काम हमखास पार पाडण्याचे कौशल्य अंगी असणे म्हणजे हातखंडा. तर हातखंड म्हणजे मधून मधून सोडवणूक करणारा, मदतनीस (मूल, मित्र, शेजारी); तसेच अडल्यावेळी उपयोगी पडेल अशी व्यक्ती.
‘हातखंडा काम’ या वाक्प्रचारामागे एक कटू सत्य आणि भीषण वास्तवता दडली आहे. पूर्वीच्या काळी राजे-महाराजे, सुलतान, जहागीरदार यांसारखे राज्यकर्ते त्यांच्या राज्यांतील वा संस्थानातील कुशल कारागिरांकडून अलौकिक शिल्प, वास्तू किंवा स्वत:चे चित्र तयार करून घेत. पण त्यानंतर भविष्यात त्या कारागिरांनी इतरत्र कोठेही तशा तऱ्हेचे किंवा त्याहून चांगले काम करू नये म्हणून त्यांना एक आगळेवेगळे बक्षीस देत; म्हणजे त्यांचे हात छाटून टाकत! त्यावरून हातखंडा काम हा वाक्प्रचार तयार झाला असावा. चि.वि.जोशी यांच्या ‘ओसाडवाडीचा देव’ या छोटय़ा, पण सुंदर पुस्तकात सुरुवातीला ओसाडवाडीतील गणपतीच्या मंदिरातील गणपतीच्या मूर्तीचे वर्णन वाचनात येते. ते असे, ‘ही गणपतीची मूर्ती इतकी सुंदर आहे, की ती तयार करणाऱ्या कारागिरांचे हात तोडून राजाने त्याला जहागीर बक्षीस दिली होती. त्याला हातखंडा काम म्हणतात. पूर्वीचे राजेलोक कलेला अशा प्रकारचे उत्तेजन देत असत!’– उमेश करंबेळकर 9822390810
umeshkarambelkar@yahoo.co.in
———————————————————————————————————————————-