाणवते. असे असताना ध्वनिमुद्रिकेत ते कडवे समाविष्ट का झाले नाही ह्याचे नवल वाटले. थोडे संभ्रमातही पडण्यास झाले. सावली उन्हाला कवटाळायची वेळ म्हणजे संधिकाळाची, पण चांदणीने नभदीप पाजळण्यास सुरूवात व्हायला थोडा अधिक वेळ जाण्यास हवा. तिने तो भेटेल म्हणून इतका वेळ वाट बघितली आणि तो न आल्याने अखेर ‘स्वप्नातील सुखाचा स्वप्नीच वेध घ्यावा’ तशी तिची स्थिती झाली असे शांताबाईंना सांगायचे होते का? तसे असेल तर गीताची कथा झाली. एरवी, कथा/कादंबरी म्हणजे गीत आहे असे म्हटले जाते. हे गीत म्हणजे कथा आहे असे म्हटले तर चालेल का? की गीताला कथा आहे असे म्हणणे म्हणजे गीतकार अनुत्तीर्ण झाला असे समीक्षकांना वाटते? माझ्यासारखे प्रश्न आणखीही कोणाला पडले असतील. उत्तरे कोणी देईल का?
– मुकुंद वझे, vazemukund@yahoo.com